– बंधुतादिनी पाचव्या बंधुता काव्य महोत्सवाचे उद्घाटन
पुणे : “काव्य, गीत आणि संगीत यांना भाषा, प्रदेश किंवा विदेशाच्या सीमा रोखू शकत नाहीत. मानवतावादी भावविश्व गुंफणारे हे साहित्य सहजपणे सर्वदूर पोहोचते. कवी, गीतकार व संगीतकार यांनी आपल्या उत्कट प्रतिभेला ज्ञान, विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन हे काव्य क्षितिज अधिकाधीक विस्तीर्ण करावे,” अशी अपेक्षा ज्येष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके यांनी व्यक्त केली. पाचव्या बंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्ष स्थानावरून झिंजुरके बोलत होत्या.
नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या काव्य महोत्सवाचे उद्घाटन साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, स्वागताध्यक्ष हरिश्चंद्र गडसिंग, शिवव्याख्याते प्रदिप कदम, डॉ. अशोककुमार पगारिया, प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण उपस्थित होते. यावेळी पत्रकारिता आणि जनसंपर्क क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवराज चोले यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार’, तर काव्य निर्मितीसाठी ज्ञानेश सुर्यवंशी, नंदा कोकाटे, वीणा व्होरा, नंदकिशोर लांडगे, नितीन गायके, राजश्री मराठे, प्रिती वानखेडे, गजानन गायकवाड, महादेव सुरवसे, कल्पना देशमुख यांना ‘बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय, भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गेली पाच दशके बंधुतेचा विचार जनमानसात रुजविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांचा जन्मदिवस बंधुता दिन म्हणून साजरा करण्यात आला.
संगीता झिंजुरके म्हणाल्या, “कविता, संगीत आणि साहित्यावर प्रेम करणारी माणसे मानवतावादी असतात. साहित्यिकांमध्ये बंधुतेचा विचार घडवण्याची ताकद असते. जगाच्या नकाशावर बंधुतेचे स्थान अढळ करण्यासाठी बंधुतेची जाण असणारे साहित्यिक निर्माण व्हावेत. बंधुतेचा विचारातून मानवतेचे दर्शन कायम घडत आहे.”
प्रकाश रोकडे म्हणाले, “समाजामध्ये वावरत असताना माणूस होणे गरजेचे आहे. कोणत्याही जातीचे लेबल न लावता बहुभाषीय, बहुधर्मीय होत आम्ही सारे भारतीय आहोत, हा विचार आपल्या मनात रुजला पाहिजे. ‘गर्व से कहो हम बंधू है’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम सुरु आहे. समाजातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्यायाची भूमिका जपण्याचे कार्य व्हावे.”
प्रा. चंद्रकांत वानखेडे म्हणाले, “समाजाला एकसंध ठेवण्यासाठी बंधुतेचा धागा महत्वाचा आहे. जाती-धर्मातील, प्रांतातील भेदाभेद बाजूला ठेवून मानवतेच्या आणि बंधुतेच्या विचारांनी एकत्र आलो, तर जगात शांतता नांदेल. बंधुतेच्या मार्गावरील आपण सर्व पांथस्थानी हा विचार पुढे घेऊन जायला हवा.”
दुपारच्या सत्रात बंधुता प्रबोधन यात्री काव्यसंमेलन झाले. नितीन वायाळ (गुजरात), मधुश्री ओव्हाळ, गुलाब राजा फुलमाळी, प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कवी सहभागी झाले. यावेळी प्रा. संतोष काळे (पलूस) यांना बंधुता प्रकाशपर्व साहित्य पुरस्कार, डॉ. सुशील सातपुते यांना बंधुता प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार आणि गोपाळ कांबळे (पुणे) यांना बंधुता प्रकाशगाथा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. अशोककुमार पगारिया, प्रदीप कदम यांनी मनोगते व्यक्त केली. हरिश्चंद्र गडसिंग यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. बंडोपंत कांबळे यांनी आभार मानले.