मुंबई- महापालिकेच्या विविध कामांमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या काळात झालेल्या १२ हजार कोटींच्या कामात निधीचा गैरव्यवहार, कंत्राट देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ‘ कॅग ’ ने ठेवला असून या प्रकरणांची विशेष चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात यावी व या संदर्भात प्राथमिक माहिती अहवाल ( एफआयआर ) दाखल करण्यात यावा , अशी मागणी मुंबई भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आ. अमित साटम यांनी केली आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असल्याची माहिती साटम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यावेळी उपस्थित होते.
आ. साटम यांनी सांगितले की . १९९७ ते जून २०२२ या २५ वर्षांत मुंबई महापालिकेच्या विविध कामांत ३ लाख कोटींपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. याच अनुषंगाने नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या काळात झालेल्या सुमारे १२ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांमार्फत ( कॅग ) लेखा परीक्षण करण्यात आले. यात ३ हजार कोटींची कामे कोरोनासंबंधित होती. या लेखापरीक्षणात कॅग ने अनेक कामांमध्ये सार्वजनिक निधीचा गैरव्यवहार, अधिकारांचा गैरवापर , शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. नोव्हेंबर २०१९ ते जून २०२२ या काळात महापालिकेने २१४ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांचे, निविदा न मागवताच वाटप केले. ४ हजार ७५६ कोटींची कामे ६४ कंत्राटदारांना देताना त्यांच्याबरोबर करारच करण्यात आला नव्हता . करार न केल्यामुळे महापालिकेला कंत्राटदारांविरुद्ध कायदेशीर कारवाईच करता येत नाही. ३ हजार ३५६ कोटींच्या १३ कामांत थर्ड पार्टी ऑडिटर नियुक्त करण्यात आला नव्हता , असेही आ. साटम यांनी सांगितले. कॅग च्या या अहवालानुसार राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीशांसारख्या निःपक्ष व्यक्तींचा समावेश असलेली विशेष तपास समिती ( एसआयटी ) नेमून चौकशी करावी व याप्रकरणी तातडीने एफआयआर दाखल करण्यात यावा , अशी मागणीही आ. साटम यांनी केली .