प्रा. डॉ. मंगेश कराड: एमआयटी एडीटी विद्यापीठात ईएलटी समिट
पुणे : इंग्रजी भाषा व साहित्य यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व सरस होते आणि त्यातून समाजाकडे, देशाकडे पाहण्याची एक दृष्टी विकसित होते. त्यामुळे, समाजाच्या उन्नतीसाठी अशा परिषदेच्या माध्यमातून चर्चा घडवून आणल्या पाहिजेत, असे विचार एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केले.
ते इंटरनॅशनल सोसायटी फॉर एज्युकेशनल लीडरशिप (आयएसईएल, यूएसए, ऑस्ट्रेलिया आणि भारत) आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ईएलटी समिट २०२३ या आभासी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा. डॉ. अनंत चक्रदेव, आयएसईएल युएसएचे ध्रुव जोशी, ईएलटी समिटचे सल्लागार डॉ. तरुण पटेल, स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे संचालक आणि ईएलटी समिटचे समन्वयक डॉ.अतुल पाटील आदी या प्रसंगी उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना डॉ. राॅबर्ट फिलबॅक म्हणाले की, प्रत्येकाला इंग्रजी शिकण्यास प्रवृत्त करण्यासाठी व त्यासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ईएलटी सारख्या चर्चासत्रांचे आयोजन करणे आवश्यक आहे. तर भाषा समाजावर प्रभाव टाकते आणि परिवर्तन आणि नावीन्य आणते, ज्याचा विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच इतर क्षेत्रांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. मानवाच्या आणि भाषेच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्रित येऊन ईएलटी समिट २०२३ सारखे उपक्रम राबविले पाहिजेत, असे डॉ. पीटर वॅटकिन्स यांनी ईएलटी समिटच्या समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रतिपादन केले.
या समिटच्या चर्चासत्रांत डॉ. रॉबर्ट फिलबॅक (युएसए), डॉ. जुडिथ हँक्स (यूके), डॉ.कॅथरीन अकर्सो (कॅनडा), डॉ. ब्रेंडा मुझेटा, (यूएसए), मार्शा जिंग-जी लिया (यूके), मौसमी गुहा बॅनर्जी, डॉ. परेश जोशी, डॉ. हरिबाबू थम्मिनेनी, ज्योती रमेश पै, डॉ. शालिनी शर्मा आदि तज्ञ लोकांनी आपले विचार व्यक्त केले. यासोबतच या समिटमध्ये संशोधन पेपर सादरीकरण, पॅनेल चर्चा, नेटवर्किंग आदी सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. उल्लेखनिय बाब म्हणजे, या परिषदेदरम्यान, यूएसए, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूके, भारत आणि इतर अनेक देशांतील सहभागींनी १०० हून अधिक शोधनिबंध सादर केले. ज्यामुळे ही परिषद अत्यंत यशस्वी ठरली. डॉ.अशोक घुगे यांनी उद्घाटनाप्रसंगी, तर प्रा.अमिषा जयकर व प्रा. स्नेहा वाघाटकर यांनी समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.