पुणे : पुणे महापालिकेच्या पाच इंग्रजी माध्यम शाळा पुढील नऊ वर्षांसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणला असून, त्यासाठी सुमारे १०१.२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र हा प्रस्ताव शिक्षण समितीसमोर न आणता थेट स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर फेरविचार करुन शिक्षण समितीच्या मार्फत हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केली असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
पुणे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा चालविण्यासाठी आकांक्षा फाउंडेशन या खासगी संस्थेला प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष २५ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव होता. सुमारे ४ हजार ५०० विद्यार्थ्यांच्या आधारावर हा खर्च दरवर्षी ११ कोटी २५ लाख रुपये इतका होणार असून, नऊ वर्षांच्या करार कालावधीत महापालिकेवर तब्बल १०१ कोटी २५ लाख रुपयांचे आर्थिक दायित्व येणार आहे. महापालिकेच्या तिजोरीवर एवढा मोठा भार पडणार आहे. याचा विचार करुन त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. त्यामुळेच प्रस्तावावर फेरविचार करण्याची सूचना करण्यात आली असल्याचे भिमाले यांनी सांगितले.
सोमवार पेठ, भवानी पेठ, बोपोडी, येरवडा आणि कोरेगाव पार्क येथील इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा सध्या आकांक्षा फाउंडेशनमार्फत चालविल्या जात आहेत. या शाळांमध्ये सुमारे ४ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांच्या इमारती, वीजबिल, देखभाल-दुरुस्ती, विद्यार्थ्यांचे गणवेश, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), मध्यान्ह भोजन आणि इतर मूलभूत सुविधा यांचा खर्च महापालिकाच करीत आहे.

