काव्यनिर्मिती करताना समाजाशी एकरूपता असायला हवी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे ; गझलकार मिलिंद दाते लिखित ‘क्षणाचे चांदणे’ या मराठी गझलसंग्रहाचा प्रकाशन सोहळा
पुणे : कवी हा स्वान्तः सुखाय: असतो. प्रेम, सौंदर्याबद्दल लिहीत असताना त्याच्यावर सामाजिक चिंतन करत नसल्याचा आरोप होतो. अशावेळी काही कवी शरणागती पत्करून वेगळे लिहिण्याचा प्रयत्न हि करतात, परंतु कवींनी स्वतःशी प्रामाणिक राहून आपण समाजाचेही देणे लागतो ही जाणीव ठेवायला हवी. काव्यनिर्मिती करताना समाजाशी एकरूपता असायला हवी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केले. मिलिंद दाते यांचे सामाजिक भान या संग्रहातून दिसून येते, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
गझलकार मिलिंद दाते लिखित प्रेम, विरह, उद्वेग, विफलता आयुष्य अशा विविध भावनांवर रचलेल्या गझलांच्या ‘क्षणाचे चांदणे’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन सदाशिव पेठेतील म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी गझलकार दीपक करंदीकर आणि श्रीकांत वाघ उपस्थित होते.
यावेळी पुस्तकातील काही निवडक गझलांचे सादरीकरण झाले. गझलकार मिलिंद दाते, संगीत हेमकांत नावडीकर, गायक कलाकार मेहेर परळीकर, रश्मी मोघे, वादक कलाकार डॉ. नरेन्द्र चिपळूणकर, यश सोमण, चिन्मय कारेकर यांनी गझलांचे सादरीकरण केले. “त्या क्षणाचे चांदणे”, “शृंगारले स्वत:ला” आणि “अजूनही स्मरणात राहिले” या गझलांना श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भारत सासणे म्हणाले, स्त्रियांच्या बाबतची किंवा स्त्रियांची चर्चा म्हणजे गझल असे म्हटले गेले आहे. गझल जशी पुढे सरकू लागली तशी केवळ स्त्री बद्दल नाही तर भोवतालच्या जगाबद्दल, त्याच्या वास्तवाबद्दल बोलण्यासाठी गझलचा प्रयोग काही बंडखोर कवींनी केला आणि तो प्रत्यक्षात उतरवला. समाजातील काही घटकांबद्दलच्या वेदना, शोषणाबद्दल गझल लिहायला सुरुवात झाली. सर्वसामान्यांचा दबलेला आवाज मांडण्यासाठी गझलचा वापर करण्यात आला. हे सांगताना ‘क्षणाचे चांदणे’ यातील काही रचनांचा त्यांनी उल्लेख केला.
दीपक करंदीकर म्हणाले, आज कवितांप्रमाणे गझल हा काव्यप्रकार देखील मोठ्या प्रमाणात लिहिला जात आहे. समाज माध्यमाद्वारे या काव्य प्रकाराला वाव मिळाला आहे आणि त्यातून गझलकार सुरेश भटांचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे.
मिलिंद दाते म्हणाले, कोणत्याही क्षेत्रातील संशोधणासाठी जशी प्रयोगशीलता असायला हवी तशीच प्रयोगशीलता साहित्य निर्मिती करताना असणे महत्वाचे आहे. स्वतःसाठी लिहीत राहिले पाहिजे आणि लिहिताना विविध प्रयोग करायला हवेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी श्रीकांत वाघ यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा केळकर यांनी केले.