Home Blog Page 1347

भारतातील 66 विमानतळ 100% हरित ऊर्जेवर कार्यरत

नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2023

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने (एमओसीए), विमानतळांवरील कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी,  भारतीय विमानतळांचे कार्बन अकाउंटिंग (कार्बन उत्सर्जनाची नोंद) आणि रिपोर्टिंग फ्रेमवर्कचे  (अहवाल) प्रमाणीकरण करून, कार्बन न्यूट्रल (तटस्थ) बनण्याच्या दिशेने काम करण्याच्या आणि देशातील विमानतळांवर निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.  

त्यासाठी, निर्धारित विमान उड्डाणे असलेल्या विमानतळ परिचालकांना संबंधित विमानतळांवर कार्बन उत्सर्जनाची नोंद ठेवण्याचे, आणि टप्प्याटप्प्याने कार्बन तटस्थता आणि निव्वळ शून्य उत्सर्जनाच्या दिशेने काम करण्याची सूचना देण्यात आली आहे. एमओसीए ने ग्रीनफिल्ड विमानतळांची उभारणी करणाऱ्या विकासकांना आणि संबंधित राज्य सरकारांना कार्बन तटस्थता आणि निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने काम करण्याची सूचना दिली असून, यामध्ये हरित ऊर्जेचा वापर समाविष्ट आहे.

भारत सरकारच्या या प्रयत्नांमुळे, दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळूरू यासारख्या विमानतळांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेची (ACI) स्तर 4 पेक्षा जास्त मान्यता प्राप्त केली आहे आणि हे विमानतळ कार्बन न्यूट्रल बनले आहेत. याव्यतिरिक्त, भारतातील 66 विमानतळ 100% हरित ऊर्जेच्या मदतीने कार्यरत आहेत.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल (डॉ) व्ही.के. सिंह (निवृत्त) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

अदिती राव हैदरी हिने गलाट्टा अवॉर्ड्स 2023 मध्ये गोल्डन आयकॉन परफॉर्मर पुरस्कार पटकावला !

 अदिती राव हैदरी ही यंदाच्या वर्षात चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिला अलीकडेच चेन्नईतील एका पुरस्कार सोहळ्यात गोल्डन आयकॉन गॅलट्टा पुरस्कार मिळाला ज्यामध्ये तमिळ चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक उपस्थित होते. 

 ताजमधील तिच्या कामगिरीसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दलचा पुरस्कार हा अदितीच्या सर्व भाषा आणि उद्योगांमधील अत्यंत उत्तम कामाचा आणि यशाचा पुरावा आहे. 
https://www.instagram.com/p/C0bXL9_OWyC/?igshid=ODhhZWM5NmIwOQ==

 अदिती प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित हीरामंडीमध्ये दिसणार असून नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी यांच्यासोबत ए.आर. रहमान यांनी गाणी बनवलेला ‘गांधी टॉक्स’ हा मूकपट तिच्यासाठी खास ठरणार आहे. अदिती राव हैदरी हिचा सिनेमॅटिक प्रवास प्रेक्षकांना मोहित करत असून येणाऱ्या काळात ती अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहे.

बडे मियाँ छोटे मियाँ’ चा टीझर येणार या दिवशी

2024 च्या प्रजासत्ताक दिनी ‘ बडे मियाँ छोटे मियाँ’ चा टीझर येणार 

 “टायगर इफेक्ट” सध्या सोशल मीडिया वर बघायला मिळत असून त्याच्या चाहत्यांसाठी ही एक उत्सुक बातमी असणार आहे. टायगर चा आगामी चित्रपट “बडे मियाँ छोटे मियाँ” चे निर्माते प्रजासत्ताक दिन 2024 च्या शनिवार व रविवार दरम्यान चित्रपटाचा डायनॅमिक ट्रेलर रिलीज करणार असल्याच कळतंय. बॉलिवूडचा अॅक्शन सुपरस्टार आणि युथ आयकॉन टायगर श्रॉफ या चित्रपटात अॅक्शन लिजेंड अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेयर करणार आहे आणि हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. 

 एका विश्वासार्ह स्त्रोताने खुलासा केला आहे ” टीझर कट लॉक केला आहे आणि त्यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या अ‍ॅक्शनचा समावेश आहे. तो सध्या पोस्ट-प्रॉडक्शनच्या अंतिम टप्प्यात आहे आणि चित्रपटाची टीम प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शनिवार किंवा रविवार च्या दरम्यान रिलीज करणार आहेत” चाहते प्रजासत्ताक दिना ची वाट बघत असून हे स्पष्ट आहे की टायगर श्रॉफ दमदार एंट्री घेऊन टीझर लॉन्चसह स्क्रीनवर वर्चस्व गाजवणार आहे. “बडे मियाँ छोटे मियाँ” व्यतिरिक्त टायगरकडे सिद्धार्थ आनंद निर्मित आणि रोहित धवन दिग्दर्शित “रॅम्बो”, जगन शक्ती दिग्दर्शित “हीरो नंबर 1,” आणि रोहित शेट्टीचा “सिंघम अगेन,” असे उत्साहवर्धक प्रोजेक्ट आहेत.

१ कोटी पुरुषांची आरोग्य तपासणी पूर्ण-आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

पुणे दि. ४: राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून १८ वर्षांवरील पुरुषांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ अभियानांतर्गत आतापर्यंत १ कोटी ७२ हजार पुरुषांच्या मोफत आरोग्य तपासणीचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानासाठी विशेष अॅपची निर्मिती करण्यात आलेली आहे. सदर अॅपच्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत रुग्णांची नोंदणी, त्यांना दिलेले औषध उपचार तसेच करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया, करण्यात आलेल्या चाचण्या, या माहितीची नोंद त्या ठिकाणी केली जाते.

हे अभियान १७ सप्टेंबर सुरू करण्यात आले होते. यात राज्यातील सुमारे ४ कोटी ६७ लाख लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आरोग्य तपासणी केलेल्या ९२ लाख लाभार्थ्यांच्या चाचण्या आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आलेल्या असून त्यापैकी सोळा लाख लाभार्थ्यांना औषधोपचार देण्यात आलेले आहेत. सुमारे तेरा हजार लाभार्थ्यांवर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या आहेत. ही मोहीम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर गरजेनुसार मोहिमेचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्र उपकेंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील सामुदायिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय या स्तरावर रुग्णांना आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

या सर्व आरोग्य संस्थांमध्ये १८ वर्षे वरील पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक चाचण्या, गरजेनुसार ईसीजी, सिटीस्कॅन, एक्स-रे इत्यादी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत आणि गरजेनुसार आवश्यक शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांमध्ये मोफत केल्या जाणार आहेत.

गरजेनुसार रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी वैद्यकीय महाविद्यालय व शासनमान्य महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जाणार आहे.
0000

14 डिसेंबर’शांतता पुणेकर वाचत आहेत’,15 डिसेंबर:’ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’

पुणे, दिनांक 4 डिसेंबर – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’मध्ये अधिकाधिक लोकसहभाग वाढावा या उद्देशाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांना अभिवादन, ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’, ‘ज्ञान सरिता ग्रंथदिंडी’,आणि ‘टॅलेंट हंट’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, डीईएस चे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन महाविद्यालय या महोत्सवाचे सह-आयोजक आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघ, भारतीय विचार साधना, इस्कॉन हे सह – प्रायोजक आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पुण्यातील डेक्कन जिमखान्यावरील ‘इंटरनॅशनल बुक सर्व्हिस’ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तक खरेदीसाठी येत असत. पुण्यात आले की बाबासाहेब हमखास या दुकानाला भेट देत. ‘पुणे पुस्तक महोत्सवा’च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी साहित्यिक गप्पांचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, साहित्यिका श्यामाताई घोणसे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आणि काही ज्येष्ठ साहित्यिक सहभागी होणार आहेत. बुधवार दिनांक 6 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता 7’इंटरनॅशनल बुक सर्व्हिस’ येथे हा कार्यक्रम होणार आहे.

‘शांतता पुणेकर वाचत आहेत’
गुरुवार दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत जो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पुस्तक वाचनाचे आवाहन करण्यात आले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व महाविद्यालये, शाळा, ग्रंथालये, प्रकाशन संस्था, साहित्यिक, लेखक, सामाजिक संस्था, गणेश मंडळे, व्यापारी संस्था, राजकीय पक्ष यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे. शहरातील पाच हजार संस्था या उपक्रमात सहभागी होतील असे अपेक्षित आहे.

या उपक्रमाअंतर्गत त्याच दिवशी सकाळी 8 वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पाच हजार पालक आपल्या पाल्यांना गोष्टी सांगणार आहेत. पुणे महापालिकेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आई जिजाऊंनी बाल शिवबावर गोष्टींतून संस्कार केले. या संस्कारातून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज घडले. गोष्टी सांगणे भारतीय ज्ञान परंपरेतील एक महत्त्वाचा घटक आहे. गोष्टींतून अनेक पिढ्या संस्कारक्षम झाल्या. गोष्ट ही प्रवाही साहित्य असल्याने पुढच्या पिढीपर्यंत ती पाहोचते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात याचा वारंवार उल्लेख केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आनंददायी शिक्षण देण्यासाठी गोष्ट सांगणे ही बाब अधोरेखित केली आहे. यांचा विचार करून पुणे महापालिकेने हा उपक्रम आयोजित केला आहे.

‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’
शुक्रवार, दिनांक 15 डिसेंबर रोजी तीस ठिकांणांहून ज्ञान सरिता ग्रंथ दिंड्यांचे प्रस्थान होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत तीस महापुरुष, साहित्यिक यांच्या ग्रंथ दिंड्या त्यांच्या स्थानावरून येणार आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज,राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक आदींच्या ग्रंथ दिंड्यांचा समावेश असणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत तीस महाविद्यालयांवर दिंड्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सर्व दिंड्या त्यांच्या ठिकाणापासून डेक्कन परिसरातील नदीपात्रात एकत्र येतील. तेथून एकत्रितपणे त्या फर्ग्युसन महाविद्यालयात पोहोचतील. या ठिकाणी ‘भारत’ हा शब्द मोठ्या अक्षरात लिहिलेला असेल. सर्व ग्रंथ ग्रंथयज्ञाच्या स्वरूपात ‘भारत’ या अक्षरामध्ये ठेवले जातील.

‘टॅलेंट हंट’
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘टॅलेंट हंट’चे आयोजन करण्यात आले आहे. कविता, भाषण, गायन, कथा-कथन, सुलेखन, चित्रकला अशा विविध स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य कार्यक्रमात व्यासपीठावर आपल्या कलांचे सादरीकरण करता येणार आहे.

उजनी जलाशयात लहान मासळी मासेमारी; मांगूर मत्स्यपालनावर कठोर कारवाई होणार

पुणे, दि. ४: उजनी जलाशयात लहान मासळी मासेमारी करणारे मत्सव्यवसायिक तसेच जलाशयालगत संपादित क्षेत्रात अनधिकृतपणे प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालन करणाऱ्यांवर संयुक्त कारवाई करुन गुन्हे दाखल करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

उजनी जलाशयात पुणे जिल्ह्यातील दौंड व इंदापूर, सोलापूरमधील माढा व करमाळा व अहमदनगर जिल्ह्यातील जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील परवानाधारक मत्स्यव्यावसायिक तसेच विनापरवाना मत्स्यव्यावसायिक अनधिकृत लहान मासळी मासेमारी करत असल्याचे आढळून आले आहे. त्याला प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगाने डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक मच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाईचे आदेश दिले.

लहान मासळी मासेमारी, मांगूरपालन करु नये
उजनी जलाशयात लहान मासळी मासेमारी करु नये. लहान मासळी मासेमारीकरीता वापरण्यात येणारी जाळी व साहित्य त्वरीत नष्ट करावे. प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालन करणाऱ्यांनी त्यांच्याकडील मांगूर मासा साठा नष्ट करावा. उजनी जलाशय संपादित क्षेत्रात असणारी शेततळी नष्ट करण्यात यावीत. संपादित क्षेत्रात अशा प्रकारचे कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

मासेमारी करण्यासाठी परवाना बंधनकारक
स्थानिक मत्स्यव्यवसायिकांनी उजनी जलाशयात मासेमारीसाठी आवश्यक परवाना नजीकच्या जलसंपदा विभाग शाखा कार्यालयाशी संपर्क साधून घ्यावा. परवाना नसलेल्या मत्स्यव्यवसायिकांवर विनापरवाना जलाशयात प्रवेश केल्याबद्दल कारवाई करण्यात येईल, असे उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.

ललित पाटील प्रकरणी येरवडा कारागृहाचे डॉक्टर संजय मरसाळे यांना अटक

पुणे-ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय मरसाळे यांना अटक केली.ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत पुणे पोलिस दलातील 10 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय 2 पोलिसांना अटकही करण्यात आली आहे. या पोलिसांवर ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाण्यात मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. ससून रुग्णालयातील जेल गार्ड मोईस शेख यालाही या प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावरही ललित पाटीलाल ससूनच्या वॉर्ड क्रमांक 16 मधून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप होता.

ललित पाटील अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. त्यावेळी त्याने आजारी असल्याचा बहाणा केल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याने तेथून नाशिक येथे ड्रग निर्मिती कारखान्यासह ड्रग रॅकेट सक्रिय केल्याचे तपासात निष्पन्न झाले. ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी डॉक्टर संजय मरसाळे यांनी शिफारस केली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी त्यांना अटक केली. येरवडा कारागृहाचे डॉ. संजय मरसाळे यांनी आतापर्यंत कुणाकुणाला ससून रुग्णालयात दाखल होण्याचे शिफारस पत्र पाठवले याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच त्यांनी या मोबदल्यात पैसे कसे व कोणत्या मार्गाने स्वीकारले याचाही शोध घेतला जात आहे.

दोन दिवसांच्या विशेष शिबिरात साडेपाच हजारावर मतदार नोंदणी

जिल्ह्यात स्वीपच्या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद

पुणे, दि. ४: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात शनिवार २ व रविवार ३ डिसेंबर या सुट्टीच्या दिवशी मतदार नोंदणीसाठी आयोजित शिबीरात ४८९ महिला, १ हजार ७४ युवांसह एकूण ५ हजार ६४८ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’अंतर्गत राबविण्यात येत असलेले उपक्रम आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे एकत्रित प्रयत्न यामुळे मतदार नोंदणीला वाढता प्रतिसाद मिळतो आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत अधिकाधिक पात्र मतदारांची नोंदणी व्हावी यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विविध उपक्रम राबवून मतदार नोंदणीला गती देण्यास प्रोत्साहन देत आहेत. पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी नाविन्यपूर्ण कल्पना राबवत मतदार जागृती आणि मतदार नोंदणीवर भर दिला आहे.

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज ९ डिसेंबर पर्यंत मागविण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाचे महिला तसेच तृतीयपंथीय, देहविक्री व्यवसायातील महिला, आणि भटक्या व विमुक्त जमाती या उपेक्षित घटकांच्या मतदार नोंदणीवर भर देण्याचे निर्देश असून त्यानुसार शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

दोन दिवसीय विशेष शिबिरात ४८९ महिला, ९० देहविक्रय व्यवसायातील महिला, ९७ तृतीयंथीय, भटक्या जमातीचे १२१, दिव्यांग ४२३, युवा मतदार १ हजार ७४ तर सर्वसाधारण मतदार ३ हजार ३५४ याप्रमाणे एकूण ५ हजार ६४८ मतदारांची नोंदणी करण्यात आली.

अर्चना तांबे, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी: ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमातून जनजागृती केल्यामुळे मतदार नोंदणी कामाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यापीठांच्या माध्यमातून महाविद्यालयांपर्यंत पाहोचून तेथे शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून युवकांनी ऑनलाईन नोंदणी करुन आजचा युवक ‘टेक्नोसॅव्ही’ असल्याचे दाखवून दिले आहे. जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

तृतीयपंथी मतदारांच्या नोंदणीसाठी समाजकल्याण विभागामार्फत मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

पुणे, दि. ४ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू असून प्रशासनाच्यावतीने तृतीयपंथी मतदारांच्या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या विशेष मतदार नोंदणी शिबिरात एकूण १०३ तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत तृतीयपंथी मतदार यांची मतदार नोंदणी वाढविण्याच्या अनुषंगाने सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी वाढवण्याच्यादृष्टिने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली २४ नोव्हेंबर रोजी संगमवाडी कॉर्नर, २ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन येरवडा आणि ३ डिसेंबर रोजी ढमढरे बोळ बुधवार पेठ येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिरात समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची एकूण १० पथकांनी सहभाग घेतला. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातील तृतीयपंथी मतदारांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मतदार नाव नोंदणी करण्याची मोहिम राबविण्यात आली. या वैशिष्ट्यपूर्ण मोहिमेला तृतीयपंथीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मतदार नोंदणी शिबिरे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्वीप समन्सयक उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, पुण्यातील युवक विकास आणि उपक्रम केंद्र व पुणेरी प्राईड फाऊंडेशन सिंहगड रोड पुणे या सामाजिक संस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ९ डिसेंबरपर्यंत सूरू राहणार असून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तृतीयपंथीयांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, पुणे सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा, पुणे या कार्यालयाशी संपर्क करून जास्तीत जास्त मतदार नाव नोंदणी करावी असे आवाहन पुणे जिल्हा समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे

‘महाभारतातील किर्तन परंपरा’  व्याख्यानाला प्रतिसाद

पुणे:
भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित  ‘कथा कीर्तन महोत्सव’ च्या समारोप प्रसंगी रविवार,दि. ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ‘भारतीय विद्या भवन पुणे केंद्राच्या  अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे यांचे  ‘महाभारतातील किर्तन परंपरा’  या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला.
भारतीय विद्या भवन बंगळुरू केंद्राच्या सह संचालक नागलक्ष्मी राव, भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी सर्वांचे स्वागत केले.

   त्यानंतर  ठाणे येथील युवा कीर्तनकार अमेय बुवा  रामदासी यांचे रामदासी कीर्तन सादर झाले.कीर्तन महोत्सवानिमित्त भारतीय विद्या भवन आवारात चित्रकला व शिल्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात अकरा कलाकार सहभागी झाले .
भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यानजीकच्या  सरदार महादेव बळवंत नातू  सभागृहामध्ये या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  पुणे शहर व जिल्ह्यातील कीर्तन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक यांनी चांगला प्रतिसाद दिला.
लीना मेहेंदळे म्हणाल्या,’सृष्टी वरील जीवन सुविहित सुरू राहावे यासाठी वेद मार्गदर्शन करतात.    समाधी अवस्थे पर्यंत बुद्धीला नेवू शकलो तर प्रज्ञा प्राप्ती होते. त्यासाठी निर्गुण उपासना सुरू ठेवली पाहिजे.
उपास्य देवतेचे नाम संकीर्तन केल्याने योग क्षेम होतो तसेच ज्ञान मिळते. प्रल्हाद, नारद, अंबरीश अशी मोठी भक्त परंपरा दिसून येते.   भक्ती करताना आपण देवतेचे गुण देखील घेतले पाहिजेत.  भक्तीमय, प्रेममय होणे हाच भक्तिचा लाभ आहे,असेही त्यांनी सांगितले.  

`स्टोरीटेल`ची सहा वर्षे!

जगातील आघाडीचा ऑडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म स्टोरीटेल भारतात येऊन ६ वर्षे पूर्ण झाली. मोबाईलच्या माध्यमातून पुस्तकांशी नातं जोडणारा हा प्रयोग रसिकांना अत्यंत भावला. विशेषतः मराठीजनांमध्ये त्याची लोकप्रियता विशेष आहे. सातव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी यानिमित्ताने साधलेला हा संवाद.

प्रश्न- `स्टोरीटेल`चे भारतात सातव्या वर्षात पदार्पण झाले आहे. मागे वळून पाहता, काय वाटते?

उत्तर- २७ नोव्हेंबर २०१७ रोजी आम्ही भारतात दाखल झालो तेव्हा आमच्याकडे भारतीय भाषांतील अगदी कमी पुस्तके होती. तसेच तेव्हा वर्गणी भरुन पुस्तक ऐकणे, ही संकल्पनाच आपल्याकडे तशी नवी होती. मात्र, आमच्यावर विश्वास ठेऊन पुस्तकांवर प्रेम करणारे लाखो वाचक श्रोते म्हणून आमच्याशी जोडले गेले. दरवर्षी आमच्याकडील पुस्तकांच्या संग्रहात मोठी वाढ होत गेली, तसतसा प्रतिसादही वाढत गेला. स्टोरीटेलच्या निमित्ताने भारतातील ऑडिओ बुक इंडस्ट्रीदेखील आकारास येत गेली. त्यातून विविध प्लॅटफॉर्मही आकारास आले आणि आजतागायत सुमारे दहा लाखांहून अधिक रसिक या माध्यमाशी संलग्न झाले. मला वाटते, भारतात श्राव्य पुस्तकांचे स्टेबल मार्केट आज दिसते आहे, त्यात `स्टोरीटेल` मोठी भूमिका बजाऊ शकले, याचा मला विशेष आनंद आहे.

प्रश्न-  स्टोरीटेल सुरु झाले तेव्हाचे मुख्य आव्हान कुठले होते आणि त्यावर तुम्ही मात कशी केली?

उत्तर- स्टोरीटेलची सुरवात झाली तेव्हा आपल्याकडे पुस्तके ऐकण्याची, विशेषतः पैसे भरुन ऐकण्याची सवय नव्हती. त्यामुळे वर्गणीदार वाचक-श्रोता तयार करणे हे मुख्य आव्हान होते. सुदैवाने आमच्याकडील सर्वोत्तम असा पुस्तकसंग्रह, युजर एक्सपेरिन्स यामुळे सशुल्क ऐकणाऱ्यांचा वर्ग आम्ही तयार करु शकलो. याशिवाय, आम्ही अनेक प्रकाशकांनाही त्यांची पुस्तके स्टोरीटेलवर आणण्याची संधी दिली. त्याचाही फायदा झाला. आम्ही तरुणाईला कनेक्ट करु शकलो. आज, आमच्याकडे केवळ मराठीपुरते बोलायचे झाले तरी तब्बल ५००० हून अधिक पुस्तके आहेत. आमची शेकडो ओरिजनल्स, तसेच पॉडकास्ट लोकप्रिय आहेत. स्टोरीटेल कट्टा हा आमचा पॉडकास्ट मराठीत सर्वाधिक ऐकला जाणारा पॉडकास्ट असून त्याचे ३०० भाग प्रसारित झाले आहेत. सहाशेहून अधिक पब्लिशर्स, लेखक, नॅरेटर्स असा आमचा परिवार बहरला आहे. २७ नोव्हेंबर रोजी आम्ही लोकप्रिय लेखक सुहास शिरवाळकर यांचे अस्तित्व ही कादंबरी मुद्रित स्वरुपात येण्याआधी आम्ही श्राव्य स्वरुपात प्रकाशित करतो आहोत, हे यानिमित्ताने आवर्जून नमूद करावेसे वाटते.

प्रश्न- स्टोरीटेलची आगामी वाटचाल कशी असेल?

उत्तर- मागच्या वर्षी रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाले, तेव्हापासून `स्टोरीटेल`चे जागतिक प्राधान्यक्रम बदलले आहेत. त्यामुळे अन्य देशांपेक्षा युरोपकेंद्री धोरण सध्या अवलंबण्यात आले आहे. त्यामुळे मागच्या वर्षी आम्ही पूर्वीसारखी गुंतवणूक करु शकलो नाही. मात्र, भविष्यात धोरण बदलताच ही परिस्थिती बदलू शकते. त्याबाबतीत आम्ही सकारात्मक आहोत.

आझम कॅम्पस येथे ५ व ६ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

पुणे, दि. ४ : जिल्हा क्रिडा कार्यालय, जिल्हा कृषी कार्यालय, पूना कॉलेज ऑफ आर्टस व सायन्स व राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आझम कॅम्पस पुणे येथे ५ व ६ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

क्रिडा व युवकसेवा संचालनालय यांच्या निर्देशानुसार युवांच्या कला गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने प्रतिवर्षी विविध स्तरावर युवा महात्सवाचे आयोजन करण्यात येते. संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष घोषित केले असल्याने युवा महोत्सवात राज्यासाठी ‘तृणधान्य उत्पन्न् वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान’ या संकल्पनेवर आधारित युवा महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे सुचित करण्यात आले आहे.

युवा महोत्सवात सांस्कृतिक विभागाअंतर्गत समूह लोकनृत्यlसाठी सहभाग संख्या १० आणि वेळ १५ मिनिटे असून प्रथम पारितोषिक ७ हजार, द्वितीय ५ हजार व तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये आहे. वैयक्तिक सोलो लोकनृत्य व वैयक्तिक सोलो लोकगीतासाठी सहभाग संख्या ५, वेळ ७ मिनिटे, प्रथम पारितोषिक ३ हजार, द्वितीय २ हजार व तृतीय १ हजार ५०० रूपये आहे. लोकगीतासाठी सहभाग संख्या १०, वेळ ७ मिनिटे, प्रथम पारितोषिक ५ हजार, द्वितीय ३ हजार व तृतीय २ हजार ५०० रूपये आहे.

कौशल्य विकास विभागाअंतर्गत कथालेखनासाठी सहभाग संख्या ३, वेळ १ तास व १ हजार शब्द मर्यादा आहे. पोस्टर स्पर्धेसाठी सहभाग संख्या २ आणि वेळ १ तास ३० मिनिटे आहे. इंग्रजी व हिंदीतील वक्तृत्व स्पर्धेसाठी सहभाग संख्या २ आणि वेळ ३ मिनिटे आहे. वरील तिन्ही स्पर्धांसह छायाचित्रण स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३ हजार, द्वितीय २ हजार व तृतीय १ हजार ५०० रूपये आहे.

‘तृणधान्य उत्पन्नवाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान’ या संकल्पनेअंतर्गत सहभाग संख्या ३५ असून प्रथम पारितोषिक ५ हजार, द्वितीय ३ हजार व तृतीय २ हजार रूपये आहे. युवा कृती विभागात हस्तकलासाठी सहभाग संख्या ५, वस्त्रोद्योग व ॲग्रो प्रोडक्ट साठी सहभाग संख्या ७ असून प्रथम पारितोषिक ३ हजार, द्वितीय २ हजार व तृतीय १ हजार ५०० रूपये असे राहील.

युवा महोत्सवात सहभाग घेण्यासाठी वयोमर्यादा १५ ते २९ वर्षे अशी आहे. वयाची परिगणना १ एप्रिल २०२३ नुसार करण्यात येईल. स्पर्धकांना वयाबाबत सबळ पुरावा सादर करावा लागेल. अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी क्रिडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार भ्रमणध्वनी क्रमांक ९५५२९३१११९ किंवा क्रिडा शिक्षक आसद शेख भ्रमणध्वनी क्रमांक ८४८४८०३५२९ वर संपर्क साधावा. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, युवक मंडळे यामधील इच्छुक कलावंतांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

वर्षभरात विक्रमी २.३३ लाखांवर नवीन वीजजोडण्या

वेग वाढलापुणे परिमंडलात दरमहा सरासरी २० हजार नवीन वीजजोडण्या कार्यान्वित

पुणे, दि. ०४ डिसेंबर २०२३‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहक सेवा देताना महावितरणच्या पुणे परिमंडलाने गेल्या डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या वर्षात विक्रमी २ लाख ३३ हजार ६०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. त्यापूर्वी दोन-तीन वर्षांमध्ये नवीन वीजजोडणी देण्याचा दरमहा सरासरी वेग १५ हजार ते १६ हजार होता तो आता दरमहा १९ हजार ९०० वर गेला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहकसेवा गतीमान करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी प्रामुख्याने ग्राहक तक्रार निवारण व नवीन वीजजोडण्यांना वेग देत ग्राहकसेवा आणखी गतिमान केली आहे. याबाबत परिमंडलस्तरावर संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.

पुणे परिमंडलामध्ये सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत १ लाख ९५ हजार ९८६ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. त्याआधीच्या आर्थिक वर्षाचा विचार केल्यास दरमहा सरासरी १५ हजार ३५० ते १६ हजार ३५० वीजजोडण्या देण्यात येत होत्या. त्यानंतर नवीन वीजजोडण्यांना मोठा वेग दिल्याने डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत वर्षभरात तब्बल २ लाख ३३ हजार ६०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित झाल्या आहेत. तर चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंतच्या आठ महिन्यांमध्ये सर्व वर्गवारीच्या तब्बल १ लाख ५९ हजार २०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित झाल्या आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग हा दरमहा सरासरी १९ हजार ९०० वर गेला आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत नवीन वीजजोडण्या व आवश्यकतेनुसार वीजमीटरचा पुरवठा व्हावा यासाठी दर आठवड्यात दोनदा मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याकडून आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया आणखी गतीमान झाली आहे. डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत कार्यान्वित झालेल्या विक्रमी २ लाख ३३ हजार ६०९ वीजजोडण्यांमध्ये घरगुती- १ लाख ९७ हजार १८०, वाणिज्यिक- २६ हजार ७३९, औद्योगिक- ३८२१, कृषी- २८२९ व इतर ३०४० वीजजोडण्यांचा समावेश आहे.

पुणे परिमंडलामध्ये मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. वीजमीटरबाबत किंवा नवीन वीजजोडणी संदर्भात काही तक्रार असल्यास ग्राहकांनी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी थेट संपर्क साधावा. वीजग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘पीएमए’ योजनेत मागणीनुसार सर्व वीजजोडण्या कार्यान्वित प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध ठिकाणी बांधलेल्या घरांना कोटेशनची रक्कम भरल्यानंतर महावितरणकडून तात्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. यामध्ये बोऱ्हाडेवाडी- १२९६, जाधववाडी सेक्टर १२- ३७२२, वडगाव खुर्द- ८१५, खराडी- ८६५, रामटेकडी- १२० अशा एकूण ६८१८ घरांच्या नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे. कोटेशन भरल्यानंतर या योजनेतील एकाही घराची नवीन वीजजोडणी सध्या प्रलंबित नाही.

श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहकसेवेची अंमलबजावणी सुरू आहे. यामध्ये नवीन वीजजोडण्यांचा वेग आणखी वाढविण्यात आला आहे. त्यासाठी परिमंडलस्तरावर दर सोमवारी व गुरुवारी विभाग कार्यालयनिहाय आढावा घेण्यात येत आहे. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे नवीन वीजजोडण्या देण्याचा दरमहा वेग एक वर्षापूर्वी १५ हजार ते १६ हजार होता तो आता दरमहा १९ हजार ९०० वर गेला आहे.

देशातील ११२३३ ज्येष्ठ कलाकारांना दरमहा ६ हजार रुपये आर्थिक सहाय्य

नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2023

ललित कला आणि संस्कृतीच्या त्यांच्या प्राविण्य प्राप्त क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या परंतु वृद्धत्वामुळे आता आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ कलाकारांसाठी सांस्कृतिक मंत्रालय “ज्येष्ठ कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य योजना” या नावाने एक योजना राबवते.

सध्याच्या योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संबंधित लाभार्थी कोणत्याही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित असला तरीही निवडलेल्या कलाकारांना रुपये 6000/- प्रति महिना आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 11233 कलाकारांची निवड करण्यात आली आहे.

केरळ राज्यासह सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील निवडक लाभार्थ्यांना त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे मिळाल्यावर त्यांना आर्थिक सहाय्य वेळेवर वितरित व्हावे यासाठी सरकारचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. योजनेंतर्गत आर्थिक सहाय्याचे वितरण मात्र लाभार्थींनी काही अनिवार्य कागदपत्रे सादर करण्यावर अवलंबून असते. लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर, आर्थिक सहाय्य त्वरित वितरित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातात. लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदतीचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी, मंत्रालय आणि कॅनरा बँक यांच्यात 28.06.2023 रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.

योजनेचा नुकताच आढावा घेण्यात आला आणि जून, 2022 पासून मासिक आर्थिक सहाय्य रु.4000/- वरून रु.6000/- करण्यात आले आहे.

ईशान्य प्रदेशाचे सांस्कृतिक, पर्यटन आणि विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

‘कळमना किराणा मार्केट यार्ड’ हे देशातील सर्वात सुंदर मार्केट यार्ड ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कळमना किराणा मार्केट यार्डचे भूमिपूजन

नागपूर :  व्यापारी व ग्राहकांसाठी विविध सुविधांचा समावेश करून तयार होणारे कळमना किराणा मार्केट यार्ड हे देशातील सर्वात सुंदर किराणा मार्केट यार्ड ठरेल व येथील किराणा व्यावसायिकांचा चौपट फायदा होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

 दि नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनच्यावतीने येथील कळमना मार्केट यार्ड परिसरात उभारण्यात येणाऱ्या  किराणा मार्केट यार्डचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी  श्री. फडणवीस बोलत होते. आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूर सुधार प्रन्यासचे(नासुप्र) सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, दि नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवप्रताप सिंह आदी यावेळी  उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, शहराच्या इतवारी भागात गजबजलेल्या जागेत असलेल्या किराणा बाजाराचा विस्तार करण्याच्या चर्चा बऱ्याच वर्षांपासून सुरु होत्या. मात्र, या संदर्भात ठोस असे काही घडत नव्हते. या किराणा बाजाराच्या स्थानांतरासाठी विविध ठिकाणांच्या नावाची चर्चा होत राहिली. मात्र, ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी किराणा मार्केट यार्डची  संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रम घेतले आणि  किराणा मर्चंट असोसिएशनने  त्यास चांगला प्रतिसाद दिला. परिणामी, येत्या काळात किराणा मार्केट यार्ड प्रत्यक्षात उभारले जाणार आहे. नासूप्रने  या प्रकल्पासाठी  जमीन उपलब्ध करून दिली असून वीरेंद्र खरे यांनी यार्डचा उत्तम प्लॅन तयार केला हेही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

किराणा मर्चंट असोसिएशनने नागपुरच्या सामाजिक व राजकीय जीवनात महत्त्वाचे योगदान दिले आहे. असोसिएशनच्या माध्यमातून इतवारी भागातील किराणा बाजार या मार्केट यार्डमध्ये पूर्णपणे स्थानांतरित होईल आणि  कमीत-कमी वेळात या मार्केट यार्डचे बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मार्केट यार्डच्या विकासासाठी आवश्यक ती मदत राज्य शासनाच्यावतीने करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.