Home Blog Page 1270

अजित पवार हे नाव पुढच्या काही दिवसात राजकीय नकाशावरून गायब होईल-शालिनी पाटील यांचा दावा

अजित पवारांना घोटाळ्यातून वाचविण्याचे काम फडणवीस अन् पंतप्रधान मोदी करताय-शालिनी पाटील यांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचवले, तर जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचवत आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांना भाजपसोबत घेऊन संरक्षण दिल्याचा आरोप शालिनी पाटील यांनी केला आहे.त्याचबरोबर अजित पवार हे नाव पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरून गायब होईल असाही दावा शालिनी पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, शालिनी पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले आहेत. ज्यात, पूर्वीच्या जनसंघाने शिखर बँकेत 25 हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अजित पवार यांना सोबत घेऊन संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शालिनी पाटील म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाचे मूळ नाव जनसंघ आहे. मग त्यांना भारतीय जनता पक्ष म्हणजेच भारतीय हे नाव वापरायचा अधिकार कोणी दिला. महाराष्ट्रातील काही नेते माझे ऐकतात, त्यांना मी पत्र लिहून भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्याबाबत लढण्यासाठी विनंती केली आहे.

शालिनी पाटील म्हणाल्या की, अजित पवार हे नाव पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या नकाशावरून गायब होईल. शरद पवारांच्या वयावरून बोलण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला. अजित पवारांना हे प्रश्न विचारण्याचा अधिकार काय आहे. शरद पवार ठरवतील त्यांना कधी रिटायर व्हायचा आहे. उद्या मला देखील मी 92 वर्षाची असल्याने वेडे ठरवतील, असा हल्लाबोल पाटील यांनी केला आहे.

शालिनी पाटील म्हणाल्या की, अजित पवार यांनी माझ्याकडे पैसा कुठून येतो याची चौकशी लावली. अँटी करप्शनचे अधिकारी याची चौकशी करत होते. त्यांना सांगायचे आहे, मला महिन्याला चार पेन्शन्स मिळतात. यातूनच मी कोर्टातील लढाई लढण्यासाठी खर्च करत असते. मागील पंधरा वर्षात तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मी माझा कारखाना सभासदांच्या हातात दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.

ठाकरेंना घराणेशाही म्हणता, मग श्रीकांत तुमचा मुलगा नाही का?:तुमच्या मुलाचे पक्षात योगदान काय ?संजय राऊत यांचा सवाल

मुंबई-एकनाथ शिंदे घराणेशाहीचा अंत झाला म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? श्रीकांत शिंदे मुलगा नाही हे सिद्ध करा, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीचा अंत झाला म्हणत प्रतिक्रिया दिली होती.

यावेळी शिंदे यांच्यावर राऊतांनी टीका केली आहे. ते म्हणाले, ”एकनाथ शिंदे घराणेशाहीचा अंत झाला म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? श्रीकांत शिंदे मुलगा नाही हे सिद्ध करा. त्यांच्या मुलाचे पक्षात काय योगदान होते? बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती. शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती. हा विचार पुढे घेऊन जाणारा एक मार्ग असतो. लोकांना स्विकारायचे असेल तर स्विकारतात नाहीतर दूर करतात”, असे राऊतांनी म्हंटले आहे.

तसेच एकनाथ शिंदे हे भाजपच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत. एकनाथ शिंदे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या टोळ्यांचे पुरस्कर्ते आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेला गुजरातच्या लॉबीद्वारे इतिहासजमा करण्याची योजना आहे. शिवसेनेला इतिहासात जमा करणारे इतिहासात गाडले गेले. आम्हालाही सुद्धा मराठी असल्याचा अभिमान आहे. दिल्लीच्या गुजराती लॉबीने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही वाकणार नाही”, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे.

यावेळी संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं. निकालानंतर लोकांच्या मनात चीड आहे. मॅच फिक्सिंग करुन निकाल दिल्यामुळे आम्हाला धक्का बसला नाही. शिंदे गटाची वकीली करावी अशा प्रकारे निकालाचे वाचन सुरु होते. नार्वेकरांनी नोंदवलेले आक्षेप पूर्णपणे खोटे आहेत. गोगावलेंची निवड चुकीची कोर्टाने सांगितले होते. कालच्या निर्णयानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले ”, असे राऊत म्हणाले.

पोलिसांना धक्काबुक्की करत रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करणारे ७ जण आणि पोलिस ठाण्यात गोंधळ घालणारी महिला गजाआड

पुणे-पुणे शहरातील हडपसर परिसरातील रामटेकडी दहशत माजवून वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. टोळक्याने पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली तर पोलिस ठाण्यात गोंधळ घालणारी महिला खडकी पोलिसांनी गजाआड केली आहे.एका आमदाराने पोलिसाच्या मुस्काडात लावल्यावर,आणि त्या आमदारावर थातूर मातुर कारवाई चे सोंग दिसल्यावर आता पोलिसांच्या विरोधात जणू अनेकांना बळ मिळू लागले आहे.

अभिजीत अशोक काकडे, बल्या गायकवाड, नितीन पाटोळे, महेश शिंदे, बाळा, प्यारी उर्फ प्रशांत कांबळे, पप्पूसिंग गुरुबचनसिंग कल्याणी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी अभिजीत चव्हाण यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री पोलीस कर्मचारी चव्हाण आणि त्यांचे सहकारी जगताप रामटेकडी भागात गस्त घालत होते.

त्यावेळी रामटेकडीतील वंदेमातरम चौकात टोळक्याने दहशत माजविल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. टोळक्याने रिक्षा, मोटार, टेम्पोवर दगडफेक केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी चव्हाण आणि जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा आरोपींनी पोलीस कर्मचारी चव्हाण यांना धक्काबुक्की केली. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.पसार झालेल्या सात जणांना अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक एस देशमुख पुढील तपास करत आहेत.

पुण्यातील खडकी पोलिस ठाण्यात गोंधळ घालून महिला पाेलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेस अटक केली. रिना उर्फ हिना फकिरा तायडे (वय 31, रा. महादेववाडी, खडकी बाजार,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस शिपाई शिवानी जगताप यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी पोलिसांनी गंभीर गुन्ह्यात सागर चांदणे याला अटक केली. त्याला पाेलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. आरोपी तायडे चांदणेला भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात आली. तेव्हा कोठडीतील आरोपीस भेटण्यास मनाई असल्याचे पोलिस शिपाई जगताप यांनी सांगितले. तायडेने पोलिस ठाण्यात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जगताप यांना धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तायडेला अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक व्ही गुंजाळ पुढील तपास करत आहेत

’तरुणाईच्या राजकीय प्रवेशाची पृष्ठभूमी तयार-’आता गरज आहे, ती पंख पसरून झेप घेण्याची’

 पुणे, दि. १० जानेवारी- तरुणाईमधील ऊर्जा, नवकल्पना, संधींचे सोने करण्याची मानसिकता आणि या कौशल्यांना लाभणारी आधुनिक तंत्रविज्ञानाची जोड, यातून राजकीय क्षेत्रातील कारकीर्द घडवण्यासाठी, उत्तम पृष्ठभूमी तयार झाली आहे. आता तरुणाईने स्वप्नांचे पंख पसरून झेप घ्यावी, असा सल्ला देशाच्या विविध भागांतील विद्यमान आमदार, खासदार, प्रवक्ते यांनी एकत्रितरीत्या दिला.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेच्या पहिल्या सत्रात ’राजकारणातील तरुण नेतृत्व – वक्तृत्व किंवा वास्तव’ या विषयावर युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणार्‍या लोकप्रितिनिधींनी विचार मांडले.
याप्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस यूनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, काँग्रेसचे आमदार सत्यजीत तांबे, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनाज पूनावाला, बिहारच्या लोकजनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदर्श युवा विधायक सन्मान तसेच उच्चशिक्षित आदर्श युवा सरपंच सन्मान प्रदान करण्यात आले. यामध्ये आमदार सत्यजीत तांबे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सरपंच यशोधराराजे शिंदे (सांगली जिल्हा, महाराष्ट्र), राजबलविंदरसिंग (पंजाब), प्रियांका तिवारी (उत्तर प्रदेश) आणि नीरू यादव (राजस्थान) या उच्चशिक्षित सरपंचांचा सन्मान करण्यात आला.
खासदार चिराग पासवान म्हणाले, ’उच्चशिक्षित उमेदवार वेगळा विचार देऊ शकतात. पण राजकारण या विषयाबद्दल गैरसमज अधिक आहेत. ते युवा मंडळींनी राजकारणात येऊन दूर केले पाहिजेत. जे बदल तुम्हाला अपेक्षित आहेत, ते तुम्हीच पुढाकार घेत घडवू शकता. तुमच्यापाशी नवे विचार, ऊर्जा, उत्साह, नव्या कल्पना आहेत. या सगळ्याची राजकीय क्षेत्रात आवश्यकता आहे. फक्त आपला विचार, कल्पना कुठल्या एका जात-धर्म-पंथापुरत्या सीमित नसाव्यात. त्यात सर्वसमावेशकता असावी. युवा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने राजकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आले पाहिजे, तर देशाचा अपेक्षित विकास लवकर करणे शक्य होईल,’.
शहनाज पूनावाला म्हणाले, ’मी स्वतः एमआयटीमधून प्रशिक्षण घेतले आहे. तरुणाईमधील ऊर्जा सर्व घडवून आणू शकते. ही उर्जा देशाच्या विकास प्रक्रियेसाठी उपयोगात आणली पाहिजे. देशात निवडणुकांचे वातावरण असल्याने राजनीती क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी अनुकूल काळ आहे. परिवर्तन युवाच घडवतील, असा विश्वास वाटतो.’
पृथ्वीराज चव्हाण यांनी युवा वर्गाने धोरणनिश्चिती आणि प्रशासन या मुद्यांचा अवश्य विचार करावा, असा सल्ला दिला. मंदिराचा विचार करत राहिलो, तर धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याचे काय, असा प्रश्नही त्यांनी विचारला. देशातील विविध समस्यांवर कोणत्या उपाययोजना सुचवता येतील, याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा आणि असे उपाय मांडावेत, असेही ते म्हणाले.
सत्यजीत तांबे म्हणाले, राजकीय साक्षरता देशभरात आली पाहिजे तेव्हाच लोकशाही मजबूत होईल. राजकारणात एक भूमिका प्रत्येक युवकांची असली पाहिजे. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. ती आपल्या घरापर्यंतच असायला हवी. त्यामुळे आम्ही विचारानेच विचारांची लढायची आहे.
डॉ. सुनील जॉर्ज यांनी आभार मानले. डॉ. अंजली साने यांनी स्वागत केले. यश, शुभंकर पंडित, आयेशा मेहबूब, प्राजक्ता भांगे या विद्यार्थ्यांनी मनोगत मांडले. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे सेंटरतर्फे ‘बिल्डर्स डे’ साजरा

पायाभूत सुविधांच्या विकासात ‘बिल्डर्स’चे योगदान मोलाचे

पुणे : “देशातील पायाभूत सुविधांची उभारणी, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, नदी जोड प्रकल्प, भारतमाला प्रकल्प, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, आवास योजना यांसारख्या शासकीय योजनांची, प्रकल्पांची पूर्तता, तसेच रोजगार निमिर्ती करण्यात ‘बिल्डर्स’ महत्वाचे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय जल अकॅडमीचे संचालक मिलिंद पानपाटील यांनी केले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरच्या वतीने आयोजित ‘बिल्डर्स डे’च्या कार्यक्रमात पानपाटील बोलत होते. रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रुप कॅप्टन (निवृत्त) प्रवीर अशोक पुरोहित, ‘बीएआय’चे चेअरमन डी. एस. चौधरी, व्हाईस चेअरमन सुनील मते, मानद सचिव अजय गुजर, सहसचिव महेश मायदेव, खजिनदार राजाराम हजारे, कार्यक्रमाचे समन्वयक शशिकांत किल्लेदारपाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ‘नव्या भारताचा शाश्वत विकास’ अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. बांधकाम क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्रा. एस. बी. भोंडे, एस. एम. मेहता, अशोक अटकेकर, सी. एच. रतलानी, संजय आपटे यांना सन्मानित करण्यात आले.

प्रवीर अशोक पुरोहित म्हणाले, “भारत गेल्या काही वर्षांत जोमाने प्रगती करत आहे. विकासाचा दर, जीडीपी वाढण्याची गरज आहे. शासनाने चांगली धोरणे केली असून, अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. मात्र, प्रत्येक भारतीयाने माणुसकी, प्रामाणिकपणा व स्वयंप्रेरणेने योगदान द्यायला हवे. यातूनच आपण संपूर्ण जगाला मार्गदर्शक असा भारत देश घडू शकेल.”

डी. एस. चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शशिकांत किल्लेदारपाटील यांनी ‘बिल्डर्स डे’च्या आयोजनामागील भूमिका विशद केली. संजय आपटे व आर. एस. वर्मा यांनी सूत्रसंचालन केले. अजय गुजर यांनी आभार मानले.

फ्लाइंग कंदील विक्री, साठवणूक व वापरावर बंदी

मुंबई, दि. 10 : मानवी जीवन व सार्वजनिक शांतता, सुरक्षितता यांना गंभीर धोका, असामाजिक घटकांच्या कारवायांची शक्यता लक्षात घेता फ्लाइंग कंदिलाचा वापर, विक्री व साठवणूक बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 29 जानेवारी 2024 पर्यंत लागू करण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त (अभियान), विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

फ्लाइंग कंदिलाद्वारे असामाजिक घटकांच्या कारवाया रोखण्यासाठी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. मानवी जीवन व सार्वजनिक शांतता, सुरक्षितता यांना गंभीर धोका निर्माण होऊ नये म्हणून हा आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.

राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारा नार्वेकरांचा निकाल -प्रशांत जगताप

पुणे-न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर अखेर आज विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपत्रतेच्या प्रश्नावर आपला निकाल दिला. हा निकाल पक्षपाती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
“आमदार अपात्रतेबाबतचा आजचा निकाल हा अनपेक्षित नाही, मात्र महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारा आहे” अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
“कधीकाळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र अशी आपली ओळख होती. सत्ताधाऱ्यांच्या लालसे मुळे आज फोडाफोडीचा महाराष्ट्र राजकीय कुरघोडीचा महाराष्ट्र राजकीय षडयंत्रांचा महाराष्ट्र अशी आपली ओळख झाली आहे. सत्ता व सत्तेच्या माध्यमातून पैसा यासाठी भारतीय जनता पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो हा संदेश आजच्या निकालाने दिला आहे.
राज्यात हीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात लोकप्रतिनिधींच्याच नव्हे तर लोकांच्याही अधिकाऱ्यांवर गदा येईल ही भावना नागरिकांच्या मनात आहे. म्हणूनच येत्या काळात कलुषित राजकारणाची ही मालिका संपवण्यासाठी नागरिक भाजपला राज्यातून हद्दपार करतील हा विश्वास आहे.” असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले.

शिवसेना एकनाथ शिंदेची निकालाचे आतषबाजी करीत जल्लोषात स्वागत

पुणे-मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आलेल्या तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे फटाक्यांची आतशबाजी करीत व महालक्ष्मी मंदिरात महाआरती करून मोठ्या जल्लोषात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे आनंद साजरा केला

पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “हा ऐतिहासिक निकाल असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थापित केलेले सरकार हे कायद्याद्वारे व संविधानिक तत्वाने स्थापन झालेले सरकार आहे. न्यायदेवतेने दिलेला निकाल आम्हाला मान्य असून, इथून पुढे सरकार अजून नव्या ऊर्जेने काम करेल.”

बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकृतपणे काल संध्याकाळी 6 वाजता वाजता जाहीर केला. यामध्ये शिवसेनेतील सर्व आमदार पात्र असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयार केलेलं सरकार हे पूर्णपणे संविधानिक व कायद्याने बनलेले सरकार आहे असे जाहीर झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या या ऐतिहासिक क्षणाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे, पक्षातील विविध पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत विजयाचा भव्य जल्लोष करीत एकमेकांना पेढे भरविले गेले. तसेच, शिवसेनेच्यावतीने मोठ्या उत्साहात आतिषबाजी करत, मध्यवर्ती कार्यालय ते बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन इथपर्यंत भव्य मिरवणूक काढत, आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत आनंदोत्सवात सहभागी झाल्या

यावेळी संपर्क प्रमुख संजय मशिलकर, शिरूर लोकसभा निरीक्षक विकास रेपाळे, सहसंपर्क प्रमुख अजय बाप्पू भोसले, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, जिल्हाप्रमुख रमेश बाप्पू कोंडे, बाळासाहेब पोखरकर,सुरेंद्र जेवरे, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे, युवासेना सहसंपर्क प्रमुख अविनाश खेडेकर,शर्मिला येवले, महिला आघाडी शहर प्रमुख पुजाताई रावेतकर, माथाडी कामगार सेना जिल्हाप्रमुख निलेश माझीरे, शहर संघटक श्रीकांत पुजारी, नवनाथ निवंगुणे, धनंजय जाधव, प्रमोद प्रभुणे, उपशहर प्रमुख सूरज परदेशी, गौरव साईनकर,सचिन थोरात, सुहास कांबळे, श्रुती नाझीरकर,श्रद्धाताई शिंदे, कांचन दोडे,मयूर पानसरे, आकाश शिंदे व शिवसेना, युवासेना सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, अंगिकृत संघटना व शिवसैनिक उपस्थित होते

आमदार – खासदारांनी वारंवार राजकीय पक्षांतरे करू नयेत- माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू

एमआयटी डब्यूपीयूत १३ व्या ‘भारतीय छात्र संसद’ चे नायडू यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. १० जानेवारी : राजकीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या आमदार – खासदारांनी सतत पक्षांतरे करू नयेत. लोकशाही समाजव्यवस्थेत विरोधक जरूर असावे, पण एकमेकांशी शत्रुत्व नसावे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी व्यापक दृष्टीकोन ठेवत संसदेचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी बुधवारी येथे केले.”राजकीय कारकीर्द घडवू इच्छिणार्‍या युवा विद्यार्थ्यांसमोर पक्षबदलाचे, गोंधळाचे, घोषणाबाजीचे आदर्श न ठेवता, एकमेकांना योग्य सन्मान करण्याची उदाहरणे समोर ठेवावीत, असेही ते म्हणाले.

भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. १० ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान स्वामी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांचे सहकार्याने छात्र संसदेला मिळाले आहे.

याप्रसंगी प्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार, वक्ते व लेखक प्रा. रामचरण हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. कर्नाटक विधानसभेचे बसवराज होराटी, यू. टी. खादेर फरीद, उत्तर प्रदेशचे सतीश महाना, मध्य प्रदेशचे गिरीश गौतम यांच्यासह एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नायडू पुढे म्हणाले,’राजकीय क्षेत्रातील मंडळींनी आपापल्या राजकीय पक्षांशी एकनिष्ठ असावे. विचारधारा भिन्न असतील, दृष्टीकोन वेगळे असतील, पण संसदेच्या सभागृहात सर्वांनी देशहिताचा विचार सर्वोच्च ठेवला पहिजे. एकविचारानेच आपण नव्या युगातील भारत घडवू शकणार आहोत. राजकीय कार्यकर्ते, नेते यांनी सतत पक्षबदल केले, की सर्वसामान्य जनतेचा त्यांच्या कामातील रस संपतो. जनतेचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडणे, हे धोक्याचे आहे. सत्ताधारी गटाच्या चुकीच्या, अयोग्य धोरणांना, कृतींना विरोधकांनी अवश्य विरोध करावा, लोकशाहीने ती ताकद प्रत्येकाला दिली आहे. पण याचा अर्थ असा नव्हे, की विरोधकांनी गदारोळ, घोषणाबाजी करून संसदेच्या कामकाजात सतत अडथळे निर्माण करावेत. त्यांनी विरोधक असावे, एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनू नये. कोणत्याही परिस्थितीत संसदेचे कामकाज सुरळीत चालू ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.

डॉ. रामचरण यांनी विद्यार्थ्यांमध्ये जात भावी जीवनात उपयुक्त ठरणारी चतुःसूत्री सांगितली. नवकल्पना, समस्या नेमक्या ओळखणे, त्यांचे स्वरूप जाणणे हे काम युवा पिढीचे आहे. त्यासाठी कामावरची निष्ठा आणि ध्यास आवश्यक आहे. नेतृत्वच देश घडवत असते आणि सर्व प्रकारचे बदल नेतृत्वाच्या कार्यक्षमतेवरच अवलंबून असतात, असे ते म्हणाले.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ’युवा पिढीला भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, परंपरा यांचे ज्ञान होणे आवश्यक आहे. जागतिक तुलनेत भारतीय संस्कृतीचे वेगळेपण देशाच्या तरुण पिढीने जाणून घेतले पाहिजे. नव्या तंत्रक्रांतीच्या युगात भारत विश्वगुरू या संज्ञेला पात्र ठरत आहे, याचा अभिमान बाळगला पाहिजे. परंपरा आणि नव्या युगामध्ये एकाच वेळी वावरताना जी संभ्रमावस्था दिसत आहे, त्यातून मार्ग दाखवण्यासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे,’.
राहुल कराड म्हणाले, ’उच्चशिक्षित पिढी राजकीय क्षेत्रात कार्यरत व्हावी, आणि त्याद्वारा लोकशाही समाजजीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सहाय्य मिळावे, समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यावरील उपाययोजनांचा विचार व्हावा, या उद्देशाने भारतीय छात्र संसद उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतून प्रेरणा घेत देशात अनेक ठिकाणी, विद्यापीठांमध्ये स्थानिक पातळीवर छात्र संसदेचे उपक्रम सुरू व्हावेत, ही इच्छा आहे. यासाठी राजकीय नेते, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी पक्षातीत – विचारांपलीकडे जात किमान समान कार्यक्रम कसा तयार करता येईल, यावर काम करावे.
यावेळी राहुल कराड यांचा छात्र संसद उपक्रम यशस्वी करत असल्याबद्दल मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
एमआयटीचे कुलगुरु डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. डॉ. के. गिरिसन यांनी आभार मानले तर डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. सुरुवातीला एमआयटी कल्चरल क्लबच्या विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर केली. उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन करून, तसेच डेमाक्रसी बेल वाजवत १३ व्या छात्र संसदेचे अधिकृत उद्घाटन केले.

शिक्षणातून नेतृत्व घडण व्हावी:डॉ. रघुनाथ माशेलकर 

पुणे :
भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) तर्फे ‘चेसिंग द एक्स्पोनेन्शियल’ या विषयावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त दि.१० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता भारती विद्यापीठाच्या एरंडवणे शैक्षणिक संकुलातील अभिजितदादा कदम सभागृहात हे व्याख्यान पार पडले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी, भारती विद्यापीठाचे    सहसचिव डॉ.के.डी.जाधव,सहसचिव एम.एस.सगरे,परिक्षा नियंत्रक डॉ.अँथनी रोज उपस्थित होते .आयएमईडीचे प्रभारी संचालक डॉ.अजित मोरे,उपप्राचार्य डॉ.रामचंद्र महाडिक यांनी स्वागत केले.डॉ.उज्ज्वला बेंडाळे, डॉ.आत्माराम पवार, डॉ.विवेक रणखांबे, प्रा.श्रेयस डिंगणकर, डॉ. स्वाती देसाई, प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. 
डॉ.माशेलकर यांनी चेसिंग द एक्स्पोनेन्शियल’ या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना शिक्षण, संशोधन, नव संकल्पना, उद्योजकता या मुद्द्यांवर संवाद साधला. ‘डॉ पतंगराव कदम यांनी शून्यातून विश्व उभे केले. सर्व विद्यार्थ्यांनी भव्य गोष्टींचा ध्यास घ्यावा. आवडत्या गोष्टीवर लक्ष एकाग्र करावे. शिक्षणातून भवितव्य घडवणे शक्य असल्याने देशाचे स्थान जगात प्रथमस्थानी यावा, यासाठी प्रयत्न करावेत’ , असे त्यांनी सांगितले.
डिजिटल क्रांतीतला कल्याणकारी आशय
भारतानं मोबाईल क्षेत्रात मोठीच क्रांती घडवली. देशात 1995 ते 2014 या 20 वर्षांत 90 कोटी ग्राहकांची भर पडली. ऑनलाईन पेमेंट च्या क्रांतीची भर पडली. लाखो भारतीय  व्हॉइस कॉलिंगचा आणि 4 जी इंटरनेटचा स्वस्तात आनंद लुटत आहेत.नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान गरिबांना परवडेल, यावर विश्‍वास हवाच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गरीब लोक उच्च तंत्रज्ञान आत्मसात करून वापरू शकतात, यावरही विश्‍वास हवा. ग्राहकाचं पूर्ण समाधान करता यायला हवं. कंपन्यांच्या “संशोधन आणि विकास विभागांनी’ही मनोवृत्तीत बदल करत, साध्या पण उपयुक्त दर्जेदार उत्पादनांची कास धरावी.  शिक्षण आणि विज्ञान हातात हात घालून पुढे गेले पाहिजे. त्यातून उद्योजकता विकसित झाली पाहिजे. संधीची दारे स्वतःहून उघडली नाहीत तर नव्या संधी तयार केल्या पाहिजेत. 

‘ डॉ. माशेलकर यांचे मार्गदर्शन भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखे असून आयुष्यात पुढें नेणारे आहे.देशाच्या प्रगतीत भारती विद्यापीठाचे विद्यार्थी आपले योगदान देत राहतील’, असे उद्गार कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी अध्यक्षीय भाषणात काढले .भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . 

‘अटल सेतू’ मुळे साधला जाणार मुंबई महानगर क्षेत्राचा सर्वांगीण विकास

मुंबईला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारे अंतर कमी करणारा आणि प्रवासाच्या वेळेत बचत करणारा ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’ लोकार्पणासाठी सज्ज झाला आहे. मुंबईसह परिसराची सर्वांगीण उन्नती साधणारा, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणारा आणि मुंबई शहराच्या चौफेर विस्तारासाठी साहाय्यभूत ठरणारा हा सेतू ‘गेमचेंजर’ ठरणारा असेल हे निश्चित… लोकार्पणानिमित्त अटल सेतूबाबतची थोडक्यात माहिती देणारा हा लेख.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. बेटांचे शहर असलेल्या मुंबईच्या रहिवाश्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शासनाने विविध प्रकल्प राबविले आहेत. याचाच पुढचा टप्पा म्हणून मुंबईला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात ‘अटल सेतू’ अस्तित्वात आला असून यामाध्यमातून मुंबईकरांचे एक स्वप्न आता साकार होत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक जाळे विस्तारणारा हा देशातील सर्वात मोठा सागरी पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) उभारण्यात आला असून तो आता वाहतुकीसाठी खुला होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेला आणि त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत असलेला हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अभियांत्रिकी आविष्कार मानला जात आहे.

default

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

सागर, जमीन आणि दलदल अशा तीनही भागांमध्ये उभारलेला सुमारे 21 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी तीन स्थापत्य कंत्राटदार, एक इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टिम कंत्राटदार, विविध 10 देशांतील विषयतज्ज्ञांनी आपले योगदान दिले असून 1500 हून अधिक अभियंते, तर सुमारे 16500 कुशल मजुरांनी तीन पाळ्यांमध्ये अहोरात्र काम केले आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे 1.2 लाख टन स्टील वापरण्यात आले आहे. इतक्याच स्टीलमध्ये चार हावडा ब्रिज उभारले जाऊ शकतात. प्रकल्पासाठी आठ लाख 30 हजार क्युबिक मीटर काँक्रीटचा वापर झाला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यासाठी लागलेल्या काँक्रीट पेक्षा हे सहापट अधिक आहे. तर, या प्रकल्पात वापरण्यात आलेले स्टील आयफेल टॉवरमध्ये वापरले गेलेल्या स्टीलच्या 17 पट अधिक आहे. सुमारे एक हजार खांबांवर उभारल्या गेलेल्या या मार्गावर 100 किमी प्रती तास वेगाने प्रवास करता येणार असून दररोज सुमारे 70 हजार वाहने वाहून नेण्याची याची क्षमता आहे.

अटल सेतूसाठी अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याची एकूण लांबी 22 किलोमीटर असून यापैकी 16.5 किलोमीटरचा भाग समुद्रात आणि सुमारे 5.5 किलामीटरचा भाग जमिनीवर उन्नत स्वरूपात आहे. यावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका असणार आहेत. पूर्व द्रुतगती मुक्तमार्ग हा जोडला गेला आहे आणि पूर्व-पश्चिम असणारा वरळी-शिवडी उन्नतमार्ग हा भविष्यात अटल सेतू प्रकल्पास जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई सागरी किनारा रस्त्याद्वारे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना अटल सेतूद्वारे विनाथांबा मुख्य भूमीकडे जाणे शक्य होणार आहे. साहजिकच प्रवासाचे अंतर कमी झाल्याने आणि एक तासाहून अधिक प्रवास वेळेची बचत होणार असल्याने हरितगृह वायू उत्सर्जन सुद्धा कमी होणार आहे.

पुलाच्या दुसऱ्या बाजूला, नवी मुंबईतील उलवे येथील शिवाजीनगर, उरण-पनवेल राज्य महामार्ग आणि मल्टीमॉडेल कॉरिडॉरवर चिर्ले येथे आंतरबदल (इंटरचेंज) करण्यात आले आहेत. याद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, पुणे किंवा गोवा येथून प्रवासी जड वाहने सहजतेने मुंबईत प्रवेश करू शकतील. हा सेतू मार्ग विविध जोडरस्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जाणार असल्याने यामधील अंतर कमी होणार आहे. या प्रकल्पामध्ये भारतातील पहिल्या ओपन रोड टोलिंग प्रणालीचा देखील वापर करण्यात आला आहे.

अटल सेतू उभारताना पर्यावरणाचा समतोल विचार करण्यात आला आहे. या क्षेत्रात स्थलांतरीत पक्ष्यांचा विशेषत: फ्लेमिंगोंचा नैसर्गिक अधिवास असल्याने प्रकल्पाच्या समुद्रातील भागात खारफुटी व दलदल इत्यादी पर्यावरणीय वैशिष्ट्यांना कमीत कमी नुकसान होईल याची दक्षता एमएमआरडीएने घेतली आहे. सुरक्षेची बाब लक्षात घेऊन बंद पडलेली वाहने नेण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन मार्गिका, ॲण्टी-क्रॅश बॅरियर्स असलेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम, तसेच पक्ष्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये ध्वनी अडथळे (साऊंड बॅरिअर्स) लावण्यात आली आहेत. भूकंप, चक्रीवादळ, वाऱ्याचा दाब आणि भरती-ओहोटीच्या प्रभावामध्ये टिकून राहण्यासाठी या प्रकल्पास सक्षम बनविण्यात आले असून सागरी सेतूचे घटक पुढील 100 वर्षांपर्यंत टिकून राहण्यासाठी गंजरोधक सामग्रीपासून बनवलेले आहेत.

प्रकल्पासमोरील आव्हाने

अटल सेतू बनविणे अतिशय आव्हानात्मक काम होते. यासाठी अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून हा अद्वितीय पूल बांधण्यात आला. एका बाजूला मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि दुसऱ्या बाजूला जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण असलेल्या मुंबई खाडीमध्ये हा पूल उभारण्यात आला आहे. कंटेनर वाहून नेणारी मोठी जहाजे तसेच मासेमारीच्या बोटी येथून सतत ये-जा करीत असतात. त्यांची वाहतूक सुरळीत व्हावी याबरोबरच कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या समुद्राखालील वाहिन्या, भाभा अणुसंशोधन केंद्र आणि बीपीसीएलच्या तेल टर्मिनल्सची सुरक्षितता आदी बाबी लक्षात घेऊन या व्ह्यू बॅरिअर्सचे नियोजन करण्यात आले आहे.

चौफेर विस्तारासाठी सहाय्यभूत

मुंबई बेटाच्या भौगोलिक मर्यादांमुळे शहरातील जमिनीच्या टंचाईची समस्या संपुष्टात येऊन अद्याप उपनगरी रेल्वेवर अवलंबून असल्यामुळे प्रामुख्याने उत्तर-दक्षिण विस्तारलेल्या मुंबई शहराच्या चौफेर विस्तारासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरणार आहे. या परिसरात दहा विकास केंद्र उभारण्यात येणार आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश करणारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई परिसरातील नागरिकांना विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देत असून अटल सेतूच्या रूपाने प्राधिकरणाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

वेळेची आणि इंधनाची बचत होणार असल्याने या प्रकल्पामुळे तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात मोठे उद्योग, विकासात्मक प्रकल्प येऊन आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक असा सर्वांगीण आणि शाश्वत विकास होण्यास मदत होणार आहे. यामुळे या भागातील पर्यटनाला देखील अधिक चालना मिळेल. अर्थव्यवस्थेला मिळणाऱ्या अपेक्षित चालनेमुळे तसेच नव्याने होणाऱ्या रोजगार निर्मितीमुळे हा प्रकल्प ‘गेम चेंजर’ ठरणार आहे, यात शंका नाही.

– ब्रिजकिशोर झंवर

सहेली संस्थेतील चिमुकल्यांसोबत तरुणाईचे ‘आपुलकीचे बोरन्हाण’  

मैत्रयुवा फाऊंडेशन व सहेली संघ संस्थेतर्फे आयोजन ; तरुणाईचा मोठा सहभाग
पुणे : माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हे काव्य प्रत्यक्ष आपल्या कृतीत आणत पुण्यातील युवक-युवतींनी बुधवार पेठेतील सहेली संस्थेतील चिमुकल्यांसोबत आपुलकीचे बोरन्हाण साजरे केले. हलव्याचे दागिने आणि नवीन कपडे घालून बसलेल्या चिमुकल्यांवर बोरं, चॉकलेट, गोळ्यांचा वर्षाव करुन बोरन्हाण साजरे होत असताना त्यांच्या चेह-यावरचा आनंद अवर्णनीय होता. 
मैत्रयुवा फाऊंडेशन व सहेली संघ संस्थेतर्फे बुधवार पेठेतील संस्थेच्याच सभागृहात आपुलकीचे बोरन्हाण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.प्रसाद जोशी, प्रकाश यादव यांसह बालसदन संस्थेच्या अश्विनी नायर, सहेली संघ संस्थेच्या अध्यक्षा महादेवी मादर, तेजस्वी सेवेकरी, मैत्रयुवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते. 
संकेत देशपांडे म्हणाले, वंचित व विशेष मुलांसाठी काम करण्याकरिता तरुणाईला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. समाजातील प्रत्येक घटकाला सण-उत्सवांचा आनंद मिळावा आणि आपले देखील कोणीतरी कौतुक करते, ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचावी, याकरीता बोरन्हाण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात देखील असे उपक्रम राबविले जाणार आहेत.

पद्मश्री पोपटराव पवार यांना ‘आत्मनिर्भर ग्राम’ जीवनगौरव पुरस्कार

पुणे :  सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी संस्थेतर्फे दरवर्षी सन्मानित करण्यात येत असून यंदाचा आत्मनिर्भर ग्राम जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांना प्रदान करण्यात येणार आहे. शुक्रवार, दिनांक १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटर येथे हा कार्यक्रम होईल, अशी माहिती राष्ट्रीय कर्तव्य अभियान चे संयोजक विजय वरुडकर यांनी दिली. 
स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ जयंती व सोशल रिस्पॉन्सिबिलिटी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय कर्तव्य अभियान या समाजिक समूहाच्या माध्यमातून गेली ९ वर्षे हा कार्यक्रम घेतला जातो. याप्रसंगी पद्मश्री गिरीश प्रभुणे, रा.स्व.संघ पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, आमदार सिद्धार्थ शिरोळे, डॉ हेडगेवार स्मारक समिती चे अभय माटे, प्राचार्य फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य डॉ.नितीन कुलकर्णी, ग्राम विकास गतीविधी प.महाराष्ट्र संयोजक मधुकर भोसले, सीएसआर हेल्प लाईन च्या संचालक डॉ.तेजस्विनी गोळे, बॉश इंडिया फाउंडेशनचे सुरज जाधव इतर अनेक सीएसआर क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
यंदाचा आत्मनिर्भर ग्राम विकास पुरस्कार वाबळेवाडी ता शिरूर, आनंदवाडी तालुका निलंगा जिल्हा लातूर, कारभारवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्राम विकास प्रतिष्ठाण देवळाली प्रवरा आणि रोहित बलुरे यांना विवेकानंद युवा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्वावलंबी आत्मनिर्भर ग्राम विषयी पूरक विविध प्रकल्पांचे सादरीकरण तसेच ग्राम विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधी उभारणीची पूर्व तयारी म्हणून तज्ञांचे मार्गदशन उपलब्ध केले जाणार आहे. 
कार्यक्रम संयोजक समिती म्हणून ग्रामविकास गतीविधी समूह प.महाराष्ट्र, सेवावर्धनी, सेवा सहयोग, डेक्कन एज्युकेशन सोसायटी फर्गुसन कॉलेज पुणे, स्पार्क, अर्थ साटेलाईट फाउंडेशन, ग्राम उर्जा, बाबुराव दोंडकर समिती, युवा ध्येय, युनिक एकाडमी, देआसरा फाउंडेशन, शिव सेवा प्रतिष्ठान तळेगाव विविध संस्थाचा सहभाग राहणार आहे. मुख्य पुरस्कार वितरण ६ वाजता होणार असून त्यापूर्वी ४ ते ६ एनजीओ सीएसआर प्रकल्प सादरीकरण होणार आहे.     

सुजल, निनाद, ऋषभ चौथ्या फेरीत पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा

पुणे: सुजल लखारी, निनाद कुलकर्णी, ऋषभ देशपांडे यांनी  पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या तिस-या फेरीत सुजल लखारीने मानस रत्नपारखीवर २१-७, २१-८ अशी, तर निनाद कुलकर्णीने प्रणव वाघवर २१-१६, २१-१२ अशी मात केली. यानंतर ऋषभ देशपांडेने पार्थ देशपांडेचे आव्हान २१-९, २१-७ असे सहज परतवून लावले.  

कवीन, देवांश यांचे विजय
या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या तिसऱ्या फेरीत कवीन पटेलने चिन्मय फणसेचे आव्हान २१-१२, १५-२१, २१-११ असे परतवून लावले. यानंतर देवांश सकपाळने नील गोएलवर २१-७, २१-१० असे, तर रघुवेंद्र यादवने नंदन मुथावर २२-२०, २१-१३ असा विजय मिळवला.
१५ वर्षाखालील मुलांच्या एकेरीच्या तिसऱ्या फेरीत अभिग्यान सिन्हा याने रियांश चौधरीवर २१-१४, २१-९ असा विजय मिळवला. 

निकाल – तिसरी फेरी – ११ वर्षांखालील मुले – हिमांश हरगुनानी वि. वि. अन्वीत राजवाडे २१-१०, २१-१४, कबीर देसाई वि. वि. गौतम साठे २१-१५, २१-१७, बुरहनुद्दीन आगाशी वि. वि. लक्ष्य सिन्हा २१-७, २१-८, अर्जुन तुळपुळे वि. वि. रणवीर सूर्यवंशी २८-२६, २१-१८, आरुष सप्रे वि. वि. शर्वीन मगर २१-१२, २१-१८, वेदांत मोरे वि. वि. मिहिर खरे २१-११, २१-६, अद्वैत फेरे वि. वि. सिद्धांत धामा २१-८, २१-७, ईशान रॉय वि. वि. कबीर कुलकर्णी २१-११, २१-२

१५ वर्षांखालील मुली – सान्वी पाटील वि. वि. साची संचेती २१-११, २१-६, पर्णवी मोहळकर वि. वि. साची पाटील २१-१९, २४-२२, पद्मश्री पिल्लई वि. वि. अरुंधती कंवर २१-१९, २१-१२, मौसम पाटील वि. वि. आर्शी देशमुख २१-४, २१-६, स्वराली थोरवे वि. वि. जिविका कासवा २१-११, २१-१२, शरयू रांजणे वि. वि. रिद्दीमा जोशी २१-२, २१-३, सोयरा शेलार वि. वि. आयुषी काळे १३-२१, २१-१२, २१-५

१५ वर्षांखालील मुले – स्वरित सातपुते वि. वि. अवनीश बांगर २१-१७, २१-१९, अभीक शर्मा वि. वि. वेदांत तांडले २१-७, २१-११, राघवेंद्र यादव वि. वि. आरव राय २१-८, २१-११, आरुष अरोरा वि. वि. अयांश यारागट्टी २०-२२, २१-१८, २१-५,सयाजी शेलार वि. वि. अथर्व काळे १४-२१, २१-११, २१-१३.

१३ वर्षांखालील मुले – मिर शाहझार अली वि. वि. दिविक गर्ग २१-१७, २२-२०, अद्वय देशमुख वि. वि. दिवित मुथा २१-११, २१-१२, एस. सोमजी वि. वि. विहान कोल्हाडे २१-१८, २१-११, शरव जाधव वि. वि. आर्यन नागवडे २१-१९, २१-१७, यश मोरे वि. वि. दियान पारेख २१-१३, २१-१८

१७ वर्षांखालील मुली – वेनिषा कोल्हे वि. वि. आद्या जोशी १८-२१, २१-१६, २१-१४, नाव्या रांका वि. वि. मौसम पाटील २१-१४, २१-११, एस. डाखणे वि. वि. शिवानी मासळेकर २१-१२, २१-११, भक्ती पाटील वि. वि. अहाना जैन २१-७, २१-४, यशस्वी काळे वि. वि. सयुरी थोकल २१-१३, २१-१७, आयुषी मुंडे वि. वि. शिवांजली करडीले २१-१५, २१-१४, स्नेहा भिसे वि. वि. सुखदा लोकापुरे २१-१७, २१-१२, हृदया साळवी वि. वि. रिद्धीमा जोशी २१-११, २१-९.  

१७ वर्षांखालील मुले – वरद लांडगे वि. वि. सोहम धामे १६-२१, २१-१४, २४-२२, सुदीप खोराटे वि. वि. ऋग्वेद भोसले २१-१२, २१-१२, अवधूत कदम वि. वि. स्वरीत सातपुते २१-११, २१-१४, श्लोक डागा वि. वि. नितीन एस. २१-१३, २१-१२.

नार्वेकरांनी दिलेला निकाल हा दिल्लीतील गुजरात लॉबीने लिहून दिलेला ड्राफ्ट – नाना पटोले

संविधानाची पायमल्ली करणारा तसेच १० व्या शेड्युलला डावलणारा निर्णय.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशालाही न जुमानता विधानसभा अध्यक्षांचा निकाल.

आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला काळीमा फासणारा

मुंबई, दि. १० जानेवारी.
शिवसेना पक्षातील आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातील काळा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपद हे निष्पक्ष असते पण आजचा निकाल पाहता तो निकाल निष्पक्ष वाटत नाही. संविधानाची पायमल्ली करत घटनेतील १० व्या शेड्युलला डावलल्याचे दिसत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनाही यावेळी डावलल्याचे स्पष्ट दिसते. राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल दिल्लीतील गुजरात लॉबीने लिहून दिलेला ड्राफ्ट वाटत असून हा निकाल महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला काळीमा फासणारा आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर टिळक भवन येथे प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आमदार अपात्रतेचे प्रकरण कोर्टात ९ महिने चालले व मे २०२३ मध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निकाल देण्यास आणखी ७ महिने लावले. निकाल देताना नार्वेकर यांनी शिवसनेची १९९९ ची घटना मान्य केली या घटनेनुसार ठाकरे यांचीच शिवसेना आहे हे स्पष्ट असताना २०१८ ची शिवसेनेची घटना मान्य नाही असे सांगत मुळ पक्ष एकनाथ शिंदे यांचा आहे असा अनाकलनीय निकाल दिला आहे. शिवसेना पक्ष फुटीआधी उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख होते व सुप्रीम कोर्टानेही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचेच सुनिल प्रभू हे प्रतोद आहेत असे स्पष्ट केले असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मात्र सुनिल प्रभू यांचे पक्षप्रतोद पद अमान्य करत एकनाथ शिंदे गटाच्या भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता दिली. निवडून आलेले आमदार-खासदार हा मुळ पक्ष नसतो पण आमदारांच्या बहुतमताचा आधार घेत राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे असा निकाल दिला आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटातील एकाही आमदाराला अपात्र केले नाही हे विशेष, हा निकाल पक्षपाती वाटतो. हा निकाल देण्यासाठी वेळकाढूपणा केला गेला. सुप्रीम कोर्टाने दोन-तिनदा फटकारल्यानंतर या प्रकरणाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला गेल्याचे दिसते. काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण जाईल व सुप्रीम कोर्ट योग्य निकाल देईल असा विश्वास आहे.

भारतीय जनता पक्षाने देशात जे चालवले आहे ते लोकशाहीसाठी घातक आहे, हे असेच चालू राहिले तर राजकीय पक्षांचे अस्तित्वच राहणार नाही. आणि भाजपाला तेच हवे आहे, देशात विरोधी पक्ष राहुच नये यासाठी यासाठी भाजपाचा कुटील राजकारण सुरु आहे म्हणूनच लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसचा लढा आहे. लोकशाही व संविधान अबाधित राहिले पाहिजे ही काँग्रसेची भूमिका आहे.

निकालाचा मविआवर परिणाम नाही.
शिवसेना फुटी प्रकरणातील निकालाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट मविआ अधिक मजूबत होईल, भारतीय जनता पक्षाचा डाव उघड झाला असून जनताच भाजपाचा धडा शिकवेल. एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, निकाल देणारे न्यायाधीश ज्याच्यावर आरोप आहेत त्यांना भेटत असतील तर ते गंभीर आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होता त्यामुळे काही संगनमत झाले का? अशी शंका येते. असेही पटोले म्हणाले.