Home Blog Page 1348

‘कळमना किराणा मार्केट यार्ड’ हे देशातील सर्वात सुंदर मार्केट यार्ड ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कळमना किराणा मार्केट यार्डचे भूमिपूजन

नागपूर :  व्यापारी व ग्राहकांसाठी विविध सुविधांचा समावेश करून तयार होणारे कळमना किराणा मार्केट यार्ड हे देशातील सर्वात सुंदर किराणा मार्केट यार्ड ठरेल व येथील किराणा व्यावसायिकांचा चौपट फायदा होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

 दि नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनच्यावतीने येथील कळमना मार्केट यार्ड परिसरात उभारण्यात येणाऱ्या  किराणा मार्केट यार्डचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी  श्री. फडणवीस बोलत होते. आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूर सुधार प्रन्यासचे(नासुप्र) सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, दि नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवप्रताप सिंह आदी यावेळी  उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, शहराच्या इतवारी भागात गजबजलेल्या जागेत असलेल्या किराणा बाजाराचा विस्तार करण्याच्या चर्चा बऱ्याच वर्षांपासून सुरु होत्या. मात्र, या संदर्भात ठोस असे काही घडत नव्हते. या किराणा बाजाराच्या स्थानांतरासाठी विविध ठिकाणांच्या नावाची चर्चा होत राहिली. मात्र, ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी किराणा मार्केट यार्डची  संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रम घेतले आणि  किराणा मर्चंट असोसिएशनने  त्यास चांगला प्रतिसाद दिला. परिणामी, येत्या काळात किराणा मार्केट यार्ड प्रत्यक्षात उभारले जाणार आहे. नासूप्रने  या प्रकल्पासाठी  जमीन उपलब्ध करून दिली असून वीरेंद्र खरे यांनी यार्डचा उत्तम प्लॅन तयार केला हेही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

किराणा मर्चंट असोसिएशनने नागपुरच्या सामाजिक व राजकीय जीवनात महत्त्वाचे योगदान दिले आहे. असोसिएशनच्या माध्यमातून इतवारी भागातील किराणा बाजार या मार्केट यार्डमध्ये पूर्णपणे स्थानांतरित होईल आणि  कमीत-कमी वेळात या मार्केट यार्डचे बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मार्केट यार्डच्या विकासासाठी आवश्यक ती मदत राज्य शासनाच्यावतीने करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मिझोराममध्ये ZPM चे सरकार, 27 जागेवर विजय:माजी IPS लालदुहमो यांचा पक्ष, सत्ताधारी MNF 10 जागा, BJP 2 आणि काँग्रेसला 1 जागा

इंफाळ-

मिझोरामच्या 40 विधानसभा जागांवर झालेल्या निवडणुकीत झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. झेडपीएमने 27 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला (एमएनएफ) 10 जागा मिळाल्या आहेत.

सीएम झोरामथांगा यांचा आयझॉल-पूर्व 1 मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्यांचा झेडपीएमच्या लालथनसांगा यांनी पराभव केला. दुसरीकडे भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत. गेल्या वेळी पक्षाला एक जागा मिळाली ती. तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे.

झोरम पीपल्स मूव्हमेंटचे नेते लालदुहोमा म्हणाले- पक्षाची प्रगती पाहून आनंद झाला. येत्या दोन दिवसांत मी राज्यपालांना भेटणार आहे. त्याचबरोबर याच महिन्यात शपथविधी होणार असल्याचे ते म्हणाले.

लालदुहोमा हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची सुरक्षा सांभाळली आहे. त्यांच्या पक्षाने दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. 2018 मध्ये झेडपीएमला 8 जागा मिळाल्या होत्या.

7 नोव्हेंबर रोजी सुमारे 77.04% मतदान झाले होते. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF), झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. भाजप येथे किंगमेकर बनण्याचा प्रयत्न करत आहे.

10 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला 2018 च्या विधानसभा निवडणुकीत सरकार गमवावे लागले होते. पी. ललथनहवला चांफई दक्षिण आणि सेरछिप या दोन्ही जागांवरून निवडणूक हरले होते. मिझो नॅशनल फ्रंटने (MNF) थेट लढतीत काँग्रेसचा पराभव केला. झोरमथांगा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एमएनएफला 26, काँग्रेसला 5, भाजपला 1 आणि अपक्षांना 8 जागा मिळाल्या होत्या.

प्रभू श्रीराम मंदिर उभारणी हे हिंदू समाज संघटित झाल्याचे यश- डॉ. प्रवीण दबडघाव

पुणे :  अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर उभारणीचे मोठे यश हे हिंदू समाज संघटित झाल्यानंतरचे यश आहे. कोणत्या पक्षाचे, संघटनेचे किंवा व्यक्तीचे यश नाही. हे आपण जगाला दाखवून दिले आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी व्यक्त केले. 
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, सेवा मित्र मंडळ, पुणे तर्फे प.पू. जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभाशीर्वादाने ह.भ.प. डॉ. किसन महाराज साखरे गौरवार्थ पुणे कीर्तन महोत्सवाचे आयोजन लाल महाल येथे करण्यात आले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर पुनर्निर्माणानिमित्त श्रीरामकथा होणार आहे. उदघाटनप्रसंगी आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, प्रा. संगीता मावळे आदी उपस्थित होते. 
डॉ. प्रवीण दबडघाव म्हणाले, प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. त्यांच्याप्रमाणे आपण आपले जीवन व्यतित करायला हवे. तसेच श्रीराम मंदिर उभारणीच्या दिवशी घरोघरी  गुढ्या उभारून रांगोळी काढून दिवाळी साजरी करावी.
आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, सन २०२४ मध्ये अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर उभारणीचे औचित्य साधून पुण्यात श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग पंधरा वर्षे हा उपक्रम सुरू आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील विविध कीर्तनकारांनी महोत्सवात आपली सेवा दिली आहे. मंगळवार, दिनांक ५ डिसेंबर पर्यंत दररोज सायंकाळी ६ वाजता होणारा हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी  कीर्तनकार  ह.भ.प. उद्धव बुवा जावडेकर यांचे कीर्तन झाले. त्यांना होनराज मावळे (पेटी), मिलिंद तायवाडे (तबला) यांनी साथसंगत केली. अरुणकुमार बाभुळगावकर, ओंकार चिकणे, मंगलमूर्ती औरंगाबादकर यांनी आयोजनात सहभाग घेतला. अक्षदा इनामदार हिने सूत्रसंचालन केले. 

अण्णासाहेब नातु यांच्या स्मृतिनिमित्त अण्णासाहेब नातु चॅम्पियन्स प्रोजेक्ट राबविणार 

पुणे : पुना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या माध्यमातून असोसिएशनचे माजी तहहयात अध्यक्ष सदाशिव उर्फ अण्णासाहेब नातु यांनी केवळ बॅडमिंटनपटूच घडविले नाही, तर या खेळासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते. त्यांच्या विविध संकल्पना आणि सुविधांमुळे आज बॅडमिंटनला सोन्याचे दिवस आले आहेत. अण्णासाहेब नातु यांचे बॅडमिंटन साठी भरीव योगदान कधीही विसरता येणार नाही. अशी भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.

पुना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशन तर्फे अण्णासाहेब नातु यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या श्रद्धांजली सभेमध्ये पुना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, बॅडमिंटनपटू व संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे, अण्णासाहेबांचे बालपणापासूनचे मित्र व ज्येष्ठ चिकित्सक डॉ. प्रकाश जोशी, बॅडमिंटन प्रशिक्षक अनिल मोडक, राष्ट्रीय पंच हेमंत खाडिलकर, त्यांचे किर्लोस्कर कमिन्स मधील सहकारी विजय पंडित, पालक प्रतिनिधी म्हणून नितीन भिवपाठकी, आंतरराष्ट्रीय पंच गिरीश नातु, अण्णासाहेबांचे चिरंजीव व संघटनेचे महासचिव रणजीत नातु, अभय सोनावणे  आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अण्णासाहेब नातु यांच्या आठवणींना उजाळा दिला. अण्णासाहेबांच्या नातवंडांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

अनिरुद्ध देशपांडे म्हणाले अण्णासाहेब नातु यांच्यामुळे बॅडमिंटनची चांगली पायाभरणी झाली.  अनेक चांगले खेळाडू त्यांच्यामुळे घडले. बॅडमिंटनला आज जे चांगले दिवस दिसत आहेत त्याचे श्रेय आपण अण्णासाहेब नातु यांच्या प्रयत्नांना दिले पाहिजे.

गिरीश नातु म्हणाले, अण्णासाहेब नातु हे कायम प्रत्यक्ष काम करण्यावर भर देत असत. त्यांनी केवळ चांगले खेळाडू घडविले नाही तर चांगले व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी त्यांचा कायम प्रयत्न असायचा. त्यामुळे त्यांनी घडवलेल्या व्यक्तींनी केवळ खेळातच नव्हे तर समाजामध्ये चांगले काम करण्यासाठी हातभार लावला आहे.

रणजीत नातु म्हणाले, अण्णासाहेब नातु यांच्या डोक्यामध्ये २४ तास बॅडमिंटन हाच खेळ असायचा. बॅडमिंटनसाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले होते. त्यांनी केलेल्या विविध सुधारणा आणि कार्य बॅडमिंटन क्षेत्र कधीही विसरू शकणार नाही. नॅशनल चॅम्पियन्सला रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्याची संकल्पना, राष्ट्रीय संघटनेकडून झालेल्या विरोधाला न जुमानता त्यांनीच पहिल्यांदा १९९७ मध्ये पुण्यात सुरू केली. त्यांच्यामुळेच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले आहेत त्याचे श्रेय आपण अण्णासाहेब नातु यांना दिले पाहिजे.

सभेचा शेवट त्यांच्या स्नुषा व प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. रेवा नातु ह्यनी अण्णासाहेबांच्या आवडत्या भजनांचे गायन करुन केला.

अण्णासाहेब नातु चॅम्पियन्स प्रोजेक्ट घडविणार बॅडमिंटन खेळाडू

अण्णासाहेब नातु यांच्या स्मृतिनिमित्त  पुना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशन तर्फे अण्णासाहेब नातु चॅम्पियन्स प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. या प्रोजेक्ट द्वारे १३ ते १७ वर्षातील बॅडमिंटन खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ह्याकरिता पुल्लेला गोपीचंद व प्रकाश पदुकोण ह्यांच्या अकादमींशी बोलणी झाली असून या खेळाडूंना प्रशिक्षणासाठी इतर देशात जाण्याची संधीही असोसिएशन तर्फे देण्यात येणार असून त्याचा सर्व खर्च असोसिएशन करणार असल्याची माहिती अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी यावेळी दिली. तसेच या  खेळाडूंना भारतातील स्पर्धांमध्ये भाग घेण्याकरता प्रवास व इतर खर्च ही संघटना करणार आहे. या  प्रकल्पाचे उद्दिष्ट पुण्यातून जास्तीतजास्त राष्ट्रीय विजेते तयार करणे हे असेल! ह्या प्रकल्पा करता अमनोरा समूहाने ३ वर्षे रुपये १० लाख इतके सहाय्य देण्याचे मान्य केले आहे.

श्री क्षेत्र आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन

पुणे, दि. ४ डिसेंबर : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. ५ डिसेंबर ते सोमवार, दि.११ डिसेंबर २०२३ या दरम्यान तत्त्वज्ञ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या   निमित्ताने दरवर्षी प्रमाणेच जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त होत असलेल्या या सप्ताहात ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे भजन, कीर्तन, प्रवचन यासह लोकप्रबोधनपर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या सप्ताहाचे उद्घाटन मंगळवार, दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता होणार आहे. या सोहळ्याला जगप्रसिध्द संगणकतज्ञ, प्रमुख मार्गदर्शक व नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थचे अध्यक्ष ह.भ.प. मा. श्री. मारुती महाराज कुर्‍हेकर, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, आळंदी देवस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त श्री. योगेश देसाई, डॉ. भावार्थ रा. देखणे, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. हेमलताताई काळोखे, देहू येथील श्री तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री.पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री क्षेत्र देहू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पूजाताई दिवटे उपस्थित राहणार आहेत.
याच दिवसी रात्री ७.३० ते ९.३० या वेळात संतबुवासाहेब ठाकुरबुवा देठणा, या फडकरी परंपरेतील सहावे वंशज ह.भ.प. डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणेकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती’ या स्वामी विवेकानंदांच्या वचनानुसार सुदृढ, निकोप व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्‍या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडविण्याच्या हेतूने सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन केले जाते. बंधुत्व, मानवी हक्क, लोकशाही, सर्वधर्मसमभाव, विज्ञान व अध्यात्माचा समन्वय आणि सहिष्णुता अशा विविध विषयांवरील लोकशिक्षणाचा व समाजप्रबोधनाचा हा सोहळा आहे.
या सोहळ्यात संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प.डॉ. नारायण महाराज जाधव, संत गोरोबाकाका संस्थानचे वाड्मय प्रचारक ह.भ.प. दीपक महाराज खरात, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. संजय नाना धोंगडे, संत साहित्याचे अभ्यासक व सामाजिक सलोखा डॉ. रफीक सय्यद आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब मोरे देहूकर यांचे प्रवचन होणार आहे.
या सोहळ्यात सकाळी ९.३० ते १२.३० वाजेपर्यंत तुकाराम महाराज शास्त्री मुंडे, ह.भ.प. कृष्णा महाराज चौरे, शिवशंभू चरित्र व्याख्याते ह.भ.प.श्री धर्मराज महाराज हांडे, ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर-पिंप्रिकर व ह.भ.प. नानामहाराज कदम यांची कीर्तने होणार आहेत.
ह.भ.प. उध्दवबापू शिंदे व सहकारी यांचा अभंगवाणी कार्यक्रम, ओंकार महाराज जगताप यांचा अभंगवाणी, ह.भ.प. गोदावरीताई मुंडे. ह.भ.प. रमेशबुवा सेनगांवकर व सहकारी यांचा अभंग गवळणीचा कार्यक्रम, पं. के.एन. बोळंगे गुरूजी यांचे ज्येष्ठ शिष्य श्री. शिवाजी मामा जानवळकर व सहकारी यांच्या गवळणीचा कार्यक्रम, विश्वशांती दिंडीच्या अध्यक्षा ह.भ.प. उषा वि. कराड, एमआयटी हनुमान भजनी मंडळ, विश्वदर्शन भजनी मंडळ, संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी भजनी मंडळ यांचा अभंगवाणी कार्यक्रम.
दररोज संध्याकाळी ७.१५ ते रात्री ९ या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प श्री अर्जुन महाराज लाड गुरूजी, भागवताचार्य बालयोग ह.भ.प.श्री हरिहर महाराज दिवेगांवकर, रामायणाचार्य ह.भ.प. रामरावमहाराज ढोक, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. श्री किसनमहाराज साखरे व वै.बाबामहाराज सातारकर यांचे नातू ह.भ.प. श्री. चिन्मय महाराज सातारकर यांची सुश्राव्य कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत.
रात्रीच्या सत्रात सौ. प्रियंका ढेरंगे चौधरी व सहकारी यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम, विश्वशांती संगीत कला अकादमी, राजबाग येथील शिक्षक व विद्याथी यांचा ‘विश्वाशांती दर्शन’ हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम,ख्यातनाम गायिका अपर्णा संत यांचा सरूप पहाता लोचनी हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम, ज्येष्ठ संगीतकार व गायक श्री.श्रीधर फडके यांचा ओंकार स्वरूपा हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम व पंडीत शौनक अभिषेकी यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.
संतश्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सोमवार, दि.११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन होऊन त्यानंतर घंटानाद व महाप्रसाद होऊन या सप्ताहाची सांगता होईल.
अशी माहिती श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीचे समन्वयक डॉ. सुनील कराड आणि प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.

मुंबईतील ३०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा

मुंबई, दि. ३ : मुंबई महानगर क्षेत्रातील ३०० शाळा, महाविद्यालयांमधील ६० हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना करिअर मार्गदर्शनपर मेळावा पहिल्या टप्प्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग,शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालय आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा शुभारंभ कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते दिनांक ५ डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी १० वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.

शालेय शिक्षण घेत असताना करिअरच्या वेगवेगळ्या संधी कोणत्या आहेत याबाबत विद्यार्थी आणि पालकांना  माहिती व्हावी, यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग एकत्र येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मळावा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

करिअर मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये करिअर कसे निवडावे, करिअरच्या विविध वाटा, व्यक्तिमत्व विकास, कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने अभ्यास कसा करावा याबाबत विद्यार्थी व पालकांना तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाईल. यावेळी विविध अभ्यासक्रमांची माहिती असलेली करिअर प्रदर्शनी विद्यार्थी आणि पालकांना पाहण्यास उपलब्ध असेल. विविध करिअर क्षेत्रे, विविध अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती योजना याबाबत अद्यायावत माहिती असलेले करिअर प्लॅनर हे पुस्तक विद्यार्थी व पालकांना विनामूल्य देण्यात येईल. या कार्यक्रमामध्ये करिअर मार्गदर्शक आनंद मापुस्कर, प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनिषा पवार यांचे पथक करिअर मार्गदर्शन करणार आहे.

विशेष मुलांना सहानुभूती नाही तर नोकरीची गरज

सामाजिक कार्यकर्ते सुभाष चुत्तर यांचे मत ः  विद्या महामंडळ संस्थेचा ६२ व्या  वर्धापनदिनानिमित्त पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
पुणे ः आज समाजात विशेष मुले दिसली की त्यांना मदत करण्याच्या हेतूने दया दाखवली जाते. त्यांना सतत काही तरी शिकविले जाते. त्यांना शिकवण्यापेक्षा त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्यात अनेक गुण असतात. अनेकजण उच्च शिक्षण देखील घेत आहेत.  त्यांना  दया  आणि सहानुभूती देण्याची नाही तर नोकरी देणे  गरजेचे आहे. प्रत्येक कंपनीमध्ये विशेष व्यक्तींसाठी नोकरीची जागा राखीव असली पाहिजे. त्यांच्या इतके चोख काम कोणी करू शकत नाही, असे मत व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सुभाष चुत्तर यांनी व्यक्त केले. 

विद्या महामंडळ संस्थेच्या  ६२ व्या वर्धापनदिनी व  ‘लोकशिक्षण दिनानिमित्त’पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार’ प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी आपटे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी खुशबू जयंतीलाल परिहारिया यांना सुभाष चुत्तर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आपटे रस्त्यावरील  संस्थेच्या सभागृहात सोहळा संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम रानडे, कार्याध्यक्ष अमोल साने, कार्यवाह लिलाधर गाजरे, संस्थेच्या उपाध्यक्षा अपर्णा कुलकर्णी, अॅड. अभय आपटे, खुशबुच्या आई उषा परिहारिया आदी मान्यवर उपस्थित होते. मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ रोख रक्कम अकरा हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

राम रानडे म्हणाले, विशेष मुलांना काही शिकवण्याची गरज नसते. त्यांच्याकडूनच आपण अनेक गोष्टी शिकत असतो. त्यांना समाजातील वेगळा भाग म्हणून बघण्यापेक्षा मानाचे स्थान दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
 अभय आपटे म्हणाले, तुम्ही आज कोणत्या स्थानावर आहात यापेक्षा तुम्ही तिथे कसे पोहोचले आणि तो प्रवास कसा होता हे जास्त महत्वाचे आहे. खुशबुचा प्रवासपण तितकाच महत्वाचा आहे म्हणून तिचे कौतुक वाटते. अशा व्यक्तींना मुलांसमोर आणले पाहिजे. आज विद्यार्थ्यासमोर आदर्शच नाहीत. खुशबु सारख्या व्यक्तींचे समाजातील स्थान आणि त्यांचा प्रवास हा विद्यार्थ्यांसाठी  आदर्श  आहे, असे त्यांनी सांगितले. खुशबु परिहारीया यांच्या आई उषा परिहारिया यांनी खुशबुच्या शाळेतील बालपणीच्या आठवणी सांगितल्या. 

सुमेधा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. अमोल साने यांनी प्रास्ताविक केले आणि गौतम मगरे यांनी आभार मानले. 

उत्कर्षा दोरगे, शताक्षी वनारसे, रुद्र महाबळेश्वर ठरले मानकरी

पुणे:

भारतातील वन्यजीव संवर्धनासाठी राबवल्या जाणाऱ्या महत्वाच्या प्रकल्पांपैकी ‘प्रोजेक्ट टायगर’ला’ पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ‘जीविधा’ संस्थेतर्फे निबंध, चित्रकला आणि पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धांचे पारितोषिक वितरण रविवार,दि.३ डिसेंबर रोजी सकाळी माजी आमदार सौ. मेधा कुलकर्णी आणि पटकथा लेखक-दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण कलादालन,कोथरूड येथे झाले.

यावेळी बोलतांना सौ.मेधा कुलकर्णी म्हणाल्या , ‘डोळ्यात अंजन घालणारे आणि प्रेरणा देणारे हे प्रदर्शन आहे. मुलांच्या संस्कारक्षम वयात असे कार्यक्रम करणे आणि त्यांचा त्यामध्ये सहभाग वाढणे गरजेचे आहे. आपण पृथ्वीला ओरबाडत आहोत, निसर्गाचा ऱ्हास थांबला पाहिजे. वाघांचे जतन केलं पाहिजे. पुढच्या पिढीसाठी हे ज्ञान पोहचवणे गरजेचे आहे .त्यासाठी जिविधा संस्थेचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे.

किरण यज्ञोपवीत म्हणाले, ‘ जिविधाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. मानवी कल्याणाचा विचार हे वाक्य रद्द करून निसर्गाच कल्याण करणं हा विचार पुढे यायला पाहिजे . निसर्ग संवर्धनासाठी माणसाला सुजाण आणि सुज्ञ होणं गरजेचे आहे. जागृती आणि शिक्षण या विषयाला धरून ‘ जिविधा ‘ संस्थेचे कार्य सुरू असते’. ‘जैवविविधतेकडे सजगतेने समाजाने पाहिले पाहिजे’ असे संस्थेचे अध्यक्ष राजीव पंडित यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीत यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड, पुणे येथे ‘व्याघ्र प्रकल्पाची पन्नास सोनेरी वर्षे’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाद्वारे वाघांच्या संवर्धनात ‘ व्याघ्र प्रकल्पांची’ भुमिका , स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न, व्याघ्र प्रकल्पांसमोरील भावी काळातील आव्हाने यासारख्या विषयांची माहिती पोस्टरद्वारे करून दिली जात होती.

विजेत्यांचा सत्कार
वन्यजीव संवर्धनाच्या ‘प्रोजेक्ट टायगर’या यशस्वी प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवाचे कौतुक करण्यासाठी ‘जीविधा’ संस्थेतर्फे यावर्षी प्रौढांसाठी पोस्टर स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा अशा तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या विजेत्यांना प्रशस्तीपत्रक आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.

विविध स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे:

निबंध स्पर्धा :उत्कर्षा दोरगे (प्रथम क्रमांक),विजया कोळेकर(द्वितीय क्रमांक), ऐश्वर्या गडदे(तृतीय क्रमांक)

पोस्टर स्पर्धा :शताक्षी वनारसे(प्रथम क्रमांक),अनुराधा दुशी(द्वितीय क्रमांक), क्रांती जरांडे(तृतीय क्रमांक)
चित्रकला स्पर्धा : रुद्र महाबळेश्वर(प्रथम क्रमांक), मानसी मालजी(द्वितीय क्रमांक),ईशिता रेगे(तृतीय क्रमांक)

परिक्षक समीर धर्माधिकारी, यांनी विद्यार्थ्याना महत्वाच्या टिप्स दिल्या. आणि विजेत्या मुलांना शुभेच्छा दिल्या.
चित्रकार प्रज्ञा सातारकर यांनी चित्रकला स्पधेंतील प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांक यांना विशेष पारितोषिक दिले.
ईशा वर्तक यांनी सूत्रसंचालन केले. वृंदा पंडीत यांनी आभार मानले.

प्रभू श्रीरामाच्या भव्य पुर्णाकृती शिल्पाचा पायाभरणी सोहळा उत्साहात साजरा

पुणे:

भारतातील सर्वात मोठ्या प्रभू श्रीरामांच्या पुर्णाकृती शिल्पाची पायाभरणी सोहळा काल शनिवार, दि. ०२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०७ : ०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. धार्मिक आणि सांस्कृतिक वसा जोपासण्यासाठी शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक तथा शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख, प्रमोद नाना भानगिरे यांनी २०१८ मध्ये पुणे महानगरपालिकेकडे भारतातील सर्वात पहिले प्रभू श्रीरामाचे पुर्णाकृती शिल्प उभारण्यासाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाला मान्यता देण्यासाठी प्रस्ताव दिला होता.

सार्वजनिक ठिकाणी प्रभू श्रीरामांचे शिल्प उभारण्यासाठी नगरविकास विभाग, गृह विभाग आणि पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर आता हांडेवाडी येथील श्रीराम चौकात प्रभू श्रीरामांचे पुर्णाकृती शिल्प उभारले जाणार आहे. त्यामुळे अशा अनेक अडचणींवर मात करून या शिल्पाला महापालिकेकडून मान्यता मिळाल्याने या शिल्पाच्या पायाभरणी सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

तसेच या कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मातोश्री स्व. गंगुबाई संभाजीराव शिंदे यांच्या नावाने वाचनालयाचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून, शिरूर मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि शिवसेना मुख्य प्रतोद तथा महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वढू तुळापूरला होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि वधु तुळापूरच्या विकास कामासाठी लागणाऱ्या ४०० कोटी निधी दिला असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी यावेळी बोलताना प्रमोद नाना भानगिरे हे २०० कोटींचा निधी पहिल्यांदाच प्रभागात आणलेला एकमेव नगरसेवक असल्याचे बोलून दाखवले. याचसोबत त्यांनी येणाऱ्या निवडणूकीत महायुतीच्या पाठीमागे खंबीर उभे राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान, शिवसेना प्रतोद आणि महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी, देशात श्रीरामाच्या मंदिराला विरोध असताना तो विरोध मोदींनी मोडून काढला असे वक्तव्य केले.

याचसोबत गोगावले यांनी येणाऱ्या काळात हडपसर मध्ये ३० ते ३५ फुट उंच विठ्ठल मंदिराची स्थापना करून, संत सृष्टी तयार करणार असल्याचे सांगितले. त्यांनतर येत्या काळात लवकरच महंमदवाडी गावाचे महादेववाडी होणार असल्याचे सांगितले. तसेच, यावेळी त्यांनी लेक लाडकी योजना, महात्मा फुले योजनेत केलेली निधीवाढ याची माहिती दिली.

दरम्यान, या समारंभास शिवसेना जिल्हाप्रमुख रामेशबाप्पू कोंडे युवासेना सचिव किरण साळी ,युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, तुषार हंबीर, युवासेना शहरप्रमुखनिलेश गिरमे, गोरक्षक शरद मोहळ, आध्यात्मिक आघाडीचे ह. भ. प. अक्षय महाराज भोसले, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख पुजाताई रावेतकर तसेच शिवसेना पुणे शहरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांचे सदस्य आणि सकल हिंदू समाज तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने होते.

गीता धर्म मंडळातर्फे भव्य गीता पाठ महायज्ञाचे यशस्वी आयोजन!

पुणे:

गीता धर्म मंडळ पुणे या संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आज दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी गीतापाठ महायज्ञ आयोजित केला होता. या महायज्ञामध्ये संपूर्ण जगभरातून दहा हजार आठशे साधक प्रत्यक्ष सहभागी झाले होते. या सर्व साधकांनी संपूर्ण श्रीमद् भगवद्गीतेचे १८ अध्याय एक सुरात सलग गायले. या साधकांमध्ये अडीच हजार साधकांचे गीता अध्याय कंठस्थ होते.
यावेळी सर्व साधकांचे स्वागत करताना गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मुकुंद दातार यांनी आज या मैदानावर भक्ती सागर उसळून आलेला आहे असे सांगितले. गीता धर्म मंडळातर्फे हा पहिलाच प्रयत्न असून तो सर्व साधकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपूर्ण यशस्वी झाला आहे असे त्यांनी नमूद केले.
एका ठिकाणी एका वेळेला दहा हजार पेक्षा जास्त साधकांनी गीता पठण करणे हा एक विक्रम असून आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद घेतलेली आहे असे आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या डॉक्टर चित्रा जैन यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते अध्यक्ष प्राचार्य डॉ. मुकुंद दातार, कार्यवाह विनया मेहेंदळे, सहकार्य वाह प्राचार्य मुकुंद कोंढवेकर, शताब्दी महोत्सव संयोजक ह भ प मोरेश्वर बुवा जोशी आणि इतर सर्व पदाधिकारी यांना आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सन्मानचिन्ह देण्यात आले.
या उपक्रमास पुणे पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, उपायुक्त श्री संदीप गिल, डॉ. देगलूरकर, प्रा. मेधा कुलकर्णी, हेमंत रासने, प्रदीप गारटकर, अभय माटे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.
कार्यवाह विनया मेहेंदळे यांनी सर्वांचे आभार मानले.

अथक समर्पण आणि सांघिक कौशल्य हेच यशाचे महत्त्वाचे मुद्दे- सोमजीत सिंग गौर

नवी दिल्ली – ३ डिसेंबर
सांघिक कार्य आणि अथक समर्पण हे कोणत्याही क्षेत्रातील सर्वोच्च यशाचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाचा कर्णधार सोमजीत सिंग गौर याने हे मत व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय अपंग दिनाच्या स्मरणार्थ “प्रोपल्स स्पोर्ट्स” च्या उद्घाटन समारंभात गौर याने या खेळातील अनोख्या आव्हानांना नॅव्हिगेट करण्याच्या महत्त्वपूर्ण प्रश्नावर उत्तर दिले. त्याच्या अंतर्दृष्टीने अडथळ्यांवर मात करण्यासाठी, व्हीलचेअर क्रिकेटला अनुकूलता, सांघिक कार्य आणि अथक समर्पणाच्या क्षेत्रात रूपांतरित करण्यासाठी एक दिशादर्शक कार्यक्रम प्रदान केला.

अनन्य आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी बहुआयामी दृष्टीकोन, जुळवून घेण्याची क्षमता, सांघिक कौशल्य आणि अथक समर्पण आवश्यक आहे यावर गौर याने भर दिला. मुख्य भाषणात त्याने व्हीलचेअर क्रिकेटच्या योजनेला आकार देणार्‍या महत्त्वाच्या धोरणांची रूपरेषा सांगितली. या रणनीतींमध्ये लवचिकता वाढवणे, कौशल्यांचा आदर करणे आणि खेळात बदल घडवून आणणारे नावीन्यपूर्ण गोष्टींचा समावेश होतो.
प्रतिष्ठित इंडियन एव्हिएशन अकादमी येथे आयोजित या समारंभाने नोव्हेंबर २०२४ मध्ये नियोजित आगामी स्पोर्ट्स एक्स्पोची प्रस्तावना म्हणूनही काम केले. “प्रोपल्स स्पोर्ट्स” हा एक महत्त्वाचा कार्यक्रम ठरणार आहे, जो व्हीलचेअरसह विविध सक्षम खेळाडूंच्या समावेशकता आणि पराक्रमावर प्रकाश टाकणारा आहे. क्रिकेट आघाडीवर.
गौर याला”इंडियाज पिनॅकल कॅप्टन आणि रन-स्कोअरर” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही ओळख त्याच्या अपवादात्मक नेतृत्व कौशल्ये आणि क्रिकेटच्या मैदानावरील उल्लेखनीय कामगिरीवर अधोरेखित करते, ज्यामुळे तो महत्त्वाकांक्षी खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.

या कार्यक्रमात क्रीडा उत्साही, अपंगत्वाच्या समावेशाचे वकिल आणि उद्योगातील नेत्यांचे एकत्रीकरण दिसले. गौरचे शब्द केवळ क्रिकेट समुदायासोबतच नव्हे तर उपस्थित असलेल्या सर्वांसोबत गुंजले, त्यांनी खेळाच्या क्षेत्रात सर्वसमावेशकता, चिकाटी आणि नाविन्यपूर्णतेचे महत्त्व अधोरेखित केले.

क्रीडा जगताने नोव्हेंबर २०२४ मध्ये “प्रोपल्स स्पोर्ट्स” एक्स्पोसाठी तयारी केली असताना, गौर याने दिलेला संबोधन व्हीलचेअर क्रिकेटच्या परिवर्तन आणि उत्क्रांतीसाठी, अडथळे दूर करण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रातील अधिक समावेशक आणि गतिमान भविष्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी एक मोठा आवाज म्हणून काम करते.

प्राधिकरण बाधितांना आगामी अधिवेशनात परतावा मिळवून देण्यात आम्हाला यश येईल : आ. महेश लांडगे

0

नागपूर अधिवेशनात तीनही आमदार करणार पाठपुरावा

पिंपरी, पुणे (दि. ३ डिसेंबर २०२३) पिंपरी चिंचवड प्राधिकरणामध्ये ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या आहेत त्या भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे. यासाठी उद्यापासून सुरू होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनात आम्ही तीनही आमदार एकत्रितपणे पाठपुरावा करणार आहोत. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. या भूमिपुत्रांना देण्यासाठी जमीन शिल्लक नसल्यामुळे परतावा म्हणून सव्वा सहा टक्के जमीन आणि उरलेल्या मोबदल्यात एफएसआय वाढवून देण्यासाठी आगामी अधिवेशनात आम्हाला यश येईल असे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले.
निगडी, आकुर्डी, वाल्हेकर वाडी युवा शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी निगडी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आ. लांडगे बोलत होते. यावेळी आमदार अश्विनीताई जगताप, आमदार आण्णा बनसोडे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सुमनताई पवळे, माजी नगरसेवक शंकरराव पांढरकर, कैलास कुटे, श्रीधर वाल्हेकर, नाना वाल्हेकर, तानाजी काळभोर, सोमनाथ काळभोर, सचिन साकोरे, नाना शिवले, राजेंद्र काळभोर आदींसह बाधित शेतकरी उपस्थित होते.
यावेळी आमदार आण्णा बनसोडे म्हणाले की, मूळ शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा मिळाला पाहिजे, यासाठी मागील पंधरा वर्षांपासून माजी आमदार विलास लांडे व स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप आणि मी प्रयत्न केले आहेत. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. हा विषय तेव्हाच निकाली निघणे अपेक्षित होते, आता आगामी नागपूर अधिवेशनात याविषयी अंतिम निर्णय होऊन सर्वांना दिलासा मिळावा. यासाठी आमदार महेश लांडगे, अश्विनीताई जगताप यांच्यासह एकत्रितपणे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कडे पाठपुरावा करून हा प्रश्न निकाली काढू असे आ. बनसोडे म्हणाले.
आमदार अश्विनीताई जगताप म्हणाल्या की, मी स्वतः यासाठी उद्यापासून सुरू होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी आणि औचित्याचा मुद्दा मांडला आहे. लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार आण्णा बनसोडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याविषयी पाठपुरावा केला होता. त्यावेळी सव्वा सहा टक्के परतावा मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. आता आम्ही तीनही आमदार एकत्रितपणे यशस्वी पाठपुरावा करू.

बाधित शेतकऱ्यांच्या वतीने माहिती देताना शंकरराव पांढरकर यांनी सांगितले की, भूमिपुत्रांच्या जमिनीच्या ज्यावेळी प्राधिकरणाने ताब्यात घेतल्या त्यावेळी व अवघा तीन हजार रुपये एकरी दर दिला. या ठिकाणी आता ७५ लाख रुपये प्रति गुंठा दर आहे. साडेबारा टक्के परतावा मिळावा यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांनी आंदोलने केली आहेत. यापूर्वीच्या सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर अनेक बैठका झाल्या आहेत. परंतु निर्णय अध्यापही प्रलंबित आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या नागपूर अधिवेशनात याविषयी अंतिम निर्णय घेऊन भूमिपुत्रांना न्याय द्यावा अशी मागणी सर्व आमदारांनी विधानसभेत करावी अशी मुख्य मागणी सर्व भूमिपुत्रांची आहे.

गिरगावातील आगग्रस्त इमारतीला मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई दि.3- मुंबई महापालिकेचा संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिम पाहणी दौर्‍यातून वेळ काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव परिसरातील धरम पॅलेस या आगग्रस्त इमारतीला भेट दिली. गिरगांव चौपाटी लगतच्या परिसरात असणाऱ्या या इमारतीला दि. 2 डिसेंबर रोजी रात्री आग लागली होती. या आगीवर मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्यात आले होते.

स्वच्छता मोहीम पाहणी दरम्यान मुख्यमंत्र्यांना याची माहिती मिळताच त्यांनी दुर्घटनास्थळी भेट देत बाधित कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी जोशी, डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मोदी हैं तो मुमकिन हैं… माजी खासदार संजय काकडे

पुणे-माजी खासदार संजय काकडे यांनी यांनी विधानसभेतील भाजपच्या विजयानंतर आनंद व्यक्त करत ‘मोदी है तो मुमकिन है ‘ अशी प्रतिक्रिया दिली आहे . ते म्हणाले ,’मोदी हैं तो मुमकिन हैं… हे पुन्हा एकदा आपण पाहतोय, अनुभवतोय. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आज जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाला प्रचंड यश मिळाले आहे. आणि या यशाच्या मागे जो चेहरा आहे, तो म्हणजे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे . देशातील जनता पंतप्रधान मोदी यांच्यावर किती मनापासून प्रेम करते, त्यांचा विश्वास मोदीजींवर किती आहे हे यातून समजते. येणाऱ्या 2024 मध्ये अगदी 5 महिन्यानंतर होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काय असेल हे देखील आजच्या निकालावरून लक्षात येते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मार्गर्शनाखाली भाजपाच्या सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे यश प्रचंड आहे. याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सायन रुग्णालयाला भेट; रुग्णांची विचारपूस अन् दिलासाही..

मुंबई, दि. 3: तुम्हाला रुग्णालयात औषधे मिळतात का..बाहेरून आणावी लागत नाही ना..ट्रीटमेंट कशी सुरू आहे..वेळेवर जेवण मिळते ना..सायन हॉस्पीटलमधील रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधलेला हा संवाद..आज महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ट्रॉमा आयसीयु, सर्वसाधारण वॉर्ड, वॉर्ड क्रमांक चार येथे पाहणी करताना रुग्णांची विचारपूस केली आणि दिलासा दिला. यावेळी त्यांनी अचानक रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहाला भेट देऊन तेथील अन्नपदार्थांची पाहणी केली.

सायन हॉस्पीटलमध्ये 200 खाटांचा अतिदक्षता विभाग आणि एक हजार खाटांचा सर्वसाधारण कक्षाचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल त्यामुळे नव्याने 1200 खाटा उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुंबईच्या सखोल स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला साकाळी सातच्या सुमारास भेट दिली.

सायन रुग्णालयात सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला गती द्यावी. पुढच्या भेटीत कामाची प्रगती आढळली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी याभेटी दरम्यान निर्देश दिले. रुग्णालयात सोयीसुविधा वाढविण्यात येत असून त्या कालमर्यादेत पूर्ण कराव्यात. रूग्णांना वेळेत आरोग्यसेवा मिळण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

रुग्णालयाची पाहणी करून तेथील रुग्णांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच त्यांनी रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना मिळत असलेल्या उपचारांची माहितीही त्यांनी घेतली. रुग्णांची गैरसोय होते का याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले.

सोनोग्राफी आणि डायलेसिस सेवा देण्यासाठी उपकरणांची वाढ करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रीप्शन संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे जेणेकरून औषधांसाठी रुग्णांना बाहेर जावे लागणार नाही. असे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सायन रुग्णालयाचा परिसर पिंजून काढला. प्रत्येक वॉर्डात जाऊन त्यांनी माहिती घेतली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक करतानाच रुग्णाला वेळेवर औषध, जेवण मिळेल यासाठी प्रशासनाला सूचना केल्या. रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहाची पाहणी करताना तेथील साफसफाई आणि अन्नाची गुणवत्ता याबाबतही त्यांनी सूचना केल्या. मुख्यमंत्री पाहणीसाठी आले याचा रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद होता तर एका वॉर्डात तर एका रुग्णाने चक्क मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फीही घेतली.