बस चालकाविरोधात गुन्हा दाखल
पुणे-वाघोली इथल्या रायझिंग स्टार या शाळेची बस काल दुपारी झाडाला आदळली . बसमधले काही विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार खासगी रुग्णालयामध्ये सुरू आहेत. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडला. या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे.पोलिसांनी या प्रकरणामध्ये बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये आता पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र स्कूल बसविरोधात ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
या अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या सीसीटीव्हीमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर अत्यंत वेगाने स्कूल बस धडकल्याचे दिसून येत आहे. तर बसचा डावा भाग झाडाला धडकल्यानंतर बसची डॅशबोर्डची काच उडून समोर पडताना दिसते. बसचा अपघात झाल्यानंतर बसमधील मुलांचा आरडाओरड आणि किंकाळ्याही ऐकू आल्याची माहिती समोर येत आहे.
अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने या स्कूल बसमधील मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही स्थानिक खिडकीमधून डोकावून रडत असलेल्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करताना ‘शांत व्हा, शांत व्हा. भिऊ नका. काही झालेलं नाही,’ अशा शब्दांत स्थानिक धीर देत होते. मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सुदैवाने या अपघातामध्ये जिवितहानी झालेली नाही. मात्र पैसे मोजूनही मुलांच्या सुरक्षेबद्दल असा बेजबाबदारपणा पाहून पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या बसेसवर आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालक वर्गाकडून केला जात आहे. आरटीओने अशा बसेसवर कारवाई करण्याची गरज असते. मात्र पुणे आरटीओचे अशा बसेसवर कोणत्याही पद्धतीचे नियंत्रण नसल्याचा आरोप केला जात आहे. अनेकदा मार्यादेपेक्षा अधिक मुले बसमधून नेली जातात. तसेच स्कूल बसऐवजी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी इतर वाहनांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.