जालना – माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर सायंकाळी बबनराव लोणीकर आणि त्यांच्या भावाच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.राजेश टोपे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर टोपे यांनी बबनराव लोणीकर यांच्यावर आरोप केले होते. लोणीकरांच्या काही कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड करणं निषेधार्ह असल्याचं ते म्हणाले होते. त्याला लोणीकर यांनीही उत्तर दिलं होतं.लोणीकर म्हणाले होते की, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीसाठी राजेश टोपेंसोबत माझ्या बंगल्यावर बैठक झाली होती. परतूर-मंठा या दोन तालुक्यात भाजपचा व्हाईस चेअरमन द्यायचा हे ठरलेलं असताना त्यांनी ऐनवेळी पलटी मारली. काही कार्यकर्त्यांनी त्यांना या विश्वासघाताबाबत जाब विचारला तेव्हा त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप लोणीकरांनी केला होता.त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान, बबनराव लोणीकर आणि त्यांच्या भावाच्या घरावर काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे. जालन्यामध्ये आता भाजप-राष्ट्रवादीचा वाद शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय. दगडफेक करणारे नेमके कोण होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये.