पुणे- महाविकास आघाडीच्या तर्फे लोकसभा निवडणूक लढविताना शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी लोकसभेच्या १५ जागा लढविणार असून इच्छुकांनी तयारीला लागावे असे आवाहन प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. तसेच यावेळी अजित पवार गटाशी दोन हात करण्याची तयारी असल्याचे संकेत दिले.आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. काही जागांवर तिढा असला तरी तो सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न आहे. त्यातच उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी बारामती, शिरूर, रायगड, सातारा या लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जयंत पाटील त्यासंदर्भाने बोलताना म्हणाले, ‘‘आगामी लोकसभा निवडणूक एप्रिल मे महिन्यात होणार आहे. १४ ते १५ जागा आपण लढविणार आहोत. त्यामध्ये अमरावती, भंडारा, बारामती, सातारा, शिरूर, रायगड, रावेर, दिंडोरी समावेश आहे. काही मतदारसंघात आपण उमेदवार बदलणार आहोत.’’अजित पवार यांचा पक्ष वेगळा झालेला आहे, त्यांना काही जागा लढवाव्या लागतील. काही मतदारसंघात लढवतील ते. पण ते खरंच लढवणार की लढवल्यासारखं दाखवणार हे बघायचं आहे, असा टोला पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी अजित पवार यांना मारला..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘‘एकनाथ यांना रात्रीची व्यवस्थित झोप लागू दे. तुम्ही नका त्यांना त्रास देऊ. ते बिचारे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. पण प्रशासन देखील त्यांचं ऐकत नाही. ते पदावरून कधीही जाऊ शकतात, त्यामुळे राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकारी त्यांच ऐकायच्या मनःस्थितीत नाहीत.