पुणे, दि. ५ : जिल्ह्यातील पात्र लघु उद्योजकांनी जिल्हा पुरस्कार-२०२३ साठी २० डिसेंबर पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांच्या कार्यालयात सादर कण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्यावतीने जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांना जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येतात. जिल्हा पुरस्कारासाठी शासनाने विहित केलेल्या निकषाप्रमाणे लघु उद्योगांची निवड करण्यात येते.
जिल्हा पुरस्कारासाठी ज्ञापन पोहोच भाग २, उद्योग आधार, उद्यम नोंदणी हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालयाकडे मागील तीन वर्षे नोंदणीकृत असावा. (१ जानेवारी २०२० पूर्वीची नोंदणी, उद्योग आधार किंवा उद्यम नोंदणी). उद्योग घटक मागील दोन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेतील असावा. लघु उद्योग कोणत्याही संस्थेचा, बँकेचा थकबाकीदार नसावा. जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकासाठी रुपये १५ हजार व द्वितीय पुरस्कारासाठी रुपये १० हजार व मानचिन्ह असे पुरस्कार आहेत.
जिल्हा उद्योग केंद्र येथे अर्ज विनामुल्य उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२०-२५५३९५८७, २५५३७५४१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांनी केले आहे. 000
पश्चिम महाराष्ट्रात थकीत वीजबिल वसूली मोहिमेला वेग
पुणे, दि. ०५ डिसेंबर २०२३: दिवाळी प्रकाशाचा सण म्हणून नुकतीच उत्साहात साजरी झाली. मात्र सर्वांना प्रकाशमान ठेवणाऱ्या महावितरणच्या वीजबिलांकडे ग्राहकांकडून गेल्या नोव्हेंबरमध्ये चांगला प्रतिसाद दिला नाही. परिणामी आर्थिक कोंडी झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महावितरणकडून थकीत वीजबिलांच्या वसूलीला मोठा वेग देण्यात आला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पुणे प्रादेशिक विभागात सद्यस्थितीत १८ लाख २ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे ३७६ कोटी ६७ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. यात पुणे जिल्हा- २३० कोटी २१ लाख रुपये (८ लाख ५२ हजार ग्राहक), सातारा २७ कोटी (२ लाख १४ हजार ग्राहक), सोलापूर- ५४ कोटी ४३ लाख (२ लाख ७४ हजार ग्राहक), कोल्हापूर- ३६ कोटी २० लाख (२ लाख ४५ हजार ग्राहक) आणि सांगली जिल्ह्यात २८ कोटी ८३ लाख रुपयांची (२ लाख १७ हजार ग्राहक) थकबाकी आहे.
महावितरणच्या महसूलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसूली हाच आहे. वीजखरेदीमध्ये दरमहा महसूलामधील सुमारे ८० टक्के रक्कम खर्च होते. त्यानंतर दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापना आदींचा खर्च वीजबिलातून मिळालेल्या महसूलावरच अवलंबून आहे. गेल्या महिन्यात दिवाळी उत्साहात साजरी झाली. मात्र इतर खर्चाच्या तुलनेत चालू महिन्याचे वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महावितरणच्या थकबाकीदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. थकबाकी तसेच चालू महिन्याचे वीजबिल भरून सहकार्य करावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात वीजबिलांच्या थकबाकीमध्ये सर्वाधिक १५ लाख ९१ हजार २४६ घरगुती ग्राहकांकडील २४१ कोटी ५२ लाख रुपये तर २ लाख १० हजार ७४४ वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील १३५ कोटी १४ लाख रुपयांचा समावेश आहे. वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला वेग देण्यात आला आहे. आता एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.
वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.
मुंबई दि. 5 : शिक्षणाचा उद्देश फक्त मुलांना शिकविण्यापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांना चांगला माणूस म्हणून घडविणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. राज्यातील शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. शिक्षणास प्राधान्य देणाऱ्या या अभियानाबद्दल राज्यपालांनी शासनाचे अभिनंदन केले.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा शुभारंभ राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला.
राजभवन येथे आयोजित ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान शुभारंभ कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे उपस्थित होते.
या अभियानासोबतच दत्तक शाळा योजना, महावाचन उत्सव- महाराष्ट्रातील वाचन चळवळ, माझी शाळा माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर टप्पा – 2 या उपक्रमांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यपाल श्री.बैस म्हणाले, शिक्षण हे ‘मनुष्य निर्माण’ करणारे असावे असे स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित होते. गरीब मुलगा शिक्षणात येऊ शकत नसेल तर त्याच्याकडे शिक्षण गेले पाहिजे. आजची मुले पुस्तक वाचत नसतील, पण स्मार्ट फोन, इंटरनेट, सोशल मीडिया अशा विविध माध्यमातून ज्ञान व माहिती घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी पुस्तकांऐवजी ऑडिओ बुक्स, व्हिडिओ बुक्स आणि ई-बुक्सची निर्मिती करावी. मुलांना इंटरनेटद्वारे फक्त सुरक्षित आणि चांगली सामग्री मिळावी यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्व वाचनालयांना इंटरनेट, संगणक सुविधा देऊन नवसंजीवनी देणे आवश्यक आहे. यासाठी ग्रंथालय दत्तक योजना देखील चालू केली पाहिजे व ग्रंथालयांचा कायापालट केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा याविषयी तज्ज्ञांची सत्रे आयोजित करणेही आवश्यक आहे. या शिक्षण मिशनमध्ये सरकारला मदत करणाऱ्या युनिसेफ, ‘रीड इंडिया’, ‘प्रथम बुक’ यांचेही राज्यपालांनी अभिनंदन केले.
प्रत्येक गावांमध्ये आदर्श शाळा निर्माण झाली पाहिजे
जागतिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी टिकून राहण्यासाठी महाराष्ट्रातील शाळा या उत्तम दर्जाच्या करणार असून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुणवत्तेला पर्याय नाही. प्रत्येक गावांमध्ये आदर्श शाळा आणि आदर्श शिक्षण प्रणाली राज्यात अवलंबणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शालेय शिक्षण विभागामध्ये अनेक बदल केले आहेत. विद्यार्थी आज शासकीय शाळेमध्ये शिकतात. खाजगी शाळांच्या तुलनेत ते कुठे कमी पडता कामा नये. अशाच आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अभिनव योजनांचे आज लोकार्पण करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील ‘शिका, संघटित व्हा’ व ‘संघर्ष करा’ हा संदेश देत शिक्षणाला प्राधान्य दिले. आजचा कार्यक्रम हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली. या अभियानाला ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ असे नाव दिल्यामुळे माझी जबाबदारी वाढलेली असून या कामात मी स्वतः जातीने लक्ष देईन.
227 मुंबई महानगरपालिकेच्या शाळांना आज कौशल्य विकास मंत्रालयाद्वारे कौशल्य विकास सेंटरने जोडण्यात आले आहे आणि याची व्याप्ती आपण पुढे आणखी वाढवणार आहोत. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना टाटा कंपनी कंपनीसोबत उत्तम प्रशिक्षणाद्वारे त्वरित नोकरी मिळण्यासाठी सहाय्यभूत ठरणारे इनोव्हेशन सेंटर स्किल डेव्हलपमेंट सेंटर आज तेथे तयार केले आहे. टाटा कंपनी मार्फत तेथे दरवर्षी पाच हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेकांना प्लेसमेंट तसेच अनेकांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गडचिरोलीत सुरजागड येथे नवीन कारखाना तयार करण्यात आला दहा हजार कामगारांना रोजगार मिळाला. लवकरच तिथे स्टील प्लांट उभारण्यात येणार आहे. ज्यातून दहा ते बारा हजार लोकांना नोकरीची संधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शिक्षणालाही महत्त्व दिले आहे. प्रधानमंत्री यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारी परीक्षेची भीती घालवण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले.
राज्यात सेलिब्रिटी स्कुल्स सुरु करणार – मंत्री दीपक केसरकर
राज्यात संगीत, नाटक, वक्तृत्व आदी शिक्षण देणाऱ्या ‘सेलिब्रिटी शाळा’ निर्माण करणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य व्हावे या दृष्टीने विविध शालेय उपक्रमांचे उदघाटन करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील शाळांमध्ये सोयी सुविधा वाढवणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, आरोग्य, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे यासाठी शालेय उपक्रमांची सुरुवात करण्यात येत असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी आभारप्रदर्शन केले.
दत्तक शाळा योजना, जिल्हा शैक्षणिक स्वास्थ पत्रिका आणि महाराष्ट्रातील वाचन चळवळ या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्री- माझी शाळा – सुंदर शाळा अभियान
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि आवश्यक कौशल्यांची तोंडओळख करून देण्याच्या उद्येशाने, राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ‘माझी शाळा सुंदर शाळा’ हे 45 दिवसाचे स्पर्धात्मक अभियान राबविण्यात येणार आहे.
या सर्व शाळा स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, राष्ट्रीय एकात्मता, आरोग्य, अर्थिक साक्षरता, कौशल्य विकास इत्यादी महत्वपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून एकमेकांशी स्पर्धा करतील व त्यासाठी गुणांकन देऊन, त्या त्या स्तरावरील विजेत्या शाळांना रकमेच्या स्वरूपात पारितोषिक दिले जाईल.
या स्पर्धात्मक अभियानात सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन त्यांना समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल. सर्व शाळांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
21 शाळांचे लोकार्पण
मुंबई शहरातील 21 शाळांची पुनर्बांधणी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असून सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त शाळा तयार करण्यात आल्या असून या शाळांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या शाळांच्या निर्मितीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे 254 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. नवीन व सुसज्ज इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या शाळेत शैक्षणिक सुविधेसह व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.
दत्तक शाळा योजना आणि स्वरूप
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची संख्या सुमारे ६२ हजाराहून अधिक असून त्यात सुमारे ५४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या सर्व शाळांना भौतिक सुविधा पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेच. मात्र शाळांची संख्या आणि आपल्या राज्याचे भौगोलिक क्षेत्र विचारात घेता या प्रययत्नांना लोक सहभागाची जोड मिळाली तर शाळांना पायाभूत व काळानुरूप आवश्यक अन्य सर्व सोयी पुरविण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या, सेवाभावी संस्था, तसेच खाजगी दानशूर व्यक्ति यांनी सहभाग घेतल्यास या भौतिक सुविधा अधिक चांगल्या प्रकारे देता येतील, या बदल्यात त्यांची इच्छा असल्यास, विशिष्ट कालावधीसाठी त्यांनी सुचिवलेले नाव त्या विशिष्ट शाळेस देण्यात यईल.
देणगीदारांची ठराविक कालावधीसाठी पुरवठा करावयाच्या वस्तू व सेवांचे मूल्य विचारात घेऊन ही योजना राबविण्यात येणार आहे. शाळांना सर्वार्थाने स्वयंपूर्ण करण्यास मदत करणारी महाराष्ट्र शासनाची ही अभिनव योजना आहे.
या प्रसंगी देणगीदारांना व विशेषतः कॉर्पोरेट कंपन्यांना सीएसआर फंडाच्या माध्यमातून अधिकाधिक शाळा दत्तक घेणयाचे व या योजनेस भरघोस प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
स्वच्छता मॉनिटर टप्पा २
प्रोजेक्ट ‘Let’s Change ‘अंतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर ‘या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ ऑगस्ट २०२३ मध्ये करण्यात आला. या उपक्रमामध्ये राज्यातील सुमारे ६४००० शाळा व लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या उपक्रमामुळे विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांच्यात निर्माण झालेली स्वच्छतेची सवय, परिसर स्वच्छतेविषयी जागरूकता व उपक्रमाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहता, स्वच्छता मानिटर्स या उपक्रमाचा विस्तार राज्यातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांसाठी करण्याचा शासनाचा मानस आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर्सची भूमिका बजावून नागरिकांना, कुठेही निष्काळजीपणे कचरा टाकण्यापासून व थुकण्यापासून परावृत करतील. ज्या ठिकाणी स्वच्छतेचे कार्य व्यवस्थित झाले नसेल या विषयाची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतील.
या उपक्रमाचे स्वच्छता आणि आरोग्या विषयक लाभ पाहता, स्वच्छता मॉनिटर टप्पा 2 या अभियानात राज्यातील सर्व शाळांनी उत्सफुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
वाचन महोत्सव
व्यक्तिच्या विकासासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृतिचा विकास होणे अतिशय महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी वाचन हे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजविणे, वाचनाविषयी गोडी निर्माण करणे व वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन, (UNICEF) व रीड-इंडीया यांच्या संयुक्त भागीदारीने’ महावाचन अभियान’ हे अभियान राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या अभियना मुळे सन २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील इयता ३ री पर्यंतच प्रत्येक मुल समजपूर्वक ओघवते वाचन करू लागेल व झ्यता ८ वी मधील प्रत्येक मुल शिकण्यासाठी वाचू शकेल हे निश्चित करणारे महावाचन अभियान शासनाने हाती घेतले आहे, महावाचन महोत्सवाचा प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक नागरिक दर दिवशी दहा मिनिटे नवीन व सकारात्मक गोष्टीचे वाचन करेल असा आहे.
महावाचन महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देणे आठवडयाचे २ तास विद्यार्थ्यांना फक्त वाचनासाठी उपलब्ध करून देणे, गोष्टींचा शनिवार, आनंदाचा तास ठेवणे. ग्रंथ प्रदर्शन आणि पुस्तक प्रदर्शन भरवणे आणि लोक सहभागातून या अभियानाला प्रसिद्धी देणे.
विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती हे उत्तम वाचक आहेत/ होते व वाचनाने विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धन होऊन, नाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळेल. तरी या महावाचन महोत्सव अभियानात सर्व शाळा, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांना सहभागी होण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात येत आहे.
माझी शाळा माझी परसबाग
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतर्गत राज्यातील एकूण ८६,४४७ शाळेतील इ १ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे १ कोटी २ लक्ष विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो.
सदर पोषण आहारात विद्यार्थ्यांनी उत्पादित केलेला ताजा भाजीपाल्याचा समावेश होण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेच्या आवारात परसबागेची निर्मिती करण्यासाठी ‘माझी शाळा माझी परसबाग’ ही योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.
परसबाग निर्मितीमधून विद्यार्थांची निसर्गाशी जवळीक निर्माण होवून त्यांना शालेय जीवनात शेतीचे प्राथमिक ज्ञान मिळणार आहे.
प्रत्येक शाळेत उत्तम दर्जाच्या परसबाग निर्माण होण्यासाठी विभागामार्फत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत.
पुणे- दोघेही अल्पवयीन ,याच वयात अडकला, जीव गुदमरला अन मुलाने केली आत्महत्या ..अखेरीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल अल्पवयीन मुलीवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अर्थात आता यावर हि प्रेमकहाणी एकतर्फी होती कि दुतर्फी होती हि माहिती उघड व्हावी यात कोणालाही स्वारस्य काही नाही .पण अवघ्या १६ वर्षाच्या मुलाने आपली मैत्रीण बोलत नाही ,मला तुझ्या सोबत बोलायचे नाही या कारणाने १ डिसेंबर रोजी त्याच्या आजीच्या घरी या मुलीसोबत वाद घातला आणि त्यानंतर आजीच्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . याप्रकरणी मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे . पोलिसांनी मुलीवर गुन्हा दाखल केला आहे .सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे 9552515238 अधिक तपास करत आहेत .
विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या
तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठ भरणार
मुंबई, दि. ५ : नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या शैक्षणिक उपाययोजना करून नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला अधिक गती द्यावी,असे सांगून विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठाने भरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक,उपसचिव अजित बाविस्कर,उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर,तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर,सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू, सहसंचालक प्रकाश बच्छाव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, प्राचार्य अनिल राव, स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी (शैक्षणिक शुल्क) विद्यापीठाने स्वनिधीतून भरावी आणि या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध होईल यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कुलगुरूंनी बहुमताने हा निर्णय मान्य केला. त्यामुळे यापुढे तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात मोफत उच्च शिक्षण घेता येणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले, अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नवमतदारांची नोंदणी व्हावी. यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने नवमतदार नोंदणी मोहीम विद्यापीठ आणि महाविद्यालयात राबविण्यात यावी या मोहिमेत ‘एनएसएस’नी पुढाकार घ्यावा त्यामुळे महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी होईल. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)टीमने पुढाकार घ्यावा.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील महत्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करून विद्यापीठांवर शैक्षणिक धोरण राबविण्याची मोठी जबाबदारी असल्याचे यावेळी सांगितले.
बैठकीत नॅक मूल्यांकन, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, कौशल्याभिमुख अभ्यासक्रम, उद्योजकांचा सहभाग, क्लस्टर महाविद्यालये, मातृभाषेतून शिक्षण, सीबीसीएस पद्धती, एबीसी प्राध्यापक भरती, प्रशिक्षण, सायबर गुन्हे, शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपध्दतीचे अचूक नियोजन करावे. अशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.
विविध स्तरांवर उच्च व तंत्र शिक्षणापासून काही विद्यार्थी दूर राहतात आणि ते विद्यार्थी व्यवसाय, नोकरीत असतात अशा विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भिती असते, या विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ-व्हिज्युअल, उद्योग क्षेत्र यांची मदत घेऊन प्रमाणपत्र कोर्स अभ्यासक्रमाची यादी तयार करता येईल का याचाही विचार विद्यापीठाने करावा.
तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत कालबद्धपद्धतीने नियोजन करून अंमलबजावणी करावी, विद्यार्थ्यांच्या हिताची विद्यापीठानी खबरदारी घ्यावी असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
पुणे, दि. ५: जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यासाठी ८ डिसेंबरपर्यंत अधिकाधिक विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्राद्वारे केले आहे.
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असून विभागीय आयुक्त तथा पुणे विभागाचे मतदार यादी निरीक्षक यांनी पुणे जिल्ह्यात पाहणी दौऱ्यादरम्यान मतदार नोंदणीबाबत विविध सूचना केल्या. मतदान प्रक्रियेत १८ ते १९ आणि २० ते २९ या वयोगटातील युवकांचा सहभाग लोकसंख्येच्या प्रमाणात कमी असल्याने युवा लोकसंख्येच्या मतदार नोंदणीसाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी शिबिरे आयोजित करावीत, विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे, शिबिराच्या तारखेची माहिती महाविद्यालयातील सूचना फलकावर लावून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. महाविद्यालयात ऑनलाइन ऑफलाइन मतदार नोंदणीच्या सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनाही अशी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के मतदार नोंदणी करण्यावर भर देण्यात यावा. शिबिर आयोजित करण्यापूर्वी स्थानिक पातळीवर प्रसिद्धी द्यावी तसेच सबंधित मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी देखील शिबिराकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून कामकाजाची पहाणी करावी. वर्शिप अर्थ फाऊडेशन यांचा महाविद्यालयांशी युवा मतदार जागृती आदींच्या अनुषंगाने सामंजस्य करार झालेला असून त्यांच्याशी समन्वय साधावा, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
दूरदृष्य प्रणालीद्वारे मतदार नोंदणी शिबिराबाबत आढावा उपजिल्हाधिकारी तथा स्वीप समन्वयक अर्चना तांबे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत मतदार नोंदणीबाबत १५० महाविद्यालयांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
मतदार यादीमध्ये युवकांच्या कमी टक्केवारीचा विचार करता महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के मतदार नोंदणी करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मोहिम स्तरावर कार्यवाही करुन सहकार्य करावे. ग्रामीण भागातील महाविद्यालयात शंभर टक्के मतदार नोंदणी होईल याकडे लक्ष द्यावे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मतदार नोंदणी अर्ज भरण्यासाठी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. मतदार नोंदणीच्या अनुषंगाने आपल्या सूचना किंवा कल्पना असल्यास कळवाव्यात. मतदार नोंदणी प्रक्रियेत अडचण आल्यास जवळच्या मतदान नोंदणी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती तांबे यांनी यावेळी केले.
पुणे-वाघोली इथल्या रायझिंग स्टार या शाळेची बस काल दुपारी झाडाला आदळली . बसमधले काही विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार खासगी रुग्णालयामध्ये सुरू आहेत. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडला. या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे.पोलिसांनी या प्रकरणामध्ये बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये आता पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र स्कूल बसविरोधात ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
या अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या सीसीटीव्हीमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर अत्यंत वेगाने स्कूल बस धडकल्याचे दिसून येत आहे. तर बसचा डावा भाग झाडाला धडकल्यानंतर बसची डॅशबोर्डची काच उडून समोर पडताना दिसते. बसचा अपघात झाल्यानंतर बसमधील मुलांचा आरडाओरड आणि किंकाळ्याही ऐकू आल्याची माहिती समोर येत आहे.
अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने या स्कूल बसमधील मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही स्थानिक खिडकीमधून डोकावून रडत असलेल्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करताना ‘शांत व्हा, शांत व्हा. भिऊ नका. काही झालेलं नाही,’ अशा शब्दांत स्थानिक धीर देत होते. मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सुदैवाने या अपघातामध्ये जिवितहानी झालेली नाही. मात्र पैसे मोजूनही मुलांच्या सुरक्षेबद्दल असा बेजबाबदारपणा पाहून पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या बसेसवर आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालक वर्गाकडून केला जात आहे. आरटीओने अशा बसेसवर कारवाई करण्याची गरज असते. मात्र पुणे आरटीओचे अशा बसेसवर कोणत्याही पद्धतीचे नियंत्रण नसल्याचा आरोप केला जात आहे. अनेकदा मार्यादेपेक्षा अधिक मुले बसमधून नेली जातात. तसेच स्कूल बसऐवजी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी इतर वाहनांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
पुणे,दि.५ : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली, तसेच येथे करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, हवेली गट विकास अधिकारी भुषण जोशी आदी उपस्थित होते.
पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यास येणाऱ्या नागरिकांना सर्व सोयीसुविधा मिळतील यादृष्टीने पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, विद्युत प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, गर्दीचे व वाहतुकीचे नियोजन याविषयी माहिती घेण्यात आली.
या भेटीच्या वेळी विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपास्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बजरंगबली की जय’ म्हटले होते.अमित शहा यांनी रामलल्लाचं दर्शन मोफत देऊ असे म्हटले होते.यामुळे देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने आणि देवाच्या नावाने मते मागण्यास आयोगाकडून आता होकार आहे. आम्हीपण आता निवडणुकीत धर्माच्या नावाचा जयघोष करु. तेव्हा निवडणूक आयोगाने कारवाई करु नये,
मुंबई-पाच राज्यांच्या निवडणुकीत जे जिंकले त्यांचे अभिनंदन. परंतु या निमित्ताने एक प्रश्न निर्माण होत आहे. मी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले होते. निवडणूक प्रचारात देवाच्या नावाने किंवा धर्माच्या नावाने मत मागितले तर गुन्हा होतो की नाही? कारण कर्नाटकाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बजरंगबली की जय’ म्हटले होते. त्यानंतर मध्य प्रदेशच्या विधाससभा निवडणुकीत अमित शहा यांनी रामलल्लाचं दर्शन मोफत देऊ असे म्हटले होते.
यामुळे देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने आणि देवाच्या नावाने मते मागण्यास आयोगाकडून आता होकार आहे का? यामुळे आम्हीपण आता निवडणुकीत धर्माच्या नावाचा जयघोष करु. तेव्हा निवडणूक आयोगाने कारवाई करु नये, असा इशारा उद्ध ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते.
तर बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढला
कारण या देशातील नव्हे तर जगातील एकमेव हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या एका भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. राम मंदिराचा मुद्दा घेतला होता. त्यावेळी निवडणूक आयोगानं त्यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढवायला बंदी घातली होती. हे कमी होतं म्हणून की काय त्यांचा मतदानाचा मुलभूत अधिकारही काढून घेतला. आज त्यात काही बदल झाला आहे का? असा प्रश्न पत्राद्वारे मी निवडणूक आयोगाला विचारला आहे. त्यावर आयोगाचं अद्याप काहीही उत्तर आलं नाही. उत्तर आलं नाही, तर याचा अर्थ आम्ही असा घ्यायचा का? की देवाच्या नावाने किंवा धर्माच्या नावाने मतं मागण्यासाठी तुमची काहीही हरकत नाही.
तर तुम्हाला कारवाई करता येणार नाही?
यावर थोड्या दिवसात तुमचं म्हणजेच निवडणूक आयोगाचे उत्तर आलं नाही, तर आम्ही तुमची मान्यता गृहीत धरुन येत्या प्रत्येक निवडणुकीत ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘गणपती बाप्पा मोरया’ असे हिंदुत्वाचे विचार उघडपणे मांडू. मग त्यावेळी मात्र आपण करवाई करता कामा नये. तुम्हाला कारवाई करता येणार नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, अशा शब्दांत उद्ध ठाकरेंनी आयोगाला इशारा दिला.
पुणे- गेल्या ४ डिसेंबरला येथील पारशी गार्डनमध्ये खून करून टाकलेल्या एकाचा मृतदेह आढळला आणि पुणे पोलिसांची तपासाची चक्रे फिरू लागली, अवघ्या १२ तासात या मर्डरची कहाणी बोपदेव घाटात उलगडली आणि दोन्ही खुन्यांना चतुर्भुज करण्यात आले . वाचा पोलिसी भाषेतच पोलिसी तपासाची सत्य कहाणी
गुन्हे शाखेकडुन खुनाच्या गुन्हयातील आरोपीतास १२ तासात केले जेरबंद दिनांक ०४/१२/२०२३ रोजी कोंढवा पोलीस स्टेशनच्या हददीत शिवनेरीनगर येथील गव्हाणे क्रिडांगण समोर असलेले पारशी गार्डन, कोंढवा, पुणे येथे शाहनवाज उर्फ बबलु मुनिर सैय्यद याला कोणीतरी अज्ञात इराद्नेया त्याचे पोटावर व गळ्यावर कसल्यातरी धारदार हत्याराने वार करुन ठार मारले आहे. म्हणुन अज्ञात व्यक्ती विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि. नं. १२२९/२०२३, भारतीय दंड संहिता कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचे घटनास्थळी युनिट-५, गुन्हे शाखेचे टिमने तात्काळ भेट देऊन, दाखल गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना, तपासादरम्यान युनिटकडील अधिकारी व स्टाफ यांना बातमी मिळाली की, शाहनवाज उर्फ बबलु याचा खुन झाला असुन, त्याचेसोबत शेवटचे साहिल युसूफ शेख, सद्दाम उर्फ सज्जुद्दीन शेख व त्याचा मित्र यांना पाहिलेले असुन, त्यांचेपैकी साहिल शेख व सद्दाम शेख यांचेकडे पांढ-या रंगाचा बर्गमन गाडी असुन ते बोपदेव घाटात लपुन बसलेले असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे युनिटकडील पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी व स्टाफ असे बोपदेव घाटात जाऊन पाहणी करत असताना १) साहिल युसूफ शेख, वय-२३ वर्षे, रा. बी-१, बंगलो सोसायटी, पिसोळी, पुणे व मुळगाव-मु.पो. बैरागड, ता.धार्णी, जि. अमरावती २) सज्जुद्दीन उर्फ सद्दाम सिरखुद्दिन शेख, वय-३५ वर्षे, रा. सायमा रेसीडेन्सी, शिवनेरीनगर, लेन नं.६, कोंढवा, पुणे यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे केलेल्या कौशल्यपुर्ण व सखोल तपासात साहिल युसूफ शेख याने सुमारे दिड वर्षापुर्वी बबलु याचेकडुन पल्सर गाडी विकत घेतली. परंतु तो गाडीचे कागदपत्रे न देता वारंवार शिवीगाळ करीत होता. तसेच सज्जुद्दीन उर्फ सद्दाम सिरखुद्दिन शेख याने मयत शाहनवाज उर्फ बबलु याचेकडुन २ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याचेपेक्षा जास्त रक्कम घेऊन सुध्दा मयत वारंवार सद्दाम यास दमदाटी करुन शिवीगाळ करुन आणखी पैशाची मागणी करीत होता. साहिल, सद्दाम व त्यांचा मित्र नोमन खान, रा. पिसोळी असे तिघांनी मिळून मयताचे त्रासाला कंटाळुन त्याला जीवे ठार मारण्याचा कट रचुन, शाहनवाज उर्फ बबलु यास शिवनेरीनगर, पारसी मैदान येथे घेऊन जाऊन, त्यास दारु पाजुन, त्यांनी ठरल्याप्रमाणे शाहनवाज उर्फ बबलु धारदार हत्याराने त्याचे गळ्यावर वार करून, त्याचे पोटात चाकु खुपसून, त्यास गंभीर जखमी करुन जीवे ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपी गुन्हा करतेवेळी व पळुन जाण्याकरीता वापरलेली १,१०,०००/- रु किची बर्गमन मोपेड जप्त करण्यात आली आहे. सदर खुनाच्या गंभीर गुन्हयाचा समांतर तपास करुन, सदरचा गुन्हा हा जलद गतीने व मोठया कुशलतेने हाताळुन अवघ्या १२ तासाच्या आत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, (अतिरिक्त कार्यभार) व मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. महेश बोळकोटगी, सहा. पोलीस निरीक्षक, कृष्णा बाबर, पोलीस उप-निरीक्षक, अविनाश लोहोटे, पोलीस उप-निरीक्षक, वैताली गपाट, पोलीस अमंलदार, पृथ्वीराज पांडुळे, रमेश साबळे, राजस शेख, प्रताप गायकवाड, दया शेगर, प्रमोद टिळेकर, पल्लवी मोरे, विनोद शिवले, दाऊद सय्यद, अकबर शेख, अमित कांबळे, शहाजी काळे, शशिकांत नाळे यांनी केलेली आहे.
बाइक टॅक्सी आणि ऑटो सेवा क्षेत्रातील मिळवलेल्या यशानंतर शून्य कमिशन आणि खात्रीशीरपणे सर्वात कमी किंमत देणाऱ्या ४डब्ल्यू ‘रॅपिडो कॅब्ज’ सुरू करत कंपनीतर्फे पहिली पारदर्शक वाहतूक व्यवस्था अमलात आणत असल्याची धोरणात्मक घोषणा
नवी दिल्ली – रॅपिडो या भारतातील आघाडीच्या, नाविन्यपूर्ण तसेच वाजवी दुचाकी आणि रिक्षा सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या कम्युट अॅपने कॅब व्यवसायात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहे.
शहरी भागातील वाहतूक क्षेत्रात क्रांती आणण्याचे व शहराअंतर्गत प्रवासासाठी वाजवी सेवा देण्याचे मिशन रॅपिडोने हाती घेतले असून कॅब सेवेचे लाँच त्याचाच महत्त्वाचा भाग आहे. वैविध्यपूर्ण सेवा उपलब्ध करून देत रॅपिडोने प्रवासाच्या सर्व गरजा पुरवणारा पसंतीचा प्लॅटफॉर्म बनण्याचे ध्येय ठेवले आहे. त्याचबरोबर कॅप्टन्सनाही त्यातून लाभ मिळवून देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. देशभरात कार्यरत असलेल्या सर्व कॅब कॅप्टन्ससाठी खुल्या असलेल्या या सेवा औद्योजिकतेला प्रोत्साहन देत चालकांना कायमस्वरूपी पैसे मिळवता येईल अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे. चालकांना सक्षम करण्याबरोबरच ग्राहकांना वाजवी दर मिळावा यासाठी कॅब सर्वात कमी किंमतीत उपलब्ध करून देत वाहतुकीची सोय सर्वांना सहजपणे मिळावी यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे.
बाइक टॅक्सी क्षेत्रात ६० टक्के वाटा असलेल्या रॅपिडोने पॅन भारतात रॅपिडो कॅब्ज लाँच करून आपला व्यवसाय विस्तार केला असून सुरुवातीच्या टप्प्यात १ लाख वाहने कार्यरत असतील.
या नव्या लाँचविषयी आपली उत्सुकता व्यक्त करत रॅपिडोचे सह- संस्थापक पवन गुंटुपल्ली म्हणाले, ‘बाइक टॅक्सी आणि ऑटो सेवांना देशभरात मिळालेल्या यशानंतर रॅपिडो कॅब्ज पॅन भारतात लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचा नाविन्यपूर्ण एसएएस- आधारित प्लॅटफॉर्म चालकांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या पारंपरिक कमिशन यंत्रणेला छेद देत अॅग्रीगेटर्ससह आपले कमिशन वाटून घेण्याचे आव्हान हाताळणारा आहे. या क्रांतीकारी धोरणामुळे चालकांना वाजवी सॉफ्टवेयर युसेज शुल्क द्यावे लागणार असून त्यामुळे या क्षेत्रात लक्षणीय बदल होईल.’
ते पुढे म्हणाले, ‘यातून ग्राहकांना सर्वात कमी किंमतीची खात्री मिळणार असल्यामुळे आमच्या सेवा सर्वांसाठी अतिशय वाजवी ठरणार आहे.’
रॅपिडो कॅब्जच्या नाविन्यपूर्ण एसएएएसवर आधारित प्लॅटफॉर्ममध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, कॅब कॅप्टन्ससाठी शून्य- कमिशन मॉडेल ही महत्त्वाची वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहे. हा एसएएएस- आधारित प्लॅटफॉर्म बाजारपेठेवर नियंत्रण न आणता चालक व ग्राहकांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावतो. रॅपिडो यंत्रणेमध्ये चालकांना थेट ग्राहकांकडून पैसे घेता येतात व त्यामध्ये रॅपिडो हस्तक्षेप करत नाही. ही व्यवसाय पद्धत टिकवून ठेवण्यासाठी आणि असामान्य सेवा देत राहाण्यासाठी चालकांना वाजवी सबस्क्रिप्शन शुल्क भरावे लागेल. उदा. रॅपिडो अॅपमधून १०,००० रुपयांचे उत्पन्न मिळवल्यानंतर चालकाला ५०० रुपये शुल्क भरावे लागेल. या क्रांतीकारी धोरणामुळे चालकाला त्याच्या सेवेचे पूर्ण मूल्य मिळेल व आपली मिळकत वाढवता येईल. त्याचप्रमाणे कॅब क्षेत्रातील स्पर्धात्मक दरांमुळे ग्राहकाला फायदा होईल. हे सर्व एसएएएस- आधारित प्लॅटफॉर्ममध्ये समाविष्ट करण्यात आले असून एकाच अॅपमध्ये विविध प्रकारच्या वाहतूक सेवांचा लाभ ग्राहकाला मिळतील.
वेगाने विस्तारत असलेल्या ग्राहक वर्गाच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व व्यावसायिक विकासाला चालना देण्यासाठी रॅपिडोने धोरणात्मक पाऊल उचलत कॅब सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे.
काव्यनिर्मिती करताना समाजाशी एकरूपता असायला हवी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे ; गझलकार मिलिंद दाते लिखित ‘क्षणाचे चांदणे’ या मराठी गझलसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पुणे : कवी हा स्वान्तः सुखाय: असतो. प्रेम, सौंदर्याबद्दल लिहीत असताना त्याच्यावर सामाजिक चिंतन करत नसल्याचा आरोप होतो. अशावेळी काही कवी शरणागती पत्करून वेगळे लिहिण्याचा प्रयत्न हि करतात, परंतु कवींनी स्वतःशी प्रामाणिक राहून आपण समाजाचेही देणे लागतो ही जाणीव ठेवायला हवी. काव्यनिर्मिती करताना समाजाशी एकरूपता असायला हवी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केले. मिलिंद दाते यांचे सामाजिक भान या संग्रहातून दिसून येते, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
गझलकार मिलिंद दाते लिखित प्रेम, विरह, उद्वेग, विफलता आयुष्य अशा विविध भावनांवर रचलेल्या गझलांच्या ‘क्षणाचे चांदणे’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन सदाशिव पेठेतील म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी गझलकार दीपक करंदीकर आणि श्रीकांत वाघ उपस्थित होते.
यावेळी पुस्तकातील काही निवडक गझलांचे सादरीकरण झाले. गझलकार मिलिंद दाते, संगीत हेमकांत नावडीकर, गायक कलाकार मेहेर परळीकर, रश्मी मोघे, वादक कलाकार डॉ. नरेन्द्र चिपळूणकर, यश सोमण, चिन्मय कारेकर यांनी गझलांचे सादरीकरण केले. “त्या क्षणाचे चांदणे”, “शृंगारले स्वत:ला” आणि “अजूनही स्मरणात राहिले” या गझलांना श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भारत सासणे म्हणाले, स्त्रियांच्या बाबतची किंवा स्त्रियांची चर्चा म्हणजे गझल असे म्हटले गेले आहे. गझल जशी पुढे सरकू लागली तशी केवळ स्त्री बद्दल नाही तर भोवतालच्या जगाबद्दल, त्याच्या वास्तवाबद्दल बोलण्यासाठी गझलचा प्रयोग काही बंडखोर कवींनी केला आणि तो प्रत्यक्षात उतरवला. समाजातील काही घटकांबद्दलच्या वेदना, शोषणाबद्दल गझल लिहायला सुरुवात झाली. सर्वसामान्यांचा दबलेला आवाज मांडण्यासाठी गझलचा वापर करण्यात आला. हे सांगताना ‘क्षणाचे चांदणे’ यातील काही रचनांचा त्यांनी उल्लेख केला.
दीपक करंदीकर म्हणाले, आज कवितांप्रमाणे गझल हा काव्यप्रकार देखील मोठ्या प्रमाणात लिहिला जात आहे. समाज माध्यमाद्वारे या काव्य प्रकाराला वाव मिळाला आहे आणि त्यातून गझलकार सुरेश भटांचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे.
मिलिंद दाते म्हणाले, कोणत्याही क्षेत्रातील संशोधणासाठी जशी प्रयोगशीलता असायला हवी तशीच प्रयोगशीलता साहित्य निर्मिती करताना असणे महत्वाचे आहे. स्वतःसाठी लिहीत राहिले पाहिजे आणि लिहिताना विविध प्रयोग करायला हवेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी श्रीकांत वाघ यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा केळकर यांनी केले.
प्रा. डॉ. मंगेश कराड: एमआयटी एडीटी विद्यापीठात ईएलटी समिट
पुणे : इंग्रजी भाषा व साहित्य यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व सरस होते आणि त्यातून समाजाकडे, देशाकडे पाहण्याची एक दृष्टी विकसित होते. त्यामुळे, समाजाच्या उन्नतीसाठी अशा परिषदेच्या माध्यमातून चर्चा घडवून आणल्या पाहिजेत, असे विचार एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केले.
ते इंटरनॅशनल सोसायटी फॉर एज्युकेशनल लीडरशिप (आयएसईएल, यूएसए, ऑस्ट्रेलिया आणि भारत) आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ईएलटी समिट २०२३ या आभासी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा. डॉ. अनंत चक्रदेव, आयएसईएल युएसएचे ध्रुव जोशी, ईएलटी समिटचे सल्लागार डॉ. तरुण पटेल, स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे संचालक आणि ईएलटी समिटचे समन्वयक डॉ.अतुल पाटील आदी या प्रसंगी उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना डॉ. राॅबर्ट फिलबॅक म्हणाले की, प्रत्येकाला इंग्रजी शिकण्यास प्रवृत्त करण्यासाठी व त्यासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ईएलटी सारख्या चर्चासत्रांचे आयोजन करणे आवश्यक आहे. तर भाषा समाजावर प्रभाव टाकते आणि परिवर्तन आणि नावीन्य आणते, ज्याचा विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच इतर क्षेत्रांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. मानवाच्या आणि भाषेच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्रित येऊन ईएलटी समिट २०२३ सारखे उपक्रम राबविले पाहिजेत, असे डॉ. पीटर वॅटकिन्स यांनी ईएलटी समिटच्या समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रतिपादन केले.
या समिटच्या चर्चासत्रांत डॉ. रॉबर्ट फिलबॅक (युएसए), डॉ. जुडिथ हँक्स (यूके), डॉ.कॅथरीन अकर्सो (कॅनडा), डॉ. ब्रेंडा मुझेटा, (यूएसए), मार्शा जिंग-जी लिया (यूके), मौसमी गुहा बॅनर्जी, डॉ. परेश जोशी, डॉ. हरिबाबू थम्मिनेनी, ज्योती रमेश पै, डॉ. शालिनी शर्मा आदि तज्ञ लोकांनी आपले विचार व्यक्त केले. यासोबतच या समिटमध्ये संशोधन पेपर सादरीकरण, पॅनेल चर्चा, नेटवर्किंग आदी सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. उल्लेखनिय बाब म्हणजे, या परिषदेदरम्यान, यूएसए, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूके, भारत आणि इतर अनेक देशांतील सहभागींनी १०० हून अधिक शोधनिबंध सादर केले. ज्यामुळे ही परिषद अत्यंत यशस्वी ठरली. डॉ.अशोक घुगे यांनी उद्घाटनाप्रसंगी, तर प्रा.अमिषा जयकर व प्रा. स्नेहा वाघाटकर यांनी समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पुणे, दि. ५ – सर्व सामान्य नागरिकांना स्वतःचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत असून येत्या वर्षभरात विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत सुमारे १ लाख कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले.
पुणे मंडळाच्यावतीने जिल्हा परिषद येथे आयोजित सदनिका संगणकीय सोडत समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील आदी उपस्थित होते.
श्री. सावे म्हणाले, नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ देण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार राज्य व केंद्र शासन मिळून प्रधानमंत्री आवास योजनांसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन दिली जात आहेत. पुणे म्हाडाच्या आजच्या सोडतीत उपलब्ध सदनिकांच्या तुलनेत सुमारे दहापटीने अर्ज प्राप्त झाले. सदनिकांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करुन म्हाडावर विश्वास दाखविल्याबद्दल त्यांनी नागरिकांना धन्यवाद दिले. म्हाडाच्यावतीने नागरिकांना ५ लाख १४ हजार घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. म्हाडाची सोडत प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अतिशय पारदर्शक आहे, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही श्री.सावे म्हणाले.
मुंबईतील सुमारे ७५ हजार गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध प्रकल्प उभारण्यात येत आहे. आगामी काळातही विविध उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यापुढे घरांची सोडत वर्षातून दोन वेळेस घेण्यासाठी म्हाडानी प्रयत्न करावेत. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अधिकाधिक नागरिकांना परवडणारी घरे देण्यासाठी प्रयत्न करावेत. पुणे विभागात विविध गृहनिर्माण योजनेकरीता शासकीय भुखंड उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी गती देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना श्री. सावे यांनी दिल्या.
सोडतीमध्ये घर मिळालेल्यांचे अभिनंदन करतांना ज्यांना घरे मिळाले नाहीत, त्यांनी निराश न होता आगामी काळात होणाऱ्या सोडतीमध्ये पुन्हा अर्ज करावेत, असे आवाहन श्री. सावे यांनी केले.
श्री. जयस्वाल म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घरे उपलब्ध करुन देत त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी म्हाडाच्यावतीने सुमारे ९ लाख परवाडणाऱ्या घरांची निर्मिती केली आहे. पुणे म्हाडाच्यावतीने विविध उतपन्न गटातील सुमारे ३५ हजार सदनिका, ७ हजार ८०० भुखंड आणि ७५५ गाळे वितरीत करण्यात आले आहे. सद्यस्थितीत विविध योजनेअंतर्गत ३ हजार ७४० सदनिकांची निर्मिती प्रगतीपथावर आहे. म्हाडातर्फे ५९२ भूखंड वितरीत करण्यात आले आहे. जुन्या इमारतींचे पुर्नविकास करण्याची कार्यवाही करण्याच्यादृष्टीने गती देण्याचे प्रस्तावावर कार्यवाही सुरु आहे.
म्हाडाच्यावतीने घेण्यात येणारी घरांची ऑनलाईन सोडत अतिशय पारदर्शक, मानवी हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना सुलभरित्या घरे मिळत असल्याने त्यांच्या मनात शासनाप्रती विश्वास अधिक वृद्धिंगत होत आहे. यापुढेही म्हाडाच्यावतीने विविध घरांच्या विविध सोडती होणार असून नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जयस्वाल यांनी केले.
यावेळी श्री. सावे यांच्या हस्ते विजेत्यांना निकालपत्रे देण्यात आली.
सोडतीचा तपशील पुणे म्हाडाच्या ५ हजार ८६३ घरांसाठी ५९ हजार ३५० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेच्या ४०३ घरांसाठी १ हजार ७२४, प्रधानमंत्री आवास योजना ४३१ घरांसाठी २७०, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना २ हजार ५८४ घरांसाठी ५६ हजार ९४१ आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (म्हाडा गृहनिर्माण योजना) साठी २ हजार ४४५ घरांसाठी ४१५ अर्ज प्राप्त झाले. सोडतीचा निकाल म्हाडाच्या संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावरही उपलब्ध आहे. नागरिकांनी संकेतस्थळाला किंवा कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन म्हाडाच्यावतीने करण्यात येत आहे.
पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने पुरस्कार वितरण : संस्थेचा १५३ वा वार्षिकोत्सव
पुणे : समाजामध्ये प्रार्थना समाजा सारख्या संस्थांची गरज आहे. पुणे प्रार्थना समाज विविध उपक्रम समाजातील लोकांसाठी राबवत असते. अशा उपक्रमांतून शाश्वत मूल्ये समाजात रुजवली जात आहेत. त्यामुळे आजच्या काळात प्रार्थना समाजासारख्या संस्थांची गरज आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले. पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने १५३ व्या वार्षिकोत्सवानिमित्त विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा झाला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डाॅ. सुषमा जोग, चिटणीस डॉ. दिलीप जोग, शिल्पा मुजुमदार, नमिता मुजुमदार, मीरा भरवीरकर, उषा शर्मा, प्रशांत पाडवे, धनराज निंबाळकर उपस्थित होते. प्राज इंडस्ट्रीजचे डाॅ.प्रमोद चौधरी यांना डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार, सुमेधा चिथडे यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, कॉकलिया पुणे संस्थेला डेव्हिडा रॉबर्ट्स् पुरस्कार प्रदान करण्यात आले. कॉकलिया पुणे संस्थेच्या वतीने रक्षा देशपांडे आणि डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी पुरस्कार स्वीकारले. सुमेधा चिथडे म्हणाल्या, सैनिक हाच माझ्यासाठी देव आहे. कारण राष्ट्रावर जेव्हा संकट येते तेव्हा सैनिक त्या संकटाला सामोरा जातो. सियाचिन येथे सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लॅट जेव्हा उभा करायचा होता, तेव्हा समाजातील अनेकांनी मदत केली. परंतु त्यासाठी सुरुवात स्वतःपासून करावी लागते. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये राष्ट्र लागते, आणि त्या राष्ट्राचे आपण देणे लागतो, असेही त्यांनी सांगितले. रक्षा देशपांडे म्हणाल्या, ऐकणे शिकविण्यापासून ते बोलणे शिकविण्यापर्यंत काॅकलिया संस्थेचा हा प्रवास आहे. कर्णबधिरत्व हे एकमेव अपंगत्व आहे ज्याचे निदान वेळीच म्हणजे वयाच्या ६ वर्षाच्या आत झाल्यास त्यावर मात करता येते. त्यामुळे ज्यांना उपचारांची गरज आहे, अशा मुलांना आमच्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डाॅ. प्रमोद चौधरी यांनी पुणे प्रार्थना समाजाच्या कार्याचे कौतुक केले. डाॅ. सुषमा जोग यांनी संस्थेच्या समाजाभिमुख उपक्रमांची माहिती दिली. शिल्पा मुजुमदार यांनी सूत्रसंचालन केले.