प्रा. डॉ. मंगेश कराड: एमआयटी एडीटी विद्यापीठात ईएलटी समिट
पुणे : इंग्रजी भाषा व साहित्य यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व सरस होते आणि त्यातून समाजाकडे, देशाकडे पाहण्याची एक दृष्टी विकसित होते. त्यामुळे, समाजाच्या उन्नतीसाठी अशा परिषदेच्या माध्यमातून चर्चा घडवून आणल्या पाहिजेत, असे विचार एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केले.
ते इंटरनॅशनल सोसायटी फॉर एज्युकेशनल लीडरशिप (आयएसईएल, यूएसए, ऑस्ट्रेलिया आणि भारत) आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ईएलटी समिट २०२३ या आभासी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा. डॉ. अनंत चक्रदेव, आयएसईएल युएसएचे ध्रुव जोशी, ईएलटी समिटचे सल्लागार डॉ. तरुण पटेल, स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे संचालक आणि ईएलटी समिटचे समन्वयक डॉ.अतुल पाटील आदी या प्रसंगी उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना डॉ. राॅबर्ट फिलबॅक म्हणाले की, प्रत्येकाला इंग्रजी शिकण्यास प्रवृत्त करण्यासाठी व त्यासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ईएलटी सारख्या चर्चासत्रांचे आयोजन करणे आवश्यक आहे. तर भाषा समाजावर प्रभाव टाकते आणि परिवर्तन आणि नावीन्य आणते, ज्याचा विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच इतर क्षेत्रांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. मानवाच्या आणि भाषेच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्रित येऊन ईएलटी समिट २०२३ सारखे उपक्रम राबविले पाहिजेत, असे डॉ. पीटर वॅटकिन्स यांनी ईएलटी समिटच्या समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रतिपादन केले.
या समिटच्या चर्चासत्रांत डॉ. रॉबर्ट फिलबॅक (युएसए), डॉ. जुडिथ हँक्स (यूके), डॉ.कॅथरीन अकर्सो (कॅनडा), डॉ. ब्रेंडा मुझेटा, (यूएसए), मार्शा जिंग-जी लिया (यूके), मौसमी गुहा बॅनर्जी, डॉ. परेश जोशी, डॉ. हरिबाबू थम्मिनेनी, ज्योती रमेश पै, डॉ. शालिनी शर्मा आदि तज्ञ लोकांनी आपले विचार व्यक्त केले. यासोबतच या समिटमध्ये संशोधन पेपर सादरीकरण, पॅनेल चर्चा, नेटवर्किंग आदी सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. उल्लेखनिय बाब म्हणजे, या परिषदेदरम्यान, यूएसए, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूके, भारत आणि इतर अनेक देशांतील सहभागींनी १०० हून अधिक शोधनिबंध सादर केले. ज्यामुळे ही परिषद अत्यंत यशस्वी ठरली. डॉ.अशोक घुगे यांनी उद्घाटनाप्रसंगी, तर प्रा.अमिषा जयकर व प्रा. स्नेहा वाघाटकर यांनी समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पुणे, दि. ५ – सर्व सामान्य नागरिकांना स्वतःचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत असून येत्या वर्षभरात विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत सुमारे १ लाख कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले.
पुणे मंडळाच्यावतीने जिल्हा परिषद येथे आयोजित सदनिका संगणकीय सोडत समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील आदी उपस्थित होते.
श्री. सावे म्हणाले, नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ देण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार राज्य व केंद्र शासन मिळून प्रधानमंत्री आवास योजनांसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन दिली जात आहेत. पुणे म्हाडाच्या आजच्या सोडतीत उपलब्ध सदनिकांच्या तुलनेत सुमारे दहापटीने अर्ज प्राप्त झाले. सदनिकांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करुन म्हाडावर विश्वास दाखविल्याबद्दल त्यांनी नागरिकांना धन्यवाद दिले. म्हाडाच्यावतीने नागरिकांना ५ लाख १४ हजार घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. म्हाडाची सोडत प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अतिशय पारदर्शक आहे, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही श्री.सावे म्हणाले.
मुंबईतील सुमारे ७५ हजार गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध प्रकल्प उभारण्यात येत आहे. आगामी काळातही विविध उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यापुढे घरांची सोडत वर्षातून दोन वेळेस घेण्यासाठी म्हाडानी प्रयत्न करावेत. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अधिकाधिक नागरिकांना परवडणारी घरे देण्यासाठी प्रयत्न करावेत. पुणे विभागात विविध गृहनिर्माण योजनेकरीता शासकीय भुखंड उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी गती देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना श्री. सावे यांनी दिल्या.
सोडतीमध्ये घर मिळालेल्यांचे अभिनंदन करतांना ज्यांना घरे मिळाले नाहीत, त्यांनी निराश न होता आगामी काळात होणाऱ्या सोडतीमध्ये पुन्हा अर्ज करावेत, असे आवाहन श्री. सावे यांनी केले.
श्री. जयस्वाल म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घरे उपलब्ध करुन देत त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी म्हाडाच्यावतीने सुमारे ९ लाख परवाडणाऱ्या घरांची निर्मिती केली आहे. पुणे म्हाडाच्यावतीने विविध उतपन्न गटातील सुमारे ३५ हजार सदनिका, ७ हजार ८०० भुखंड आणि ७५५ गाळे वितरीत करण्यात आले आहे. सद्यस्थितीत विविध योजनेअंतर्गत ३ हजार ७४० सदनिकांची निर्मिती प्रगतीपथावर आहे. म्हाडातर्फे ५९२ भूखंड वितरीत करण्यात आले आहे. जुन्या इमारतींचे पुर्नविकास करण्याची कार्यवाही करण्याच्यादृष्टीने गती देण्याचे प्रस्तावावर कार्यवाही सुरु आहे.
म्हाडाच्यावतीने घेण्यात येणारी घरांची ऑनलाईन सोडत अतिशय पारदर्शक, मानवी हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना सुलभरित्या घरे मिळत असल्याने त्यांच्या मनात शासनाप्रती विश्वास अधिक वृद्धिंगत होत आहे. यापुढेही म्हाडाच्यावतीने विविध घरांच्या विविध सोडती होणार असून नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जयस्वाल यांनी केले.
यावेळी श्री. सावे यांच्या हस्ते विजेत्यांना निकालपत्रे देण्यात आली.
सोडतीचा तपशील पुणे म्हाडाच्या ५ हजार ८६३ घरांसाठी ५९ हजार ३५० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेच्या ४०३ घरांसाठी १ हजार ७२४, प्रधानमंत्री आवास योजना ४३१ घरांसाठी २७०, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना २ हजार ५८४ घरांसाठी ५६ हजार ९४१ आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (म्हाडा गृहनिर्माण योजना) साठी २ हजार ४४५ घरांसाठी ४१५ अर्ज प्राप्त झाले. सोडतीचा निकाल म्हाडाच्या संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावरही उपलब्ध आहे. नागरिकांनी संकेतस्थळाला किंवा कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन म्हाडाच्यावतीने करण्यात येत आहे.
पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने पुरस्कार वितरण : संस्थेचा १५३ वा वार्षिकोत्सव
पुणे : समाजामध्ये प्रार्थना समाजा सारख्या संस्थांची गरज आहे. पुणे प्रार्थना समाज विविध उपक्रम समाजातील लोकांसाठी राबवत असते. अशा उपक्रमांतून शाश्वत मूल्ये समाजात रुजवली जात आहेत. त्यामुळे आजच्या काळात प्रार्थना समाजासारख्या संस्थांची गरज आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले. पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने १५३ व्या वार्षिकोत्सवानिमित्त विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा झाला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डाॅ. सुषमा जोग, चिटणीस डॉ. दिलीप जोग, शिल्पा मुजुमदार, नमिता मुजुमदार, मीरा भरवीरकर, उषा शर्मा, प्रशांत पाडवे, धनराज निंबाळकर उपस्थित होते. प्राज इंडस्ट्रीजचे डाॅ.प्रमोद चौधरी यांना डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार, सुमेधा चिथडे यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, कॉकलिया पुणे संस्थेला डेव्हिडा रॉबर्ट्स् पुरस्कार प्रदान करण्यात आले. कॉकलिया पुणे संस्थेच्या वतीने रक्षा देशपांडे आणि डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी पुरस्कार स्वीकारले. सुमेधा चिथडे म्हणाल्या, सैनिक हाच माझ्यासाठी देव आहे. कारण राष्ट्रावर जेव्हा संकट येते तेव्हा सैनिक त्या संकटाला सामोरा जातो. सियाचिन येथे सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लॅट जेव्हा उभा करायचा होता, तेव्हा समाजातील अनेकांनी मदत केली. परंतु त्यासाठी सुरुवात स्वतःपासून करावी लागते. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये राष्ट्र लागते, आणि त्या राष्ट्राचे आपण देणे लागतो, असेही त्यांनी सांगितले. रक्षा देशपांडे म्हणाल्या, ऐकणे शिकविण्यापासून ते बोलणे शिकविण्यापर्यंत काॅकलिया संस्थेचा हा प्रवास आहे. कर्णबधिरत्व हे एकमेव अपंगत्व आहे ज्याचे निदान वेळीच म्हणजे वयाच्या ६ वर्षाच्या आत झाल्यास त्यावर मात करता येते. त्यामुळे ज्यांना उपचारांची गरज आहे, अशा मुलांना आमच्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डाॅ. प्रमोद चौधरी यांनी पुणे प्रार्थना समाजाच्या कार्याचे कौतुक केले. डाॅ. सुषमा जोग यांनी संस्थेच्या समाजाभिमुख उपक्रमांची माहिती दिली. शिल्पा मुजुमदार यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील २१५ रिक्त पदांपैकी १११ जागांवर पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती होणार आहे. त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, आठवड्याभरात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांतील रिक्त जागांचा प्रश्न काही प्रमाणात कमी होणार आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक भरती न झाल्याने विविध शैक्षणिक विभागातील जवळपास निम्म्यापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. काही विभागांमध्ये एकच प्राध्यापक, प्राध्यापकांवर अतिरिक्त कार्यभाराचा ताण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्राध्यापक नसल्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर, तसेच विद्यापीठाच्या क्रमवारीवरही होतो. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी म्हणून विद्यापीठाकडून कंत्राटी पद्धतीने प्राध्यापक भरती केली जाते. त्यानुसार नुकतीच १३३ प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली.राज्यातील विद्यापीठांतील रिक्त जागांच्या भरतीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठाला १११ रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार या पदांच्या भरतीची प्रक्रिया विद्यापीठाकडून सुरू करण्यात आली. बिंदुनामावलीसारखी तांत्रिक प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर विद्यापीठाला पूर्णवेळ प्राध्यापक उपलब्ध होऊ शकणार आहेत. विद्यापीठ आता नॅक मूल्यांकन प्रक्रियेला सामोरे जाणार आहे. नॅक मूल्यांकनामध्ये प्राध्यापकांची संख्या, विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर हे घटक महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे नॅक मूल्यांकनापूर्वी पूर्णवेळ प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
पुणे दिनांक ४ डिसेंबर२०२३ – गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) शिरोळे प्लॉटमधील विनापरवाना शॉपिंग मॉलवरील कारवाईची स्थगिती उच्च न्यायालयाने उठवताच महापालिकेच्या बांधकाम विभागाने तेथील ७० स्टॉलवर कारवाई केली. यामध्ये ७ हजार चौरस फुटाची जागा अतिक्रमण मुक्त केली.
शिरोळे प्लॉटमध्ये लोखंडी एंगल, गर्डर पत्र्यांच्या सहाय्याने दोन मजली विनापरवाना मॉल तयार करण्यात आला होता. यामध्ये ७० दुकाने होती. महापालिकेने या ठिकाणी कारवाईची नोटीस बजावल्यानंतर यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर स्थगिती देण्यात आल्याने गेल्या आठ वर्षापासून महापालिकेला कारवाई करता आलेली नव्हती.महापालिकेने उच्च न्यायालयात स्थगिती उठवली, पुन्हा त्यावर स्थगिती येऊ नये यासाठी न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. त्यानंतर आज (ता. ४) तातडीने कारवाई करून ७ हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले.या विनापरवाना मॉल मुळे गोखले रस्त्यावर वाहतुकीवर ताण येणे, मॉलमध्ये हवा उजेडाची सोय नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाली असती त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी कपड्याच्या दुकानांची संख्या जास्त होती, कारवाई करताना आग लागण्याची शक्यता असल्याने अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले होते.शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस, महापालिकेचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, समीर गडइ यांनी ही कारवाई पूर्ण केली.यामध्ये एक जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, १५ बिगारी व पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला, अशी माहिती उप अभियंता सुनील कदम यांनी दिली.
पुणे दिनांक ४ डिसेंबर२०२३ – महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची इमारत सक्तीने ताब्यात घेण्याची कारवाई महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे सोमवारी (ता. ४) रात्री सुरू केली. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने मोडकळीस आलेला हा धोकादायक वाडा रात्रीच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आला. पुणे महापालिका आणि पोलिसांनी गनिमी काव्याच्या मार्गाने ही कार्यवाही करत भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही न झाल्याने महापालिका प्रशासनाने येथील व्यावसायिकांना सोमवारी सकाळी नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर दुपारी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या दालनात पालिकेचे वरिष्ठ अधिकारी व पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची बैठक झाली. त्यामध्ये वाडा ताब्यात घेण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास बांधकामे पाडण्यास प्रारंभ झाला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पोलिस उपायुक्त गिल, पालिकेचे उपायुक्त माधव जगताप, प्रतिभा पाटील यांच्यासह शंभरहून अधिक पोलिस कर्मचारी व महापालिकेचे पन्नासहून अधिक कर्मचारी भिडेवाडा ताब्यात घेण्याच्या कारवाईत सहभागी झाले होते.
फुले दांपत्याने भिडे वाड्यात १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा सुरु केली. त्याच्या स्मरणार्थ या वाड्यात राष्ट्रीय स्मारक केले जावे यासाठी महापालिकेत ठराव झाला होता.
नंतर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर गेली १३ वर्षा उच्च न्यायालयात खटला सुरू होता. उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची हा निर्णय कायम ठेवण्यात आला. तसेच ही जागा एका महिन्याच्या आत महापालिकडे हस्तांतरित करण्याचे आदेश जागामालक व भाडे करून दिले होते.
ही मुदत ३ डिसेंबरला संपल्याने महापालिकेने आज (ता. ४) पोलिस बंदोबस्तात भूसंपादनाची प्रक्रिया सुरु केली. आज सकाळी महापालिकेच्या भूसंपादन विभागाचे अधिकाऱ्यांनी भिडे वाड्यातील जागा मालक व भाडेकरूंना नोटीस बजावण्यात आली भिडेवाड्यातील भाडेकरूंनी जागा ताब्यात देण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती ही याचिका देखील आज फेटाळून लावण्यात आली आहे.
ही जागा ताब्यात घेण्यास आणखी विलंब होऊ नये यासाठी महापालिकेने पोलिसांशी समन्वय साधून आज रात्री जागा ताब्यात घेण्यासाठी नियोजन केले. रात्री साडेनऊ वाजल्यापासूनच भेडे गाड्यांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त येणार करण्यात आला. रात्री पावणे अकराच्या सुमारास पुणे महापालिकेच्या विविध क्षेत्रिय कार्यालयामधून सुमारे ५० बिगारी हातोडी पहार, कटवणी, दोरी साहित्य घेऊन यासाठी आले.
रात्री ११ च्या सुमारात वाडा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली.
यावेळी कोणतीही अनुसूच घटना घडू नये यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली होती.
असा घेतला वाडा ताब्यात
– पोलिसांकडून वाडा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू
– शिवाजी रस्त्यावरील वाहतूक थांबवली
– पदापथावरील पथदिवे, बोलार्ड काढण्यात आले.
– वाड्यावर झालेले पोस्टर, झेंडे, दुकानांच्या पाट्या काढण्यात आल्या
– जेसीबीने दुकानाच्या पाट्या करताना वाड्याचा काही भाग कोसळला
– दुकान उघडून पंचनामा करण्यात आला
– गॅस कटरने दुकानांचे शटर तोडण्याचे काम सुरू
– दोन जेसीबीच्या सहाय्याने मोडकळीस आलेला वाडा पाडण्याचे काम सुरू.
– इमारत धोकादाय झाल्याने आपोआप काही भाग कोसळत होता
– डंपर मधून वाड्याचा राडाराडा त्वरित रस्त्यावरून हटविण्याचे काम सुरू
” सर्वोच्च न्यायालयाची मुदत उलटून केल्याने महापालिकेने पोलिसांना भिडे वाडा ताब्यात घेण्याचे नियोजन केले. रात्री पोलिसांनी ही वास्तू ताब्यात घेऊन महापालिकेकडे हस्तांतरित केली. यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडताना नियमांचे पालन करण्यात आलेले आहे. ही कार्यवाही शांततेत पार पडली.”
– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त
महापालिकेने भिडे वाड्यामध्ये राष्ट्रीय स्मारक करताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उचित गौरव करण्यासाठी स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु केले आहे. त्यासाठी तीन वास्तूविशारदांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील काही आठवड्यामध्ये या ठिकाणी स्मारकाच्या कामाचे भूमीपूजन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिवाजी रस्त्यावर बुधवार पेठेतील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. या निर्णयाला जागामालक व पोटभाडेकरूंनी २०१०मध्ये पहिल्यांदा उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी असलेल्या याचिका निकाली काढून महापालिकेने यापूर्वी केलेल्या निवाड्यानुसार; तसेच २०१३मधील कायद्यानुसार जागेचा मोबदला देण्याचा आदेश दिला. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांनी दिलेल्या निकालात या स्मारकास लागलेला १३ वर्षांचा कालावधी योग्य नसल्याची टिप्पणी केली होती. हे स्मारक यापूर्वीच व्हायला हवे होते. न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याने दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्नही याचिकाकर्त्यांपुढे न्यायमूर्तींनी उपस्थित करण्यात आला होता. या आदेशांविरोधात पुर्नविलोकन याचिका दाखल करण्यात आली असली तरी यापूर्वीच्या आदेशांना स्थगिती मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करत भिडेवाड्याच्या जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली.
मुंबई : कलेच्या क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत त्यांना प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध व्हावी म्हणून तालुकास्तरावर 75 ठिकाणी नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 386 कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले.
मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील नोंदणीकृत 41 संस्थांना सहाय्यक अनुदान धनादेश वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री मुनगंटीवार म्हणाले, शासन प्रयोगात्मक कलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या पाठीशी आहे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत त्यांना मदतीचा हात शासनाकडून दिला जात आहे. आज विज्ञान युगात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे पण सुख समृद्धीचा अभाव दिसत आहे, समाधान लोप पावत आहे. कलावंतांनी राज्याचा सांस्कृतिक जपत आपले काम सुरू ठेवावे.
प्रधान सचिव विकास खारगे म्हणाले, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचे काम कलेच्या क्षेत्रातील या संस्था करतात आपले कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव जपण्याचे काम शासनासोबत आपणही करत आहात.
कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले. कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत तसेच प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
धनादेश वाटप संस्थेची यादी खालील प्रमाणे
पटेल कल्चर फाउंडेशन मुंबई, वैभव सांस्कृतिक कला मंडळ नागपूर, अजित बालक मंडळ नागपूर, जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक नागपूर या संस्थांना (प्रत्येकी 2 लाख रुपये.), अय्यर फाउंडेशन मुंबई, संक्रीता फाउंडेशन मुंबई, प्रारंभ कला अकादमी ठाणे, तक्षशिला नृत्य कला मंदिर ठाणे, शाहीर शामराव खडके सांस्कृतिक लोककला मंडळ सावर्डी सोलापूर, जय भवानी कलापथक सांस्कृतिक मंडळ जवळा सोलापूर,सुंदरी सम्राट कै. सिद्राम जाधव सांस्कृतिक कला मंडळ सोलापूर, सप्तरंग थिएटर्स अहमदनगर, स्वानंद सांस्कृतिक मंडळ नागपूर, आदित्य बहुउद्देशीय संस्था रामटेक नागपूर, पिराजी बहुउद्देशीय संस्था नागपूर, ऑरेंजसिटी बहुउद्देशीय संस्था नागपूर, प्रेरणा अल्पसंख्यांक महिला बाल व युवक कल्याण सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्था वाशिम या संस्थांना (प्रत्येकी एक लाख रुपये).
बोधी नाट्य परिषद मुंबई, श्री. वल्लभ संगीतालय मुंबई, विश्राम ठाकर आदिवासी कला अंगण चारीटेबल ट्रस्ट पिंगळी गुढीपूर सिंधुदुर्ग, मराठी साहित्य सांस्कृतिक व कला मंडळ नवी मुंबई, स्वप्निल सपना लोककला विकास मंडळ मानेगाव सोलापूर, स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान जळगाव, चंदन युवक शिक्षण व्यायाम विकास क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर, श्रीकृष्ण सांस्कृतिक व ग्रामीण विकास संस्था नादरपूर छत्रपती संभाजीनगर , जय साई नटराज नाट्य चित्रपट कला व सांस्कृतिक संस्था छत्रपती संभाजीनगर , सामाजिक जनजागृती कला विकास छत्रपती संभाजीनगर, बालगंधर्व सांस्कृतिक कला क्रीडा व युवक मंडळ परभणी, स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था सिने स्टार अकादमी नांदेड, मानवसेवा सामाजिक प्रतिष्ठान बीड, प्रगती सेवाभावी संस्था पाडळी बीड,
नटराज क्रीडा मंडळ नागपूर, रखुमाई सेवा मंडळ नागपूर, पंचरंगी निशाण खडीगंमत मंडळ नागपूर, जनजागृती कलंगी शाहीर मंडळ नागपूर, नागरी सांस्कृतिक व बहुसंस्था गोंदिया,स्व. विनायक राखोंडे प्रतिष्ठान पातुर, साने गुरुजी कला व सांस्कृतिक कार्य क्रीडा बहु मंडळ अकोला, शाहू फुले आंबेडकर फाउंडेशन बुलढाणा, लोकसेवा राष्ट्रीय सांस्कृतिक नाट्य मंडळ वाशिम, जय तुळजाई ग्रामीण बहु संस्था उमरसा यवतमाळ या संस्थांना (प्रत्येकी 50 हजार) रुपयांचा धनादेश देऊन अनुदान वाटप करण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते ज्युनियर महमूद पोटाच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. अलीकडेच दिग्गज कॉमेडियन जॉनी लीव्हरने त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये 67 वर्षीय ज्युनियर महमूद खूपच कमजोर दिसत आहेत.काही अहवालांवर विश्वास ठेवला तर, ज्युनियर महमूदच्या पोटातून लवकरच शस्त्रक्रियेद्वारे ट्यूमर काढला जाईल. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.
ज्युनियर मेहमूदचे खरे नाव नईम सय्यद आहे. ज्युनियर मेहमूद हे नाव त्यांना खुद्द प्रसिद्ध कॉमेडियन मेहमूद अली यांनी दिले होते.ज्युनियर महमूदने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. ब्रह्मचारी, मेरा नाम जोकर, दो और दो पांच आणि परवरिश या चित्रपटांमध्ये दिसले होते.पुढे त्यांनी काही मराठी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. याशिवाय त्यांनी ‘तेनाली रामा’ आणि ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ सारख्या मालिकांमध्येही काम केले आहे.मेहमूदचा भाऊ सलाम काझी म्हणाला, ‘ज्युनियर मेहमूदला पोटाचा कर्करोग आहे. त्यांचा रक्तदाब आणि साखरेचा दाब वाढल्याने त्याचे वजन सुमारे २० किलोने कमी झाले आहे. पण तरीही चांगला प्रतिसाद देत आहेत.
रणबीर कपूरचा एक बिग बजेट चित्रपट येणार आहे. वास्तविक, ते नितेश तिवारीच्या ‘रामायण’ चित्रपटाचा भाग असणार आहेत. एवढेच नाही तर एका भागाचे शूटिंगही मुंबईत सुरू झाले आहे. मात्र, या चित्रपटाच्या मुख्य कलाकारांचे शूटिंग मार्चपासून सुरू होणार आहे. या चित्रपटासाठी हॉलिवूडच्या ऑस्कर विजेत्या तांत्रिक क्रूसोबत सहकार्य करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गेल्या 20 दिवसांपासून याचे शूटिंग सुरू आहे. आता ते आणखी दीड महिना सुरू राहणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग जवळपास अडीच महिने चालणार आहे. चित्रपटातील मुख्य कलाकारांसोबत जे शूटिंग होणार आहे. नवीन वर्षात त्याची सुरुवात होईल. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि केजीएफ अभिनेता यश मार्च महिन्यापासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.
सूत्राचे म्हणणे आहे की, सुरुवातीच्या टप्प्यात ज्याप्रमाणे हॉलिवूडच्या अवतारचे शूटिंग झाले होते. त्याचप्रमाणे सध्या येथे ‘रामायण’ रंगवले जात आहे. वास्तविक, मुख्य भूमिकेसोबतच रामायणात इतरही शेकडो भूमिका आहेत. आजकाल, उर्वरित पात्रांचे मॉक शूट केले जात आहेत. नंतर, VFX दरम्यान स्पेशल इफेक्ट्सच्या मदतीने, ते सूट रामायण काळातील सैनिक आणि राजे आणि सम्राटांच्या पोशाखात बदलले जातील.
या चित्रपटात साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहे. निर्मात्यांनी यापूर्वी आलिया भट्टला सीतेची भूमिका ऑफर केली होती. पण नवीन वर्षात आलिया भट्टची प्राथमिकता संजय लीला भन्साळीच्या बैजू बावरासोबत आहे. दोन्हींच्या तारखा जुळत नव्हत्या. अशा परिस्थितीत निर्मात्यांना दक्षिणेतील एका मोठ्या अभिनेत्रीला कास्ट करावे लागले. अखेरीस साई पल्लवीला कास्ट करण्यात आले. रावणासाठी अर्थातच, निर्माते KGF च्या रॉकी भाई फेम यशच्या पुढे जात आहेत. हनुमानासाठी सनी देओलला कास्ट करण्यात आले आहे.
ड्युन व्यतिरिक्त, टेक्निकल क्रू ज्यांनी ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ वर देखील काम केले त्यांना रामायणाच्या निर्मात्यांनीही कामावर घेतले आहे. मॉक शूटची प्रक्रिया सामान्यतः ऐतिहासिक आणि पौराणिक शैलीतील चित्रपटांमध्ये वापरली जाते. यामध्ये कलाकारांना प्रत्यक्ष शूटवर जाण्यापूर्वी स्पेशल सूटमध्ये मोशन कॅप्चर केले जाते. नितीश तिवारी सध्याच्या शूटिंगमध्ये गुंतलेले नाहीत. सध्या निर्माते नमित मल्होत्राची तांत्रिक टीम या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. ते तयार होणारे उत्पादन पाहिल्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार नितीश तिवारी नवीन वर्षात शूटिंगमध्ये सहभागी होणार आहेत.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; जागतिक एड्स दिनानिमित्त बावधन परिसरात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन पुणे : जागतिक एड्स दिनानिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप इन्स्टिट्यूट्समध्ये भव्य रांगोळीतून एड्स जनजागृतीचे सांकेतिक चिन्ह साकारण्यात आले. ५० फूट बाय ५० एवढ्या मोठ्या आकाराची रांगोळी अवघ्या तीस मिनिटांत रेखाटण्याचा विक्रम नोंदवला गेला. या विक्रमी उपक्रमात ‘सूर्यदत्त’च्या बॅचलर ऑफ फिजिओथेरपीच्या ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी सकाळच्या वेळेत बावधन परिसरात एड्स जागृती पदयात्रा काढली. ‘संघर्ष और सहयोग-एड्स की कहाणी’ या पथनानाट्याचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली बॅचलर ऑफ फिजिओथेरपीच्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. जागतिक एड्स दिनाचे प्रतीक असलेले रेड रिबीन रांगोळीत साकारले. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्य डॉ. सिमी रेठरेकर आणि सहायक प्राध्यापक डॉ. अंजली शर्मा यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सहयोगी उपाध्यक्षा प्रा. स्नेहल नवलखा, संचालक प्रशांत पितालिया, रोहित संचेती यांच्यासह या भागातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एकाच दिवसात तीन उपक्रम केल्याबद्दल प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सुषमा चोरडिया यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. म्हणाले की, “रॅली, पथनाट्य आणि एड्सच्या प्रतीकाची सर्वात मोठी रांगोळी हे एड्सबद्दल समाजात जनजागृती करण्यासाठीचे उपक्रम आहेत. अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग हा एक प्रकारे तरुणांना संदेश देणारा आहे. रेड रिबीन हे एचआयव्ही एड्सच्या जागृती आणि एचआयव्ही पीडित समुदायांना आधार देण्याचे, तसेच एकात्मतेचे प्रतीक आहे. ‘लेट कम्युनिटीज लीड’ ही यंदाच्या जागतिक एड्स दिनाची संकल्पना आहे. विद्यार्थी हा समाजाचा प्रमुख भाग असून, विद्यार्थ्यांमध्ये व त्यांच्यामार्फत जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम या संकल्पनेला पूरक आहे. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीची स्थापना २०२१ मध्ये झाली असून, हे महाविद्यालय नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित आहे. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या अंतर्गत सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीने नेहमीच सामाजिक जनजागृती कार्यक्रमात, तसेच समाजातील गरजू लोकांना वैद्यकीय साहाय्य व मार्गदर्शन देण्यात पुढाकार घेतला आहे. आजवर कर्करोग जागृती शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, कृत्रिम अवयवांचे वाटप शिबीर आदी उपक्रम सूर्यदत्त एज्यु-सोशियो कनेक्टच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत. दर्जेदार शिक्षण व त्याला अवांतर उपक्रमांची जोड यातून विद्यार्थ्यांमधील नावीन्यतेला व कल्पकतेला प्रोत्साहन मिळते आणि त्यातून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, यावर सूर्यदत्त ग्रुपचा विश्वास आहे. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी शिकण्याच्या अनेक संधी मिळाल्या असून, त्याचा उपयोग त्यांच्या एकंदरीत प्रगतीमध्ये झालेला आहे. सूर्यदत्त सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून, त्याची राष्ट्रीय व जागतिक स्तरावर अनेक विक्रमांमध्ये नोंद होत आहे. यापूर्वी ‘सूर्यदत्त’ने ‘ट्वेन्टी फॉर अवर्स सायलेंट व्हीरीडेथॉन’ ज्यामध्ये शांततेचे निरीक्षण करत वाचन, लेखन, शिकणे, विचार करणे असा विक्रम प्रस्थापित केला होता. ‘अनफोल्ड द ब्लाइंडफोल्ड’ या विक्रम अंध व्यक्तींना येणाऱ्या आव्हानांचा अनुभव घेत नेत्रदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. सलग २५ तास देशभक्तीपर गायनाचा ‘काव्याथॉन’ हा उपक्रम घेण्यात आला. ८००० किलो गरम, ताजी व पौष्टिक पुणेरी मिसळ सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ४० हजार लोकांना वाटण्याचा ‘महामिसळ’ हा उपक्रम विक्रमी झाला होता. स्वरांवर आधारित सर्वात जास्त वेळ योग करण्याचा ‘कलाआरोग्यम योगाथॉन’ या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच ‘तालआरोग्यम योगाथॉन’मध्ये तालावर आधारित सर्वाधिक वेळ योग करण्याचा विक्रम ‘सूर्यदत्त’च्या नावावर नोंदवला गेला आहे, असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
पीसीईटीच्या रेडीओ चा कम्युनिटी रेडिओ एक्सेलन्स पुरस्कार देऊन गौरव पुणे (दि. ४ डिसेंबर २०२३)- देशामध्ये आता कम्युनिटी रेडिओचा प्रभाव वाढत आहे. आगामी काळात रेडिओच्या माध्यमातून केंद्रीय पद्धतीने अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येईल. याचा उपयोग शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, शेती, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रासाठी होईल. त्यामुळे मानवी जीवनस्तर उंचावण्यावेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे प्रतिपादन मानस आयुष मंत्रालयाचे संचालक विक्रम सिंग यांनी व्यक्त केले. नवी दिल्ली, युनेस्को भवन येथे “कम्युनिटी रेडिओ एक्सेलन्स २०२३” या गौरव सोहळ्यात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ ९०.४ एफएमचा ‘नाविन्यपूर्ण संवाद पद्धती’ (INNOVATIVE COMMUNICATION PRACTICES) या श्रेणीअंतर्गत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी दळणवळण आणि माहिती सल्लागार, साऊथ आफ्रिका, युनेस्को हिझेकील डलामिनी, संचालक, CEMCA डॉ. बी. शद्रच , निवड समितीचे अध्यक्ष प्रा. अशोक ओग्रा , अतिरिक्त संचालक, सीआरएस, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार गौरीशंकर केसरवाणी आदी उपस्थित होते. इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या निर्मिती प्रमुख माधुरी ढमाले व कार्यक्रम अधिकारी विराज सवाई यांनी पुरस्कार स्वीकारला. आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशिया, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अनेक उपक्रमांचे आयोजन केले होते. या उपक्रमाचे उत्कृष्ठ सादरीकरण केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. पीसीईटीचे डिजिटल मार्केटिंग प्रमुख डॉ. केतन देसले यांनी त्यावेळी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून उत्कृष्ठ नियोजन केले होते. योगाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भारतभरातील सुमारे २०० कम्युनिटी रेडिओंनी या उपक्रमात भाग घेतला होता. यापैकी २० रेडिओंच्या प्रभावी योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. माधुरी ढमाले यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड मधील प्रत्येक पात्र व्यक्तीला रेडिओ वर संधी देण्यासाठी आणि उत्तमोत्तम विषय समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी इन्फिनिटी कायम तत्पर आहे. समाजातील गुणी कलाकार, विविध विषयांतील तज्ञ, सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था आदींना इन्फिनिटी ९०.४ एफएम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.
नवी दिल्ली, 4 : देशात ग्रामीण पर्यटनाला देण्यात येणारे प्रोत्साहन आणि विकासाला अधिक चालना देण्यासाठी राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि राष्ट्रीय सर्वोत्तम ग्रामीण घरगुती निवाससुविधा स्पर्धा 2024 केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सुरू केल्या आहेत. यापूर्वीच्या राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम स्पर्धा 2023 मध्ये भारतामधील 35 गावांची सुवर्ण, रौप्य आणि कांस्य श्रेणीत निवड करण्यात आली होती.
देशात ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पर्यटकांसाठी ग्रामीण घरगुती निवाससुविधांची लोकप्रियता वाढवण्यासाठी राष्ट्रीय नीतिसह ग्रामीण घरगुती निवाससुविधाविषयक सर्वसमावेशक राष्ट्रीय धोरण आणि आराखडा तयार केला होता. ग्रामीण पर्यटन आणि ग्रामीण घरगुती निवाससुविधांना लोकप्रिय करण्यासाठी राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि राष्ट्रीय सर्वोत्तम ग्रामीण घरगुती निवाससुविधा स्पर्धांचे आयोजन करणे हा भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने मंत्रालयाचा धोरणात्मक उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे.
ग्रामीण पर्यटनवाढीसाठी सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आणि पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी पर्यटन मंत्रालयांने राज्य सरकारे, उद्योगातील हितधारक, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक समुदायांना या स्पर्धांच्या माध्यमातून सक्रीय केले आहे.
या स्पर्धेमुळे परिचित नसलेले भाग पर्यटकांसाठी अधिक खुले होतील, ज्यामुळे समुदायांच्या सहभागात वाढ होईल, सांस्कृतिक वारशाचे जतन होईल आणि शाश्वत पर्यटनाला चालना मिळू शकेल.
पर्यटन मंत्रालयाने ग्रामीण पर्यटनासाठी या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्रामीण पर्यटन आणि ग्रामीण घरगुती निवाससुविधा नोडल संस्था(CNA RT & RH) स्थापन केली आहे. ग्रामीण स्तरावर या स्पर्धांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मास्टर ट्रेनर्स तयार करण्यासाठी ही संस्था क्षमता उभारणी सत्रांचे आयोजन करत आहे.
ही स्पर्धा जागतिक पर्यटन दिनी म्हणजे 27 सप्टेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली होती आणि त्यासाठी 15 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहेत. www.rural.tourism.gov.in या लिंकच्या माध्यमातून अर्ज करण्याच्या पोर्टलचा वापर करता येईल.
मुंबई, दि. 4 : चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्मारक मुंबई येथे राज्य शासनाच्यावतीने उभारणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदान येथे चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४८ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन पुण्यश्लोक फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते.
यावेळी सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डॉ. मनोहर अंचुले, उद्योजक अनिल राऊत, सामाजिक नेते राजीव जांगळे, व्याख्याते सागर मदने, मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. स्मिता काळे, श्रीक्षेत्र विठ्ठल बिरदेव देवस्थान पट्टणकोडोली येथील मुख्य भाकणूककार सद्गुरु श्री फरांडे महाराज, पुण्यश्लोक फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, धनगर समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत आहे. येत्या ३० दिवसात संयोजन समितीने मुंबई शहरातील जागा सूचवावी त्याठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकर यांचे मुंबई शहरात स्मारक उभे करण्याची जबाबदारी मी घेतो असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती ही अतिशय चांगली लाभल्याने मंत्री लोढा साहेब यांनी त्यांचे कौतुक केले.
ऑगस्ट क्रांती मैदान येथे सायंकाळी पाच पासूनच धनगरी ढोलांचा आवाजाने मैदान दुमदुमून गेले होते. शाहीर सुरेश सूर्यवंशी आणि त्यांच्या ग्रुपने शौर्यगाथा महाराजा यशवंतराव होळकरांची हा पोवाडा सादर केला कोकणातील धनगर समाज बांधवांनी आपले कोकणी गजी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सागर मदने यांनी पहाडी आवाजात महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास मांडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी पुण्यलोक फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी मुंबई शहरात महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्मारक उभारावे अशी मागणी प्रास्ताविक करताना केली. आभार रामचंद्र जांगळे यांनी मानले तर निवेदन प्रशांत पुजारी यांनी केले.
यावेळी सह संयोजन बबन कोकरे, गणपत वरक, रामचंद्र जांगळे, तुकाराम (दादा) येडगे, दीपक झोरे, संतोष बावदाणे, पी. बी. कोकरे, अनंत देसाई, सुरेश वावदाणे, सूर्यकांत जांगळे, तानाजी शेळके, संतोष जांगळे, बंटी बावदाणे, नाना राजगे, अशोक पाटील, विश्वनाथ साळसकर, यांनी केले.
पुणे, दि. ४: केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान, रागी भरडधान्य खरेदी करण्यास ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या जुन्नर प्रादेशिक कार्यालयाने दिली आहे.
शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने (डिस्ट्रेस सेल) धान्य विकावे लागू नये याकरिता ही योजना राबविण्यात येते. राज्य शासनाने आदिवासी उपयोजना क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची मुख्य अभिकर्ता म्हणून नियुक्ती केलेली आहे.
या योजनेअंतर्गत राज्यात ‘वाजवी सरासरी गुणवत्ता’ अर्थात ‘एफएक्यू’ दर्जाचे धान व भरडधान्याची खरेदी करण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा हा शासनाचा हेतू आहे. हगाम २०२३-२०२४ मध्ये धान ‘अ’ चे प्रतिक्विंटल खरेदी दर २ हजार २०३ रूपये, धान साधारण- २ हजार १८३ रूपये तर रागीचे खरेदी दर ३ हजार ८४६ रूपये लागू करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ व खेड तालुक्यातील डेहणे येथे महामंडळाची खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. येथे धान, भरडधान्य खरेदीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खरेदी केंद्रावर शासनाच्या ‘एनइएमएल’ पोर्टलवर शेतकरी नोंदणी सुरु आहे. नोंदणीसाठी ७/१२ व ८ अ चा उतारा, चालू हंगामातील पिकपेराची नोंदणी, बँक पासबुक व आधार कार्डच्या छायांकित प्रतीची आवश्यकता आहे.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खरेदी केंद्रावर वा कार्यालयात येवून नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळाच्या जुन्नर येथील प्रादेशिक कार्यालयाचे प्र. प्रादेशिक व्यवस्थापक रा. भ. पाटील यांनी केले आहे.
कोट्यावधी भारतीयांचे दैवत असलेला श्रीराम हा शौर्य आणि सदगुणांचा पुतळा आहे. अशा या भगवान श्रीरामाची कथा सच्चेपणाने आणि विशुद्ध रूपात सादर करण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येत आहे मालिका ‘श्रीमद् रामायण’. ही मालिका 1 जानेवारी 2024 पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9.00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. ही पौराणिक मालिका प्रत्येक भारतीय कुटुंबाला एका प्राचीन काळात घेऊन जाईल, ज्या काळात प्रभावी स्वरूपात अस्तित्त्वात असलेली जीवनमूल्ये आणि शिकवण आजच्या काळात देखील सुसंबद्ध आहे.
या वाहिनीने सदर मालिकेचा एक नवीन प्रोमो दाखल केला आहे, ज्यामध्ये हे उघड झाले आहे की मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारा अभिनेता आहे, सुजय रेऊ.
प्रोमो येथे बघा:
आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची भूमिका साकारत असलेला सुजय रेऊ या भूमिकेबद्दल म्हणतो, ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत ही भूमिका मिळणे हा मी माझा गौरव मानतो. कोट्यावधी लोकांचे आराध्य दैवत असलेली ही देवता म्हणजे केवळ एक भूमिका नाही. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि एका आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे. प्रभू श्रीरामाची कथा अनेक भारतीयांप्रमाणे माझ्यासाठीही जिव्हाळ्याचा विषय आहे. श्रीराम कथा पडद्यावर जिवंत करणे हे माझ्यासाठी स्वप्न साकार होत असल्यासारखे आहे.”
‘श्रीमद् रामायण’ सुरू होत आहे, 1 जानेवारी 2024 पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!