पुणे दिनांक ४ डिसेंबर२०२३ – गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) शिरोळे प्लॉटमधील विनापरवाना शॉपिंग मॉलवरील कारवाईची स्थगिती उच्च न्यायालयाने उठवताच महापालिकेच्या बांधकाम विभागाने तेथील ७० स्टॉलवर कारवाई केली. यामध्ये ७ हजार चौरस फुटाची जागा अतिक्रमण मुक्त केली.
शिरोळे प्लॉटमध्ये लोखंडी एंगल, गर्डर पत्र्यांच्या सहाय्याने दोन मजली विनापरवाना मॉल तयार करण्यात आला होता. यामध्ये ७० दुकाने होती. महापालिकेने या ठिकाणी कारवाईची नोटीस बजावल्यानंतर यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर स्थगिती देण्यात आल्याने गेल्या आठ वर्षापासून महापालिकेला कारवाई करता आलेली नव्हती.महापालिकेने उच्च न्यायालयात स्थगिती उठवली, पुन्हा त्यावर स्थगिती येऊ नये यासाठी न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. त्यानंतर आज (ता. ४) तातडीने कारवाई करून ७ हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले.या विनापरवाना मॉल मुळे गोखले रस्त्यावर वाहतुकीवर ताण येणे, मॉलमध्ये हवा उजेडाची सोय नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाली असती त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी कपड्याच्या दुकानांची संख्या जास्त होती, कारवाई करताना आग लागण्याची शक्यता असल्याने अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले होते.शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस, महापालिकेचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, समीर गडइ यांनी ही कारवाई पूर्ण केली.यामध्ये एक जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, १५ बिगारी व पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला, अशी माहिती उप अभियंता सुनील कदम यांनी दिली.