पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशवासियांचा अढळ विश्वास आहे, यावर या निकालाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. मोदींवर कॅांग्रेसने अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. ही टीका देशवासियांना रुचली नाही, हे या निकालाने सिद्ध झाले आहे. अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ,( पुणे लोकसभा निवडणूक प्रमुख, भाजपा) यांनी व्यक्त केली आहे , ते म्हणाले,’मोदींच्या गरीब कल्याणाच्या आणि विकासाच्या अजेंड्यापुढे कॅांग्रेसचा खोट्या आश्वासनांचा अजेंडा निष्प्रभ ठरला आहे. या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक घटकाचे मनापासून अभिनंदन. देशातील मतदारांचा हा ट्रेंड पुणे लोकसभेतही कायम असेल. आम्ही सर्व कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी उत्सुक आणि सज्ज आहोत’
मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास -• चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
•’इंडि’ला मात देत ‘भारत’ जिंकला
•तीन राज्यात भाजपाच्या विजयानंतर महाराष्ट्रातही जल्लोष
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या लोकप्रियतेमुळे भाजपाच्या ऐतिहासिक व अभूतपूर्व विजयाची पताका डौलाने फडकू लागली. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेच्या अढळ विश्वासासह स्त्री शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे या चार अमृतस्तंभाचा होणारा शाश्वत विकास म्हणजे आजचा विजय आहे, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ राज्याच्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला. या विजयाचा नागपूर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. माध्यमांशी बोलताना श्री बावनकुळे म्हणाले, गृहमंत्री अमित शाह यांच्या कुशल रणनीतीचा, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या संघटन कौशल्याचा तसेच त्या त्या राज्यातील नेतृत्वाचा हा विजय आहे. या अद्भुत विजयात योगदान देणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. कारण, ‘इंडि’ला मात देत ‘भारत’ जिंकला आहे.
ते म्हणाले की, संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे, आत्मनिर्भर व जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. मागील साडेनऊ वर्षांत देशासाठी अनेक निर्णय घेतले त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. महिला सक्षमीकरणाच्या ज्या योजना राबविल्या. गरीब जनतेसाठी अन्न सुरक्षा योजना राबविली. जसा तिन्ही राज्यात भाजपाचा विजय झाला तसाच महाराष्ट्रातही भाजपाचा विजय होणार आहे. महाराष्ट्रात महायुतीचे ४५ प्लस खासदार, २२५ प्लस आमदार निवडून येतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. देशात ३५० प्लस एनडीएचे खासदार निवडून येतील.
• मोदींच्या कामावर जनतेचा विश्वास
मोदीजींवर कॉंग्रेसने टीका केली होती, आता जनतेने कोण पनौती आहे हे दाखवून दिले आहे. कॉंग्रेसने मागील ६५ वर्षे अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार आणि गरीब कल्याणाचे काम केले नाही. मोदींनी केलेल्या कामाचा हा विश्वास आहे. त्यांच्या स्वच्छ सरकारला मतदान केले आहे. सुवर्णकाळातील भारत निर्माण करण्याची क्षमता मोदींमध्येच आहे, हे प्रत्येक मतदाराला माहिती आहे. देशातील महिला मतदार मोदीजींच्या मागे उभे आहेत. मोदींवर टीका करणे जनतेला आवडत नाही हे या निकालावरून स्पष्ट होते.
नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
पुणे-विश्वगुरू नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार च्या विकासपर्वाचा हा विजय आहे. सबका साथ, सबका विकास,सबका विश्वास आणि सबका प्रयास या घोषनेनुसार काम करत राष्ट्राला प्रगती पथावर नेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याचा हा विजय असल्याचे भाजपा चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर म्हणाले.
खर्डेकर पुढे म्हणाले,’या विजयात भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान असून ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रानी सर्वांच्या साथीने रावणाची लंका उध्वस्त केली, रावणाचा अहंकार नेस्तनाबूत केला त्याच पद्धतीने देशातली जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून भारताच्या प्रगतीच्या आड येणाऱ्यांना धूळ चारत आहे.
हा विजय 2024 च्या लोकसभा निवडणुकीची नांदी असून पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्ष 400 चा आकडा पार करतील असा विश्वास देखील संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला आहे. सोशल मीडिया वर कार्यरत मोदी विरोधकांना ही चपराक असून विरोधकांनी मोदी द्वेषातून केलेल्या गलिच्छ पोस्ट आता तरी डिलीट करावेत आणि मोदी द्वेष सोडून द्यावा असे आवाहन ही त्यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नांतील “जगाचे नेतृत्व” करू पाहणाऱ्या शक्तिशाली भारताच्या निर्मितीच्या आड आता कोणी येऊ नये आणि जनादेशाचा स्वीकार करून रोज उठून गरळ ओकणे बंद करावे असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले आहे.
तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी-धीरज घाटे
पुणे–भारतीय जनता पार्टी ने मध्यप्रदेश , राजस्थान, तसेच (Pune)छत्तीसगड मध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्या नंतर भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी बोलताना घाटे म्हणाले ,’ पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वावर जगाने शिक्कामोर्तब केले आहे . केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकार हे जनतेचे सरकार आहे तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी आहे’.यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात (Pune)जल्लोष केला. यावेळी घाटे यांच्यासह पुणे भा ज पा प्रभारी माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सचिव वर्षा डहाळे,युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी ,वर्षा तापकीर, रवींद्र साळेगावकर,राहुल भंडारे उपाध्यक्ष प्रमोद कोंढरे प्रिया शेंडगे , गायत्री खडके राजेंद्र काकडे गणेश बगाडे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजस्थानात भाजपला 2/3 बहुमत
राजस्थानमध्ये पुन्हा एकदा दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड कायम आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, भाजप 114 जागांवर आणि काँग्रेस 70 जागांवर पुढे आहे, तर इतर उमेदवार 15 जागांवर पुढे आहेत. भाजपने 30, काँग्रेसने 19 आणि इतरांनी 3 जागा जिंकल्या आहेत.दरम्यान, काँग्रेसने आपला पराभव मान्य केला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज संध्याकाळी राजभवनात जाऊन राजीनामा देणार आहेत. विधानसभा अध्यक्ष डॉ.सी.पी.जोशी यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे परसादीलाल मीना, प्रताप सिंह खाचरियासह काँग्रेसच्या 25 पैकी 17 मंत्र्यांना पराभव पत्करावा लागला आहे. शांती धारिवाल विजयी झाले आहेत.
विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड आणि विरोधी पक्ष उपनेते सतीश पुनिया यांचाही पराभव झाला आहे. भाजपने निवडणूक लढविलेल्या 7 खासदारांपैकी 4 आघाडीवर आहेत आणि 3 मागे आहेत आणि दोन्ही खासदार तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यावेळी जनतेने पुन्हा सरकार बदलले, पण विधानसभेच्या अध्यक्षांसह विरोधी पक्षनेते आणि उपनेते हे दोघेही पराभूत झाले हाही योगायोग आहे.
निवडणूक निकालांवर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे म्हणाल्या की, राजस्थानचा शानदार विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या गॅरंटीचा विजय आहे. येथे मतमोजणीच्या वेळी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये काही वादही झाले. बेहरोरचे आमदार आणि अपक्ष उमेदवार बलजीत यादव यांना मारहाण करण्यात आली. मोजणी करून ते बाहेर आले तेव्हा लोकांनी त्यांना घेरले आणि मारहाण केली.राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या 199 जागांसाठी मतदान झाले होते. श्रीकरणपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गुरमीत कुन्नर यांच्या निधनामुळे तेथे निवडणूक झालेली नाही.
निवडणूक काळात विरोधकांवर धाडी टाकल्या, प्रचाराला खीळ बसवली, मोदी-शाहांसोबत तपास यंत्रणांचं देखील अभिनंदन : संजय राऊत
मुंबई : मागील सहा महिन्यांपूर्वी हिमाचल आणि कर्नाटक जिंकल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास सातव्या आस्मानावर होता. त्यामुळे छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आपण सत्ता राखू आणि म. प्रदेशमध्ये भाजपकडून सत्ता हिसकावून घेऊ, असा होरा काँग्रेसचा होता. मात्र चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर समोर आलेल्या गणितांनुसार तेलंगणा वगळता काँग्रेसच्या अपेक्षेप्रमाणे काहीही झालेलं नाहीये. भाजपने मध्य प्रदेशची सत्ता राखताना राजस्थान आणि छत्तीसगडची सत्ता काँग्रेसच्या हातून हिसकावून घेण्यात यश मिळवलंय. त्यामुळे लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या ४ राज्यांच्या निवडणुकीत ३ राज्ये जिंकून भाजपने दणदणीत यश मिळवलंय. भाजपच्या विजयानंतर त्यांचं अभिनंदन करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तिरकस शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीये.”मोदी शाह यांचं अभिनंदन करताना तपास यंत्रणांचं देखील अभिनंदन करायला पाहिजे. कारण विरोधकांच्या प्रचाराला खीळ बसविण्यासाठी तपास यंत्रणांनी इमाने इतबारे धाडी टाकल्या. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी गेली २ महिने अनेक राज्यांत घालवले. त्याचवेळी मतदान सुरू असताना देखील तपास यंत्रणा विरोधकांवर धाडी टाकत होत्या. त्यामुळे मोदी शाह यांच्याबरोबर तपास यंत्रणा देखील अभिनंदनास पात्र आहेत”, अशी टोलेबाजी संजय राऊत यांनी केली.”मध्य प्रदेशात जुन्या साथीदारांना काँग्रेसने सोबत घेतलं नाही. म. प्रदेशात काँग्रेसने इंडिया आघाडीतून निवडणूक लढवायला पाहिजे होती. जर इंडिया आघाडीतून निवडणूक लढली असती तर तिकडे चित्र नक्की वेगळं असतं, असं सांगतानाच तीन राज्यांच्या पराभवानंतर काँग्रेसला नव्याने विचार विचार करावा लागेल”, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.त्याचवेळी शिवराजसिंह चौहान यांनी निवडणूक उत्तमरित्या हाताळली. मोदी-शाह यांचे दौरे आणि चौहान यांच्या सभांनी भाजपने युद्धाप्रमाणे निवडणुका लढवली, हेच भाजपच्या विजयाचं तंत्र आहे. आम्ही लोकशाही मानणारे आहोत. हा खरोखर जनतेचा कौल असेल तर आम्ही तो मान्य करतो, असा टोला राऊतांनी लगावला.
संविधान दिनी ‘सूर्यदत्त’मध्ये भारतीय लोकशाही मूल्यांचा जागर-प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त विधी महाविद्यालयात अमृतमहोत्सवी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. संविधानाने सर्वसामान्य भारतीयांना दिलेले अधिकार व त्यांची कर्तव्ये याचे शिक्षण देण्याचे हे एक व्यासपीठ असते. हाच विचार घेऊन सूर्यदत्त विधी महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या संविधान दिन कार्यक्रमात ‘सूर्यदत्त’मधील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पाठ्यक्रमाला अवांतर उपक्रमांची जोड देण्यावर अधिक भर असलेले प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “भारतीय संविधान हे नागरिकांसाठी दीपस्तंभासारखे आहे. जे त्यांना त्यांच्या मार्गाचे मार्गदर्शन करतात आणि त्यांना त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देतात. संविधान आणि त्यातील मूलभूत मूल्यांचा आदर करणे ही आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे.”
सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राध्यापक केतकी बापट यांनी स्वागत-प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विधी महाविद्यालयासह सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज, सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्च, सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थी व शिक्षकांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. तसेच संवैधानिक मूल्ये जपण्याचा आणि त्यांचे पालन करण्याचा संकल्प केला.
सूर्यदत्त विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, लेखक प्रा. डॉ. मिथिलेश विश्वकर्मा यांचे मुख्य भाषण झाले. डॉ. विश्वकर्मा जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटीच्या सीडलिंग स्कुल ऑफ लॉ अँड गव्हर्नन्सचे विभागप्रमुख व उपसंचालक होते. आजवर त्यांनी अनेक विधी चर्चासत्रे, परिषद, परिसंवादाचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांना वीसपेक्षा अधिक वर्षांचा शिकवण्याचा व प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. जगातील सर्वात प्रदीर्घ लिखित संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेवर विश्वकर्मा यांनी प्रकाश टाकला. संविधानात सुशासनाच्या तरतुदी सविस्तरपणे नमूद करत सुशासनासाठी त्या किती गरजेच्या आहेत, याविषयी त्यांनी सांगितले.
विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनानंतर सूर्यदत्त विधी महाविद्यालयातील दृष्या नेडुंगडी व शांभवी श्रीवास्तव यांनी प्रशमंजुषा स्पर्धा घेतली. त्यात उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘भारतीय संविधान : अपेक्षा व वास्तव’ या विषयावर ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. ११ वी कॉमर्समधील सुमन चेतन परिहार हिने प्रथम, तर दीपादेवी प्रजापती हिने द्वितीय क्रमांक मिळवला. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या प्राचार्य डॉ. सिमी रेठरेकर, अॅनिमेशन विभागाच्या प्रा. तेजल निकम यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “दरवर्षी २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करण्यात येतो. याच दिवशी भारताने संविधान स्वीकारले. हा आनंदाचा प्रसंग भारताच्या लोकशाहीचा कणा बनलेल्या दस्तऐवजाचा मसुदा तयार करण्यासाठी संविधान सभेच्या समर्पित प्रयत्नांचे शिखर सूचित करतो. संविधान दिन भारताच्या लोकशाही प्रजासत्ताक प्रवासाचा पाया रचणाऱ्या निर्मात्यांना आदरांजली वाहतो आणि कायद्याच्या वर काहीही नाही याची आठवण करून देतो. संविधानात अंतर्भूत असलेली मूलभूत मूल्ये कायम राखण्यासाठी, विविधतेत एकतेची भावना जोपासण्यासाठी आणि सर्व नागरिकांसाठी न्याय आणि समानता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्धतेची पुष्टी करण्याची ही संधी वर्षातून एकदा येते.”
ग्रीष्म सुराणा आणि आख्या उपमन्यु यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचा समारोप करताना प्रा. डॉ. मोनिका सेहरावत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
जानेवारीत सोने ६७ हजारांचा टप्पा ओलांडेल, इंडिया बुलियन असाेसिएशनचे संचालक विजय लष्करे यांचा अंदाज
शनिवारी सोने-चांदीला पुन्हा झळाळी आली. सराफा बाजारात प्रतितोळ्यामागे सोन्याच्या भावात ६०४ रुपयांची वाढ होत भाव उच्चांकी ६५,७०० (जीएसटीसह) रुपयांवर पोहोचले. येत्या जानेवारीत सोने ६७ हजारांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज इंडिया बुलियन असाेसिएशनचे संचालक विजय लष्करे यांनी व्यक्त केला आहे. चांदीच्या भावातही ५५१५ रुपयांची वाढ होऊन ७९,८२५ वर पाेहाेचली.असे असले तरी यंदाच्या वर्षात म्युच्युअल फंडात सरासरी २० टक्के परतावा मिळाला. अमेरिकेने तिमाहीतील बेरोजगारीचा डेटा प्रसिद्ध केला. त्यानंतर गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीतून पैसा काढून घेतला. शिवाय सोन्यात नैसर्गिक वाढ झाल्यामुळे जागतिक बाजारात सोने-चांदीचे दर ऑल टाइम उच्चांकावर पोहोचले आहेत. युक्रेन आणि रशिया युद्धानंतर सहा हजार रुपयांची तेजी पकडलेल्या सोन्याच्या भावात तेजी कायम होती. दिवाळीत साेने ६४ हजारांचा टप्पा ओलांडणार असा अंदाज जाणकारांनी आधीच व्यक्त केला होता. ती दरवाढ आधीच होत असून जानेवारीत सोन्याचे भाव ६७ हजारांपार जातील, असेही संकेत मिळत असल्याचे जाणकारांनी सांगितले.
शनिवारचे भाव
- सोने : ६५,७००
- चांदी : ७९,८२५
- दाेन्ही दर जीएसटीसह
राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास ४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ
मुंबई,: राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध पदांच्या तब्बल ७१७ रिक्त जागांच्या मेगाभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता सोमवार, ४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज सादर करता येणार आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज याबाबत विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांना मुदतवाढ करण्याबाबत आदेश दिले.
उत्पादन शुल्क विभागातील लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान नि वाहनचालक आणि चपराशी या पदांच्या एकूण ७१७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या भरती प्रक्रियेस मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाची मंजुरी मिळाली होती. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया १७ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाली होती. यात १ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.
मात्र, हे अर्ज करताना अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करता आले नाहीत. तसेच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिटीने विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना काही दिवस इंटरनेट सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना या भरतीसाठी अर्ज करता आले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या मागणीचा मंत्री शंभूराज देसाई यांनी संवेदनशीलतेने विचार करून विभागास तात्काळ मुदतवाढ देण्याचे आदेश दिले. याबाबत विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांना त्यांनी निर्देश दिल्यानंतर विभागाकडून सोमवार, ४ डिसेंबर २०२३ च्या रात्री ११:५५ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच ज्या उमेदवारांनी दि. ३० मे, २०२३ रोजीच्या जाहिरातीस अनुसरून दि. ३० मे, २०२३ ते ०९ जून, २०२३ या कालावधीत अर्ज भरून परीक्षा शुल्क अदा केले आहे, त्यांनाच त्यांच्या अर्जात दि. ०६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ पासून ते दि. ०८ डिसेंबर २०२३ च्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीत बदल करता येणार आहेत.
याबाबत मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना अर्ज सादर करताना अडचणी आल्या. मात्र, एकही इच्छुक विद्यार्थी भरती प्रक्रियेपासून वंचित राहू नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच आता ४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यादृष्टीने संबंधितांना सूचना दिल्या आहेत. तसेच ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यास आम्ही कटिबद्ध असून आता मुदतवाढीचा लाभ घेऊन सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहनही मंत्री शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने केले आहे.
00000
पिंपरी चिंचवड शहराच्या अर्थकारणाला शरद पवारांमुळे चालना: कार्यकर्ता मेळाव्यात अमोल कोल्हेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
जनता लयं अवघड; विचार करून मतदान करते – जयंत पाटील
पुणे : राष्ट्रवादी पक्षातून गेलेल्यांची चिंता करण्यापेक्षा सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे योग्य संघटन करून पुन्हा नव्या जोमाने काम करत पक्षाची मजबूत बांधणी करायची आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरांमध्ये ज्या सुधारणा झाल्या त्यामध्ये शरद पवारांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील जनता लय अवघड आहे; लोक विचार करून मतदान करतात. येत्या निवडणुकीत जनता महायुतीला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असे परखड मत राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते शनिवारी (२ डिसेंबर) करण्यात आले. तसेच यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी माजी आमदार आणि राष्ट्रीय सचिव पदी नियुक्त झालेले ॲड. जयदेव गायकवाड, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर सुमनताई पवळे, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत – धर, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, मीना नानेकर, शकुंतला भाट, स्मिता कुलकर्णी, मधुकर चिंचवडे, प्रदेश युवक अध्यक्ष महेबूब शेख, ज्येष्ठ नेते श्याम वाल्हेकर, प्रकाश म्हस्के, निहाल पानसरे, ज्योती निंबाळकर, इम्रान शेख, ज्येष्ठ नेते देवेंद्र तायडे, शिरीष जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
छत्रपती शाहू, फुले, आंबेडकरांचे समाजकारण म्हणजे बहुजन समाजाला प्रगतीकडे घेऊन जाणे आणि हेच कार्य राजकीय सामाजिक भावनेतून शरद पवार करत आहेत. जे सोडून गेले त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. परंतु जनतेबरोबर राहिले तर सत्ता सत्ता येते. शरद पवारांनी दहा वेळा अशी किमया करून दाखवलेली आहे. राज्याची विस्कटलेली घडी पवार साहेबच पुर्ववत करू शकतात, असा विश्वास जनतेला आहे. म्हणूनच जनता शरद पवारांच्या मागे ठामपणे उभी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लवकरच निवडणुका होत असून नवा डाव सुरू होत आहे. कारण पूर्वीच्यांची मुदत आता संपलेली आहे. येत्या काळात महापालिका तसेच राज्यात राष्ट्रवादीची पर्यायाने महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, रस्ते मोठे केले म्हणजे विकास होत नाही. विविध कंपन्या, माहिती तंत्रज्ञाननगरी आणत शहराच्या अर्थकारणाला शरद पवार यांनी चालना दिली. सत्ताधाऱ्यांनो नदी सुधार प्रकल्पाचे काय झाले. इंद्रायणीमाईवर फेसाचा तवंग येत आहे, असे प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केले. वारकऱ्यांना कशाला नमन करायचे. भौतिक सुखाची नाही तर आपल्याला तत्वांची लढाई लढाईची आहे, असे खा. डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
स्वागत प्रास्ताविक करताना तुषार कामठे म्हणाले की,पिंपरीत नवीन सुरू झालेल्या पक्ष कार्यालय मध्ये ई सुविधा केंद्रद्वारे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मदत केली जाईल. येथे महिला व युवतींसाठी स्वतंत्र कक्ष असून याद्यावत कार्यालयात भविष्यात नागरिकांना कोणते कामानिमित्त हेलपाटे मारावे लागणार नाहीत. शहराचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे आज पवार साहेबांबरोबर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असा विश्वास तुषार कामठे यांनी व्यक्त केला.
आभार सुलक्षणा शीलवंत – धर यांनी मानले. यावेळी ॲड. जयदेव गायकवाड, प्रशांत जगताप, महेबुब शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
ओपन स्पेस पॉलिसी बाबत पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतले महत्वाचे निर्णय
१. पुढील ३० दिवसांमध्ये ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी बाबत निर्णय घ्यावा
२. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील उद्यानांची देखभाल महानगरपालिकेने करावी.
३. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील मैदानाच्या विकासासाठी आणि देखभालीसाठी ‘PPP’ मॉडेल चा वापर व्हावा
४. खाजगी तत्वावर दत्तक दिल्या गेलेल्या २६ उद्यानांसाठी वेगळा निर्णय घेण्यात यावा
मुंबई, : मुंबई महापालिकेतर्फे सप्टेंबर महिन्यात ‘ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी’चा मसुदा प्रसारित करण्यात आला होता. या धोरणा अंतर्गत महानगरपालिकेची मालकी असलेल्या जागा, देखभाल करण्यासाठी खाजगी तत्वावर दत्तक देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाबाबत पुन्हा एकदा नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याद्वारे शुक्रवार दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात बैठकीचे आयोजन केले. धोरणात्मक चर्चेसाठी नागरिक, प्रशासन आणि सरकार यांना एकत्र आणून एकमताने जनहिताचा योग्य निर्णय घेता यावा हा या बैठकीचा उद्देश होता.
या बैठकीच्या माध्यमातून खालील प्रमाणे निर्देश पालकमंत्र्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले
१. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील उद्यानांची देखभाल महानगरपालिकेने करावी आणि ती व्यवस्थित सुरु आहे किंवा नाही याचे निरीक्षण करण्यासाठी एक समिती नेमावी. या समिती मध्ये नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचा समावेश असावा.
२. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील मैदानाच्या विकासासाठी आणि देखभालीसाठी ‘PPP’ मॉडेल चा वापर व्हावा. या मध्ये सरकार, PSU तसेच क्रीडा प्राधिकरण अथवा संस्थांचे सहकार्य घ्यावे. जेणेकरून उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देता येतील.
३. या आधी महानगरपालिकेतर्फे देखभाल करण्यासाठी खाजगी तत्वावर दत्तक दिल्या गेलेल्या २६ उद्यानांसाठी वेगळा निर्णय घेण्यात यावा.
मुंबई शहरात आणि उपनगरात क्रीडा सुविधा, उद्याने आणि मैदाने यांची कमतरता असल्याने ती लवकरात लवकर उपलब्ध करून देणे हि महानगरपालिकेची जबादारी आहे त्यामुळे पुढील ३० दिवसांमध्ये ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी बाबत निर्णय घ्यावा असे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी बैठकी दरम्यान दिले. महानगपालिकेत जनप्रतिनिधी नसल्याने या धोरणासंदर्भात निर्णय घेताना नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह चर्च करावी असेही पालकमंत्री लोढा यांनी सांगितले.
4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारने राजकीय पक्षांच्या नेत्यांची घेतली बैठक
नवी दिल्ली- संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकार आणि सर्व पक्षाच्या सभागृह नेत्यांची बैठक झाली. 4 डिसेंबरपासून हे अधिवेशन सुरू होईल, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. या अधिवेशनचा समारोप 22 डिसेंबरला शुक्रवारी होईल. त्यात 19 दिवसांत कामकाजाच्या 15 बैठका होतील, अशी माहिती त्यांनी दिली. त्यात भारतीय नाट्य संहिता, मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती, कार्यकाल), केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (दुसरी सुधारणा) या तीन विधेयकांसह एकूण 21 विधेयके आणली जाणार असून त्यातील दोन वित्त विधेयक आहेत.

संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांनी कार्यपद्धतीच्या नियमांतर्गत परवानगी दिलेल्या कोणत्याही मुद्द्यावर सभागृहात चर्चा करण्यास सरकार नेहमीच तयार असते, असे जोशी यांनी सांगितले. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी सहकार्य करावे आणि पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मांडलेले मुद्दे ऐकून घेतल्यानंतर बैठकीत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी उपस्थित नेत्यांचे आभार मानले आणि या सर्व मुद्द्यांवर संसदेच्या संबंधित सभागृहांच्या नियमांनुसार आणि संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांच्या परवानगीने चर्चेसाठी सरकार तयार असल्याचे सांगितले. या बैठकीला तेवीस राजकीय पक्षांचे एकूण तीस नेते उपस्थित होते.
शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी लोकसभेच्या १५ जागा लढविणार- जयंत पाटील म्हणले ,इच्छुकांनी तयारीला लागावे
पुणे- महाविकास आघाडीच्या तर्फे लोकसभा निवडणूक लढविताना शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी लोकसभेच्या १५ जागा लढविणार असून इच्छुकांनी तयारीला लागावे असे आवाहन प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. तसेच यावेळी अजित पवार गटाशी दोन हात करण्याची तयारी असल्याचे संकेत दिले.आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. काही जागांवर तिढा असला तरी तो सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न आहे. त्यातच उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी बारामती, शिरूर, रायगड, सातारा या लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जयंत पाटील त्यासंदर्भाने बोलताना म्हणाले, ‘‘आगामी लोकसभा निवडणूक एप्रिल मे महिन्यात होणार आहे. १४ ते १५ जागा आपण लढविणार आहोत. त्यामध्ये अमरावती, भंडारा, बारामती, सातारा, शिरूर, रायगड, रावेर, दिंडोरी समावेश आहे. काही मतदारसंघात आपण उमेदवार बदलणार आहोत.’’अजित पवार यांचा पक्ष वेगळा झालेला आहे, त्यांना काही जागा लढवाव्या लागतील. काही मतदारसंघात लढवतील ते. पण ते खरंच लढवणार की लढवल्यासारखं दाखवणार हे बघायचं आहे, असा टोला पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी अजित पवार यांना मारला..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘‘एकनाथ यांना रात्रीची व्यवस्थित झोप लागू दे. तुम्ही नका त्यांना त्रास देऊ. ते बिचारे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. पण प्रशासन देखील त्यांचं ऐकत नाही. ते पदावरून कधीही जाऊ शकतात, त्यामुळे राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकारी त्यांच ऐकायच्या मनःस्थितीत नाहीत.
बबनराव लोणीकरांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक
जालना – माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर सायंकाळी बबनराव लोणीकर आणि त्यांच्या भावाच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.राजेश टोपे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर टोपे यांनी बबनराव लोणीकर यांच्यावर आरोप केले होते. लोणीकरांच्या काही कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड करणं निषेधार्ह असल्याचं ते म्हणाले होते. त्याला लोणीकर यांनीही उत्तर दिलं होतं.लोणीकर म्हणाले होते की, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीसाठी राजेश टोपेंसोबत माझ्या बंगल्यावर बैठक झाली होती. परतूर-मंठा या दोन तालुक्यात भाजपचा व्हाईस चेअरमन द्यायचा हे ठरलेलं असताना त्यांनी ऐनवेळी पलटी मारली. काही कार्यकर्त्यांनी त्यांना या विश्वासघाताबाबत जाब विचारला तेव्हा त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप लोणीकरांनी केला होता.त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान, बबनराव लोणीकर आणि त्यांच्या भावाच्या घरावर काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे. जालन्यामध्ये आता भाजप-राष्ट्रवादीचा वाद शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय. दगडफेक करणारे नेमके कोण होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये.
वाहतूक व बांधकाम क्षेत्र प्रदूषणास जास्त कारणीभूत !
भारतातील अनेक प्रमुख शहरांतील हवेच्या प्रदूषणाची पातळी ही धोकादायक स्थितीत आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई, पुणे या सर्व शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. एकाच वेळी ध्वनी, पाणी व हवेचे प्रदूषण यांच्याशी प्रत्येकाला सामना करावा लागत आहे. देशातील प्रवासी व मालवाहतूक व बांधकाम क्षेत्र यांचा प्रदूषणात भर घालण्यात मोठा वाटा आहे. या महत्त्वाच्या समस्यांवर शास्रीय दृष्टीकोनातून उपाययोजना करण्याची गरज आहे.
चालू वर्षांमध्ये देशातील अनेक शहरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा निर्देशांक लक्षणीयरीत्या घसरलेला असून अनेक ठिकाणी त्याने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे.राजधानी दिल्ली व पुण्यासारख्या शहरांमध्ये तर हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे विमानांची उड्डाणे रद्द करावी लागल्याची उदाहरणे आहेत. अन्य प्रमुख शहरांची स्थिती यापेक्षा फार काही वेगळी नाही.याबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये विविध कारणांमुळे हवेच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. प्रदूषणामध्ये भर घालण्याच्या विविध कारणांपैकी सर्वात दोन महत्त्वाची कारणे आहेत वाहतूक व बांधकाम क्षेत्र.
सध्या भारतातील रस्त्यांवर 70 लाख पेक्षा जास्त ट्रक धावत असतात.त्यामध्ये प्रतिवर्षी नऊ ते दहा लाख नव्या ट्रकची भर पडत असते. भारतात दरवर्षी दोन ट्रिलियन टन किलोमीटर वजनाची मालवाहतूक रस्त्यांवरून केली जाते.त्यासाठी आपण आयात करीत असलेल्या इंधनांपैकी जवळजवळ एक चतुर्थांश डिझेल या ट्रक साठी वापरले जाते एवढेच नाही तर वाहतुकीमुळे हवेमध्ये कार्बन चा धूर सोडण्याचे सर्वात प्रमुख कारण ही ट्रक वाहतूक असून त्यामुळे 90 टक्के कार्बन प्रदूषण ट्रकमुळे होते असे लक्षात आले आहे.भारतातील व्यापार वृद्धीमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता देशभरात सर्वत्र ट्रक मधून होणारी मालवाहतूक सातत्याने वाढत असल्याने एकूण हवेच्या प्रदूषणामध्ये त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे.आपल्याकडे विजेवर धावणाऱ्या रेल्वेच्या माध्यमातून मालवाहतूक केली जाते. परंतु त्याचा एकूण वाटा केवळ 20 टक्क्यांच्या घरात आहे. भारतात गेल्या काही वर्षात विजेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती केली जात आहे ही त्या दृष्टिकोनातून समाधानाची बाब असली तरी त्याचे प्रमाण एकूण वाहनांच्या तुलनेत केवळ पाच ते सहा टक्के आहे. विजेवर चालणारे ट्रक आज तरी देशात जवळजवळ नाहीत. त्यामुळे या डिझेलवर चालणाऱ्या ट्रकच्या ताफ्यांना पर्याय हे आपल्यापुढे मोठे आव्हान आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे विजेवर चालणाऱ्या ट्रक साठी लागणाऱ्या बॅटऱ्यांची किंमत किंवा खर्च आणि या बॅटऱ्या सातत्याने चार्ज करण्यासाठी लागणारी चार्जिंग स्टेशन्स या त्यातील महत्त्वांच्या अडचणी व आव्हाने आहेत. तसेच विजेवर चालणाऱ्या ट्रक साठी जी वीज वापरली जाते त्याची निर्मिती ही कोळसा वापरून केली जाते. त्यामुळेही प्रदूषणात भर पड़ते. ज्याला हरित वीज म्हणतो अशा प्रकारची वीजनिर्मिती देशात कमी प्रमाणात होते. तरीही मालवाहतूक व प्रवासी वाहतूक यासाठी लागणाऱ्या मोठ्या बसेस आणि ट्रक्स यांची लक्षणीय वाढ लक्षात घेता विजेवर चालणाऱ्या बसेस व ट्रक हा प्रदूषण कमी करण्यावर किंवा नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाचा मार्ग ठरेल असे वाटते. त्यामुळे वाहनांच्या धुरापोटी निर्माण होते होणारे कार्बन उत्सर्जन आणि धुळीचे हवेतील प्रमाण हे कमी करण्यासाठी तातडीने राष्ट्रीय पातळीवरील उपाययोजना करण्याची निश्चित गरज आहे.
दरवर्षी किमान सात ते आठ हजार विजेवर चालणाऱ्या ट्रकची गरज आहे. जर प्रत्यक्षात हे ट्रक हे विजेवर चालणारे ट्रक रस्त्यावर आले तर त्यामुळे आठशे बिलियन डिझेलची बचत होणार आहे. सध्या देशात दरवर्षी डिझेलवर चालणाऱ्या ट्रकचे वाढते प्रमाण लक्षात घेतले तर 2050 पर्यंत 1.7 कोटी ट्रक भारतीय रस्त्यांवर धावत असतील अशी शक्यता आहे.हा आकडा खरोखरच देशाची चिंता वाढवणारा असून त्या ऐवजी विजेवर चालणारे ट्रक तयार करणे आणि डिझेलवर चालणारे ट्रक लवकरात लवकर बाद करणे हा त्यावर पर्याय आहे.परंतु देशाच्या विविध शहरी व ग्रामीण भागांमध्ये धावणारे डिझेल वरील ट्रक भंगारात काढणे किंवा त्याला पर्यायी वाहतूक यंत्रणा निर्माण करणे हे सहज सोपे नाही. देशातील मालवाहतुकीसाठी सर्वत्र ट्रकचा वापर केला जातो व त्याच्यामध्ये खाजगी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आहे. या वाहतूक व्यवसायाला केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून मदत करण्याची आवश्यकता आहे.अर्थात त्यासाठी खाजगी उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक ही वाढण्याची गरज आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आज रस्त्यावर येणाऱ्या डिझेल ट्रकची किंमत 40 ते 45 लाख रुपयांच्या घरात आहे.मात्र त्या तुलनेत विजेवर चालणाऱ्या एका ट्रकची किंमत ही जवळजवळ 1.50 कोटीच्या घरात जाते.त्यामुळे डिझेल ट्रकचा वापर कमी करणे आणि त्या ऐवजी विजेवर चालणारे ट्रक देशभरात वापरणे हा जरी उपाय असला तरी त्यातील मोठी गुंतवणूक हा गंभीर प्रश्न असून तीच प्रमुख समस्या आहे.
देशातील विविध महानगरांमधील सुरू असलेली मोठ्या प्रमाणावरील बांधकामे सुद्धा हवेच्या प्रदूषणास प्रदूषणात भर घालणारी ठरत आहेत. बांधकामासाठी वापरली जाणारी खडी आणि सिमेंट यामुळे हवेमध्ये धुळीचे कण मोठ्या प्रमाणावर साचले जातात व त्याचाही प्रतिकूल परिणाम शुद्ध हवेवर मोठ्या प्रमाणावर होतो.महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या एका पाहणीनुसार मुंबईतील हवेच्या प्रदूषणाला तेथील बांधकाम क्षेत्र कारणीभूत ठरत असून त्याचा 70 टक्क्याच्या घरात आहे. बंगलोर चेन्नई व पुणे तसेच दिल्ली या सर्व शहरांमध्ये सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील बांधकामापोटी हवेचे प्रदूषण वाढत आहे.देशातील शहरीकरण अत्यंत वेगाने वाढत असून निवासी घरांची व पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या व्यापारी संकुलांची निर्मिती सातत्याने वाढत आहे.याचाच परिणाम होऊन धुळीमुळे होणारे हवेचे प्रदूषण कारणीभूत ठरत आहे. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीमुळे हवेतील प्रदूषण वाढत असल्याचे आढळलेले आहे. या धुलीकणांमुळे आबाल वृद्धांपासून गर्भवती असलेल्या महिला, या सर्वांनाच श्वसनाच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. देशाच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये ही मोठी समस्या असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनीही वारंवार सरकारच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. पुणे शहराबरोबरच अनेक शहरांमध्ये मध्येही वाढत्या बांधकामामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. अहोरात्र सुरू असलेल्या बांधकामामुळे ध्वनी व हवेचे प्रदूषण वाढत आहे.
एकंदरीत देशातील विविध महानगरांमध्ये अक्राळ विक्राळ पद्धतीने वाढत असलेला बांधकाम व्यवसाय, वेगाने वाढणारे शहरीकरण,व्यापार वृद्धीमुळे वाढत असलेली माल वाहतूक या दोन महत्त्वाच्या गोष्टींचा राष्ट्रीय पातळीवर विचार करून त्यावर त्वरित योग्य मार्ग काढण्याच्या शास्त्रीय, व्यावहारिक दृष्टिकोनातून पावले उचलणे आवश्यक आहे.
लेखक -प्रा. नंदकुमार काकिर्डे
(लेखक पुणेस्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार आहेत)*
