मुंबई, दि. 4 : चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्मारक मुंबई येथे राज्य शासनाच्यावतीने उभारणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदान येथे चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४८ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन पुण्यश्लोक फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते.
यावेळी सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डॉ. मनोहर अंचुले, उद्योजक अनिल राऊत, सामाजिक नेते राजीव जांगळे, व्याख्याते सागर मदने, मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. स्मिता काळे, श्रीक्षेत्र विठ्ठल बिरदेव देवस्थान पट्टणकोडोली येथील मुख्य भाकणूककार सद्गुरु श्री फरांडे महाराज, पुण्यश्लोक फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, धनगर समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत आहे. येत्या ३० दिवसात संयोजन समितीने मुंबई शहरातील जागा सूचवावी त्याठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकर यांचे मुंबई शहरात स्मारक उभे करण्याची जबाबदारी मी घेतो असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती ही अतिशय चांगली लाभल्याने मंत्री लोढा साहेब यांनी त्यांचे कौतुक केले.
ऑगस्ट क्रांती मैदान येथे सायंकाळी पाच पासूनच धनगरी ढोलांचा आवाजाने मैदान दुमदुमून गेले होते. शाहीर सुरेश सूर्यवंशी आणि त्यांच्या ग्रुपने शौर्यगाथा महाराजा यशवंतराव होळकरांची हा पोवाडा सादर केला कोकणातील धनगर समाज बांधवांनी आपले कोकणी गजी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सागर मदने यांनी पहाडी आवाजात महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास मांडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी पुण्यलोक फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी मुंबई शहरात महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्मारक उभारावे अशी मागणी प्रास्ताविक करताना केली. आभार रामचंद्र जांगळे यांनी मानले तर निवेदन प्रशांत पुजारी यांनी केले.
यावेळी सह संयोजन बबन कोकरे, गणपत वरक, रामचंद्र जांगळे, तुकाराम (दादा) येडगे, दीपक झोरे, संतोष बावदाणे, पी. बी. कोकरे, अनंत देसाई, सुरेश वावदाणे, सूर्यकांत जांगळे, तानाजी शेळके, संतोष जांगळे, बंटी बावदाणे, नाना राजगे, अशोक पाटील, विश्वनाथ साळसकर, यांनी केले.