Home Blog Page 1342

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचे पुणे येथील सी.एम.ई.येथे दीक्षांत समारंभात संबोधन

पुणे,7 डिसेंबर 2023-लष्करप्रमुख आणि कर्नल कमांडंट, द बॉम्बे सॅपर्स जनरल मनोज पांडे (पी. व्ही. एस. एम., ए. व्ही. एस. एम., व्ही. एस. एम., ए. डी. सी.) यांनी 7 डिसेंबर 23 रोजी पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्क्रॉल सादरीकरण आणि दीक्षांत समारंभादरम्यान अभियंता अधिकारी पदवी अभियांत्रिकी (ईओडीई) आणि तांत्रिक प्रवेश योजना अभ्यासक्रमांच्या अधिकाऱ्यांना संबोधित केले.

अभियंता अधिकारी पदवी अभियांत्रिकी (ई. ओ. डी. ई.) अभ्यासक्रम-125 आणि तांत्रिक प्रवेश योजना (टी. ई. एस.) अभ्यासक्रम-40 मधील एकूण 46 लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांचे अभ्यासक्रम सी. एम. ई. पुणे येथे यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. 32 लष्करी अधिकाऱ्यांना सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये बी. टेक पदवी, 7 अधिकाऱ्यांना इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बी. टेक पदवी आणि 7 अधिकाऱ्यांना बी.टेक मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये बी.टेक पदवी प्रदान करण्यात आली.
वैयक्तिक शाखांमधील गुणवान विद्यार्थी अधिकाऱ्यांना लष्करप्रमुखांनी विविध पुरस्कार आणि चषकही प्रदान केले. इ. ओ. डी. ई.-125 अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कॅप्टन नवजीत मिश्रा यांना प्रतिष्ठित सुवर्णपदक आणि लेफ्टनंट अंबर चतुर्वेदी आणि लेफ्टनंट सार्थक व्यास यांना अनुक्रमे सिव्हिल आणि मेकॅनिकल शाखेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल टी.ई.एस.-40 अभ्यासक्रमात सुवर्णपदक देण्यात आले.
पदवीधारक अधिकाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या आवश्यकतांमुळे, विशेषतः दुर्गम भागात, वाढत्या जटीलतेसह अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल यावर लष्कर प्रमुखांनी आपल्या समारोप भाषणात भर दिला. अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी, विद्यार्थी अधिकाऱ्यांनी नवीनतम प्रगतीची माहिती ठेवण्याचे आणि संबंधित अभियांत्रिकी शाखांमध्ये सर्वोत्तम अभियांत्रिकी पद्धतींचा समावेश करण्याचे त्यांनी आवाहन केले.
पदवीनंतर, हे अधिकारी सक्रिय लढाऊ अभियांत्रिकी कामे, लष्करी अभियांत्रिकी सेवा, सीमा रस्ते संघटना आणि राष्ट्र उभारणीच्या इतर कामांच्या प्रतिष्ठित बांधकाम प्रकल्पांमध्ये कार्यरत राहण्यासाठी संबंधित विभागांमध्ये जातील.

४७२५ कोटीच्या घोटाळ्यातील कुख्यात महेश मोतेवारचा साथीदार रामलिंग हिंगे ७ वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात: सीआयडीची कारवाई

भारतभरात एकूण 26 गुन्हे दाखल,एकूण 25 आरोपींपैकी 16 आरोपीस अटक,अद्याप ९ फरार

भारतभरातील 64 लाखांपेक्षा अधीक गुंतवणूकदारांची व महाराष्ट्रातील एकूण 18 लाख गुंतवणूकदारांची फसवणुक

पुणे- तब्बल ४७२५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील कुख्यात गुन्हेगार महेश मोतेवार याचा साथीदार असलेला ,गेली ७ वर्षे फरार असलेला रामलिंग हिंगे याला सीआयडीने काल सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड सिनेमागृह येथे पकडला .

याबाबत ची माहिती सीआयडी च्या अप्पर पोलीस अधीक्षक तृप्ती जाधव यांनी सांगितले कि,’डेक्कन पोलीस ठाणे, पुणे शहर गु.र.नं. 243/2016 भा.द.वि.कलम 403, 406, 409, 120 (ब), 34 आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम सन – 1999 चे कलम 3 मधील समृध्द जीवन समूहाचा सर्वेसर्वा गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेश मोतेवार व आरोपी रामलिंग हिंगे यांनी संगनमत करुन महाराष्ट्र व संपुर्ण देशभरात समृध्द जीवन फुड्स इंडिया लिमीटेड व समृध्द जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पज को.ऑप सोसायटी यांच्या अनेक शाखा उघडुन त्यांच्या माध्यमातुन गुंतवणूकदारांची 4725 कोटीहून अधिक रकमेचा अपहार केला होता. आरोपी रामलिंग हिंगे वय- 56 रा. गल्ली नं-3, गोकुळनगर, कात्रज, पुणे हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार होता, सदर आरोपी मागील 07 वर्षापासुन पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी ओळख लपवुन राहत असल्याने मिळुन येत नव्हता. सदर आरोपी दिनांक 06/12/2023 रोजी सिटीप्राईड सिनेमागृह, सातारा रोड, पुणे याठिकाणी येणार असलेबाबत गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्या अनुषंगाने सापळा रचुन, आरोपीचा मागोवा घेवुन आरोपीस सिटीप्राईड सिनेमागृह, सातारा रोड, पुणे या ठिकाणावरुन शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

समृध्द जीवन समूहाविरूध्द भारतभरात एकूण 26 गुन्हे दाखल आहेत. समृध्द जीवन समूहाद्वारे संपूर्ण भारतभरातील 64 लाखांपेक्षा अधीक गुंतवणूकदारांची व महाराष्ट्रातील एकूण 18 लाख गुंतवणूकदारांची फसवणुक करण्यात आली होती. सदर गुन्ह्यातील एकूण 25 आरोपींपैकी 16 आरोपीतांस अटक करण्यात आले असून त्यांचेविरूध्द दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.
सदर कामगिरी ही प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक, सीआयडी , यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तसेच संजय येनपूरे, विशेष पोलीस महानिरीक्षक (सीआयडी )श्रीमती. मनिषा दुबुले, पोलीस अधीक्षक, सीआयडी .पुणे, श्रीमती. तृप्ती जाधव, अपर पोलीस अधीक्षक, संगणक, सीआयडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, आनंद रावडे, पो.हवा. सुनिल बनसोडे, पो.हवा. प्रदिप चव्हाण, पो.हवा. कोळी सर्व नेमणुक गु.अ.वि.म.राज्य. पुणे यांनी केलेली आहे.

मुंबई सायबर क्राईममधून बोलतोय सांगून पुण्यातील एकाला घातला 28 लाखांचा गंडा

पुणे- येथील ३७ वर्षीय तरुणाला अज्ञात व्यक्तीने फाेन करुन मुंबई सायबर क्राईम ब्रँच मधून बाेलत आहे असे सांगून तुमच्या नावाचे मुंबई ते तैवान पार्सल मध्ये ड्रग सापडल्याचे सांगण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच बँक खात्याची खातरजमा करण्यासाठी गाेपनीय माहिती घेऊन तब्बल 28 लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी अज्ञात माेबाईल क्रमांक धारक व आयसीआयसीआय बँक खातेधारक यांचे विराेधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत रत्नदिप पुरुषाेत्तम ब्राम्हणकर (वय-37) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार ब्राम्हणकर यांना अज्ञात व्यक्तीने फाेन करुन ताे सायबर क्राईम मुंबई मधून हर्षवर्धन नावाचे अधिकारी बाेलत असल्याचे सांगितले तक्रारदार यांचे नावाचे मुंबई ते तैवान असे पार्सल जात असून त्याचे एक्सापयर पासपाेर्ट, एसबी आय क्रेडीट कार्ड 450 ग्रॅम ड्रगज सापडले आहे, असे सांगून तक्रारदार यांचे खाते व्हेरीफाय करायचे आहे असे सांगितले. तक्रारदार यांचे बँक खात्याची माहिती घेऊन खात्यातून एकूण 28 लाख रुपये परस्पर हस्तांतरित करण्यास भाग पाडले. याबाबत पुढील तपास सिंहगड राेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयंत राजुरकर करत आहे.

राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्याबाबत सविस्तर आराखडा सादर करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, दि. ७ : महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे आणि महिला सुरक्षा या उद्देशाने राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणे व सॅनिटरी पॅड संदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिल्या.

यासंदर्भात नागपूर विधानभवन येथे बैठक झाली. या बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.

या योजनेचा सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, यामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल देण्याचा प्रस्ताव आहे. चांगल्या इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करणाऱ्या कंपन्यांची याबाबत माहिती घ्यावी. महिलांना फायदा होईल, अशाप्रकारे प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

मंत्री श्रीमती तटकरे यांनी पिंक रिक्षा योजनेमुळे महिलांना होणाऱ्या फायद्याविषयीची माहिती दिली. या योजनेंतर्गत एकूण 5 हजार रिक्षा सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये एकल महिला, विधवा, परित्यक्ता यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील मुंबई शहर, नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व कल्याण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्यात येणार आहे.

यावेळी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना सॅनिटरी पॅड पुरवण्याबाबतच्या योजनेविषयीही सविस्तर चर्चा करण्यात आली. या दोन्ही योजनांविषयीचे सविस्तर आराखडे सादर करुन त्यावर पुढील बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेण्याविषयीही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

‘स्वतंत्र व विकसित आयता भारत’हाती आलेल्या अमित शहांनी नेहरूंच्या निर्णयावर बोलण्यापेक्षा सद्य परिस्थितीतील देशातील समस्यांवर बोलावे

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात, ब्रिटीश विरोधी संघर्षात  तब्बल ७ वेळा ११ वर्षे जेलमध्ये काढलेल्या नेहरुंच्या संघर्षाची, विद्वत्तेची व पात्रतेची तुलना भाजपा करू शकत नाही

जम्मू-काश्मीर प्रश्नी’ युनो’त जाण्याच्या’ पं नेहरुंच्या निर्णयाचे, देशाकडुन ही समर्थन..!म्हणूनच त्यानंतर नेहरुंना जनतेने १७ वर्षे नेतृत्वाची संधी दिली..! 

काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी 

मुंबई दि ७ –  ‘स्वतंत्र भारताची’ ओळख निर्माण करून, १९४८ मध्ये पं नेहरू ‘जम्मू काश्मिर प्रश्नी’ युनो’त गेले, विविध ठरावा द्वारे जागतिक मान्यता घेतली व त्या नंतर “देशाने १७ वर्षे पं नेहरूंच्या निर्णय व धोरणांवर विश्वास व पसंती दर्शवुनच्” नेतृत्व करण्याची संधी दिली..!नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशात स्वयंपुर्णतेचा व तांत्रिक साधन सामुग्रीचा तेंव्हा अभाव होता. त्या काळात युनो’त जाण्याचा निर्णय कालानारुप व परिस्थितीनुरुप  होता. अखेर जम्मू-काश्मीर प्रश्नी’ युनो’त जाण्याच्या” पं नेहरुंच्या धोरणाचे व निर्णयाचे, समस्त देशाने ही निवडणुकांद्वारे वारंवार मान्य केले व तब्बल १७ वर्षे देशाच्या पंतप्रधानपदी पं नेहरुंना बसवले, ही बाब अमित शहा सोईस्कर विसरतात काय?व ‘जनतेने समर्थन दिलेल्या निर्णयाचा’ उपमर्द करतात काय? असा उपरोधीक सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला. 

देशवासियांकडुन शिक्कामोर्तब झालेल्या निर्णयाची पुन्हा कालबाह्य वाच्यता करणे म्हणजे शिळ्या कढीला ऊतु आणण्याचा निंदनीय प्रकार आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात, ब्रिटीश विरोधी संघर्षात  तब्बल ७ वेळा ११ वर्षे जेल मध्ये गेलेल्या पं नेहरुंच्या संघर्षाची, विद्वत्तेची व पात्रतेची भाजप च्या कोणत्याही नेताशी तुलनाच होऊ शकत नाही. 

पं नेहरुंचे नांव घेण्याची पात्रता ही नसणाऱ्या अमित शहांनी त्यावर बोलणे हे “देशापुढील ज्वलंत मुद्यांवरील लक्ष विचलीत करण्याचे भाजप’चे सोईस्कर व पलायनवादी तंत्र असल्याचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला. 

२०१४ व १९ च्या निवडणुकीत जनतेने पं नेहरुंच्या चुका दर्शवण्यासाठी नव्हे तर देशातील विद्यमान समस्या दुर करण्यासाठी, भ्रष्टाचार व काळा पैसा बाहेर काढुन जनतेस १५ लाख देऊन अच्छे-दिन आणण्यासाठी सत्ता बहाल केली होती, याचे स्मरण ठेवावे व देशावरील वाढते कर्ज, महागाई, बेरोजगारी, सामाजिक सलोखा, शांतता व सुरक्षेकडे अमित शहांनी अधिक लक्ष द्यावे असे खडे बोल ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सुनावले. 

स्वातंत्र्योत्तर भारताच्या’ उभारणीत योगदान नसणाऱ्यांनी पं नेहरुंच्या चुका काढण्या पेक्षा, ‘स्वतंत्र व विकसित आयता भारत’ हातामघ्ये आल्या नंतर ही चिन ने हजारो किमी जमीन का बळकावली?याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी प्रथम ऊत्तर द्यावे, असेही काँग्रेस ने सुनावले.पं नेहरूंच्या जम्मू काश्मिर विषयी कालबाह्य निर्णयावर एकतर्फी टिका करीत केंद्रातील भाजप सरकार स्वतःचे अपयश झाकण्याचाच् सातत्याने प्रयत्न करत असल्याचा आरोप ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला..!! 

तीन भ्रष्ट माजी शिक्षणाधिकाऱ्यांची 10 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

पुणे- पदाचा गैरवापर करून गैरमार्गाने कोट्यवधी रुपयांची ‘माया’ जमवणाऱ्या राज्यातील तीन तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांची सुमारे १० कोटींची बेहिशेबी संपत्ती ‘एसीबी’ने जप्त केली. टीईटी घोटाळ्यात अडकलेले पुण्याचे माजी शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे ३ कोटी ३९ लाखांची, सोलापूरचे लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह कुुटुंबीयांकडे ५ कोटी ८५ लाखांची तर सांगलीचे लाचखोर शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्याकडील ८२ लाखांची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात आली.

शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेले पुण्याचे शिक्षणाधिकारी तुकाराम नामदेव सुपे (५९) यांच्या १९८६ ते २०२१ दरम्यानच्या मालमत्तेची एसीबीने चौकशी केली. त्यात २ काेटी ८७ लाख ९९ हजार ५९० रुपये राेख, ७२ लाख रुपये किमतीचे १४५ ताेळे साेने अशी ३ काेटी ५९ लाख ९९ हजार ५९० रुपये किमतीची बेकायदेशीर संपत्ती असल्याचे दिसून आले. २०२१ मध्ये त्यांच्यावर पुणे सायबर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल अाहे. १७ डिसेंबर २०२१ राेजी त्यांना अटकही झाली होती. म्हाडा पेपर फुटीतील मुख्य आराेपी डाॅ. प्रीतीश देशमुख याच्या घरी टीईटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांची ओळखपत्रे सापडली. त्याच्याकडूनही २ काेटी ३४ लाख रुपये आणि ६५ लाख रुपयांचे साेन्याचे दागिने जप्त केले हाेते.

शालार्थ आयडी प्रस्तावासंदर्भात दाखल प्रस्ताव मंजुरीसाठी नोव्हेंबरमध्ये लाच घेताना अडकलेले सोलापूरचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह पत्नी व मुलाकडे ५ काेटी ८५ लाख ८५ हजारांची बेकायदा मालमत्ता आढळली. ग्लाेबल टीचर रणजित डिसले यांच्या रजा प्रकरणावरूनही लोहार वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या कोल्हापुरातील मालमत्तेची चौकशीही करण्यात आली. किरण लोहारसह पत्नी सुजाता, मुलगा निखिल (सर्व राहणार पाचगाव, ता. करवीर) यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

सांगली येथील शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे यास लाच घेताना अटक करण्यात आली होती. एसीबीने जून १९८६ ते ६ मे २०२२ दरम्यान त्यांचे प्रत्यक्ष उत्पन्न व जमवलेल्या संपत्तीची चौकशी केली असता कांबळे दांपत्याच्या नावावर ८२ लाखांची अपसंपदा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी विष्णू यांच्यासह त्यांच्या पत्नी जयश्रीवरही (रा. बार्शी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञान संपदेला नवी दिशा देण्याची गरज – रामदास काकडे


तळेगावात नारायणा कोचिंग केंद्राचा शुभारंभ
,पुणे (दि.०६ डिसेंबर २०२३) भारतामध्ये प्रचंड ज्ञानसंपदा आहे. या प्रतिभेला नवी दिशा देण्याची गरज आहे. तळेगाव आणि मावळ परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी देशभरात नावलौकिक असलेले नारायणा कोचिंग केंद्र तळेगाव मध्ये सुरू झाले आहे. या केंद्राच्या माध्यमातून भविष्यातील आयएएस, आयपीएस, डॉक्टर, इंजिनियर्स तयार होऊन देशसेवा करतील, असा विश्वास इंद्रायणी विद्या मंदिरचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केला.
इंद्रायणी विद्या मंदिरच्या शैक्षणिक संकुलात नारायणा कोचिंग केंद्राचा शुभारंभ रविवारी (दि.३ डिसेंबर) रामदास काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नारायणा कोचिंग केंद्राच्या पुणे, चिंचवड शाखेचे संचालक शंकर सिंह राठोड, व्यवस्थापक संजय कुमार, शैक्षणिक विभाग प्रमुख परिणीता सुधांशू, प्रा. भगवान बक्श पटेल, श्याम गोरे, संजिवनी पाटील,‌‌ व्याख्याते बालाजी जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी नारायणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या वतीने ‘एनसॅट २३’ परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम दोन सत्रात झाला. सकाळच्या सत्रात तज्ज्ञांनी विविध विषयांवर विद्यार्थी – पालकांना मार्गदर्शन केले.
समाजातील विविध घटकांमधील विद्यार्थ्यांना ‘एनसॅट – २०२३’ परीक्षेत सहभागी होता यावे हा उद्देश समोर ठेवून नारायणा इन्स्टिट्यूटने ही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे घेतली. देशभरातून सुमारे अडीच लाख तर पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून साडेचार हजार विद्यार्थीनी परीक्षा दिली होती. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना फी सवलती व्दारे शिष्यवृत्ती दिली जाते. जेईई, नीट,आयआयटी अशा उच्च शैक्षणिक पात्रता परीक्षांमध्ये नारायणा कोचिंगच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले आहे, असे शंकर सिंह राठोड यांनी यावेळी सांगितले.
देशातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा (आयआयटी – जेईई आणि नीट) साठी नारायणा इन्स्टिट्यूट सर्वोच्च संस्था आहे. विद्यार्थी पालकांमध्ये उच्च शैक्षणिक संधी, योजना यांचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी संस्था कार्य करत आहे. इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना संस्थेत प्रवेश घेता येईल.
शै क्षणिक वर्ष २०२४ साठी नवीन प्रवेश सुरु झाले असून एप्रिल २४ पासून नवीन बॅचेसला प्रारंभ होणार असून ३१ डिसेंबर पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती संजय कुमार यांनी दिली.
तळेगाव केंद्रात प्रवेशासाठी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा संजय कुमार – 9522200750, धनंजय पांडव – 9522200732,

श्याम गोरे – 9522200797 असे आवाहन संजय कुमार यांनी केले आहे. कार्यक्रमास विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार शिवानी राजपूत यांनी मानले.

कोंढवा भागात मुलींसाठी उर्दू माध्यमिक शाळा सुरू करण्याची आप ची मागणी

पुणे–कोंढवा भागामध्ये पाच किलोमीटर परिसरात आठवी पुढे शिकण्यासाठी उर्दू शाळा नसल्यामुळे नववी दहावीसाठी वर्ग सुरू करावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने मनपा उपयुक्त नंदकर यांच्याकडे केली आहे.यावेळेस आम आदमी पार्टीचे प्रवक्ता मुकुंद किर्दत, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष एम अली सय्यद ,हरून अन्सारी, मुक्ती अहमद हुसेन कासमी, नौशाद अन्सारी, मिलिंद सरोदे, नितीन पायगुडे, शंकर थोरात, खुशबू अन्सारी, विक्रम गायकवाड, ऋषिकेश मारणे इत्यादी उपस्थित होते.

या संदर्भात आम आदमी पार्टीचे प्रवक्ता मुकुंद किर्दत म्हणाले कि,’कोंढवा भागात संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा, अब्दुल कलाम आझाद शाळा, बापूसाहेब दरेकर शाळा असून या तिन्ही शाळांमध्ये मिळून पटसंख्या २०० पेक्षा जास्त आहे. या तिन्ही शाळांमध्ये आठवीपर्यंतच उर्दू शिक्षण उपलब्ध आहे. आठवी नंतर पाच- सहा किलोमीटर परिसरात पुढील शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध नाही आणि खाजगी शाळा परवडत नसल्यामुळे बहुतांश मुली शिक्षण अर्धवट सोडत आहेत. पालक मुलींना दूरच्या शाळेत पाठवण्यास तयार नाहीत, त्यामुळे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण वाढत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे स्वस्तात आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे त्यामुळे शासन महानगरपालिकेचे असलेल्या शाळेमध्येच नववी दहावीचे मुलामुलींचे वर्ग उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आज आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भेटून आयुक्तांकडे केली. मौलाना अब्दुल कलाम शाळेमध्ये पटसंख्या चांगली आहे, परंतु तिथे पुरेसे बेंचेस नाहीत तसेच दिव्यांगांसाठी टॉयलेट उपलब्ध नाही. त्यामुळे या मागण्या सुद्धा या शिष्टमंडळाने केल्या. पुढील शैक्षणिक वर्षात वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन उपायुक्तांनी दिले.

पंडित जवाहरलाल नेहरूंच्या चूकीमुळे काश्मीरचा भाग पाक मध्ये गेला- अमित शाह यांचा संसदेत आरोप

नवी दिल्ली –  देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून झालेल्या दोन चुकांमुळे काश्मीरला पुढची अनेक वर्षं अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या, असा दावा अमित शाह यांनी आपल्या भाषणात केला.एवढेच नाही तर नेहरूंच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला अन्यथा तोहो भारतातच असता असे ते म्हणाले.

पंडित जवाहरलाल नेहरूंची पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे जेव्हा आपलं सैन्य जिंकत होतं पण पंजाबचा भाग येताच त्यांनी युद्धबंदी केली. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला. जर युद्धबंदी तीन दिवस उशीरा झाली असती, तर आज पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असता”, असा दावा अमित शाह यांनी यावेळी केला. दरम्यान, अमित शाहा यांच्या या दाव्यावरून काँग्रेस खासदारांनी आक्रमक होत आरडाओरड करायला सुरुवात केली.नेहरूंची दुसरी चूक म्हणजे संयुक्त राष्ट्रात भारत-पाकिस्तान वादाचा मुद्दा नेणं असं अमित शाह म्हणाले. “दुसरी चूक म्हणजे संयुक्त राष्ट्रात आपला मुद्दा घेऊन जाण्याची चूक. एका पत्रातल्या मजकुरातला एक भाग मी वाचून दाखवतो”, असं म्हणत अमित शाह यांनी हातातील कागदावरचा एक मजकूर वाचून दाखवला.“पंडित जवाहरलाल नेहरूंनी शेख अब्दुल्लांना लिहिलेलं हे पत्र आहे. ‘संयुक्त राष्ट्राच्या अनुभवानंतर मी या निष्कर्षावर पोहोचलोय की तिथून कोणत्याही समाधानकारक उत्तराची अपेक्षा ठेवली जाऊ शकत नाही. मला युद्धबंदी हा एक चांगला निर्णय वाटला. पण या मुद्द्यावर योग्य पद्धतीने उत्तर शोधलं गेलं नाही. आम्ही युद्धबंदीवर अधिक विचार करून काही चांगला पर्याय शोधू शकलो असतो. मला वाटतं की भूतकाळात ही आमच्याकडून झालेली चूक आहे”, असा उल्लेख असलेला मजकूर अमित शाह यांनी वाचून दाखवला.“विरोधक विनाकारण माझ्यावर चिडचिड करत आहेत. मी नेहरूंचं पत्र वाचून दाखवत आहे. त्यांना चिडचिड करायचीच असेल, तर त्यांनी नेहरूंवर करायला पाहिजे”, असंही अमित शाह म्हणाले.

कोणत्या कलमानुसार निर्णय व्हायला हवा होता?
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांकडे वेगळ्या कलमानुसार नियम उपस्थित करायला हवा होता, असंही अमित शाह यांनी यावेळी नमूद केलं. “जेव्हा संयुक्त राष्ट्रांत मुद्दा न्यायचा होता, तेव्हाही घाईगडबडीत निर्णय घेतला गेला. हा मु्द्दा संयुक्त राष्ट्र नियमावलीतील कलम ३५ ऐवजी ५१ नुसार न्यायला हवा होता. अनेक लोकांनी सल्ला देऊनही तो निर्णय घेण्यात आला”, असा दावाही अमित शाह यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें म्हणाले, मुँह खोलनेसे पहले सोचना सिख ले,पहले तू अपने अंदर झांक के देखले …’

नागपूर

राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शायरीतून उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे विरोधी पक्षांना उद्देशून म्हणाले, मुंह खोलने से पहले सोचना सीख लें, पहले तो अपने अंदर झाँक के देख लें! तुम्ही लोक आधी तुमचं बघा आणि मग सरकारवर टीका करा. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी हे इंडिया आघाडीवाले खूप मोठ्या-मोठ्या बाता मारत होते. परंतु, निकलानंतर काहीच बोलत नाहीत.विरोधकांचा विश्वास न्यायालयावर नाही, पत्रकारांवर नाही, सरकारवर नाही. त्यांच्या बाजूने जे बोलेल तोच त्यांचा अशी ज्यांची मानसिकता आहे. राज्यात आत्मविश्वास गमावलेला विरोधी पक्ष राज्याला आहे, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

शिंदे म्हणाले की, विदर्भात अधिवेशन असल्यानंतर विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित होते. पण विरोधकांनी त्यांच्या पत्रात उल्लेख केला नाही. सरकारच्या वतीने योजना, प्रकल्प याला न्याय दिला जाईल. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याचे काम आमचे सरकार करत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तीन राज्याने दाखवून दिले आहे. तर महाराष्ट्रात देखील चांगले वातावरण आहे.

शासन आपल्या दारीवर देखील टीका विरोधकांनी केली. 2 कोटी लोकांना मदत मिळत असेल तर त्याला हे लोक इव्हेंट म्हणत असतील तर म्हणू द्या, पण लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळतोय हे गोष्ट चांगली आहे. पण विरोधकांची हीच पोटदुखी आहे.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असे म्हणतात. पण जे नियमात बसत नाही, ते करून अवकाळी पाऊस, गारपीट यासह सर्व अडचणीच्या काळात सरकारने मदत केली. तर येत्या काळात देखील मदत होत राहील. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला काही अर्थ नाही.

जे कधी बाहेर पडलं नाही त्यांनी आम्हाला काही सांगण्याचा अधिकार नाही. अवकाळी गारपीट पंचनामे करून मदत करणे यासाठी सरकार आखडता हात घेणार नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार नाही.

गुन्हेगारी प्रमाणावर देखील विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. आम्ही खोटे गुन्हेगारी दाखल नाही केली. हनुमान चालीसा, राणे साहेब, गिरीश महाजन यासह अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या सरकारमध्ये प्रामाणिक पणे काम केले जाते. गुन्हे लपवून कातडी वाचवणारे सरकार नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणार आहोत.

मराठा समाजाला आरक्षण देणार त्यात कोणतीही भूमिका नाही. त्यासाठी सर्व प्रक्रिया व काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मी शिवरायांची शपथ देखील घेतली आहे. त्यामुळे भुजबळ व आमच्यात कोणताही वाद नाही. भुजबळांची देखील भूमिका आम्हाला माहिती आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आर्थिक शिस्त पाळण्याची महायुती सरकारचे प्रयत्न – अजित पवार
अजित पवार म्हणाले की, विरोधी पक्षाचा अनुभव आम्हाला देखील आहे. चहापानातून कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा, यावर चर्चा होत असते. दिलेल्या पत्रावर तेवीस लोकांची नावे आहेत. आणि सात लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे विरोधकांना गांभीर्य आहे की नाही हा प्रश्न आहे.परंतू या अधिवेशनात विदर्भासह मराठवाड्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी सरकारचा प्रश्न आहे. जे प्रश्न सत्ताधारी व विरोधकांकडून मांडले जातील. त्यावर सकारात्मक चर्चा आम्ही करणार आहोत. आम्ही समर्पक उत्तर देऊ. काही मागण्या यदा कदाचित राहिल्या तर त्यावर निर्णय घेऊ, असे अजित पवार म्हणाले.अजित पवार म्हणाले की, विदर्भातील पिकांवर व अवकाळी पाऊस व नुकसानग्रस्तांच्या मागणीला योग्य न्याय दिले जाईल. अर्थ विभागाविषयी, साडे सहा लाख कोटींच्या कर्जाचा उल्लेख विरोधकांनी केला आहे. पण 1 लाख 30 कोटी रुपये कर्ज काढू शकतो. 70 हजार कोटी रुपयांची कर्ज काढण्याचा आमचा संकल्प आहे. 53 हजार कोटी रुपये आम्हाला द्यावे लागणार आहे. आर्थिक शिस्त पाळण्याची महायुती सरकारने प्रयत्न केला विरोधक फक्त कर्जाबाबत बोलतात, हे दु:ख आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे१०० वे  अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, शुभारंभ सोहळा पुण्यात

पुणे-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलनाध्यक्ष  डॉ. जब्रबा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष . शरद पवार व मुख्य निमंत्रक उदय सामंत आहेत.तंजावर येथे ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी व नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत नाट्य संहिता पूजन व नटराज पूजन होणार आहे.  यानंतर नाट्य संमेलनाच्या सोहळ्याची मुहूर्तमेढ कार्यक्रम सांगली येथे दिनांक २९ डिसेंबर २०२३  रोजी होणार आहे.शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी पुणे येथे सुरु होऊन समारोप मे २०२४ अखेर रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. उद्घाटन सोहळा ते समारोप या कालावधीत अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे.

दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ पुणे येथे संपन्न होणार असून दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी-चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तसेच दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध शाखा व कलावंत सहभागी होणार आहेत.  त्यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक २० आणि २१ जानेवारी २०२४ रोजी अहमदनगर, दिनांक २७ आणि २८ जानेवारी २०२४ सोलापूर, दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ बीड, दिनांक १० आणि ११ फेब्रुवारी २०२४ लातूर, दिनांक १७ आणि १८ फेब्रुवारी २०२४ रोजी नागपूर,  आणि मुंबई येथे नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  

१०० व्या  नाट्य संमेलनानिमित्त विशेष उपक्रम म्हणून आणि जास्तीत जास्त कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी  मिळावी, यासाठी नाट्य कलेचा जागर आयोजित करण्यात आला असून यात  खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (महोत्सव), बालनाट्य स्पर्धा (महोत्सव), नाट्य संगीत स्पर्धा (महोत्सव), एकपात्री स्पर्धा (महोत्सव), नाट्यछटा स्पर्धा (महोत्सव) आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार असून निवडक एकांकिका, बालनाट्य, नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा उपांत्य फेरी नाशिक आणि सांगली येथे मार्च २०२४ रोजी संपन्न होणार आहे.  उपांत्य फेरीतून निवडण्यात आलेल्या ९ एकांकिका आणि  बालनाट्य तसेच नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा यांची अंतिम फेरी एप्रिल २०२४ यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा , मुंबई येथे संपन्न होणार आहे.    

एकांकिका आणि बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील प्रथम, द्वितीय व तृतीय एकांकिका आणि बालनाट्यसाठी अनुक्रमे रु. ११,०००/- रु. ७,०००/- व रु. ५,०००/- पारितोषिक देण्यात येणार असून अंतिम फेरीत या स्पर्धेसाठीच लिहिलेल्या आणि अंतिम फेरीत प्रथम आलेल्या एकांकिकेस रु. २,००,०००/- पारितोषिक देण्यात येणार आहे अथवा  इतर एकांकिकेस प्रथम रु. १,००,०००/-, द्वितीय रु. ७५,०००/- तृतीय रु. ५०,०००/- आणि उत्तेजनार्थ २५,०००/- रोख, तसेच दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय ह्या साठी प्रत्येकी प्रथम द्वितीय व तृतीय साठी अनुक्रमे रू. १५,०००/-, रू. १०,०००/-, रू. ५,०००/- रोख देण्यात येणार आहेत. या एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर होणाऱ्या खास ह्या स्पर्धेसाठी लिहिलेल्या नवीन एकांकिकांमधून तीन एकांकिका सर्वोत्कृष्ट लेखनाच्या पारितोषिकासाठी प्राथमिक फेरीतून निवडण्यात येतील. त्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येईल.

अंतिम फेरीत निवड झालेल्या नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटातून प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे  रू. ५०,०००/- ,रू. ३५,०००/- , रू. २५,०००/-, आणि दोन विजेत्यांना प्रत्येकी उत्तेजनार्थ रू. १०,०००/- देण्यात येणार आहेत.  

सर्व सहभागी कलावंतांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. अंतिम फेरीतील पहिल्या ३ विजेत्यांचे प्रयोग रत्नागिरी येथे होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात सादरीकरण होईल.

या संपूर्ण १०० व्या नाट्य संमेलनास रसिक आणि रंगकर्मींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी केले आहे.

क्लोव्हर इन्फोटेकने पुण्यात स्थापन केले ओरॅकलवर भर देणारे जागतिक केंद्र

पुणे-क्लोव्हर इन्फोटेकने त्यांचे अत्याधुनिक ओरॅकल केंद्रित ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) पुण्यात सुरू केले आहे. 200-सीटर जागतिक ओरॅकल केंद्रित COE मध्ये ओरॅकलमधील व्यापक अनुभवासह विषय, डोमेन आणि तंत्रज्ञानाची माहिती असलेले लोक असतील. क्लोव्हर इन्फोटेक आणि ओरॅकलची भागीदारी दोन दशकांहून अधिक जुनी आहे. ओरॅकलच्या ऑन-प्रिमाइसेस आणि क्लाउडवरील काही अंमलबजावणीसाठी क्लोव्हर इन्फोटेक जबाबदार आहे. भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आणि जगभरातील ओरॅकल ग्राहकांना उच्च दर्जाची सेवांचा देण्यासाठी जागतिक ओरॅकल केंद्रित COE हा एकप्रकारे योग्य असा विस्तार आहे. क्लोव्हर इन्फोटेकचा भारत, मध्य, पूर्व आणि उत्तर अमेरिकेमध्ये झपाट्याने विस्तार होत आहे आणि अलीकडेच गेल्या चार महिन्यांत चार फ्यूजन करारांसह अनेक ओरॅकल करार जिंकल्या आहेत.

आपले मनोगत व्यक्त करताना क्लोव्हर इन्फोटेकचे अध्यक्ष जावेद तापिया म्हणाले की, “आमचे ओरॅकल-केंद्रित COE हे उत्कृष्ट सेवा देण्यासाठी, संशोधनासाठी आणि नवनवीन उपक्रमांसाठी जागतिक केंद्र असेल. हे ओरॅकल उत्पादनांसाठी नवीन व्यवहारिक संरचना, प्रवेगक आणि पद्धती तयार करेल. हे जागतिक COE आमच्या ग्राहकांना त्यांच्या ओरॅकल गुंतवणुकीतून सर्वोत्तम ROI आणि मूल्य मिळविण्यास सक्षम करेल आणि त्यांच्या वाढीला गती देण्यासाठी खरोखरच आधुनिक अॅप्लिकेशन आणि तंत्रज्ञान तयार करेल.”

EMEA, क्लोव्हर इन्फोटेकचे व्यवस्थापकीय भागीदार आशिष दास याप्रसंगी भाष्य करताना म्हणाले की“ओरॅकल केंद्रित COE ओरॅकल उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची आणि ग्राहकांना व्यवसाय वाढीला चालना देण्यासाठी सर्वोत्तम-इन-क्लास ऍप्लिकेशन्स आणि तंत्रज्ञानासह सक्षम करताना  व्यवहारिक सोल्युशन्स तयार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची जोरदार साक्ष देते.आम्ही दर महिन्याला उच्च ओरॅकल डीलसह आमचा व्यवसाय झपाट्याने वाढवत असताना, आमचे ओरॅकल केंद्रित COE आमच्या ग्राहकांसाठी आणि ओरॅकलसाठी उत्कृष्ट सेवा, नाविन्य आणि मूल्य निर्मितीचे प्रतीक आहे. ही भागीदारी आमच्या ग्राहकांना ओरॅकल उत्पादने आणि व्यवहारिक कार्यक्षमता आणि व्यवसाय गतीसाठी सोल्युशन्सच्या अंमलबजावणीचा आवश्यक आत्मविश्वास आणि आश्वासन देईल.”

केंद्र शासनाच्या क्षयरोग पथकाची मावळ, खेड व दौंड तालुक्यातील खासगी रुग्णालयांना भेट

पुणे, दि. ६ : राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत देशातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असून याबाबत आढावा घेण्याकरीता आलेल्या केंद्र शासनाच्या क्षयरोग पथकाने मावळ, खेड व दौंड तालुक्यातील खासगी रुग्णालये, खासगी प्रयोगशाळा, खासगी औषधविक्रेते यांना भेटी देवून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनीदेखील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक यांच्यासोबत बैठक घेतली. खासगी क्षेत्रातील क्षयरुग्ण नोंदी वाढविणे, खासगी व्यवसायीकांना कामकाजाबाबत पत्र देवून अनुदान वेळेत वितरित करावे, राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत संबंधितांनी रिक्त पदे तात्काळ भरण्याची कार्यवाही करावी आदी सूचना त्यांनी दिल्या.

FedEx ने हैदराबादमधील टेकहबमध्ये १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक केली

हैदराबाद,FedEx Corp. (एनवायएसई:एफडीएक्स) या प्रसिद्ध कंपनीची एक उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपन्यांपैकी एक असलेल्या FedEx Express (FedEx) ने हैदराबादच्या आर्थिक विश्वामध्ये तब्बल १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी मोठी गुंतवणूक करत त्यांच्या पहिल्या ‘FedEx प्रगत क्षमता समुदाय’ (FedEx advanced capability Community-ACC) चे आज हैदराबाद येथे उद्घाटन केले.

भारतात होत असलेल्या तांत्रिक आणि डिजिटल परिवर्तनाला आणि नवकल्पकतेला पाठिंबा देऊन भारतास उत्कृष्ट अश्या प्रतिभेचा लाभ मिळवून देण्यासाठी FedEx नेहमीच कटिबद्ध राहिले आहे. या पहिल्या केंद्राच्या महत्वपूर्ण टप्प्यामध्ये देखील त्यांची हीच कटिबद्धता सर्वात पुढे आहे. या उद्घाटन सोहळ्याला FedEx Corporationचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राज सुब्रमणियम आणि FedEx Express चे अध्यक्ष आणि एअरलाइन आणि इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड स्मिथ हे उपस्थित होते.

            तांत्रिक आणि डिजिटल नवकल्पकतेचे केंद्र म्हणून FedEx ACC कडे पाहिले जात आहे. तांत्रिकी कौशल्याने संपन्न अश्या समुदायाला समर्थन देण्यावर तेलंगणा सरकारचा जो धोरणात्मक जोर आहे त्याच्याशी हे केंद्र पूरक आहे. रोजगाराच्या संधी वाढविण्यासोबतच हे केंद्र नवीन क्षमतांच्या विकासासाठी आणि संपूर्ण जगभरातील FedEx च्या कामकाजाच्या तांत्रिकी गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा सहाय्यक ठरेल.

            FedExCorporation चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराज सुब्रमणियम म्हणाले, तांत्रिक  डिजिटल प्रतिभा आणि नवकल्पकतेमध्ये गुंतवणूक करणे हा उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्याच्या आणि जगभरात अतुलनीय असे स्मार्ट लॉजिसटिक्स उपाय पुरविण्याच्या आमच्या अत्यंत व्यापक योजनेचा एक भाग आहेअत्यंत प्रतिभा संपन्न अश्या समूहाचा लाभ घेऊन आम्ही डिजिटल परिवर्तनाला गती देत आहोत आणि आमच्या ग्राहकांना नवनवीन कल्पक असे उपाय  पर्याय उपलब्ध करून देत आहोत.”

            जगभरात अश्या तांत्रिक व डिजिटल प्रतिभेला प्रोत्साहन देणाऱ्या कंपन्यांचे नेटवर्क उभारण्याच्या कंपनीच्या जागतिक धोरणाचे हे पहिले FedEx ACC एक महत्वाचे पाऊल आहे. शिवाय पुढे जाऊन हे कंपनीच्या वाढीला व विस्तारला चालना देईल आणि जागतिक पुरवठा साखळीच्या परिसंस्थेला अजून समृद्ध करेल.

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेला रंजक वळण.

सोनी मराठीवरील ‘अजब प्रीतीची गजब कहाणी’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय आहे. अजिंक्यने साकारलेला राजवीर सध्या मुलींच्या गळ्यातला ताईत बनला असून राजवीरसारखा मनमिळाऊ-समजूतदार प्रेमी आपल्यालाही लाभावा, ही समस्त मुलींची सुप्त इच्छा आहे. पण.. पण.. इतर मुलींची इच्छा पूर्ण होण्याआधी आपल्या भाऊसाहेब उर्फ मयूरीच्या हाती हा राजवीर लागतो की नाही, याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. हे गुपित फार काळ ताणून न धरता आता राजवीरला भाऊसाहेब आणि मयूरी यांचं सत्य लवकरच कळणार आहे म्हटलं तर…

मयूरी आणि भाऊसाहेब यांचं गुपित आता लवकरच राजवीरच्या समोर येणार अशी परिस्थिती येणार आहे. ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत हा ट्विस्ट येणार आहे. मयूरीचा एक प्रेमळ मित्र तर भाऊसाहेबचा समजूतदार बॉस राजवीर हा एक सच्चा माणूस आहे. मयूरीकडे आकर्षित होणारा राजवीर आपल्या जवळच्या बॉडीगार्डला म्हणजेच भाऊसाहेबला आपल्या दिलाची कहाणी मित्रत्वाच्या  नात्याने सांगत आलेला आहे. मयूरीला राजवीरचं प्रेम कळतंय पण परिस्थितीच अशी आली आहे की मयूरीला राजवीरवरचं प्रेम त्याच्यापासून लपवावं लागतंय. पण नियतीनेच आता मयूरी आणि राजवीर या दोघांना एकत्र आणलंय. आपण राजवीरची फसवणूक करतोय, असं मयूरीला वाटतं आहे. मयूरी आपल्या मैत्रिणीकडे मन मोकळं करत असतानाच राजवीर तिला पाहतो आणि सगळं सत्य त्याला समजतं. मयूरी हीच भाऊसाहेब आहे, हे राजवीरला समजतं. आता यावर राजवीरची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आता तिची प्रतिक्रिया काय असेल? तो मयूरीची अडचण समजून तिला माफ करेल का की मयूरी आणि  राजवीर यांच्यात  दुरावा निर्माण होईल? याचा मयूरीवर काय परिणाम होणार हे सगळं आता मालिकेत पाहायला मिळेल.

भाऊसाहेबच मयूरी आहे, हे  राजवीरच्या समोर येणार आहे. राजवीरने आजवर भाऊसाहेबशी एक मित्र म्हणून बोलताना आपल्या प्रेमाची कबुली आधीच दिली असल्यामुळे मयूरी आपल्याविषयी काय विचार करेल, हा प्रश्न त्याला सतावेल की भाऊसाहेबने उर्फ मयूरीने राजवीरच्या साधेपणाचा फायदा घेतला असा त्याचा समज होईल? या दोघांच्या प्रेमाला लागलेलं हे ग्रहण आता तरी सुटणार का? राजवीर आणि मयूरी एकत्र येतील का? साधा-सरळ-समजूतदार राजवीर अशाही परिस्थितीत शांत चित्ताने विचार करून मयूरीची बाजू समजून घेईल का? या सगळ्या प्रश्नांची मालिका आपल्या सगळ्यांनाच सतावत असेल तर.. त्यासाठी सोम. ते शनि. संध्या. ७.३० वा. सोनी मराठीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी पाहावी लागेल.