पीसीईटीच्या रेडीओ चा कम्युनिटी रेडिओ एक्सेलन्स पुरस्कार देऊन गौरव
पुणे (दि. ४ डिसेंबर २०२३)- देशामध्ये आता कम्युनिटी रेडिओचा प्रभाव वाढत आहे. आगामी काळात रेडिओच्या माध्यमातून केंद्रीय पद्धतीने अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येईल. याचा उपयोग शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, शेती, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रासाठी होईल. त्यामुळे मानवी जीवनस्तर उंचावण्यावेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे प्रतिपादन मानस आयुष मंत्रालयाचे संचालक विक्रम सिंग यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली, युनेस्को भवन येथे “कम्युनिटी रेडिओ एक्सेलन्स २०२३” या गौरव सोहळ्यात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ ९०.४ एफएमचा ‘नाविन्यपूर्ण संवाद पद्धती’ (INNOVATIVE COMMUNICATION PRACTICES) या श्रेणीअंतर्गत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी दळणवळण आणि माहिती सल्लागार, साऊथ आफ्रिका, युनेस्को हिझेकील डलामिनी, संचालक, CEMCA डॉ. बी. शद्रच , निवड समितीचे अध्यक्ष प्रा. अशोक ओग्रा , अतिरिक्त संचालक, सीआरएस, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार गौरीशंकर केसरवाणी आदी उपस्थित होते.
इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या निर्मिती प्रमुख माधुरी ढमाले व कार्यक्रम अधिकारी विराज सवाई यांनी पुरस्कार स्वीकारला. आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशिया, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अनेक उपक्रमांचे आयोजन केले होते. या उपक्रमाचे उत्कृष्ठ सादरीकरण केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. पीसीईटीचे डिजिटल मार्केटिंग प्रमुख डॉ. केतन देसले यांनी त्यावेळी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून उत्कृष्ठ नियोजन केले होते. योगाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भारतभरातील सुमारे २०० कम्युनिटी रेडिओंनी या उपक्रमात भाग घेतला होता. यापैकी २० रेडिओंच्या प्रभावी योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
माधुरी ढमाले यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड मधील प्रत्येक पात्र व्यक्तीला रेडिओ वर संधी देण्यासाठी आणि उत्तमोत्तम विषय समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी इन्फिनिटी कायम तत्पर आहे. समाजातील गुणी कलाकार, विविध विषयांतील तज्ञ, सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था आदींना इन्फिनिटी ९०.४ एफएम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.