Home Blog Page 1344

ऐन हिवाळ्यात एकनाथ शिंदे सरकारला फोडणार घाम ?अधिवेशनावर धडकणार 100 मोर्चे

नागपूर-नागपूर मधील हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या आधीच विरोधी पक्षांनी एकमूठ बांधत सरकारला घेण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर जवळपास 100 मोर्चे धडकणार आहेत. त्यामुळे ऐन हिवाळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचाल चांगलाच घाम फुटणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय .

नागपुरात हिवाळी अधिवेशनावर जवळपास 100 मोर्चे धडकणार आहेत. आतापर्यंत 45 पेक्षा जास्त मोर्च्यांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मोर्चांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणांच्या वतीने सीसीटीव्ही, ड्रोन, मोबाईल सर्व्हिलंस व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी चांगलीच तयारी केली आहे. या संदर्भात मविआच्या प्रमुख नेत्यांची बैठक नागपुरात पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, अजय चौधरी आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत सभागृहात सरकारला घेरण्यासाठी रण तयार करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सभागृहाच्या बाहेर सरकारला घेरण्यासाठी मोर्चे काढण्यावरही विरोधकांचा भर असेल.

नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, या अधिवेशनासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनात सुरक्षेसाठी 11 हजार पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. व्हीआयपी सुरक्षा ही पोलिसांची प्राथमिकता असेल, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठीी राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी, दंगा नियंत्रण पथक देखील 24 तास तैनात असेल, असेही अमितेश कुमार यांनी सांगितले.

सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे-डॉ. योगेन्द्र मिश्रा 

पुणे, दि.६ डिसेंबर :” सहिष्णूतेचा अर्थ म्हणजे वासनेला व क्रोधाला नियंत्रित करणे आहे. आळंदी ही ज्ञानाची भूमी आहे. हे तीर्थ क्षेत्र मानवाला विषयाच्या भवसागरातून पार करून किनार्‍यावर घेऊन जाणारे आहे. त्यामुळे येथे येणार्‍या वारकर्‍याचे अंतःकरण पवित्र बनते ”.असे विचार काशी येथील विद्वान व हिंदी सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ. योगेन्द्र मिश्रा यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’,विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या सोहळ्याला आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज कुर्‍हेकर, ह.भ.प. किसन महाराज साखरे यांचे चिरंजीव चिदम्बर महाराज साखरे. विठ्ठलराव काळोखे,  बाळासाहेब काळोखे, अशोक उमरगेकर, सुरेश वडगावकर, शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण, देहूचे रमेश काळोखे, तुकाराम काळोखे व ह.भ.प. डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी  प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच सौ.उषा विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण व प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.
डॉ. योगेन्द्र मिश्रा म्हणाले,” आळंदी ही संवेदनाची सृष्टी असल्याने येथे सत्याचे संस्कार मिळतात. आपल्यातील जिज्ञासा वृद्धिंगत होऊन समाधान मिळते. आम्हाला देवतांचे संस्कार अंगीकरण्यासाठी जिभेवरील स्वाद आणि शब्द यांचा जपून वापर करावा.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”सामाजिक कार्य करतांना नागरिकांचा विरोध होतच असतो. परंतू आपले लक्ष विचलित करुन नये असा सल्ला मला तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दिला होता. त्यांच्या या सूत्रानुसार आळंदी येथे घाटाची निर्मिती झाली. येथे गरूड स्तंभ ४३ दिवसांमध्ये व  बद्रिनाथ येथे ६३ दिवसात माता सरस्वती मंदिराची निर्मिती झाली. विनम्रता, श्रध्दा, भक्ती आणि कर्मयोग याचेच हे फलीत आहे.”
अशोक उमरगेकर म्हणाले,” आळंदीसाठी राजकीय क्षेत्र व महाराष्ट्र सरकारला जे काम करता आले नाही ते काम डॉ. कराड यांनी केले. त्यांनी शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक क्षेत्रात अतुलनिय कार्य केले आहे. सर्वप्रथम वारकर्‍यांनासाठी शौचालयांची निर्मिती केल्यानंतर त्यांनी घाट व गरुड स्तंभ उभा केला.”
चिदंबर महाराज साखरे म्हणाले.” सहिष्णूता ही व्यापक असून त्यात विश्व चिंतनाचा समावेश आहे. त्यामुळे सर्व तीर्थ क्षेत्र हे ज्ञान तीर्थ क्षेत्र व्हावे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ज्ञान पोहचविण्यासाठी कार्य करावं. आपल्या मनाचा तोल सांभाळण्याचे कार्य संत वाग्ड़मय करतात त्यामुळे त्यांचे वाचन करावे.”
प्रा.स्वाती कराड चाटे म्हणाल्या, “भारतीय शिक्षण पद्धतीत अध्यात्माचा समन्वय व्हावा या साठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु डॉ. कराड यांनी ४०वर्षापूर्वीच हा प्रयोग केला आहे. तीर्थ क्षेत्रापासून ज्ञान तीर्थ क्षेत्रापर्यंतचा हा प्रवास अद्भूत आहे.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,” ७०० वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर यांनी विश्वात्मक कल्पना मांडून जाती पातीमध्ये दुभांगलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला होता. आळंदीची भूमी जगाच्या इतिहासात मानवाचे गुरूकुल बनले आहे. वारी म्हणजे मानवाच्या चित्त शुद्धीचा आध्यत्मिक महोत्सव आहे.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, ” हा मंच ज्ञानाची दिवाळी साजरा करण्यासाठी आहे. डॉ. कराड व ह.भ.प. साखरे महाराज यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला कळण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. इंद्रायणीच्या दोन्हीं किनार्‍यावर शिक्षण घेणार्‍या वारकर्‍यांची संख्या वाढावी. तसेच देशातील सर्व नद्यांच्या किनार्‍यावर शिक्षणाची ज्ञान केंद्रे बनावीत.”
त्यानंतर पं.वसन्तराव गाडगीळ व विठ्ठलराव काळोखे यांनी आपले विचार मांडले.
डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी प्रस्तावना केली व नंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
ह.भ.प. शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

चित्रकार समाजाला दिशा देणारा असावा : विवेक खटावकर

काँग्रेसतर्फे सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ‘मुठाई : काल, आज आणि उद्या’ यावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन
पुणे :

पुणे : “चित्रकार मुक्तहस्ते भवतालाचे प्रतिबिंब कॅनव्हासवर रेखाटत असतो. चित्रकाराच्या कल्पनेतून साकारलेल्या चित्रामुळे समाजाला दिशा देखील मिळत असते. मुठा नदीच्या सौंदर्यासाठी व संवर्धनासाठी चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे दिशादर्शक आहेत,” असे मत चित्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉ. धनंजय देशपांडे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या पुढाकारातून काँग्रेसतर्फे आयोजित १९ व्या सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ‘मुठाई : काल, आज आणि उद्या’ या विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरणात डॉ. देशपांडे बोलत होते. सार्थक भरेकर, सिमरन मिरवानी, तनिषा कुलकर्णी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. जीवन अडसूळ, तनय घाडगे, आयुष दीक्षित व हेतवी शहा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 
मुठा नदीच्या काठावर वृद्धेश्वर घाटावर झालेल्या या स्पर्धेवेळी प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर, काँग्रेसचे दत्ता बहिरट, संयोजक पीयूष शहा, सौरभ अमराळे, काँग्रेसचे कार्यकर्ते चेतन अग्रवाल, सुरेश कांबळे, अयुब पठाण, बाबा सय्यद, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे, कै. सि. धो. आबनावे कला महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्याणी साळुंके आदी उपस्थित होते.
विवेक खटावकर म्हणाले, “मुठा नदी पुण्याची जीवनवाहिनी आहे. नदीचे संवर्धन, तिची स्वच्छता कशी असावी, तिची सद्यस्थिती कशी आहे आणि ती पूर्वीच्या काळी पुण्याच्या वैभवात कशी भर घालत होती, याचे सुंदर मिश्रण या चित्रकला स्पर्धेतून पाहायला मिळाले. चित्रकारांनी आपल्या नजरेतून, कल्पनेतून अतिशय मोहक चित्रे रेखाटली आहेत. नदी वाचवण्यात चित्रकारांचा पुढाकार महत्वाचा ठरतो.”
दत्ता बहिरट म्हणाले, “आदरणीय सोनिया गांधी आणि मोहनदादा जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या १९ वर्षांपासून हा सप्ताह सातत्याने आयोजित होत आहे. समाजाच्या विविध घटकांना अनेक उपक्रमांतून सहभागी करून घेतले जाते. सोनियाजींच्या सेवा, कर्तव्य आणि त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे.”
पियुष शहा यांनी सूत्रसंचालन केले. सौरभ अमराळे यांनी प्रास्ताविक केले. चेतन अग्रवाल यांनी आभार मानले. कल्याणी साळुंके यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

शरद पवार गटाला मोठा धक्का:विधिमंडळ कार्यालय अजित पवार गटाला, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा निर्णय

नागपूर-विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नागपूर विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या शरद व अजित पवार गटात मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरु होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. हे अधिवेशन मराठा आरक्षण, अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्याचे नुकसान, वाढती महागाई, बेरोजगारी आदी विविध मुद्यांवरून गाजण्याची शक्यता आहे. पण तत्पूर्वीच एक मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, अजित पवार गटाने काही दिवसांपूर्वी एका पत्राद्वारे राहुल नार्वेकर यांच्याकडे अधिवेशन काळात विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय आपल्या गटाला देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, अध्यक्षांनी ही मागणी मान्य करत सदर कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता या कार्यालयावर अजित पवार गटाचे नेते तथा मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटीही लावण्यात आली आहे. यामुळे या गटाचा शरद पवार गटाशी मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची शरद व अजित पवार अशी 2 शकले पडली आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या गटाने राष्ट्रवादी पक्ष व निवडणूक चिन्हावरही दावा ठोकला. सध्या या प्रकरणी निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे. त्यात हे दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येत आहेत. त्यातच आता विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाला दिल्यामुळे दोन्ही गटांतील राजकीय शत्रूत्व आणखी टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंगळवारीच आपल्या पक्षात 2 गट असले तरी कोणतीही फूट पडली नसल्याचा दावा केला होता. तसेच दोन्ही गट अधिवेशन काळात एकाच कार्यालयात बसून कामकाज करणार असल्याचेही स्पष्ट् केले होते. त्यावर अनिल देशमुख यांनी तीव्र हरकत नोंदवली होती. आमचा गट मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे कार्यालयावर आमचाच हक्क आहे. मुंबईतही आमच्या गटाला ठरलेले कार्यालय मिळाले. अजित पवार गटाला दुसरी जागा देण्यात आली. त्यानुसार हिवाळी अधिवेशनातही आम्हालाच कार्यालय मिळेल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी या प्रकरणी व्यक्त केला होता.

करणी सेनेच्या प्रमुखाला गोळ्या घालणारा लष्कराचा जवान:रजा घेऊन हरियाणाला गेला, लॉरेन्स गँगच्या संपर्कात होता

जयपूर-राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची 5 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींची ओळख पटवली आहे. यापैकी एक शूटर रोहित हा मकरानाचा असून दुसरा नितीन फौजी हा हरियाणाच्या महेंद्रगडचा रहिवासी आहे. नितीन सध्या सैन्यात आहे. त्यानेच गोगामेडी यांच्या डोक्यात गोळी झाडली होती.

नितीन नोव्हेंबरमध्ये सुटीवर घरी (महेंद्रगड) आला होता. मग तो निघून गेला. नितीन कुठे गेला याची माहिती घरच्यांना नव्हती. गोगामेडी हत्याकांडाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी नितीनला ओळखले.

शूटर नितीन पंजाबच्या भटिंडा तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील गुंड संपत नेहराच्या संपर्कात होता. संपत नेहराने या हत्येचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याची माहिती मिळाल्यानंतर राजस्थान पोलिसांनी हरियाणामध्ये छापे टाकले. याशिवाय राजस्थानसह उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशात घटनेशी संबंधित अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

दुसरीकडे, या हत्येनंतर आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने राजस्थान बंदची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील बाजारपेठा बंद आहेत. जयपूर शहरात धावणाऱ्या लो फ्लोअर बसेसचे कामकाज बंद करण्यात आले आहे. खासगी शाळांनीही बंदला पाठिंबा दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन लष्करात असून तो महेंद्रगड जिल्ह्यातील डोंगरा जाट या गावचा रहिवासी आहे. तो नोव्हेंबरमध्येच रजेवर आला होता. यानंतर 9 नोव्हेंबर रोजी गाडी दुरुस्त करून देतो, असे सांगून तो घरातून निघून गेला, मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. तेव्हापासून त्याचा कुटुंबाशी संपर्क होऊ शकलेला नाही. सुखदेव सिंग गोगामेडी हत्याकांडात नितीनचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी येथेही छापा टाकला.

10 महिन्यांपूर्वी सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येबाबतचे इनपुट प्राप्त झाल्याची माहिती छापा टाकण्यासाठी हरियाणाला पोहोचलेल्या पोलिस पथकाकडूनही उघड झाली. पंजाब पोलिसांनी हे इनपुट राजस्थान पोलिसांना पाठवले होते. भटिंडा तुरुंगात बंद असलेला गुंड संपत नेहरा गोगामेडी यांच्या हत्येचा कट रचत होता, असे सांगण्यात आले. पंजाब पोलिसांनी हत्येसाठी AK-47 ची व्यवस्था केल्याचेही सांगितले होते.डीजीपी उमेश मिश्रा म्हणाले- घटनेनंतर राजस्थान पोलीस सक्रिय झाले आहेत. बिकानेरसह गुंडांच्या संभाव्य अड्ड्यांवर छापे टाकले जात आहेत. हरियाणासह जवळपासच्या सर्व राज्यांच्या पोलिसांकडून या गैरप्रकारांबाबत अभिप्राय घेतला जात आहे. राजस्थान पोलिसांनी यूपी, हरियाणा, पंजाब आणि मध्य प्रदेश पोलिसांसोबत आरोपींचे फोटो शेअर केले आहेत. मात्र, अद्याप हल्लेखोरांबाबत कोणताही सुगावा मिळालेला नाही.

पोलिस चोरट्यांचे फोटो घेऊन गुन्हेगारांची चौकशी करत आहेत. बिकानेर तुरुंगात राजू थेथ यांची हत्या करणाऱ्या तीन गुन्हेगारांची आणि जयपूर तुरुंगातील एका गुन्हेगाराचीही पोलिस चौकशी करत आहेत. जयपूरचे एक पथक यूपी आणि हरियाणाच्या तुरुंगात बंद असलेल्या गुन्हेगारांची चौकशी करण्यात व्यस्त आहे. ज्यांनी यापूर्वी राजस्थानमध्ये गुन्हे केले आहेत.

राजस्थानच्या वेगवेगळ्या कारागृहात बंद असलेल्या रोहित गोदाराच्या गुंडांचीही पोलीस चौकशी करत आहेत. कारागृहातून या चोरट्यांबाबत नक्कीच काही सुगावा लागेल, अशी पोलिसांना खात्री आहे. खून, खंडणी, धमकावणे या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांची, शूटर्सची चौकशी सुरू आहे. जयपूर कारागृहातील झी क्लबवर गोळीबार करणाऱ्या आरोपींचीही चौकशी सुरू आहे. राजू थेहाट यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचीही चौकशी करण्यात आली आहे.या खून प्रकरणातील आणखी एक दुवा समोर येत आहे. सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा परदेशात बसलेला गुंड रोहित गोदारा हा संपत नेहराचा सहकारी होता. परदेशात पळून जाण्यापूर्वी रोहित गोदाराने संपत नेहरासह राजस्थानमध्ये अनेक गुन्हे केले होते. त्यामुळे रोहित गोदाराच्या सांगण्यावरून संपत नेहराने शस्त्र आणि शूटरची व्यवस्था करून हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. नेहरा आणि रोहित गोदारा हे दोघेही लॉरेन्स गँगचे सदस्य आहेत. गोगामेडी येथे झालेल्या गोळीबारानंतर गुंड रोहित गोदाराने सोशल मीडियावर पोस्ट करून हा खून आपणच घडवून आणल्याचा दावा केला होता. गोगामेडी यांनी शत्रूंना मदत केल्याचा आरोप त्याने केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव सिंह गोगामेडी यांचे घर श्याम नगर जनपथवर आहे. मंगळवारी दुपारी 1.03 च्या सुमारास तीन हल्लेखोर त्यांच्या घरी पोहोचले. आधी ते सोफ्यावर बसले आणि गोगामेडींशी बोलू लागला. सुमारे 10 मिनिटांनंतर दोन हल्लेखोर उठले आणि त्यांनी गोळीबार केला. गोळीबार सुरू असताना गोगामेडींच्या गार्डने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरही हल्लेखोरांनी गोळीबार केला.

तेथून निघताना एका आरोपीने गोगामेडी यांच्या डोक्यातही गोळी झाडली. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात नवीनला गोळी लागली आणि त्याचाही मृत्यू झाला.

गोळीबारानंतर दोन हल्लेखोर धावत रस्त्यावर आले आणि त्यांनी कार थांबवून लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चालकाला पिस्तूल दाखवताच चालकाने गाडी पळवून नेली. यादरम्यान मागून येणाऱ्या स्कूटीस्वाराला हल्लेखोरांनी लक्ष्य केले. स्कूटरस्वाराला गोळ्या घालून जखमी करून स्कूटरसह पळ काढला. माहिती मिळताच श्यामनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

नवीन शेखावत हा गोगामेडींचा जुना गनमॅन असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. नवीनने गोगामेडींची भेट घडवल्यास चांगले पैसे देण्याचे आश्वासन या आरोपींनी दिले होते. नवीन हा सौदा करण्यासाठी दोन्ही आरोपींसोबत गोगामेडी यांच्या घरी गेला होता. राहत्या घरी जाण्यापूर्वी हे आरोपी नवीनसोबत गोगामेडी येथील वैशाली नगर येथील फ्लॅटमध्ये गेले. गोगामेडी न भेटल्याने हे आरोपी झोटवाडा येथील एका दुकानात गेले. तिथून साफा विकत घेतला. हा साफा घेऊन हे तिघेही श्याम नगर येथील गोगामेडी यांच्या घरी पोहोचले.

नवीनला भेटण्यापूर्वी चोरट्यांनी त्याच्याशी इंटरनेट कॉलिंगद्वारे सर्व संभाषण केले होते. कारण पोलीस पकडू शकतात हे गुन्हेगारांना माहीत होते. नवीनच्या फोनवरून पोलिसांना कोणतीही मोठी माहिती मिळत नाहीये.

कोण होते गोगामेडी
सुखदेव सिंह गोगामेडी हे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. याआधी ते दीर्घकाळ राष्ट्रीय करणी सेनेशी संबंधित होते. वादानंतर राष्ट्रीय राजपूत करणी सेना या नावाने वेगळी संघटना स्थापन करण्यात आली.

करणी सेनेपासून वेगळे होऊन या संघटनेची केली स्थापना
2006 मध्ये पहिल्यांदा करणी सेनेची स्थापना झाली. पुढे लोकेंद्रसिंग कालवी यांनी राजपूत करणी सेना ही वेगळी संघटना स्थापन केली. 2012 मध्ये सुखदेव सिंह गोगामेडी यांना श्री राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले होते, मात्र नंतर कालवी आणि गोगामेडी यांच्यात वाद झाला. सुखदेव सिंह गोगामेडी यांनी 2017 मध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेना या नावाने वेगळी संघटना स्थापन केली होती. श्री राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपाल सिंह मकराना आहेत. सुखदेव सिंग हे राष्ट्रीय राजपूत करणी सेना नावाची संघटना सांभाळत होते.

कोण आहे रोहित गोदारा
गोगामेडीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा गँगस्टर रोहित गोदारा हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा हस्तक आहे. त्याच्यावर पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गोदारा 2022 मध्ये बनावट नावाने पासपोर्ट बनवून देशातून पळून गेला होता. परदेशात जाण्यापूर्वी गोदारा बिकानेरच्या लुंकरानसार येथील कापुरीसर येथे राहत होता. 2019 मध्ये सरदारशहर, चुरू येथे भिनवराज सरन यांच्या हत्येप्रकरणीही तो मुख्य आरोपी होता. गुंड राजू थेहाटच्या हत्येची जबाबदारीही गोदाराने घेतली होती.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम

 मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना बुधवार दि.०६ डिसेंबर २०२३  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दादर, शिवाजी पार्क येथे माहिती व प्रसिद्धी स्टॉल व भोजन स्टॉल उभारण्यात आलेला आहे. या माहिती स्टॉलचे उद्घाटन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व विविध महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या माहिती स्टॉलमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती पुस्तिका मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध महामंडळे कार्यरत आहेत. या महामंडळाच्या योजनांची माहिती पुस्तिकाही मोफत वाटप करण्यात येत आहे.

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्यावतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी भोजन स्टॉल उभारण्यात आला असून या स्टॉलवर भोजनाचा एक बॉक्स व एक पाणी बॉटल याचे वाटप करण्यात येत आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या वतीने पुस्तक स्टॉल उभारण्यात आलेला आहे. या पुस्तक स्टॉलवर बार्टीच्या विविध उपक्रमांची माहिती देणारी पुस्तके उपलब्ध आहेत. या माहिती व प्रसिद्धी स्टॉलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यासारख्या महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तके उपलब्ध आहेत. या सर्व पुस्तकांवर ८५% इतकी सूट देण्यात आलेली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती व प्रसिद्धी स्टॉलला व मोफत भोजन स्टॉलला भेट द्यावी, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.

चायनीज मांजाबंदीची कडेकोट अंमलबजावणी करा -नितीन कदम

पुणे-सर्वोच्च न्यायालयाने चायनीज मांजावर बंदी घातली आहे. या बंदीची काटेकोरपणे पोलीस आणि महापालिकेने अंमलबजावणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहरअध्यक्ष नितीन कदम, तसेच नितीन जाधव,स्वप्निल दुधाने, स्वप्निल खडके यांनी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी या दोन्ही आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि ,’

येत्या काही दिवसात संक्रातीचा सण साजरा होत आहे. भारतीय परंपरेनुसार संक्रातीला पतंग उडवून सण साजरा केला जातो.सदर पतंग उत्सव साजरा करत असताना पारंपारिक मांजा ऐवजी सध्या चायनीज मांजाचा वापर सर्रास होत आहे.. या मांजामुळे हजारो लोक गंभीररित्या जखमी होऊन काही मृत्यूमुखी सुद्धा पडले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या चायनीज मांजावर बंदी घातली आहे..आत्ताही बाजारामध्ये सर्रास चायनीज मांजा उपलब्ध असल्याचे दिसून येते. महापालिका तसेच पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रशासन अपघात होऊन नागरिकांच्या जीवावर बेतायची का वाट बघत आहे..!

सदर मांजा दिसायला अदृश्य( अगदी बारीक )असल्याने पशुपक्षी त्यामध्येअडकून जखमी होतात. पुणे शहरातल्या झोपडपट्ट्यांचा अभ्यास केल्यास बऱ्याच भागात तारा वायर्स ह्या ओपन आणि गुंतागुंतीच्या प्रमाणात आहेत.तिथेही कुठल्या प्रकारचा अपघात होऊ शकतो..एकंदरीत पर्यावरणासाठी सुद्धा अत्यंत हानिकारक असल्याने आपणास पत्र देत आहोत की त्वरित या बंदी असलेल्या चायनीज मांजावर कारवाई करावी. अन्यथा आपल्या तीव्र आंदोलन करण्यात येईल.

शिवराज्याभिषेकासह रायगडाची कथा ऐकण्याची संधी

शुक्रवारपासून तीन दिवसीय व्याख्यानमाला

पुणे, ५ डिसेंबर
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या तीनशेपन्नासाव्या वर्षाचे औचित्य साधून शिवराज्याभिषेक आणि रायगडाची संपूर्ण ओळख करून देणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत ही व्याख्याने होणार असून ही व्याख्यानमाला ८ ते १० डिसेंबर दरम्यान होईल.

अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रम न्यास यांच्या वतीने स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये रोज सायंकाळी सात वाजता ही व्याख्याने होणार आहेत. सर्वांसाठी ही व्याख्यानमाला निःशुल्क खुली आहे.

व्याख्यानमालेत शुक्रवारी, ८ डिसेंबर रोजी ‘असा होता रायगड’ या व्याख्यानात डॉ. रमा लोहकरे रायगडाचा इतिहास मांडणार आहेत. रायगड या विषयावर त्यांनी पीएच.डी. संपादन केली आहे. त्याच दिवशी इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांचे ‘असा झाला राज्याभिषेक’ या विषयावर व्याख्यान होईल. शनिवारी, ९ डिसेंबर रोजी ‘कला रसिक बाबासाहेब’ हा कार्यक्रम समूह नाट्याचे प्रणेते संजय पुरंदरे, जाणता राजा महानाट्याचे प्रथम दिग्दर्शक दिवाकर पांडे, होनराज मावळे आणि सहकलाकार सादर करणार आहेत.

दुर्ग आणि इतिहास अभ्यासक महेश तेंडुलकर ‘इतिहासकार बाबासाहेब’ या विषयावरील व्याख्यान आणि सादरीकरण रविवारी, १० डिसेंबर रोजी करतील. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने होणाऱ्या या वैचारिक मंथनात सहभागी होण्याचे आवाहन अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रम न्यास यांनी केले आहे.

शिवसेनेची ध्येयधोरणे घरोघरी पोचविण्यासाठी महिला सज्ज : सुलभा उबाळे

पुणे (दि.५ डिसेंबर २०२३)- कोरोना काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जबाबदार कुटुंब प्रमुख या नात्याने जनतेची सेवा केली. हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांना शिवसेनेत बरोबर घेऊन मोठी पदे दिली. परंतु काहींनी शिवसेनेला अडचणीत आणून स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षात फूट पाडली. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष वाढविणे आणि पक्षाची ध्येयधोरणे घरोघरी पोचविण्यासाठी जबाबदारी महिला सक्षमपणे पार पाडण्यासाठी महिला सज्ज झाल्या आहेत असे प्रतिपादन जिल्हा संघटीका सुलभा उबाळे यांनी केले.
शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडी पदाधिकारी यांचा नियुक्ती पत्र वाटप समारंभ सेना भवन आकुर्डी येथे आयोजित करण्यात आला होता. शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, पुणे शहर संपर्क प्रमुख सचिनभाऊ अहिर तसेच महिला आघाडी मावळ पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख लतिकाताई पाष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी सुलभा उबाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा प्रमुख शैलाताई खंडागळे, शहर संघटीका अनिताताई तुतारे, शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले आणि चेतन पवार युवा अधिकारी पिंपरी चिंचवड, युवराज कोकाटे शहर संघटक, रेखाताई दर्शले माजी नगरसेविका, नितीन बोंडे आदी उपस्थित होते.
यावेळी पिंपरी, चिंचवड, भोसरी मधील अनेक महिलांनी पक्ष प्रवेश केला.
भोसरी विधानसभा संघटिका कल्पना शेटे, समन्वयक पिंपरी सुजाता काटे, गौरी घंटे, विभाग संघटिका सुजाता गायकवाड (अंजठा नगर), उपविभाग संघटिका साधना वाघमारे (भोसरी), शाखा संघटिका वंदना बनसोडे (अंजठा नगर), पिंपरी विधानसभा संघटिका डॉ. वैशाली अभय कुलते, समन्वयक पिंपरी चिंचवड वैभवी घोडके, उपशहर संघटिका कामिनी मिश्रा, सुषमा शेलार, विभाग संघटिका संगीता भारती (संत तुकाराम नगर), पुनम रिठे (पिंपरी) चिंचवड विधानसभा संघटिका मंगल भोकरे, समन्वयक चिंचवड विधानसभा उषा आल्हाट, उपशहर संघटिका रजनी वाघ, योगिनी मोहन, ज्योती भालके, विभाग संघटिका कमळ गोडांबे (पिंपळे सौदागर), वंदना वाल्हेकर (वाल्हेकर वाडी), वैशाली काटकर (चिंचवड), अमृता सुपेकर (रहाटणी), गीता कुसाळकर (वाकड), उपविभाग प्रमुख सुनिता सोनवणे (रहाटणी), श्रद्धा शिंदे (काळेवाडी), कलावती नाटेकर (चिंचवड), वंदना खंडागळे (पिंपळे सौदागर) हर्षाली घरटे(वाल्हेकरवाडी) तस्लीम शेख (काळेवाडी) या महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
संगिता परेश शाह, पुष्पा पाटील, राणी देवकर, रेहाना शेख, बालिका गुरव, प्रतीक्षा जाधव, खरात पाटील, आलिया शहा, वाल्या शहा, कविता जाधव, रोहिणी पाटील, लतिका कुंभार, किरण संहिता, सोनी वाघमारे, बालिका वाघमारे, समरिन भालेराव, मनीषा गडावर, अरूणा सुर्यवंशी, नविता शिंदे, राणी सुवासे, सुरेखा भवारे, मनीषा जाधव, श्रद्धा माडे, बेबी जगताप, सुजाता गायकवाड, वंदना बनसोडे, साधना वाघमारे आदींनी पक्ष प्रवेश केला त्यांचे स्वागत शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केली.

अभिनेते मनोज जोशी यांच्या ‘चाणक्य’ नाटकाचे दोन मोफत प्रयोग

चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून नाट्यपर्वणी

पुणे- मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पुणेकरांना नाट्यपर्वणी अनुभवता येणार असून, प्रसिद्ध सिने अभिनेते मनोज जोशी यांच्या चाणक्य नाटकाचे दोन प्रयोग मोफत प्रयोग दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहेत. या नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्यासाठी दि ६ डिसेंबर रोजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड मधील जनसंपर्क कार्यालयात प्रवेशिका मिळणार आहेत.

भारताच्या वैभवशाली इतिहासातील आचार्य चाणाक्य हे एक महान विद्वान आणि कुशल रणनीतिकार होते. त्यांची धोरणे आजही लोकांना मार्गदर्शन करतात. त्यांनी चाणक्य नीतीमध्ये मानवी जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यांच्या धोरणांद्वारे, एखादी व्यक्ती आपले जीवन सुधारू शकते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात धर्म-अधर्म, कर्म, पाप-पुण्य याशिवाय यशाचे अनेक मंत्र सांगितले आहेत.

आचार्य चाणक्य यांच्या जीवनावर अभिनेता मनोज जोशी यांनी ‘चाणक्य’ या नाटकाची निमिर्ती केली असून, या नाटकाचा मोफत प्रयोग चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ आणि रात्री ९ वेळेत हे दोन नाट्यप्रयोग बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.

या नाटकाच्या प्रवेशिका दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड, बाणेर जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच कसबा भागातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यान्वित नागरी सुविधा केंद्रातही सदर नाटकाच्या प्रवेशिका उपलब्ध असणार आहेत‌. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाची हत्या, VIDEO:गोगामेडी यांच्यावर घरात घुसून गोळीबार; एक तरुणही ठार; गोदारा गँगने घेतली जबाबदारी

जयपूर-राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमधील घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी, भरदिवसा, 3 आरोपींनी गोगामेडींवर गोळीबार केला, नंतर ते पळून गेले. गोगामेडी यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

https://twitter.com/PTI_News/status/1731988066406191330

गोगामेडी यांच्यासोबत घटनेवेळी उपस्थित असलेले गार्ड अजित सिंग हे गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना गोगामेडी यांच्या घरी घेऊन गेलेल्या तरुणाचाही हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. गँगस्टर रोहित गोदाराने हत्येची जबाबदारी घेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव सिंह गोगामेडी यांचे घर श्यामनगर जनपथवर आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास तीन हल्लेखोर त्यांच्या घरी पोहोचले. आधी ते सोफ्यावर बसले आणि गोगामेडींशी बोलू लागले. सुमारे 10 मिनिटांनंतर दोन हल्लेखोर उठले आणि त्यांनी गोळीबार केला. गोळीबार सुरू असताना गोगामेडींच्या गार्डने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरही हल्लेखोरांनी गोळीबार केला.

तेथून निघताना एका आरोपीने गोगामेडी यांच्या डोक्यात गोळी झाडली. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात नवीनला गोळी लागली आणि त्याचाही मृत्यू झाला.

गोळीबारानंतर दोन हल्लेखोर धावत रस्त्यावर आले आणि त्यांनी कार थांबवून लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चालकाला पिस्तूल दाखवताच चालकाने गाडी दामटली. यादरम्यान मागून येणाऱ्या स्कूटीस्वाराला हल्लेखोरांनी लक्ष्य केले. स्कूटरस्वाराला गोळ्या घालून जखमी करून स्कूटरसह पळ काढला. माहिती मिळताच श्यामनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

येथे गोगामेडी यांच्या संघटनेशी संबंधित लोकांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली.सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येनंतर डीजीपी उमेश मिश्रा यांनी राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी नाकाबंदी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. विशेष दक्षतेसोबतच संबंधित जिल्ह्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यासही सांगण्यात आले आहे.

येथे घटनेनंतर गँगस्टर रोहित गोदाराच्या नावाने तयार केलेल्या फेसबुक पेजने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. पोस्टमध्ये लिहिले- राम राम, सर्व भावांना, मी रोहित गोदारा कपुरीसर, गोल्डी ब्रार आहे. बंधूंनो, आज सुखदेव गोगामेडी यांची हत्या झाली. याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. आम्ही ही हत्या घडवून आणली आहे.

सुखदेव सिंह गोगामेडी हे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. याआधी ते दीर्घकाळ राष्ट्रीय करणी सेनेशी संबंधित होते. या वादानंतर राष्ट्रीय राजपूत करणी सेना या नावाने वेगळी संघटना स्थापन करण्यात आली.

करणी सेनेपासून वेगळे होऊन या संघटनेची स्थापना
2006 मध्ये पहिल्यांदा करणी सेनेची स्थापना झाली. पुढे लोकेंद्रसिंग कालवी यांनी राजपूत करणी सेना ही वेगळी संघटना स्थापन केली. 2012 मध्ये सुखदेव सिंह गोगामेडी यांना श्री राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले होते, मात्र नंतर कालवी आणि गोगामेडी यांच्यात वाद झाला. सुखदेव सिंह गोगामेडी यांनी 2017 मध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेना या नावाने वेगळी संघटना स्थापन केली होती. श्री राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपाल सिंह मकराना आहेत. सुखदेव सिंह हे राष्ट्रीय राजपूत करणी सेना नावाची संघटना सांभाळत होते.

कोण आहे रोहित गोदारा
गोगामेडीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा गँगस्टर रोहित गोदारा हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा हस्तक आहे. त्याच्यावर पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गोदारा 2022 मध्ये बनावट नावाने पासपोर्ट बनवून दुबईला पळून गेला होता.

पाणीगळती:पुण्यापाठोपाठ साताऱ्यातही पाण्यासाठी मीटर बसविणार

सातारा, दि.५: शहराची भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठा योजना, वितरण वाहिन्या आदींचे व्यवस्थापन करण्यासह पाणीगळती रोखण्यासाठी सर्व नळजोडण्यांना मीटर बसविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा नगर परिषदेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, सातारा नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर परिषद प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, यावर्षी धरणांतील पाणीसाठ्याची गंभीर परिस्थिती असून पुढील काळात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कास तलावात पुरेसे पाणी असले तरी त्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे झाले पाहिजे. पाणी गळती होऊ नये यासाठी सर्व शहरात नळजोडण्यांना मीटर बसवणे आवश्यक आहे.

शहरात स्वच्छ्ता राखण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी कचरा व्यवस्थापन योग्यरित्या करावे. भुयारी गटार योजना शहराच्या ठराविक भागात न करता संपूर्ण शहर समाविष्ट होईल, अशा प्रकारे राबवावी. त्यासाठी उर्वरित भागाचा प्रस्ताव तातडीने तयार करून सादर करावा, असेही पालकमंत्री म्हणाले.

शहर सौंदर्यीकरण प्रकल्पांचा आढावा घेताना श्री. देसाई म्हणाले, उड्डाण पुलांच्या खालील भागांचे सौंदर्यीकरण करत असताना वृद्ध, बालकांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता येईल याचाही विचार करावा.

यावेळी श्री. बापट यांनी सादरीकरण करून नगर परिषदेच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. कास धरणाची उंची वाढविण्याचे काम झाले असल्यामुळे कास धरणातील पाणी संपूर्ण शहरासाठी येणार आहे. अमृत २.० अंतर्गत जल विद्युत प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे, प्रस्तावित कास पाणी पुरवठा योजना, शहर सौंदर्यीकरण, गोडोली तळे खोलीकरण, सौंदर्यीकरण, अजिंक्यतारा रस्ता विकसित करणे आदी प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.

रुपाली चाकणकर यांच्याबाबत बदनामीकारक पोस्ट; ४ जणांवर गुन्हा दाखल, एक निघाला मनोरुग्ण

पुणे: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्द्ल सोशल मीडियावर अश्लील पोस्ट टाकून त्यांची जनमानसात बदनामी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यातील एक आरोपी मानसिक रुग्ण असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

विकास सावंत, जयंत पाटील, रणजित राजे हट्टींमबिरे आणि अमोल के. कुटे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भाऊ संतोष बबन बोराटे यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्हयाच्या तपासाविषयी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. जयंत पाटील, रणजित राजे हट्टींमबिरे आणि अमोल के. कुटे यांच्या मोबाईल क्रमांकांची माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीचे विश्लेषण करून संशयित जयंत रामचंद्र पाटील हा सांगलीतील धनगरवाडी परिसरात रहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबरचे एक पथक २४ नोव्हेंबर ला त्या ठिकाणी रवाना झाले. त्याच्याकडे केलेल्या तपासादरम्यान तो मानसिक रुग्ण असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्याला सी आरपीसी ४१ (अ) (१) प्रमाणे नोटीस दिली असून, त्याचा जबाब नोंद करून मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. तसेच वसंत रमेश खुले (वय ३४ जि .परभणी) व प्रदीप कणसे या दोघांनाही चाकणकर यांच्या पोस्टवर अश्लील भाषेत कमेंट केल्याप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

गुन्हयाचे तपासी अधिकारी उपनिरीक्षक स्नेहल अडसुळे, विद्या साबळे, पोलीस शिपाई संतोष जाधव, पोलीस शिपाई दिनेश मरकड , पोलीस शिपाई श्रीकृष्ण नागटिळक , उमा पाळावे, पोलीस हवालदार सुनील सोनोने या पोलीस पथकाने पार पाडली.

लघुउद्योजकांना जिल्हास्तरीय पुरस्काराकरीता २० डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. ५ : जिल्ह्यातील पात्र लघु उद्योजकांनी जिल्हा पुरस्कार-२०२३ साठी २० डिसेंबर पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांच्या कार्यालयात सादर कण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्यावतीने जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांना जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येतात. जिल्हा पुरस्कारासाठी शासनाने विहित केलेल्या निकषाप्रमाणे लघु उद्योगांची निवड करण्यात येते.

जिल्हा पुरस्कारासाठी ज्ञापन पोहोच भाग २, उद्योग आधार, उद्यम नोंदणी हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालयाकडे मागील तीन वर्षे नोंदणीकृत असावा. (१ जानेवारी २०२० पूर्वीची नोंदणी, उद्योग आधार किंवा उद्यम नोंदणी). उद्योग घटक मागील दोन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेतील असावा. लघु उद्योग कोणत्याही संस्थेचा, बँकेचा थकबाकीदार नसावा. जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकासाठी रुपये १५ हजार व द्वितीय पुरस्कारासाठी रुपये १० हजार व मानचिन्ह असे पुरस्कार आहेत.

जिल्हा उद्योग केंद्र येथे अर्ज विनामुल्य उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२०-२५५३९५८७, २५५३७५४१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांनी केले आहे.
000

दिवाळी उत्साहात मात्र वीजबिल भरण्यासाठी निरुत्साह

पश्चिम महाराष्ट्रात थकीत वीजबिल वसूली मोहिमेला वेग

पुणे, दि. ०५ डिसेंबर २०२३दिवाळी प्रकाशाचा सण म्हणून नुकतीच उत्साहात साजरी झाली. मात्र सर्वांना प्रकाशमान ठेवणाऱ्या महावितरणच्या वीजबिलांकडे ग्राहकांकडून गेल्या नोव्हेंबरमध्ये चांगला प्रतिसाद दिला नाही. परिणामी आर्थिक कोंडी झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महावितरणकडून थकीत वीजबिलांच्या वसूलीला मोठा वेग देण्यात आला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पुणे प्रादेशिक विभागात सद्यस्थितीत १८ लाख २ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे ३७६ कोटी ६७ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. यात पुणे जिल्हा- २३० कोटी २१ लाख रुपये (८ लाख ५२ हजार ग्राहक), सातारा २७ कोटी (२ लाख १४ हजार ग्राहक), सोलापूर- ५४ कोटी ४३ लाख (२ लाख ७४ हजार ग्राहक), कोल्हापूर- ३६ कोटी २० लाख (२ लाख ४५ हजार ग्राहक) आणि सांगली जिल्ह्यात २८ कोटी ८३ लाख रुपयांची (२ लाख १७  हजार ग्राहक) थकबाकी आहे.

महावितरणच्या महसूलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसूली हाच आहे. वीजखरेदीमध्ये दरमहा महसूलामधील सुमारे ८० टक्के रक्कम खर्च होते. त्यानंतर दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापना आदींचा खर्च वीजबिलातून मिळालेल्या महसूलावरच अवलंबून आहे. गेल्या महिन्यात दिवाळी उत्साहात साजरी झाली. मात्र इतर खर्चाच्या तुलनेत चालू महिन्याचे वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महावितरणच्या थकबाकीदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. थकबाकी तसेच चालू महिन्याचे वीजबिल भरून सहकार्य करावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात वीजबिलांच्या थकबाकीमध्ये सर्वाधिक १५ लाख ९१ हजार २४६ घरगुती ग्राहकांकडील २४१ कोटी ५२ लाख रुपये तर २ लाख १० हजार ७४४ वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील १३५ कोटी १४ लाख रुपयांचा समावेश आहे. वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला वेग देण्यात आला आहे. आता एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.

वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.