Home Blog Page 1271

नार्वेकरांच्या निकालापूर्वी DGP रश्मी शुक्ला फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर; राज्यात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त

मुंबई-शिवसेना आमदार अपात्रता निकाल जाहीर होण्यासाठी काही वेळेचा अवधी राहिला असताना दुसरीकडे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाल्या होत्या.शिवसेना आमदार अपात्रता निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात नेमके त्याचे काय पडसाद उमटतील, यावर यावेळी काही आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे. मंगळवारी, रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची बैठक झाली होती. जवळपास तासभर ही बैठक सुरू होती.

आमदार अपात्रता निकाल सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निवास स्थान, शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय, आमदारांचे कार्यालय आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे.

ठाकरेंची नव्हे तर खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची… मात्र दोघांचे आमदार पात्रच .. अपात्र कोणीही नाही -नार्वेकरांचा निकाल जाहीर

मुंबई- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्यांना शिवसेनाप्रमुख , सरसेनापती अशा शब्दांनी संबोधले जायचे , ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा महारष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर इस्लामी राष्ट्रांतही होता, ज्या शिवसेनेचा वारस बाळासाहेबांनी राज ठाकरेंना न करता आपला पुत्र उद्धव ठाकरे यांना करून माझ्या उद्धवला सांभाळा अशी आर्त हाक मुंबईतूनच शिवसेना मेळाव्यातून दिली होती. ती शिवसेना म्हणजे खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची नसून एकनाथ शिंदेंची आहे असा निर्णय आज विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी दिला आहे . त्याच बरोबर शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंच्या समवेतच राहिलेले आमदार हे दोन्ही गटातील आमदार पात्र असल्याचा निकाल हि नार्वेकर यांनी दिला आहे. निकाल वाचनास सुमारे तासभर उशीर केल्यावर त्यांनी वाचलेले मुद्दे खाली प्रथम वर शेवट .. या प्रमाणे येथे देत आहोत …

उद्धव ठाकरे गटाचे 14 आमदारही पात्र

शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा धोका टळला आहे. यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांंना विधानासभा अध्यक्षांनी पात्र ठरवले आहे.

शिंदे गटाचे 16 आमदार पात्र – नार्वेकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यास विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी नकार दिला. त्यांना अपात्र ठरवण्याचे कोणतेही वैध कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे आणि पक्षाचे खरे नेते आहेत.गोगावले यांची नियुक्ती बरोबर, त्यांचाच व्हीप लागू – नार्वेकर

निकाल वाचताना नार्वेकर म्हणाले की, भरत गोगावले यांची शिवसेनेचा व्हीप म्हणून झालेली नियुक्ती बरोबर आहे. त्यांचाच व्हीप लागू होतो. विधिमंडळ पक्ष ज्याचा त्याचाच पक्ष आहे.अध्यक्ष म्हणाले- सुनील प्रभू यांची जेव्हा चीफ व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आली तेव्हा पक्षात फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने या गटालाच खरी शिवसेना मानली आहे, त्यामुळे भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती योग्यच आहे. सुनील प्रभू यांना विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. असे म्हणत नार्वेकरांनी गोगावलेंना व्हीप-प्रतोद म्हणून मान्यता दिली.

शिंदे गट हीच खरी शिवसेना – नार्वेकरविधानसभा अध्यक्षांनी निरीक्षणे नोंदवत म्हटले की, शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे.एकनाथ शिंदेंना पदावरून हटवण्याचा अधिकार ठाकरेंना नाही – नार्वेकरपक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत.

पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे. असं झालं तर पक्षाला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोल शकणार नाही. शिवसेनेच्या घटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे. शिवसेना पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाहीत. शिवसेना नेतृत्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगानं दिलेला निकाल स्पष्ट आहे, पक्षात बंडखोरी झाल्यानंतर खरा पक्ष कोणाचा हा मुद्दाही विचारात घेणं महत्त्वाचं होतं, असंही नार्वेकर म्हणाले.

निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे – नार्वेकर

नार्वेकर म्हणाले की, 23 जानेवारी 2018 रोजी कुठलीही संघटनात्मक निवडणूक झालेली नव्हती. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार शिंदे गटाची शिवसेना खरी आहे. तेच समोर ठेवलं गेलं. 21 जून 2022 ला जे झालं ते समजून घेतलं पाहिजे, त्या दिवशी शिवसेना फुटली. 2013 आणि 2018 ला शिवसेनेत अंतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. दोन्ही गट आपणच असली शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिलीय, ते समोर ठेवलं गेलं आहे.

खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच : नार्वेकर

नार्वेकर म्हणाले की, 23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली नाही. 21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेनेत दोन गट पडल्याचं 22 जून रोजी लक्षात आलं. नेतृत्त्वाची रचना तपासण्यापुरताच पक्षघटनेचा आधार आहे, खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच आहे.

“शिवसेनेची 1999 सालची घटनाचं वैध – नार्वेकर

2018 सालची घटना ग्राह्य धरण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. पण, 2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची 1999 सालची घटना असून तीच ग्राह्य धरली जाईल. 2018 सालची घटना ग्राह्य धरा ही ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात आली आहे, असेही नार्वेकर म्हणाले.

पक्षाचा प्रमुख कोण, एवढंच मी ठरवणार – नार्वेकर

10व्या शेड्युलनुसार मला फक्त राजकीय नेतृत्व बघायचं आहे. पक्षाचा प्रमुख कोण, एवढंच मी ठरवणार आहे. 2018 मध्ये पक्षांतर्गत निवडणूक झाली नाही म्हणून तेव्हाची घटनादुरुस्ती चूक आहे. असेही नार्वेकर म्हणाले.

2018ची ठाकरे गटाची घटनादुरुस्ती नियमबाह्य

2018ला ठाकरे गटाने केलेली घटनादुरुस्ती नियमबाह्य आहे. 2023 ला जी घटना दिली तीच ग्राह्य धरत असल्याचेही नार्वेकर म्हणाले. ते म्हणाले की, उलटतपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र अमान्य करत आहे.

दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या- नार्वेकर

खरी शिवसेना कोणती यावर निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी म्हटले की, “शिवसेनेची घटना काय आहे आणि त्यानुसार पक्ष कुणाचा याचा अभ्यास, निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटात मतभेद आहेत. 2018 सालची घटना ही यामध्ये महत्त्वाची मानली आहे. घटनेच्या 10व्या सुचीनुसार शिवसेना कुणाची? अधिकृत व्हीप कुणाचा? बुहमत कुणाचं हे ठरवणं होतं, 2018 मधील घटनेच्या दुरुस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळी केलेली घटनादुरूस्ती ही त्यावेळी सर्वांच्या संमतीने. घटना, नेतृत्व, विधिमंडळ पक्षाचं बहुमत, हे पक्ष ठरवताना महत्वाचे घटक होते. 2018 ची घटना ग्राह्य धरणार.

“आधी पक्ष कोणाचा याचा निर्णय देणार- नार्वेकर

विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना सर्वात आधी खरी शिवसेना कोणती हे ठरवणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. यानंतरच आमदार अपात्रतेबाबत ते निर्णय देणार आहेत.

सह्याद्रि हॉस्पिटल्सने अतिशय दुर्मिळ फ्रोझन एलिफंट ट्रन्क सर्जरी यशस्वी करून महत्त्वाचा टप्पा पार केला

पुणे, १० जानेवारी २०२४: वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी यश संपादन करत, सह्याद्रि हॉस्पिटल्सने फ्रोझन एलिफंट ट्रन्क ही गुंतागुंतीची सर्जिकल प्रक्रिया यशस्वीपणे केली आहे. ही अनोखी आणि दुर्मिळ प्रक्रिया हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा करण्यात आली आहे. ५५ वर्षे वयाच्या महिला रुग्णावर करण्यात आलेल्या या प्रक्रियेमध्ये क्रोनिक एओर्टिक डिससेक्शन ठीक करण्यात आले, जे गेला बराच काळ दुर्लक्षिले गेले होते.

या रुग्ण महिलेला सुरुवातीला काहीच लक्षणे जाणवत नव्हती, सखोल तपासणी केल्यानंतर लक्षणे आढळून आली आणि क्रोनिक एओर्टिक डिससेक्शन झाल्याचे समजले. त्यामुळे एओर्टा (महाधमनी) मोठ्या प्रमाणात पसरली होती. सर्वसामान्यतः ती २५ ते ३० मिलीमीटर असते तर या केसमध्ये ती दुप्पट म्हणजे ६० मिलीमीटर इतकी झाली होती. गांभीर्य आणि तीव्रता लक्षात घेऊन डॉ. स्वप्नील कर्णे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने विस्तारलेली एओर्टा बदलण्यासाठी आणि प्रॉक्सिमल डिसेंडिंग एओर्टा ठीक करण्यासाठी फ्रोझन एलिफंट ट्रन्क प्रक्रिया करण्याचे ठरवले.

फ्रोझन एलिफंट ट्रन्क प्रक्रियेमध्ये विस्तार पावत असलेली संपूर्ण एओर्टा बदलली जाते, यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचा देखील समावेश असतो. या केसमध्ये रुग्ण महिलेची संपूर्ण रक्ताभिसरण संस्था तात्पुरती जवळपास २० मिनिटे थांबवण्यात आली होती आणि त्या वेळेत आवश्यक ग्राफ्ट्स इम्प्लांट करण्यात आले. या दरम्यान रुग्णाच्या मेंदूला सातत्याने रक्तपुरवठा होत राहावा यासाठी एक अँटीग्रेड सेरेब्रल पर्फ्यूजन तंत्र वापरण्यात आले. ही सर्जरी कित्येक तास सुरु होती, त्यामध्ये कमालीचा अचूकपणा आणि उच्च कुशल विशेषज्ञांच्या टीमची गरज होती. या प्रक्रियेतील अतिशय महत्त्वाचा घटक, फ्रोझन एलिफंट ट्रन्कची किंमत खूप जास्त असते. पण हा एक टिकाऊ उपाय आहे आणि भविष्यात काही उपचार करण्याची गरज पडली तर त्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म म्हणून वापरता येऊ शकतो.

पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्डियाक ऍनेस्थेटिस्ट डॉ शंतनू शास्त्री यांनी सांगितले, “अशाप्रकारची अतिशय नाजूक शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत दक्ष दृष्टिकोन असणे आवश्यक असते, खासकरून मेंदूच्या रक्तपुरवठ्याच्या नाजूक गुंतागुंतीचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा विशेष सावधगिरी बाळगावी लागते. या केसमध्ये आम्ही ब्लीडींगचे व्यवस्थापन अतिशय काळजीपूर्वक केले, प्रगत मॉनिटरिंग तंत्रे वापरली आणि रुग्णाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी सेरेब्रल प्रोटेक्शन उपायांचा अवलंब केला. शस्त्रक्रियेनंतर कोणत्याही न्यूरॉलॉजिकल समस्या न उद्भवता रुग्णाची तब्येत ठीक झाली ही बाब आमच्या दृष्टिकोनाचा प्रभाव दर्शवते. सुयोग्य पद्धतीने नियंत्रित केलेले ब्लीडींग आणि सर्वसमावेशक रिकव्हरी प्लॅनचा अवलंब यामुळे अगदी पाच ते सहा दिवसात या रुग्ण महिलेची तब्येत स्थिर झाली.”

पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्डिओ थोरॅसिस सर्जन डॉ स्वप्नील कर्णे म्हणाले, “हृदयातील महाधमनीमधील बिघाडामुळे गंभीर आणीबाणीचा सामना करताना आम्ही फ्रोझन एलिफंट ट्रंक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. या नाजूक सर्जरीमध्ये विस्तार पावत असलेली महाधमनी बदलून, खालच्या थोरॅसिस एओर्टावर उपचार करण्यात आले, त्यामुळे रुग्णाची रक्ताभिसरण संस्था स्थिर राहिली. तपासणी आणि सर्जरीपासून ते शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची देखभाल करेपर्यंत, आमच्या कुशल टीमने केलेल्या सहयोगपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश मिळाले, त्यामुळेच ही रुग्ण महिला तब्येत पूर्ण बरी झाल्यानंतर सर्वसामान्य जीवन जगू शकेल.”

अशाच प्रकारच्या एका केसचे उदाहरण देताना डॉ स्वप्नील कर्णे यांनी सांगितले, “हल्लीच आम्ही हाताळलेल्या, अशाचप्रकारच्या एका केसमध्ये ॲक्युट एओर्टिक डिससेक्शन असलेल्या ६२ वर्षांच्या रुग्णाच्या बाबतीत तातडीने उपचार करणे भाग होते. एओर्टाच्या डिससेक्ट झालेला होता, त्यामुळे शरीराचा खालचा भाग आणि मेंदू यांना होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होऊ शकत होता. अशा केसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो वेळ, प्रत्येक मिनिट रुग्णाच्या जीवाला असलेला धोका वाढवते. हल्लीच्याच दुसऱ्या लक्षणे दिसून येत नसलेल्या आणि फ्रोझन एलिफंट ट्रन्कने उपचार केलेल्या केसमध्ये आम्ही एओर्टाचा संपूर्ण वरचा भाग, एओर्टाचा कमानीसारखा भाग आणि जवळची खालची एओर्टा यांच्या ऐवजी एक स्वतंत्र ग्राफ्ट बसवला. पण ॲक्यूट डिससेक्शनमध्ये फक्त वरच्या एओर्टाचा डिससेक्टेड भाग बदलला जातो. यशस्वी परिणाम मिळवण्यासाठी ही स्थिती लवकरात लवकर लक्षात येणे आणि त्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे असते.”

सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये क्रांतिकारी फ्रोझन एलिफंट ट्रंक प्रक्रिया यशस्वी झाल्याचे संपूर्ण श्रेय समर्पित आणि कुशल वैद्यकीय टीमचे आहे. कार्डियाक सर्जन डॉ स्वप्नील कर्णे या नेतृत्वाखालील या टीममध्ये कार्डियाक सर्जन डॉ सुमित अगस्ती होते ज्यांनी या नाजूक सर्जिकल इंटरव्हेन्शनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, त्याचप्रमाणे अनुभवी कार्डियाक ऍनेस्थेशिओलॉजिस्ट डॉ शंतनू शास्त्री यांनी या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रुग्णाची सुरक्षितता आणि आराम याची काळजी घेतली. कार्डियाक पर्फ्यूशनिस्ट श्री प्रशांत धुमाळ यांनी तात्पुरत्या बंद काळात रक्ताभिसरण संस्थेचे व्यवस्थापन अतिशय कुशलपणे केले. या सर्वांनी मिळून हे अभूतपूर्व सर्जिकल यश संपादन करण्यात मोलाचे योगदान दिले.

फ्रोजन एलिफंट ट्रंक म्हणजे काय? : एफईटी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया एओर्टिक डिससेक्शनच्या गंभीर केसेसमध्ये वापरली जाते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, यामध्ये महाधमनीच्या दुबळ्या झालेल्या भागाच्या ऐवजी एक स्पेशल ग्राफ्ट बसवला जातो, त्यासाठी रक्तपुरवठा तात्पुरता थांबवला जातो. यामुळे ब्रांच व्हेसल ग्राफ्टिंगमार्फत मेंदूला रक्तपुरवठा होत राहतो आणि अँटीग्रेड सेरेब्रल पर्फ्यूजनसह मेंदूच्या कार्याचे देखील रक्षण केले जाते. सर्जरीनंतर रुग्णाला ब्लीडींग होऊ नये आणि तब्येत नीट बरी व्हावी याची काळजी घेतली जाते. एफईटी प्रक्रिया हा एक टिकाऊ उपचार आहे आणि भविष्यात गरज लागल्यास संभाव्य उपचार करता येऊ शकतात, गुंतागुंतीच्या एओर्टिक स्थितींवर उपचार करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

१२८ व्या जयंती दिनी संग्रहालय महर्षी कै.दिनकर केळकर यांना अभिवादन

पुणे :जगातील अद्वितीय असे राजा दिनकर केळकर संग्रहालय उभारणाऱ्या ज्येष्ठ संग्राहक कै.दिनकर केळकर यांना त्यांच्या १२८ व्या जयंती दिनी केळकर संग्रहालयात पुणेकरांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.गुरुवारी,दि १० जानेवारी रोजी सकाळी कै.दिनकर केळकर यांच्या पुतळ्याला दिनकर केळकर यांचे पुतणे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ.श्रीकांत केळकर,सौ.अरुणा श्रीकांत केळकर ,केळकर संग्रहालयचे संचालक डॉ.सुधन्वा रानडे यांनी पुष्पहार अर्पण केला.श्याम भुर्के आणि डॉ. श्रीकांत केळकर यांनी दिनकर केळकर यांच्या योगदानाची माहिती दिली.
एच.व्ही. देसाई महाविद्यालयानेही १o जानेवारी हा दिन ‘ संग्रहालय महर्षी दिन ‘ म्हणून साजरा केला.

सुरेंद्र रानडे,संग्रहालयातील कर्मचारी,पुणेकर नागरिक यावेळी उपस्थित होते. संग्रहालय पाहायला आलेल्या विद्यार्थी,नागरिकांना त्यांनी कै.दिनकर केळकर यांच्या संग्राहक वृत्तीची आणि ध्यासाची माहिती दिली.

ध्यासातून संग्रहालय उभारणारे दिनकर केळकर

पुण्यात आलेल्या कोणत्याही पाहुण्यांनी किंवा सुटीत मुलांनी भेट देण्यायोग्य जागा म्हणजे राजा दिनकर केळकर संग्रहालय. पुरातन वस्तूंचा एवढा प्रचंड संग्रह, तो पण एकाच व्यक्तीच्या व्यासंगातून केलेला, बहुतेक इतर कुठेही बघायला मिळायचा नाही.डॉ. दिनकर केळकर यांनी एक छंद म्हणून हा संग्रह एकत्र केला. ज्येष्ठ बंधुंसोबत ते चष्म्याचे दुकान चालवत होते. ऐतिहासिक कविता करत असताना केळकरांना आपल्या वस्तू संग्रहाच्या अनोख्या छंदाने साद घातली. १९२० मध्ये पेशव्यांचे एकेकाळचे सावकार दीक्षित पटवर्धन यांच्याकडील एक लघुचित्र त्यांनी मिळवले. ही केळकर संग्रहालयाची पहिली कलाकृती ठरली. पुढे ते जुन्या वाड्यांचे कलाकुसर असलेले दरवाजे आणि खिडक्या जमा करू लागले.

थोरले बाजीराव पेशवे यांनी बांधलेला मस्तानी महालानंतरच्या काळात दुरवस्थेत होता. तो जसाच्या तसा आणून, दुरुस्ती करून, त्याला पूर्ववत झळाळी आणून आपल्या संग्रहालयात उभा केला. अशा या केळकरांच्या अफाट संग्रहाला आधी त्यांच्या राजा या, लहान वयातच मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव त्यांनी दिले. ‘राजा संग्रह’ असे सुरवातीचे नाव होते. पुढे त्याचे ‘राजा केळकर हिस्टॉरिकल कलेक्शन’ आणि तदनंतर ‘राजा दिनकर केळकर संग्रहालय’ असे नाव रूढ झाले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या संग्रहालयाला भेट दिली आहे.

वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना गदिमा त्यांना येथे घेऊन आले. भारावून जाऊन आणि संग्रहालयाचे महत्त्व लक्षात घेऊन वसंतरावांनी, ‘याचे लोकार्पण करा, आम्ही हे पुढे सांभाळू’ अशी तयारी दाखवताच एका सहीनिशी केळकरांनी १२ एप्रिल १९७५ ला संग्रहालयाचे लोकार्पण केले. दिनकर केळकरांना १९७८ मध्ये पुणे विद्यापीठाने डी. लिट. पदवीने सन्मानित केले. १९८१ मध्ये पद्मश्री हा सन्मानही मिळाला.

आज त्यांचे नातू सुधन्वा रानडे हे या संग्रहालयाची धुरा सांभाळत आहेत. वस्तूसंग्रह २४ हजार वस्तुंपेक्षा जास्त आहे. जागेअभावी त्यातील ११ टक्के वस्तूच लोकांना बघता येतात. अर्थातच आता नवीन जागेत भव्य असे संग्रहालय बांधायचा संकल्प रानडे यांनी सोडला आहे. त्यासाठी राज्य सरकारने बावधन बुद्रूक येथे मोठी जागा उपलब्ध करून दिली आहे

लिंगभेदासंदर्भातील कायद्यावर चर्चा

पुणे:

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या जेंडर सेंन्सटायझेशन सेल तर्फे आयोजित ‘लॉज ऑन जेंडर जस्टिस’ विषयावरिल चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाला. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या चर्चासत्रात विधार्थी, प्राद्यापक सहभागी झाले.

लिंगभेदासंदर्भातील कायद्यावर चर्चा करण्यात आली .’भरोसा सेल ‘ क्राईम ब्रँचच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना कट्टे,सह पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर यांनी मार्गदर्शन केले.भारती विद्यापीठ विधी विद्याशाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उज्ज्वला बेंडाळे, उपप्राचार्य डॉ. ज्योती धर्मा, फॅकल्टी को- ऑर्डिनेटर डॉ. राजलक्ष्मी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र पार पडले.

महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक या समाजातील असुरक्षित घटकांची सुरक्षा आणि त्यांचे अधिकार यावर मार्गदर्शन करण्यात आले. समाजात जागृती घडवून आणण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

पुणे, दि. १० : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई वाहिनीवर कि.मी ९.८०० (पनवेल एक्झिट) आणि कि.मी २९.४०० ( खालापूर टोल प्लाझा व मडप बोगद्यादरम्यान) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ११ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १.३० वा ते दुपारी ३.३० या वेळेत करण्यात येणार आहे.

या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलकी तसेच जड-अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील. वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. पुण्याहुन मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बसेस ही खोपोली एक्झिट कि.मी ३९.८०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्ग वरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील.

तसेच पुण्याहुन मुंबईकडे जाणारी हलकी व जड अवजड वाहने ही खालापूर टोल नाका येथील डाव्या बाजूकडील शेवटची लेन खालापूर एक्झिट येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून खालापूर शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

सैनिक कल्याण विभागात माजी सैनिकांतून पदभरती

पुणे, दि.१० : सैनिक कल्याण विभागाच्या घोरपडी येथील कार्यालयात ‘लिपिक टंकलेखक’ पदे करार पद्धतीने भरण्यात येणार असून या पदासाठी माजी सैनिकांना २२ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्यासंबंधित विविध प्रकारच्या कामकाजाकरीता सैन्य सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नियुक्ती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधनावर करण्यात येणार आहे. उमेदवाराकडे मराठी टंकलेखन वेग प्रती मिनीट किमान ३० शब्द व इंग्रजी टंकलेखनाचा वेग प्रती मिनीट किमान ३० किंवा ४० शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र असावे.

इच्छुक उमेदवारांनी संचालक, सैनिक कल्याण विभाग, रायगड इमारत, राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, घोरपडी, पुणे-४११००१ येथे अर्ज करावा. अर्जासोबत सैन्य सेवेतील पीपीओ, डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र व मराठी, इंग्रजी टंकलेखनाच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत जोडावी.

विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी पत्राद्वारे, ई-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे, अशी माहिती सैनिक कल्याण विभागाचे राज्याचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड (निवृत्त) यांनी केले आहे.

राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची पदे टप्प्याटप्प्याने भरण्यास मान्यता

मुंबई-राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त 2863 पदे तसेच सहाय्यभूत 11 हजार 64 पदे निर्माण करण्याबाबत व 5 हजार 803 मनुष्यबळ बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास आणि या मंजूर पदांवरील भरती टप्प्याटप्प्याने करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

नॅशनल कोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम कमिटी (NCMSC) ने शिफारस केलेल्या दुय्यम न्यायाधीशांच्या 3211 पदांची शिफारस करतांना महाराष्ट्रात 2012 पदे मंजूर होती. त्यानंतर 348 पदे मंजूर करण्यात आली असून सद्य:स्थितीत मंजूर पदसंख्या 2360 एवढी आहे. त्यास अनुसरुन आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये दुय्यम न्यायालयातील न्यायाधीशांच्या 3211 पदांपैकी महाराष्ट्रात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त 2863 पदे तसेच त्यांचेसाठी सहाय्यभूत 11 हजार 64 पदे निर्माण करण्याचा व 5803 मनुष्यबळ बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मंजूर पदांवरील भरती ही टप्याटप्याने करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त २२ जानेवारी पासून 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा

मुंबई-श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त २२ जानेवारी पासून साखर, खाद्यतेल, चनाडाळ, रवा, मैदा आणि पोहे या ६ वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना देण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कु़टुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे या सहा वस्तूंचा समावेश असलेला संच “आनंदाचा शिधा” म्हणून वितरित करण्यात येणार आहे.या वितरणाकरीता येणाऱ्या 549.86 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहिनांना एक लाख रुपयांचे अनुदान

मुंबई- पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून ५० हजार रुपयांवरुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

केंद्र व राज्य शासनाने सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटूंबांना घरे उपलब्ध करुन देण्याची महत्वकांक्षी मोहिम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते.
तथापि, या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते. ही बाब विचारात घेऊन, राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु, बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटूंबांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे सद्य:स्थितीत जागांच्या किंमती पाहता, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान १ लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पीसीसीओईचे पारिठेवाडीत श्रम संस्कार शिबिर

विविध सामाजिक उपक्रमातून केली जनजागृती

पुणे (दि.१० जानेवारी २०२४) पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय निगडी (पीसीसीओई) यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत इंगळुन-पारिठेवाडी, तालुका मावळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. या मध्ये अनेक सामाजिक उपक्रमातून जनजागृती करण्यात आली. सात दिवस झालेल्या या निवासी शिबिरात एकुण ६० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये लोकसंख्या जागरुकतेवर भित्तीचित्रे, ग्रामस्थांमध्ये मतदान जनजागृती, ग्राम स्वच्छता, शाळा डागडुजी, शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रिडा स्पर्धा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन, शिवराज्याभिषेक सोहळा, सापाविषयी समज, गैरसमज व विविध विषयांवर व्याख्याने, अंधश्रद्धा निर्मूलन, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबीर, पथनाट्य अशा उपक्रमांचा समावेश होता. येथील शाळेला आवश्यक असणारे संगणक संच आणि क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
या विशेष श्रम संस्कार शिबिराला पीसीईटीचे विश्वस्त नरेंद्र लांडगे, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, विद्यार्थी कल्याण व विकास अधिष्ठाता डॉ. प्रविण काळे यांनी भेटी देऊन विशेष कौतुक केले. शिबिराच्या समारोप प्रसंगी इंगळुन पारिठेवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य तसेच, प्राध्यापक, गावकरी उपस्थित होते. नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी दिनेश कुटे व विद्यार्थी प्रतिनिधी अभिजित बनसोडे यांनी केले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, विद्यार्थी कल्याण व विकास अधिष्ठाता प्रविण काळे, सामाजिक कार्यकर्ते गोरख भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

एक लाख पुणेकर करणार रामरक्षा पठण

पुणे, ता. 10 – अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने एक लाख पुणेकर स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या रविवारी सकाळी साडेसात वाजता रामरक्षा पठण करणार असल्याची माहिती निमंत्रक हेमंत रासने यांनी कळविली आहे.

रासने म्हणाले, भक्तिसुधा फाउंडेशन आणि समर्थ व्यासपीठ या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्रीरामासाठी नमन, देशासाठी समृद्धी आणि सैनिकांसाठी बल अशा तीन संकल्पांसाठी तीन वेळा पठण केले जाणार आहे. स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या आश्रमातील शिष्य रामरक्षा पठणाचे नेतृत्व करणार आहेत.

रासने पुढे म्हणाले, लक्ष्मणाचार्य रचित रघुपती राघव राजाराम या मूळ पदाचे प्रथमच सादरीकरण केले जाणार आहे. आशिष केसकर यांचे संगीत असून चारुदत्त आफळे गायन करणार आहेत. अभिनेते राहूल सोलापूरकर रामजन्मभूमीचा इतिहास सांगणार आहेत. अधिकाधिक पुणेकरांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा.

मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार

मिशन महाविजय २०२४ अंतर्गत मुंबई भाजपा लोकसभा निवडणूक संचालन समितीची पहिली बैठक

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

निवडणूक संचालन समितीचे समन्वयक म्हणून अतुल भातखळकर यांची नियुक्ती

मुंबई दिनांक १० जानेवारी २०२४
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिशन ‘महाविजय २०२४’ अंतर्गत मुंबई भाजपा लोकसभा निवडणूक संचालन समितीची पहिली बैठक केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथील मुंबई भाजपा कार्यालयात आज पार पडली. मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

या बैठकीदा कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, खा. पूनम महाजन लोकसभा निवडणूक संचालन समितीचे संयोजक आ. अतुल भातखळकर, आ. प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपा आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. याच अनुषंगाने मुंबई लोकसभा निवडणूक समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्षपद मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्याकडे असून आ. अतुल भातखळकर संयोजक, तर संजय उपाध्याय, आ. सुनील राणे, आ.अमित साटम आणि आ. योगेश सागर यांना सह- संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याशिवाय विविध प्रकारचे ३६ विभाग तयार करण्यात आले असून, त्याची जबाबदारी अंतर्गत पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. मोदी सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. ही विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरू आहे. लोकसभा, विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. तसेच संघटनात्मक बांधणीवर जोर दिला जात आहे. बुथ समित्या अधिक सक्षम करून पक्षाने दिलेले कार्यक्रम अधिक व्यापक नियोजन करुन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले जात आहे. आज प्रथम संयोजन समितीची बैठक झाली. त्यानंतर या समितीच्या कोअर गृपने मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघाचा त्या मतदार संघाचे खासदार, आमदार आणि जिल्हा अध्यक्ष, महामंत्री यांच्याकडून आढावा घेतला.

टिफिन बैठक

आजच्या बैठकीला सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार स्वतः च्या घरुन जेवणचा डबा घेऊन आले होते. मुख्य आढावा बैठक झाल्यानंतर मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात टिफिन बैठकही पार पडली. प्रत्येकाने आणलेले पदार्थ एकमेकांना देऊन सहभोजनाचा आनंद यावेळी घेण्यात आला.

चौघा ज्येष्ठांकडून काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा यशस्वी- ३२ दिवसांत ३८०० किलोमीटरचा प्रवास केला पूर्ण

विविध संस्थांच्या वतीने सायकलस्वारांचा सत्कार व अनुभव कथन;
पुणे : भारताच्या उत्तर टोकाकडून दक्षिण टोकाकडे कोणत्याही बाह्य साहाय्याविना चौघा ज्येष्ठांनी सायकलवारी करीत ‘ज्ञान की ज्योत’मधून तंदुरुस्त भारत, नवीन शिक्षण धोरण याबाबत जागृती केली. काश्मीर ते कन्याकुमारी असा ३८०० किलोमीटरचा सायकल प्रवास या चार ज्येष्ठांनी अवघ्या ३२ दिवसांत पूर्ण केला. त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल पुण्यातील विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या अनुभव कथनाने उपस्थित भारावून गेले.

पुण्यातील संजय कट्टी (६५ वर्ष) आणि मोनिष चक्रवर्ती (५२ वर्ष), तर डेहराडूनचे अनुभवी जोडपे विश्व धीमान (वय ७० वर्षे) आणि कमलजीत सिंग (वय ७४ वर्षे) यांनी हा महत्त्वाकांक्षी आणि आव्हानात्मक स्वयं-समर्थित (कोणतेही बॅकअप वाहन नाही) अशी ही सायकलिंग मोहीम श्रीनगर (काश्मीर) ते कन्याकुमारी (तामिळनाडू) यशस्वीपणे पूर्ण केली.

हाबिन्सन पर्सनॅलिटी अँड आंत्रप्रेन्युअर स्कुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाउंडेशन, पुणे विद्यार्थी गृह, अस्पायर स्किल्स आणि यंग सिनियर्स या संस्थांच्या वतीने पुण्यातील सायकलस्वार संजय कट्टी, मोनिष चक्रवर्ती यांचा सत्कार करण्यात आला. पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, संचालक सुनील रेडेकर, हाबिन्सनचे संस्थापक अदनान सिद्दीकी, यंग सिनिअर्सचे भुवनेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यंग सिनीयर्स ग्रुपच्या गौरी पटवर्धन यांनी संजय कट्टी आणि मोनिष चक्रवर्ती यांची ओळख करून दिली व त्यांच्या विविध सायकल आणि गिर्यारोहण मोहिमांची माहिती दिली. पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी अफान शेख आणि आदित्य पाटील यांनी कट्टी व चक्रवर्ती यांची मुलाखत घेत सायकल सफरी, गिर्यारोहण, त्यासाठी लागणाऱ्या मानसिक आणि शारिरीक तयारीबद्दल जाणून घेतले. कार्यक्रमासाठी यंग सिनीयर्सचे लोकेश मराठे व डॉ. अपर्णा कुलकर्णीं यांनी विशेष सहकार्य केले. यंग सिनीयर्सचे दत्तात्रेय गोखले, सुप्रिया चक्रवर्ती, यतीन जोशी, गौतम भिंगानिया, हेमा राव उपस्थित होते. इलेक्ट्रोमेडिक्सचे ठाकूरदेसाई व स्वानंद यात्राचे सौरभ कुलकर्णी उपस्थित होते. यंग सिनियर सायकलिस्ट ग्रुपचे प्रीती म्हस्के यांनी संजय कट्टी यांचे, तर प्रा. दत्ता गोखले यांनी चक्रवर्ती यांचे कौतुक केले.

संजय कट्टी म्हणाले, “या सायकलिंग मोहिमेची ‘सक्षम बनो, तंदुरस्त रहो, हम फिट तो भारत फिट, जय हिंद’ ही घोषणा होती. भारताच्या उत्तर ते दक्षिण सायकल मोहिमेची सुरुवात लाल चौक (श्रीनगर) येथून २७ नोव्हेंबरला झेंडा दाखवून झाली आणि १ जानेवारी २०२४ रोजी विवेकानंद स्मारक (कन्याकुमारी) येथे सूर्योदयास समारोप झाला. या ३२ दिवसांत ३८७० किलोमीटर सायकल चालवून १२ राज्ये पार केली आहेत. या प्रवासात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आणि प्रमुख शहरे पार करताना अनेक चांगले अनुभव आले.”

“ज्ञान मिळवा व इतरांना समृद्ध करा, तंदुरुस्त राहा व इतरांना प्रेरित करा, या संदेशाचा प्रचार करत आम्ही जम्मू-काश्मीर (श्रीनगर), पंजाब (अमृतसर, लुधियाना, अंबाला), हरियाणा (पानिपत), दिल्ली (नवी दिल्ली), उत्तर प्रदेश (आग्रा, मथुरा, झाशी), मध्य प्रदेश (सागर), महाराष्ट्र (नागपूर), तेलंगणा (हैदराबाद), आंध्र प्रदेश (अनंतपूर), कर्नाटक (बेंगळुरू), तामिळनाडू (सालेम, मदुराई आणि कन्याकुमारी) असा प्रवास केला. अनेक ठिकाणी आमचे स्वागत व सत्कार झाले,” असे मोनीष चक्रवर्ती यांनी नमूद केले.

सुनील रेडेकर म्हणाले, “संपूर्ण भारतभर सायकलिंगचा अनुभव असलेल्या महाराष्ट्र आणि उत्तराखंडमधील (पुणे आणि डेहराडून) मल्टिस्टेट सदस्यांनी या मोहिमेत उत्तमप्रकारे सहभाग घेतला. ६६ वर्षांच्या सरासरी वयाच्या टीमने हे आव्हानात्मक मिशन पूर्ण करीत ज्येष्ठ नागरिकांसमोर एक उदाहरण ठेवले आहे.”

भुवनेश कुलकर्णी म्हणाले, “डेहराडूनच्या सायकलस्वार जोडप्याने मोठ्या जोमाने आणि उत्साहाने काश्मीर ते कन्याकुमारी मोहिम यशस्वीपणे पूर्ण केली. श्रीमती विश्व धीमान या डेहराडूनच्या बायसायकल महापौर देखील आहेत.”

अदनान सिद्दीकी यांनी स्वागत प्रास्ताविक करताना सांगितले की, या चौघा ज्येष्ठांनी आपल्या सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद व प्रेरक अशी आहे. त्यांच्या अनुभव कथनाने आपण सारेच समृद्ध झालो आहोत.

“आम्ही ज्येष्ठ नागरिकांना तंदुरुस्त, आनंदी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी प्रेरित करत राहू इच्छितो. तसेच तरुणांनी उच्चशिक्षित व्हावे आणि भारताला अभिमान वाटेल असे काम करावे याचीही प्रेरणा देण्याचे काम उत्तरोत्तर करत राहू.”
– संजय कट्टी, ज्येष्ठ सायकलस्वार

डेक्कन परिसरात सव्वा कोटींच्या विकास कामांना प्रारंभ-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे :आमदार विशेष निधीतून छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भांडारकर रोड, प्रभात रोड, डेक्कन जिमखाना परिसर येथे १ कोटी ३० लक्ष रुपयांच्या विकास कामांना सुरुवात करण्यात आली.

या भागातील ड्रेनेज लाईन विकसित करणे, रस्ते डांबरी करणे यासाठी हा निधी खर्च केला जाणार असून या कामामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे,असे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी सांगितले.
या परिसरातील नागरिक माझे वडील नगरसेवक असल्यापासून आमच्याआणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. मी नगरसेवक असताना सुद्धा याठिकाणी बरीच विकास कामे मला करता आली याचा आनंद आहे. या भागातील नागरिकांनी ही कामे मला करण्याची संधी दिल्याबद्दल मी नेहमीच त्यांच्या विषयी कृतज्ञ राहील, अशी भावना आ.शिरोळे यांनी व्यक्त केली.

माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार अनेक विकासाची कामे करत आहे आणि यापुढेही विकासाची गंगा अशीच पुढे सुरू राहील असा विश्वास आ.शिरोळे यांनी व्यक्त केला.

यावेळी संयोजक सुनील पांडे (लोहगांवकर), रविंद्र साळेगावकर, गणेश बगाडे, अभिजीत मोडक, समीर हलंदे,रमेश गिरमकर, निलेश घोडके,योगेश जोगळेकर, दशरथ कदम, जोंधळे,मिलिंद टकले, हर्षल मोरे,नरेंद्र उर्फ नाना मोरे, अपूर्व सोनटक्के, दत्तात्रय फंड,श्रीधर खांडेकर, दिलीप हर्डीकर, सिद्धार्थ भोंडे, बाळा गिराम, राशिकर करमकर, मिलिंद जोगदंड, सचिन वाडेकर, अपर्णाताई कुऱ्हाडे, अनिल भिसे, राजेश नायडू, सुजित गोटेकर, रविराज यादव, रोहित लींबोळे,सुरेश उर्फ काका धर्मावत, मुकेश राठोड, ॲड. दिलीप आठवले,किशोर गोडबोले, राजेंद्र जोगळेकर, डॉ. संजीव दातार,दिनेश बर्वे, विद्याताई भोपटकर, विलास राठोड, राजकुमारी जैन, अभयसिंह धाडवे पाटील, निरंजन गोडबोले, संग्राम चाफेकर,जालिंदरनाथ मोरे, विजयकुमार सिंग तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.