पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने पुरस्कार वितरण : संस्थेचा १५३ वा वार्षिकोत्सव
पुणे : समाजामध्ये प्रार्थना समाजा सारख्या संस्थांची गरज आहे. पुणे प्रार्थना समाज विविध उपक्रम समाजातील लोकांसाठी राबवत असते. अशा उपक्रमांतून शाश्वत मूल्ये समाजात रुजवली जात आहेत. त्यामुळे आजच्या काळात प्रार्थना समाजासारख्या संस्थांची गरज आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.
पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने १५३ व्या वार्षिकोत्सवानिमित्त विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा झाला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डाॅ. सुषमा जोग, चिटणीस डॉ. दिलीप जोग, शिल्पा मुजुमदार, नमिता मुजुमदार, मीरा भरवीरकर, उषा शर्मा, प्रशांत पाडवे, धनराज निंबाळकर उपस्थित होते.
प्राज इंडस्ट्रीजचे डाॅ.प्रमोद चौधरी यांना डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार, सुमेधा चिथडे यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, कॉकलिया पुणे संस्थेला डेव्हिडा रॉबर्ट्स् पुरस्कार प्रदान करण्यात आले. कॉकलिया पुणे संस्थेच्या वतीने रक्षा देशपांडे आणि डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी पुरस्कार स्वीकारले.
सुमेधा चिथडे म्हणाल्या, सैनिक हाच माझ्यासाठी देव आहे. कारण राष्ट्रावर जेव्हा संकट येते तेव्हा सैनिक त्या संकटाला सामोरा जातो. सियाचिन येथे सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लॅट जेव्हा उभा करायचा होता, तेव्हा समाजातील अनेकांनी मदत केली. परंतु त्यासाठी सुरुवात स्वतःपासून करावी लागते. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये राष्ट्र लागते, आणि त्या राष्ट्राचे आपण देणे लागतो, असेही त्यांनी सांगितले.
रक्षा देशपांडे म्हणाल्या, ऐकणे शिकविण्यापासून ते बोलणे शिकविण्यापर्यंत काॅकलिया संस्थेचा हा प्रवास आहे. कर्णबधिरत्व हे एकमेव अपंगत्व आहे ज्याचे निदान वेळीच म्हणजे वयाच्या ६ वर्षाच्या आत झाल्यास त्यावर मात करता येते. त्यामुळे ज्यांना उपचारांची गरज आहे, अशा मुलांना आमच्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डाॅ. प्रमोद चौधरी यांनी पुणे प्रार्थना समाजाच्या कार्याचे कौतुक केले.
डाॅ. सुषमा जोग यांनी संस्थेच्या समाजाभिमुख उपक्रमांची माहिती दिली. शिल्पा मुजुमदार यांनी सूत्रसंचालन केले.