पुणे, दि. ५ – सर्व सामान्य नागरिकांना स्वतःचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत असून येत्या वर्षभरात विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत सुमारे १ लाख कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले.
पुणे मंडळाच्यावतीने जिल्हा परिषद येथे आयोजित सदनिका संगणकीय सोडत समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील आदी उपस्थित होते.
श्री. सावे म्हणाले, नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ देण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार राज्य व केंद्र शासन मिळून प्रधानमंत्री आवास योजनांसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन दिली जात आहेत. पुणे म्हाडाच्या आजच्या सोडतीत उपलब्ध सदनिकांच्या तुलनेत सुमारे दहापटीने अर्ज प्राप्त झाले. सदनिकांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करुन म्हाडावर विश्वास दाखविल्याबद्दल त्यांनी नागरिकांना धन्यवाद दिले. म्हाडाच्यावतीने नागरिकांना ५ लाख १४ हजार घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. म्हाडाची सोडत प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अतिशय पारदर्शक आहे, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही श्री.सावे म्हणाले.
मुंबईतील सुमारे ७५ हजार गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध प्रकल्प उभारण्यात येत आहे. आगामी काळातही विविध उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यापुढे घरांची सोडत वर्षातून दोन वेळेस घेण्यासाठी म्हाडानी प्रयत्न करावेत. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अधिकाधिक नागरिकांना परवडणारी घरे देण्यासाठी प्रयत्न करावेत. पुणे विभागात विविध गृहनिर्माण योजनेकरीता शासकीय भुखंड उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी गती देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना श्री. सावे यांनी दिल्या.
सोडतीमध्ये घर मिळालेल्यांचे अभिनंदन करतांना ज्यांना घरे मिळाले नाहीत, त्यांनी निराश न होता आगामी काळात होणाऱ्या सोडतीमध्ये पुन्हा अर्ज करावेत, असे आवाहन श्री. सावे यांनी केले.
श्री. जयस्वाल म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घरे उपलब्ध करुन देत त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी म्हाडाच्यावतीने सुमारे ९ लाख परवाडणाऱ्या घरांची निर्मिती केली आहे. पुणे म्हाडाच्यावतीने विविध उतपन्न गटातील सुमारे ३५ हजार सदनिका, ७ हजार ८०० भुखंड आणि ७५५ गाळे वितरीत करण्यात आले आहे. सद्यस्थितीत विविध योजनेअंतर्गत ३ हजार ७४० सदनिकांची निर्मिती प्रगतीपथावर आहे. म्हाडातर्फे ५९२ भूखंड वितरीत करण्यात आले आहे. जुन्या इमारतींचे पुर्नविकास करण्याची कार्यवाही करण्याच्यादृष्टीने गती देण्याचे प्रस्तावावर कार्यवाही सुरु आहे.
म्हाडाच्यावतीने घेण्यात येणारी घरांची ऑनलाईन सोडत अतिशय पारदर्शक, मानवी हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना सुलभरित्या घरे मिळत असल्याने त्यांच्या मनात शासनाप्रती विश्वास अधिक वृद्धिंगत होत आहे. यापुढेही म्हाडाच्यावतीने विविध घरांच्या विविध सोडती होणार असून नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जयस्वाल यांनी केले.
यावेळी श्री. सावे यांच्या हस्ते विजेत्यांना निकालपत्रे देण्यात आली.
सोडतीचा तपशील
पुणे म्हाडाच्या ५ हजार ८६३ घरांसाठी ५९ हजार ३५० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेच्या ४०३ घरांसाठी १ हजार ७२४, प्रधानमंत्री आवास योजना ४३१ घरांसाठी २७०, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना २ हजार ५८४ घरांसाठी ५६ हजार ९४१ आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (म्हाडा गृहनिर्माण योजना) साठी २ हजार ४४५ घरांसाठी ४१५ अर्ज प्राप्त झाले. सोडतीचा निकाल म्हाडाच्या संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावरही उपलब्ध आहे. नागरिकांनी संकेतस्थळाला किंवा कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन म्हाडाच्यावतीने करण्यात येत आहे.