पुणे-बीआरटी मार्गात पीएमपीएमएलबस आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एका महाविद्यालयीन तरुणीचा बळी गेला. पोलिसांनी या मयत मुलीला आरोपी करून गुन्हा दाखल केला आहे. यात या मुलीच्या मागे बसलेला तिचा मित्र मात्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात येरवड्यातील डेक्कन कॉलेज बसस्थानकासमोरील बीआरटी मार्गात घडला आहे.
ऋतूजा अमित कदम (वय 17 रा. दिघी ) असे ठार झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. तिचा मित्र प्रतीक दौलत मोहोड (वय 24 रा. गणेशनगर, बोपखेल) असे गंभीररित्या जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.या प्रकरणी पीएमपीएमएलने फिर्याद दिलेली नाही तर पोलिस अंमलदार सागर जगताप यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतूजा महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तीन डिसेंबरला ऋतूजा आणि तिचा मित्र प्रतीक दुचाकीवरून जात होते. येरवड्यातील डेक्कन कॉलेज बसस्थानकासमोरील बीआरटी मार्गातून जाताना ऋतूजा दुचाकी चालवित होती. त्यावेळी तिने समोरून आलेल्या पीएमपीएलला जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडून गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान, ऋतूजाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अमर कदम (८९९९०६०६३५)तपास करीत आहेत.मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
रस्ता केवळ एकाच वाहतूक कंपनीच्या वाहनांसाठी असू शकतो काय ?
पीएमपीएमएल हि एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देणारी कंपनी आहे. बीआरटी मार्ग हा केवळ या कंपनीसाठी दिल्याने हा मार्ग बऱ्याच वेळा मोकळा असतो आणि त्यालगत मात्र खाजगी वाहनांना अत्यंत अरुंद रस्ता सोडल्याने तिथे खाजगी वाहनांची मोठी गर्दी होऊन कोंडी होते , एका आजूला कोंडी तर दुसऱ्या बाजूला सुसाट जाता येईल असा मोकळा पडलेला रस्ता असे चित्र बीआरटी ने तयार केलेले आहे. याच बीआरटी मार्गाचे भांडवल करत अजित पवार यांनी सुरेश कलमाडी यांची पुणे महापा ली केतील सत्ता उलथवून टाकली होती .
आता हेल्मेट वापरा , बीआरटी चा वापर करू नका असा प्रचार सुरु होणे साहजिक आहे. पण अर्थातच अल्पवयीन मुलांच्या हातही गाडी देणे चुकीचेच आहे.
पुणे- शहरातले प्रदूषण हे बांधकामे आणि वाहतुकीने होत असल्याचा स्पष्ट दावे केले जात आहेत.माझे शहर सुंदर शहर अशा घोषणा देत शहरातील झोपडपट्टी निर्मूलनाचा कार्यक्रम वर्षानुवर्षे राबविला जातोय.त्यासाठी महापालिकेनंतर स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण देखील केले गेले मात्र अद्यापही झोपडपट्ट्या मात्र नाहीश्या होत नाहीत असे चित्र असताना या प्राधिकरणाचा कारभारच गोलमाल कारभार आहे कि काय ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत याच पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी या प्रकरणात एका नव्या ‘गोलमाल ‘प्रवृत्तीवर आसूड ओढले आहेत आणि हा ५० हजार कोटीचा घोटाळा तर नाही ना ? असा प्रश्न थेट महापालिका प्रशासनाला केला आहे.
या संदर्भात केसकर यांनी महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन दिले आहे यात असे म्हटले आहेकी,’ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे सध्या झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्राधिकरण न राहता फक्त पुणे शहरातील जुने वाडे आणि इमारती यांच्या पुनर्वसनासाठी पुनर्विरमानासाठी बनलेले प्राधिकरण आहे.झोपडपट्टी सदृश्य असा अभिप्राय वॉर्ड ऑफिसर च्या माध्यमातून त्यांच्या अभियंत्याकडनं घेतात आणि जुने वाडे हे झोपडपट्टी सदृश असल्याचे जाहीर करून झोपडपट्टी पुनर्वसन योजना जाहीर करतात.यामध्ये पुणे महानगरपालिकेचे नुकसान आहे.पुणे मनपाला विकास शुल्क मिळत नाही. विकासकाला शुल्क भरावे लागत नाही आणि टीडीआर विकून करोडो रुपये मिळतात त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वार्ड रचनेतील अभियंत्यांना हाताशी धरून हे सगळे षडयंत्र चालू आहे.पुणे महानगरपालिकेच्या पेठांच्या मध्ये जवळपास 20 हजार वाडे आहेत त्यांचा विचार केला तर हा 50 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार घोटाळा आहे.आमची महानगरपालिका आयुक्त यांना विनंती आहे आपल्या परवानगीशिवाय कुठल्याही अभियंत्याने झोपडपट्टी सदृश्य असा अभिप्राय देऊ नये हा अभिप्राय देण्याचा दर किमान 30 लाख रुपये असल्याचे कळते.आपण याबाबत त्वरित योग्य पावले उचलून हे अभिप्राय देणे थांबवावे आपल्या किंवा नगर अभियंत्यांच्या परवानगीशिवाय कुठल्याही अभियंत्याने कुठलाही अभिप्राय देऊ नये असे आदेश निगरमित त्वरित करावेत ही हात जोडून विनंती आहे. असे केसकर यांनी म्हटले आहे.
पुणे-खूनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे, दहशत पसरवणे असे गुन्हे केल्याबद्दल अक्षय राजु नवगिरे(टोळी प्रमुख) व त्याचा एक साथीदार याचेवर मकोका अंतर्गत कारवाईकरण्यात आल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दि.१९/११/२०२३ रोजी बिकानेर स्वीट समोर, तसेच नारायण मोझे शाळेसमोर, मुंजबा वस्तीपुणे या ठिकाणी यातील फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ हे जेवण झाल्यानंतर फेरफटका मारुन गप्पा मारत थांबले असताना, अक्षय नवगिरे व आकाश विश्वकर्मा यांनी दुचाकीवरुन येऊन फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ यास शिवीगाळ व दमदाटी करुन अक्षय नवगिरे याने त्याचे हातातील कोयता फिरवुन तेथे दहशत निर्माण करुन फिर्यादी व त्यांचे भावास कंबरेच्या पटयाने व हातातील जाड कड्याने, लाथा-बुक्यांनी मारहाण करुन, चुलत भाऊ याचे डोक्यात कडे मारुन गंभीर जखमी करून, पोलिसांत तक्रार केली तर तुमचे काही खरे नाही अशी धमकी दिली म्हणुन फिर्यादी यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं.३४३/२०२३ भा. द. वि.क. ३२६,३२३,५०४, ५०६,३४, आर्म अॅक्ट कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचे तपासा दरम्यान यातील आरोपी नामे १) अक्षय राजु नवगिरे, वय-२५ वर्षे, रा. गोकुळ नगर, मनपा शाळेजवळ, धानोरी, पुणे (टोळी प्रमुख) २) आकाश शिवशंकर विश्वकर्मा, वय-२१ वर्षे, रा. परांडे नगर, धानोरी, पुणे (टोळी सदस्य) यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर नमुद आरोपी नामे अक्षय राजु नवगिरे (टोळी प्रमुख) याची पूर्व रेकॉर्डची पाहणी करता, त्याचेवर विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल असुन, त्याने त्याचे साथीदारासह स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित करण्यासाठी विश्रांतवाडी, येरवडा, विमानतळ पोलीस स्टेशन परीसरात खूनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हे केलेले आहेत. यातील आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचे हेतुने व इतर फायदयासाठी सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आलेने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) प्रमाणेचा अंतर्भाव करणेसाठी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. दत्तात्रय भापकर यांनी मा. पोलीस उप आयुक्त परी-०४, पुणे, श्री. शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने . अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणी छाननी करुन विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं.३४३/२०२३, भा.द.वि.क. ३२६, ३२३,५०४,५०६,३४, आर्म अॅक्ट कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) (३) सह१३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेट कलम ३ व ७ या दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३(४) प्रमाणेचा अंतर्भाव करणेची अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ पुणे शशिकांत बोराटे, सहा पोलीस आयुक्त, खडकी विभाग श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे, पोलीस उप निरीक्षक शुभांगी मगदुम व सत्यवाण गेंड सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार मनोज शिंदे, सुनिल हसबे, यांनी केली आहे. पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून, शरीराविरुध्द व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ९३ वी कारवाई आहे.
मुंबई, दि.६ : जगभरातील लोक भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
दादर चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते.
यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे, देशभरातील आलेले अनुयायी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान शिक्षणतज्ज्ञ होते, शोषितवर्गाचे शिक्षण झाले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. मागास, वंचित, बहुजनांना शिक्षण मिळण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीसारख्या संस्थांच्या माध्यमातून आजही काम सुरू आहे. महिलांच्या अधिकारासाठी कार्य केले आणि महिलांना सन्मान मिळवून दिला. इंदू मिल येथील निर्माणाधीन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण होईल, याचा मला विश्वास असल्याचेही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी सांगितले.
भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या संविधानानुसार भारतीय लोकशाहीची वाटचाल सुरू आहे. भारतीय संविधान संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक कायदे तयार केले. अर्थव्यवस्था, ऊर्जा, सिंचन, महिला धोरण, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील धोरणांची आखणी केली आणि या धोरणाला मानवतेच्या विचारांची जोड दिली. त्यामुळेच देशाची एकता, बंधुता, एकात्मता या तत्त्वांना बळ मिळाले. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाचे महत्त्व आजच्या पिढीला लक्षात येण्यासाठी शासनाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. मा. सर्वोच्च न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. तसेच जगाला हेवा वाटेल असे इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच बरोबर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या कामालाही वेग दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारत अतिशय वेगाने प्रगती करीत आहे. जगातील पाचव्या क्रमांकावरील भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला जाते. भारतीय संविधानाने सकल बहुजनांना न्याय देण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मंत्रीकाळातील कार्य भारताच्या निर्मितीतील महत्त्वाचे पाऊल ठरते. इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होईल. दीक्षाभूमी येथे २०० कोटीची विकास कामे सुरू केली आहेत. तसेच लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर शासनाने विकत घेतले आहे. तेथील संग्रहालयाला देश विदेशातील पर्यटक भेट देतात. जपान मधील कोयासन विद्यापीठ मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचेभव्य स्मारक उभारण्यात येत आहे, या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत असताना समाजात समता, बंधुता रुजवण्यासाठी यशस्वी लढा दिला. सर्वोत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती केली. शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, शेतीतज्ज्ञ,संरक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांचे कार्य अलौकिक आहे. ते दूरदृष्टीचे प्रशासक होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ प्रंबंधाला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे कार्य मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे आहे. यांच्या स्मृती जपण्यासाठी जे करावे लागेलं त्यासाठी शासन कटीबद्ध आहे. बौद्ध पंचायत समितीची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. या समितीचे जे कार्यालय आहे त्याचे काम अपूर्ण होते. मुख्यमंत्री महोदयांनी यासाठी 25 कोटीचा निधी दिला आहे. यावर्षी या इमारतीचे काम पूर्ण होईल.
मंत्री संजय बनसोडे म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यासाठी शासकीय सुट्टी जाहीर केली, यासाठी मा. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो. सिद्धार्थ कॉलेजच्या विकासासाठी निधी दिला, तसेच दि. १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम आयोजन करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल शासनाचे आभार मानले.
यावेळी माजी खासदार नरेंद्र जाधव, भीमराव आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त केले तर आयुक्त डॉ. श्री.चहल यांनी आभार मानले.
भालेराव, देवगावकर, शहरकर, कुंभार यांना यंदाचा पुरस्कार पुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाअंतर्गत योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, दिनांक ११ डिसेंबर सायंकाळी ५ वाजता सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती वेद विद्या संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला अध्यक्ष विलास देशपांडे, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, कोषाध्यक्ष दिलीप संभूस, वेदमूर्ती आहिताग्नी सुधाकरपंत कुलकर्णी, डॉ. संजय देवडीकर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे वैदिक संशोधन मंडळ पुणे चे संचालक सुब्रह्मण्यम वेरीवेंटी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेदाचार्य शांतारामजी भानोसे, नाशिक हे उपस्थित राहणार आहेत. निखिल भालेराव यांना योगीश्वर याज्ञवल्क्य पुरस्कार ( १५०००/- व मानपत्र), वेदांग शहरकर यांना आदर्श छात्र पुरस्कार, ( ११०००/- व मानपत्र), श्रीमती रत्नमाला गजानन जोशी स्मरणार्थ सेवारत्न पुरस्कार (१००००/- व मानपत्र) अरुण देवगावकर यांना देऊन ह.भ. प. बाळू कुंभार यांना ज्ञानेश्वरी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
याशिवाय अथर्व हरदास, कौस्तुभ पाठक, प्रशांत जोशी, चिन्मय जोशी, अभय जोशी यांना छात्र पुरस्कार(प्रत्येकी २५००/-) प्रदान करण्यात येणार आहेत. या शिवाय दिनांक २२जानेवारी २४ रोजी अयोध्येत पुण्यातून रामजन्मभूमी स्थळी पूजेसाठी जाणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असून १०वी १२वी व इतर परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व शिष्यवृत्तीचे चेक वाटप होणार आहे. तरी सर्व पुणेकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
मुंबई, दि. 6 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव उमेश शिंदे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अशोक आगिवले, सोमेश्वर चौगुले, आदिंसह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गानेही गुलाबपुष्प अर्पण करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
मुंबई, दि. ६ : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवर महामार्ग सुरक्षा विभाग केंद्र वडगाव हद्दीत कि.मी ७४/९०० व खंडाळा हद्दीत कि.मी ५६/९०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दि ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वा ते दुपारी २ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार ) किवळे पुलावरून जुना मुंबई -पुणे महामार्गावरून मुंबई दिशेला वळविण्यात येणार आहे. पुणे ते मुंबई जुना महामार्गावरून येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोल नाका येथून एक्सप्रेस वेवर मुंबई दिशेने सोडण्यात येतील.
पुणे, दि. ६ : पुढील वर्षी फ्रान्स (ल्योन) येथे जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत उमेदवारांची निवड होण्यासाठी जिल्हास्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पूर्वतयारीच्या निवडीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फ्रान्स (ल्योन) येथे ५२ क्षेत्रांशी संबंधित जागतिक कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
कौशल्य स्पर्धेचे जिल्हा, विभाग, राज्य तसेच देश पातळीवर आयोजन करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष असून अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, डिजिटल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्री डिझाइन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री ४.०, इन्फर्मेशन नेटवर्क गॅबलिंग, मेकॅट्रॉनिक्स, रोबोट सिस्टीम इंटिग्रेशन आणि जल तंत्रज्ञान या क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी १९९९ किंवा त्यानंतरचा तर इतर क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००२ किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.
कौशल्य स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून निवड होणाऱ्या उमेदवारांना वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांचेमार्फत करण्यात येणार आहे.
स्पर्धेकरिता सर्व शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई टूल रूम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन महाविद्यालये, आयएचएम, हॉस्पिटॅलिटी संस्था, कॉर्पोरेट तंत्रज्ञान संस्था, कौशल्य प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीईटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, फाइन आर्टस कॉलेज, फ्लॉवर ट्रेनिंग इन्स्टिटयूट, इन्स्टिटयूट ऑफ ज्वेलरी मेकिंग तसेच इतर सर्व महाविद्यालये व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यामधील उमेदवारांना नोंदणी करता येईल.
इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://kaushalya.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर २० डिसेंबरपूर्वी नाव नोंदणी करावी. तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित संस्थांनी कौशल्य स्पर्धेबाबतची माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र रास्तापेठ, पुणे या कार्यालयास भेट द्यावी किंवा दूरध्वनी क्र. ०२०-२६१३३६०६/ भ्रमणध्वनी क्र. ८०५५९९२९०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.
पुणे,दि.६ डिसेंबर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी त्यांच्या स्मृतिंना उजाळा देऊन विनम्र अभिवादन केले. तसेच, विद्यापीठाचे विश्वस्त, कुलगुरू, विविध विभागातील विभाग प्रमुख, डीन, डायरेक्टर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पाअर्पण करून अभिवादन केले. यावेळी डब्ल्यूपीयूचे वरिष्ठ सल्लागार डॉ.संजय उपाध्ये, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, प्रा.डॉ. विनोद जाधव व प्रा.डॉ. दत्ता दांडगे उपस्थित होते. विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड म्हणाले,” हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही असे सांगत डॉ. आंबेडकरांनी संत गाडगेबाबा महाराजांना कोणता धर्म स्विकारू असे विचारले होते. भारतात ज्या धर्माचा उगम झाला, अशा धर्माचा स्विकार करा असे गाडगेबाबा यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यता आणि जातिवाद सारख्या सामाजिक दुष्कृत्यांचे उच्चाटन करण्यासाठी अनेक चळवळींचे नेतृत्व केले. एमआयटी डब्ल्यूपीयूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जे अध्यासन आहे, त्या माध्यमातून आता वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.” त्यानंतर डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. संजय उपाध्ये, डॉ.मिलिंद पांडे, गणेश पोकळे, डॉ. दत्ता दांडगे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ आहे. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, कायदेपंडीत, संसदपटू, समाजसुधारक तसेच भारताच्या इतिहासावर त्यांनी आपला आगळा वेगळा ठसा उमटविला आहे.प्रा.विनोद जाधव यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
गुवाहाटी (आसाम)/चंद्रपूर, दि. 6: पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या वनक्षेत्रपालांमुळे जैवविविधता सुरक्षित असून धनापेक्षा जीवन सुरक्षित करणारे वन श्रेष्ठ आहे, हे पटवून सांगण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे यासाठी झटणारे फॉरेस्ट रेंजर्स हे खऱ्या अर्थाने हिरो आहेत. असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
गुवाहाटी येथे आयोजित पहिल्या आशियाई रेंजर्स फोरमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आशिया खंडातील विविध देशांसह, भारताच्या विविध राज्यातील रेंजर्स या तीन दिवसीय फोरमसाठी उपस्थित झाले होते. यावेळी मंचावर आसामचे वने व पर्यावरण मंत्री चंद्रमोहन पटवारी, आसामचे वनबल प्रमुख एम. के. यादव, एशियन रेंजर्स फोरमचे अध्यक्ष रोहित सिंग, आशियाचे अध्यक्ष ख्रिस ग्लोरिस, वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वन संरक्षक संदीप कुमार उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार म्हणाले, जगण्यासाठी श्वास अर्थात प्राणवायू देणाऱ्या जंगलांच्या वाढीची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी. भारतातील सर्वाधिक वाघ महाराष्ट्रात असून, वनक्षेत्रातदेखील मोठी वाढ गेल्या काही वर्षात झाली आहे. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे जागतिक पर्यटकांचा ओढा असतो. जैवविविधता नष्ट होणार नाही यासाठी व्यापक प्रयत्न झाले पाहिजे. महाराष्ट्रात अर्थ व वनमंत्री असताना पर्यावरणाप्रती आपण काही तरी देणं लागतो या भावनेतून अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात वन विभागाचे बजेट वाढविले, आजच्या घडीला देशातील वन विभागाला सर्वाधिक बजेट महाराष्ट्रात मिळत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
यावेळी विशेष कामगिरी करणाऱ्या महिला रेंजर्सना मंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. महाराष्ट्राच्या वन विभागातही महिला कार्यरत असून त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. 50 कोटी वृक्षालागवड, हॅलो फॉरेस्ट अशा प्रकल्पांच्या माध्यमातून आपण सातत्याने महाराष्ट्रातील वनसंवर्धनासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
गुजरातच्या हिना पटेल, मेघालयाच्या मर्थिलिना संगमा, राजस्थानच्या प्रेमकुंवर सत्तावर, महाराष्ट्राच्या दीपिका वशिष्ठ यांना एक्सप्लोरिंग वुमनहुड फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या वनदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती दीपाली देवकर उपस्थित होत्या.
महाराष्ट्रात मानव-वन्यजीव संघर्षात दिला जाणारा मोबदला आजच्या घडीला देशातील सर्वाधिक आहे. पुरातन काळापासून भारतात वन आणि वन्यजीव व्यवस्थापन केले जात आहे. आधुनिक भारतातील रेंजर्स हे व्यवस्थापन करणाऱ्यांपैकी एक आहेत. सिमेवर सैन्याचे जवान देशाच्या संरक्षणासाठी लढा देतात. तर सिमेच्या आत वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी पर्यावरण रक्षणासाठी लढा देतात, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. देशाच्या कानाकोपऱ्यात आता ‘वन की बात’ होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखत आपण महाराष्ट्राचे वनमंत्री या नात्याने काम करीत आहोत. इतरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
चंद्रपूर, दि. 06: विदर्भ ही वाघांची भूमी आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या भूमीत देश विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे जागतिक दर्जाचे व्याघ्र सफारी प्रकल्प करण्याचा संकल्प असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची मदत घेण्यात येईल. यामुळे पर्यटनाला चालना मिळून परिसरात रोजगार निर्मिती व अर्थकारण मजबूत होण्यास मदत होईल. यासाठी वन अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
नागपूर येथे यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, वनबल प्रमुख शैलेंद्र टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, वन विकास महामंडळाचे सीजीएम संजीव कुमार, प्रशांत झुरमुरे, कल्याण कुमार आदी उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले की, चंद्रपूर-मूल मार्गावर वनप्रबोधिनीजवळील प्रशस्त वनक्षेत्रात व्याघ्र सफारी प्रकल्प होण्यासाठी असा संकल्प असून केवळ व्याघ्र सफारीपुरता हा मर्यादित न ठेवता इतर वन्यजीवांचाही या सफारीत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न व्हावा. अशा प्रकल्पातून संशोधन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सर्व वयोगटातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवीनतम, अत्याधुनिक दर्जाचे विरंगुळा केंद्र याठिकाणी व्हावे यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक असून तेथे असलेल्या वन्यजीवांची माहिती, त्यावर एखादा माहितीपूर्ण शो पर्यटकांसाठी करता येईल का, याचाही विचार करावा, अशा सूचना यावेळी दिल्या.
नागपूर-आज नागपूर येथील रविभवन येथे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू, शेकापचे जयंत पाटील, आमदार राजेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.विरोधकांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. राज्यावरील दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटलेत. या स्थितीत सरकारच्या चहापानाला आम्ही उपस्थित राहिलो तर तो संकटात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांप्रती द्रोह ठरेल, असे विरोधकांनी या प्रकरणी म्हटले आहे.वडेट्टीवार म्हणाले की,
सरकारच्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे, हा संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्याप्रती द्रोह ठरेल.
अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीची मागणी करणार.
महाविकास आघाडीची पत्रकार परिषद.
राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रु आहेत.… pic.twitter.com/VCmv0SMr5M
सरकारच्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे, हा संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्याप्रती द्रोह ठरेल.अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीची मागणी करणार.राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रु आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे. शेतकऱ्यांची ही दुर्देवी परिस्थिती असताना सरकारने चहापानाचा कार्यक्रम टाळायला हवा होत. हा कार्यक्रम टाळला असता तर शासन शेतकऱ्यांबरोबर असल्याचा दिलासा राज्यातील शेतकरी, शेतमजूर यांना मिळाला असता. दुर्देवाने सरकारने शेतकऱ्याप्रती ही संवेदनशीलता दाखवली नाही. पण संपूर्ण राज्यातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे चटके भोगत असताना आम्ही चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे हा संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्याप्रती द्रोह ठरेल. त्यामुळे चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भूमीका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे.आज नागपूर येथील रविभवन येथे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत श्री. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू, शेकापचे जयंत पाटील, आमदार राजेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.राज्यावरील वाढलेले कर्ज, शेतकऱ्यांची दैन्यावस्था, शेती क्षेत्राची दुरावस्था, शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव, राज्यातील पाणीटंचाई परिस्थीती, स्मारकांची स्थिती, आरक्षणाबाबतची असंवेदनशीलता, अल्पसंख्यांकाबाबत नकारात्मक दृष्टीकोन, कंत्राटी भरती व बेरोजगारीमुळे युवकांमधील वाढता रोष, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, सरकारची प्रसिध्दीची हाव, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक, अंतर्गत सत्ता स्पर्धेचे दुष्परीणाम, विदर्भातील कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट, अशा अनेक समस्या असताना सरकार चहापान कार्यक्रम करत आहे. यावरून सरकारचा संवेदनशिलपणा हरविल्याचे दिसून येते.छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दंगलग्रस्त महाराष्ट्र अशी ओळख या महायुती सरकारने केली. पुरोगामी महाराष्ट्रात सर्वात जास्त दंगली झाल्या. महाराष्ट्रात २०२२ मध्ये दंगलीच्या तब्बल ८ हजार २१८ प्रकरणांची नोंद झाली आहे. ही त्या वर्षातल्या देशातील सर्वाधिक नोंद असल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माहिती आहे. महायुती सरकार आल्यावर राज्यात दंगली, बलात्काराच्या घटनेत वाढ झाली. संत्रा नगरी असलेल्या नागपूरची ओळख आता चोरांची राजधानी अशी झाली आहे. जर महाराष्ट्राची ही ओळख होत असेल तर या राज्यात गुंतवणूक कशी येणार? उद्योग कसे येणार?महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालात समोर आली आहे. गरीबी, बेरोजगारीमुळे जगणं असह्य झाल्याने अनेकांनी आत्महत्या केल्याचं अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्रात एका वर्षात 22,746 आत्महत्या झाल्याची नोंद आहे. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. शेती क्षेत्रात दर तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतात. याला म्हणतात दिव्याखाली अंधार. NCRB आकडेवारी नुसार २०२२ वर्षात राज्यात सगळ्यात जास्त नागपूर मध्ये २ हजार ५०३ चोरीच्या घटना झाल्या आहेत. महायुती सरकार आल्यावर महाराष्ट्र राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवालानुसा महाराष्ट्र खुनाच्या घटनेत तिसरा, बलात्कारात चौथ्या क्रमांकावर, सायबर गुन्ह्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. मराठवाड्यात बीडमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या. सर्वाधिक दुष्काळ. तरीही शासन आपल्या दारी कार्यक्रमात प्रचंड उधळपट्टी. ही उधळपट्टी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर तिखट-मीठच सरकारने चोळले. उधळपट्टी ऐवजी शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी.राज्यातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढला असुन सरकारच्या उधळपट्टीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. शासनाचे आरोग्य व्यवस्थेकडे होणारे दुर्लक्ष हे महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्याला भूषणावह नाही हे खेदाने म्हणावे लागते. महाराष्ट्र हे फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा वारसा जपणारे राज्य असून या सरकारने मात्र जाती जाती मध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम सुरु केले आहे. मराठा व ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत बोटचेपेपणाची भूमिका घेतल्याचे दिसते. त्यामुळे मराठा व ओबीसी समाजामध्ये सरकार बद्दल प्रचंड रोष आहे. जनतेचे प्रश्न सरकारला सोडवता न आल्याने सरकारी तिजोरीतून आपली पाठ थोपठून घेण्याचा प्रयत्न शासन आपल्या दारी या योजनेद्वारे सुरु आहे. यामध्ये राज्य सरकार जनतेची कामे न करता जाहिरातबाजीवर भर देत आहे. “शासन आपल्या दारी” योजनेचा फोलपणा दिसून येत आहे. आपल्या सरकारची कामगिरी खोटी असून प्रसिध्दी मात्र मोठी आहे. राज्य सरकारमधील अंतर्गत मतभेद, मंत्र्याची विसंगत विधाने, एकमेकांवर होणारी कुरघोडी, अंतर्गत सत्तास्पर्धा व हेवेदाव्यांमुळे प्रशासनाचे तीन तेरा वाजले आहेत. एकंदरीतच फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांना काळिमा फासण्याचे काम आपल्या सरकार मार्फत केले जात आहे. चोर-चोर भाऊ-भाऊ सरकारची तिजोरी लुटून खाऊ, अशी या सरकारची अवस्था आहे.
पुणे, दिनांक 6 – ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’ या संस्थेच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहून महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
डेक्कन जिमखान्यावरील ‘इंटरनॅशनल बुक सर्व्हिस’ या दुकानात बाबासाहेब नियमितपणे पुस्तके खरेदी करण्यासाठी येत असत. बाबासाहेबांचे पुस्तकांविषयीचे प्रेम हे सर्वश्रृत आहे. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूत महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, साहित्यिका डॉ. श्यामाताई घोणसे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण खोरे, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे, ॲड. मंदार जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
लिंबाळे म्हणाले, ‘ माझ्या आयुष्यात मी अनेकदा महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. परंतु आज त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुस्तकांच्या दुकानात अशा अनोख्या पद्धतीने अभिवादन करता आले, हे कायम माझ्या स्मरणात राहील. बाबासाहेब आंबेडकरांचे वाचन प्रेम विलक्षण होते. ते रात्री उशीरापर्यंत वाचन करायचे. इतर समाज जागा झाला आहे, परंतु माझा समाज अजूनही झोपेत आहे. या समाजाला जागे करून ज्ञानाचा प्रकाश द्यायचा असेल, तर आम्हाला जास्तीत जास्त वाचन करावे लागेल, असे बाबासाहेबांचे मत होते.’
या वास्तूचे महत्त्व विषद कराना डॉ. खोरे म्हणाले, ‘ही वास्तू 1931 मध्ये स्थापन झाली. या पुस्तकाच्या मोठ्या दुकानात बाबासाहेब पाठीमागच्या बाजूने येत असत. दुकानाचे संस्थापक मालक विठ्ठलराव दीक्षित यांच्याशी ते गप्पा मारायचे, विठ्ठलराव त्यांना टेबलावर पुस्तक आणून द्यायचे. बाबासाहेब कपाटांच्या भोवती फेरी मारून पुस्तकांची निवड करायचे. यावेळी बाबासाहेबांचे कार्यकर्ते दुकानाबाहेर मोठी गर्दी करायचे.’
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे पुस्तकांचे वाचन करणारा आणि पुस्तक प्रदर्शनातील सर्व दालनाला भेट देणारा राजकीय नेता पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने भेटावा अशी अपेक्षा डॉ. खोरे यांनी व्यक्त केली.
डॉ. घोणसे म्हणाल्या, ‘आपण प्रतिकुलतेचे गाऱ्हाणे गात असतो. बाबासाहेबांच्या जीवनात अनेकदा प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाली. परंतु न डगमगता त्यांनी तिच्यावर मात केली. हे त्यांचे वेगळेपण आहे. त्यांच्या संग्रहात पन्नास हजारांहून अधिक पुस्तके होती. त्यांनी नेहमीच सर्वसमावेषक भारताचा विचार केला. म्हणूनच आज देश एक राहिला आहे.’
पांडे म्हणाले, ‘पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांचा उत्सव पुणे जागतिक पुस्तकांची राजधानी व्हावी आणि वाचन संस्कृतिला चालना मिळावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाबासाहेबांचे पुस्तकांवर प्रेम होते. पोटाएवढेच ते पुस्तकाला महत्त्व देत. बाबासाहेबांचा पुस्तक वाचनाचा संदेश समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पाहोचावा यासाठी पुणे पुस्तक महोत्सवाचा शुभारंभ या वास्तूत केला.’
कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी पुस्तक महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
पुणे, दि. ६: मार्केट यार्ड येथील व्यापारी वेदप्रकाश गुप्ता यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित ससून रुग्णालयातील मज्जासंस्था विभागाकरीता सक्षन मशीन आणि वॉटर कूलरची भेट दिली.
यावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, मानव सेवा ट्रस्टचे सी. आर. जैन, मज्जासंस्था विभागाचे विभाग प्रमुख डॉ. जयकुमार गुंजकर, ससून रुग्णालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गणेश बडदरे, समाजसेवा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शंकर मुगावे, प्रशासकीय अधिकारी अनिल माने, समाजसेवा अधिक्षक प्रथमेश गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी अधिष्ठाता डॉ. काळे म्हणाले, ससून रुग्णालयात समाजातील विविध घटकांतील गरजू रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे हे रुग्णालय गरीब व गरजू रुग्णांचे रुग्णालय म्हणून राज्यात ओळखले जाते. श्री. गुप्ता यांसारख्या दानशूर व्यक्तींकडून देण्यात येणाऱ्या विविध वैद्यकीय सामुग्रीमुळे ससून रुग्णालय अद्ययावत होत आहे. अशा वैद्यकीय सामुग्रीमुळे गरजू रूग्णांच्या विविध महागड्या तपासण्या तसेच निदान सवलतीच्या दरात होत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी ससून रुग्णालयास अशाचप्रकारे सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. काळे यांनी केले.
नागपूर दि.६: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात हिंदूकोड बिल लागू होण्यासाठी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. ते नेहमी महिलांच्या अधिकारासाठी त्यांच्या बाजूने उभे राहिले. ते एक उत्तम वक्ते, द्रष्टे नेते आणि समाजाला वळण देण्याची इच्छाशक्ती असणारे मोठे नेते होते अशा शब्दांत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.सामाजिक कार्य करताना आंबेडकर चळवळी सोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली. या समाजाने मला कायमच प्रेम, जिव्हाळा दिला आहे. त्यामुळे या समाजाचा कोणताही प्रश्न उपस्थित झाला तर त्या ठिकाणी तो तात्काळ सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जात असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जर नसते तर आज महिलांना उपसभापती,आमदार देखील होता आले नसते. त्यामुळे या महामानवांची मनापासून ऋणी असल्याची भावना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.