Home Blog Page 1144

जैन तेरापंथ धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांचा पुणे दौरा 

आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीच्या वतीने आयोजन; सद्भावना, नैतिकता, नशामुक्तीसाठी करणार मार्गदर्शन
पुणे : जैन तेरापंथचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांचा पुणे दौरा दि. २८ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत होणार आहे. या पुणे दौर्‍यानिमित्त त्यांचे अभिवादन करण्यासाठी शुक्रवार, दि.२९  मार्च रोजी भव्य अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगाधाम चौकापासून वर्धमान सांस्कृतिक केंद्रापर्यंत भव्य यात्रा काढण्यात येणार आहे. नशामुक्त भारत आणि  नशामुक्त पुणे या अभियानांतर्गत या दौर्‍यामध्ये आचार्य श्री महाश्रमणजी  मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीचे संजय मरलेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला पं. वसंतराव गाडगीळ, संजय मरलेचा, धनपतराज कटारिया, सुरेंद्र कोठारी, दिनेश खिंवसरा, सुमन मरलेचा, पपीता मरलेचा उपस्थित होते. अभिवादन रॅलीमध्ये मोठ्या संख्येने जैनबांधव सहभागी होणार आहेत.

अभिवादन यात्रेनंतर दि. ४ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ९.३० वाजल्यापासून आचार्य श्री महाश्रमणजी यांचे प्रवचन होईल. मंगळवार, दि. २ एप्रिल रोजी कोंढव्यातील तेरापंथ भवन या वास्तूमध्ये येथे आचार्य
श्री महाश्रमणजी यांचा प्रवेश होणार आहे.

आचार्य श्री महाश्रमण जी यांनी जनकल्याण आणि राष्ट्राच्या चारित्र्य निर्माणासाठी पदयात्रा करत सद्भावना, नैतिकता, व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे. आतापर्यंत नेपाळ, भूतान, भारतातील२३ राज्यात ६० हजार कि.मी. पेक्षाही अधिक पदयात्रा त्यांनी केली आहे. त्यांच्या प्रेरणेने लाखो लोक व्यसनमुक्त झाले आहेत.

दि. २८ मार्च रोजी खड़की आलेगांवकर शाला, दि. २९ मार्च ते २ एप्रिल वर्धमान सांस्कृतिक भवन आणि २ एप्रिल तेरापंथ भवन, दि. ३ एप्रिल रोजी मगनकुंज, कल्याणी नगर आणि दि. ४ एप्रिल रोजी वाघोली येथे कार्यक्रम होणार आहेत. आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समिति एवं समस्त तेरापंथ समाज पुणे, श्री भिक्षु मेमोरियल फाउंडेशन, तेरापंथ युवक परिषद, तेरापंथ महिला मंडळ, तेरापंथ प्रोफेशनल फोरम, अनुव्रत समिती आणि सर्व तेरापंथ समाज यामध्ये सहभागी झाला आहे.

सुधीर मुनगंटीवार :चंद्रपुरात महायुतीचा पहिला उमेदवारी अर्ज

चंद्रपूर-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या लढत होणार आहे. सुधीर मुनगंटीवार हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आज पर्यंत कधीही एवढ्या प्रचंड मतांनी उमेदवार निवडून आला नसेल, तेवढ्या मतांनी मुनगंटीवार निवडून येणार असल्याचा विश्वास या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वेळी व्यक्त केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी इतिहास रचला जाणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. वास्तविक सुधीर मुनगंटीवार हे या मतदारसंघासाठी इच्छुक नव्हते. मला केंद्रात नव्हे तर राज्यातच लोकांची कामे करायची आहे, असे त्यांनी आधीच सांगितले होते. मात्र, तरी देखील भाजपच्या पहिल्याच यादीत सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे विरोधकांनी देखील भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. मात्र, आता पक्षाने उमेदवारी दिली असून पक्षाने दिलेले आदेश हे सर्वतोपरी मान्य करत सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रचाराला जोरदार सुरुवात केली. त्यानुसार त्यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2019 मधील मागील निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला होता. सुरेश धानोरकर यांच्या रूपाने महाराष्ट्रात काँग्रेसचे एकमेव खासदार विजयी झाले होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याने यावेळी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या वेळी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा राज्यात सर्वत्र दिसून येत आहे.

देशाचे नेतृत्त्व ठरवणारी निवडणूक – फडणवीस

ही राज्याची निवडणूक नसून देशाचे नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचे? याची निवडणूक आहे. ही निवडणूक सुधीर मुनगंटीवार किंवा काँग्रेसच्या उमेदवार यांच्यात नसून ही निवडणूक देशात मोदींचे राज्य आणायचे की राहुल गांधींना पंतप्रधान करायचे, याची निवडणूक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सुधीर मुनगंटीवार यांना दिलेले मत हे नरेंद्र मोदी यांना दिलेले मत आहे. तर काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेले मत हे राहुल गांधी यांना दिलेले मत आहे. देशात राहुल गांधींची स्थिती काय आहे, हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेले त्या-त्या ठिकाणी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. तेथील काँग्रेसमध्ये फूट पडली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. देशाच्या सर्वच कानाकोपऱ्यात एकच नाव ऐकू येईल आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी यांचा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून देशांमध्ये पहिल्यांदा गरीबांचा विचार करणारे नेतृत्व लाभले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तुम्ही एकाच जातीच्या नावावर निवडणूक लढवणार असाल तर इतर जातीच्या लोकांनी कोणाकडे जायचे? असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. मतदारांनी डोळ्यातील अश्रू पाहून मतदान करायचे का? विकासाची दिशा पाहून मतदान करायचे? हे ठरवण्याची ही वेळ असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तुलना करायचीच असेल तर केलेल्या कामाची तुलना करा, विचारांची तुलना करा, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिभा धानोरकर यांच्यावर टीका केली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी, विचार करून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे. सर्व मतदार संघाची सेवा मी पूर्ण शक्तीने आणि तळमळिने करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझी लढाई काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही. मी आजपर्यंत जेवढे भाषणे दिली, त्यातील 99 टक्के भाषणे ही विकासावर दिली असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्याच आधारावर मी मतदारांकडे मते मागण्यासाठी जाणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत चंद्रपूर मतदार संघातून काँग्रेसचे सुरेश धानोरकर विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र महाडोळे रिंगणात होते.

  • सुरेश धानोरकर (काँग्रेस) – 5,59,507 (विजयी)
  • हंसजार अहीर (भाजप) – 5,14,744
  • राजेंद्र महाडोळे (वंचित बहुजन आघाडी) – 1,12,079

ज्योती मेटे यांचा अप्पर सहनिबंधक पदाचा राजीनामा:बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार

बीड लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीच्या उमेदवार म्हणून ज्योती विनायकराव मेटे निवडणूक लढणार आहे. त्यातच त्यांनी त्यांच्या अप्पर सहनिबंधक पदाचा राजीनामा दिला असून आपण राजकारणात सक्रिय सहभागी होण्यासाठीच पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती त्यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या बीडमध्ये दाखल झाल्या असून त्यांनी स्व. विनायक मेटे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपण बीड लोकसभा मतदारसंघातून लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने या जागेवर ज्योती मेटे यांनी उमेदवारी द्यावी, असा आग्रह शरद पवार यांच्याकडे केला आहे. ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची दोन वेळा या संदर्भात भेट देखील घेतली ओ. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या ज्योती मेटे याच उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत शरद पवार यांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र, असे असले तरी ज्योती मेटे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणूक:काँग्रेसचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल

नागपूरमधून विकास ठाकरे 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी होतील, वडेट्टीवार यांचा दावा

नागपूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात विकास ठाकरे लढत देत आहेत. नागपूर काँग्रेसमधील नेत्यांमध्ये असलेले अंतर्गत मतभेद विसरून काँग्रेसचे सर्व नेते एकत्र आलेले या निमित्ताने दिसून आले. विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार देखील उपस्थित होते. या निमित्त नागपूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे तगडे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे गडकरी यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने कोणाला तिकीट दिले जाते याबाबत चर्चा रंगली होती. मात्र काँग्रेसने अंतर्गत गटबाजी बाजूला ठेवत विकास ठाकरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार ठाकरे यांनी आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार नाना पटोले यांचा पराभव केला होता. यावेळी नाना पटोले यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे काँग्रेसने नाना पटोले यांच्या ऐवजी आता विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस प्रचंड बहुमताने विजय होईल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूर हा काँग्रेसचा गड आहे. काही वर्षांसाठी येथे लोकांनी परिवर्तन केले होते. मात्र, यावेळी नागपूर हा काँग्रेसचा गड असून हा गड काँग्रेसच्या मागे प्रचंड ताकतीने उभा राहणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. हा विजय काँग्रेसच्या विजयामध्ये पहिल्या नंबरला असेल, असा मला विश्वास असल्याचेही ते म्हणाले. विकास ठाकरे हे किमान एक लाख मतांनी निवडून येतील असा विश्वास आपल्याला असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.…लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत नागपूर मतदार संघातून भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांचा पराभव केला होता. या ठिकाणी बहुजन समाज पक्षाकडून मोहम्मद जमाल रिंगणात होते.नितीन गडकरी (भाजप) – 6,60,221 (विजयी)नाना पटोले (काँग्रेस) – 4,44,212मोहम्मद जमाल (बहुजन समाज पक्ष) – 31,725अशी मते मिळालेली होती .

श्री कसबा गणपती शिवजयंती उत्सव समितीच्या जिवंत देखाव्यात मॉरिशसच्या राजदूत होणार सहभागी


पुणे २५:- तिथीप्रमाणे साजरा होणाऱ्या शिवजयंती निमित्त श्री कसबा गणपती चौक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने यंदाचे वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण प्रित्यर्थ राज्याभिषेकाचा जिवंत देखावा साकारण्यात येत आहे यामध्ये सुमारे 100 हून अधिक कलाकार हे आपल्या कलेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणार आहेत या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या उत्सवांमध्ये कुठलाही व्यावसायिक कलाकार सहभागी असणार नाही सर्व कलाकार हे कसबा पेठ परिसरातील नागरिक आहेत मॉरिशियसहुन खास शिवजयंती निमित्त आलेल्या मॉरिशियसच्या राजदूत वृश्नी रावजी या त्यांची कला सादर करणार आहेत गणपती मंदिराच्या समोर दिनांक 28 मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता या भव्य दिव्य सोहळ्याची सुरुवात होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार प्रसिद्ध व्यावसायिक व श्रीमंत भाऊ रंगारी ट्रस्टचे मुख्य विश्वस्त पुनीत बालन ज्येष्ठ इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे हे उपस्थित असतील या कार्यक्रमासाठी परमपूज्य गणेशनाथ महाराज त्रंबकेश्वर यांचे आशीर्वाद यावेळी लाभणार आहेत अशी माहिती समितीचे विश्वस्त पुष्कर तुळजापूरकर यांनी दिली या जिवंत देखाव्याचे दिग्दर्शन व संकल्पना महेश मोळावडे, सयाजी शेंडकर यांनी केलेले आहे

धुलीवंदन आले अंगाशी-‘त्या’ अल्पवयीन मुले आणि पालकांवर कठोर कारवाई ;पुणे पोलिसांचे RTO ला पत्र

पुणे- धुलीवंदनाच्या दिवशी अल्पवयीन मुलांना गाडी चालविणेसाठी देणा-या पालकांविरुध्द पुणे पोलिसांनी मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा तर दाखल केलाच त्यांची वाहने जप्त केलीच, कायद्यातील तरतुदीनुसार १ वर्षासाठी वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला ….पण आता त्याही पुढे जाऊन या मुलांना वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत वाहन परवानाच देऊ नये असे पत्र पोलिसांनी RTOला दिले आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दि २५/०३/२०२४ रोजी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ पुणे श्री. संभाजी कदम यांचे आदेशानुसार धुलिवंदन सणानिमीत्त तुकाई नगर सर्कल सिंहगड कॉलेज रोड पुणे येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान दोन अल्पवयीन मुले त्यांचे ताब्यातील मोटरसायकल चालविताना मिळुन आल्याने त्यांचेकडे विचारपुस केली असता दोघांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे व दोघेही अल्पवयीन असल्याचे दिसुन आले. दोन्ही अल्पवयीन मुलांना मोटरसायकल चालविणेसाठी ताब्यात देणारे त्यांचे पालक/गाडीचे मालक यांना मुले अल्पवयीन असल्याचे माहीत असताना सुध्दा त्यांचे नावावरील व ताब्यातील वाहने अल्पवयीन मुलांना चालविणेसाठी दिलेने पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे यांनी दिले तक्रारीवरुन सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे मोटार वाहन कायदा सन १९८८ चे कमल ३,५,१९९ (अ) अन्वये दि. २५/०४/२०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयातील वाहने जप्त करण्यात आलेली असुन मोटार वाहन कायदयातील तरतुदीनुसार अल्पवयीन मुलांना त्यांचे वयाचे २५ वर्षापर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मंजुर करु नये याकरीता प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांना पत्र देण्यात आले आहे. मोटार वाहन कायदयातील तरतुदीनुसार जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा परवाना एक वर्षासाठी रद्द करणेकामी प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांना पत्र देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परि ३ पुणे संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, भिमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, विजय कुंभार, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, सुरेश जायभाय, पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे, दिपक गबदुले, होमगार्ड सोनवणे यांनी केली आहे.
तरी पालकांनी आपले अल्पवयीन पाल्यांना अगर वाहनाचे मालकांनी आपले वाहन अल्पवयीन मुलांना तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविणेकरीता ताब्यात देवु नये असे पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा वरीलप्रमाणे कायदेशीर कारवाई करुन वाहने जप्त करुन पुढील कारवाई करण्यात येईल

खजिना विहीर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर चोरीप्रकरणी सखोल चौकशी करा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे दि.२५: सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील देवाच्या मूर्ती आणि मखर चोरीस जाणे ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्फत सखोल तपास करण्यात यावा. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. याबाबतचे सविस्तर लेखी निवेदन त्यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना पाठविले आहे.

दिनांक आठ मार्चच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करून येथील देवाच्या मूर्ती आणि मखर यांची चोरी केल्याची घटना घडल्याचे विविध माध्यमांतून समोर आले आहे या प्रकरणाची डॉ. गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेत त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ शनिवारवाड्यासमोर मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी

पुणे- आम आदमी पक्षाच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ देशभर तीव्र आंदोलने करण्यात येत असतानाच पुण्यातहीशनिवारवाडा चौक येथे आम आदमी पक्षाच्या वतीने मोदी सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याची होळी करून निषेध करण्यात आला.सत्याचा असत्यावर विजय या हेतूने देशभरात होलिका दहन केले जाते, त्यामुळे आम आदमी पक्ष पुणे च्या वतीने देखील आज मोदी सरकारच्या असत्य वागण्याचा निषेध म्हणून मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले असे आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.

m

या आंदोलनात मुकुंद किर्दत,सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर तसेच सुरेखा भोसले, सतीश यादव, अक्षय शिंदे, अमित म्हस्के, किरण कांबळे, नौशाद अन्सारी, अमोल मोरे, शंकर पोटघन, बालाजी कंठेकर, समीर आरवाडे, अभिजीत गायकवाड, प्रशांत कांबळे, सुनील सावडी, बाळासाहेब भारती, विक्रम गायकवाड, मनोज एरंडकर, ॲन अनिष, संजय कटारनवरे, श्रीकांत चांदणे, शाहीन अत्तार, अली सय्यद, सुनील विठ्ठल भोसले, इकबाल तांबोळी, ज्ञानेश्वर गायकवाड, रितेश निकाळजे, तानाजी शेरखाने, स्वप्निल गोरे, निखिल खंदारे, ॲड. गुणाजी मोरे, उमेश दीक्षित, ॲड.अमोल काळे, तुकाराम शिंदे, सेंथील अय्यर, असगर बेग, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, शहाजी मोळके, सुरज सोनवणे, सुनील शहाबाजी भोसले, कुमार धोंगडे, संदीप सूर्यवंशी, अविनाश केंदळे, संतोष काळे, ॲड.बाळासाहेब पोखर, मनोज शेट्टी, श्रद्धा शेट्टी, शंकर थोरात, शीतल कांडेलकर, किरण कद्रे, सुरेखा भोसले, ऋषिकेश मारणे, शिवाजी डोलारे, ॲड. गणेश थरकुडे, अनिल कोंढाळकर, अप्पा कोंढाळकर, प्रीतम कोंढाळकर, मायकल मस्करेन्हास, आरती करंजावणे छाया भगत, संदेश दिवेकर, शशीभूषण होले, शेखर शिवाजी ढगे, उमेश बागडे,पाडळे रवींद्र, ॲड.गुनाजी मोरे, अनिस वर्गीस, ॲड.कुणाल घारे, सचिन कोतवाल, मिलिंद सरोदे, अविनाश भाकरे हे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

यावेळी किर्भादत म्रहणाले कि,’तीय जनता पक्षाला ४१ कंपन्यांकडून त्यांच्यावर ईडी, सीबीआय या सारख्या तपास यंत्रणेद्वारे टाकल्या गेलेल्या छाप्यानंतर २,४७१ कोटी रुपयाचे डोनेशन्स दिले गेल्याचे एसबीआय ने दिलेल्या माहिती दिसून येत आहे. इतक्यात मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणांनी धाडी घातल्यानंतरचं कंपन्यांनी भाजप सरकारला डोनेशन का दिले असा प्रश्न यामुळे आता निर्माण होत आहे? भाजप व तथाकथित मद्य घोटाळ्यातील अर्विंदो फार्मा यांचे संबंध उघड झाले आहेत. सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे हा घोटाळा असल्याचे म्हंटल्यावरही भाजपाला मिळणाऱ्या डोनेशनची कोणत्याही प्रकारे चौकशी अद्याप झाली नसल्याचे दिसून येत असल्याने भ्रष्टाचाराचा सूत्रधार भारतीय जनता पार्टी आहे असे आम आदमी पक्षाचे राज्यप्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे म्हणाले, आपल्या देशाचे राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभाखाली “सत्यमेव जयते” असे लिहिलेले असते परंतु मोदी सरकारच्या असत्य कारभारामुळे सर्व देशवासीयांना मोदी सरकारचे काम हे असत्यमेव जयते या विचारानेच सुरू आहे अशी भावना निर्माण झालेली आहे.

मोदी सरकारच्या वतीने सर्वसामान्य जनतेला अनेक सुविधा मोफत उपलब्ध करून देणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर आत्तापर्यंत कोणतेही आरोप सिद्ध करण्यात यश आलेले नाहीत, त्यामुळेच निराशेपोटी मोदी सरकार केजरीवालां विरोधात कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न करत आहे. असे धनंजय बेनकर आप,शहर अध्यक्ष यांनी म्हंटले आहे.

विठ्ठल रुख्मिणी मंदिरात चोरी

पुणे- सदाशिवपेठेतील खजिना विहीर जवळील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात ८ मार्च रोजीच्या पाहते ३ वाजता तिघांनी चोरी केल्याची माहिती आज येथे पोलिसांनी दिली आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाचे आणि गाभाऱ्याचे कुलूप तोडून देवांच्या मूर्ती मखर असा ४१ हजार ५०० रुपयांचा ऐवज तिघा चोरट्यांनी चोरून नेला . विश्राम्भाग पोलीस ठाण्यातील फौजदार गणेश फरताडे अधिक तपास करत आहेत .

रामदास पुजारी यांना बाबुराव बागुल राज्यस्तरीय पुरस्कार

पुणे-  जेष्ठ कवी व सेवानिवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी यांच्या साहित्यविश्व प्रकाशन, पुणेने प्रकाशित केलेल्या  ‘ उद्याच्या श्वासासाठी’ या कवितासंग्रहास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूरकडून देण्यात येणारा राज्यस्तरीय बाबुराव बागुल पुरस्कार जाहीर झाला आहे. तसे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे व सरचिटणीस डॉ. रविंद्र तिरपुडे यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे.    नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृह येथे ३१ मार्चला होणाऱ्या महामंडळाच्या दहाव्या वर्धापनदिन कार्यक्रमात, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.     ‘उद्याच्या श्वासासाठी’ या कवितासंग्रहामध्ये पर्यावरणविषयक सुंदर कवितांचा समावेश आहे. श्री. पुजारी यांच्या ‘आई माझं जग ‘  या कवितासंग्रहाच्या दोन आवृत्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांनी आपल्या दिवंगत शिक्षकाविषयीचे ‘देवमाणूस’ हे संकलित पुस्तक तसेच स्व. वडिलांविषयीची ‘ ही घडीपत्रिकाही प्रकाशित केली आहे.     विविध वृत्तपत्रे, मासिके व दिवाळी अंकांतून श्री पुजारी यांचे लेख,कविता,प्रवासवर्णने, पुस्तक परीक्षणे प्रकाशित झाली आहेत. त्यांची  वृक्षलागवड,पर्यावरणविषयक जनजागृतीपर घोषवाक्ये पुण्यात विविध ठिकाणी प्रसारित करण्यात आलेली आहेत. त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार २०२१, राष्ट्रीय प्रबोधनयात्री पुरस्कार २०२३ व इतर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. वनविभागाचे प्रसिद्धी अधिकारी म्हणूनही त्यांनी बराच काळ काम पाहिले आहे.

भगिनी निवेदिता सहकारी बँकेने  सहकार क्षेत्राचे नेतृत्व  केले पाहिजे : विद्याधर अनास्कर

पुणे : सहकार क्षेत्राला आणखी सक्षम करण्यासाठी भगिनी निवेदिता सहकारी बँकेने  सहकार क्षेत्राचे नेतृत्व  केले पाहिजे. सर्व सहकारी बँका, संस्था आपल्या मार्गदर्शनाने सहकार क्षेत्रात भरारी घेतील, असे प्रतिपादन करण्यासाठी सहकार व बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ अभ्यासक विद्याधर अनास्कार यांनी केले. भगिनी निवेदिता बँकेने खातेदारांचा विश्वासाचा ठेवा मिळवला आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यात बँकेने यश मिळवले असून पुढील अमृत महोत्सवी वाटचालीसाठी शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.       

भगिनी निवेदिता सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ रविवारी टिळक स्मारक मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सहकार व बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ अभ्यासक विद्याधर अनास्कार यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यावेळी उपस्थित होते. बँकेच्या अध्यक्षा सीए डॉ. रेवती पैठणकर, उपाध्यक्षा सीएमए डॉ. नेत्रा आपटे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यावेळी उपस्थित होत्या. याप्रसंगी भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या सुवर्ण भरारी स्मरणिकेच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन व बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते यावेळी पार पडला. यावेळी बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळ व सेवक वर्ग, बँकेचे सभासद, खातेदार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बँकेच्या अध्यक्षा सीए डॉ. रेवती पैठणकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी बँकेच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला. ग्राहकांच्या संवादाबरोबर  ठेवी व आकर्षक योजना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ५० वर्षे पूर्ण झाली असून ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. बॅंकेची विश्वासाची परंपरा आहे. बॅंकेने काळानुरूप  ग्राहकांना अत्याधुनिक सोयीसुविधा दिल्या आहेत. शिक्षण कर्ज योजनासह विविध योजना सादर केल्या आहेत.अनास्कार म्हणाले, सहकार संस्था व बँकांना राज्य सरकारने मदत केली पाहिजे. राजकारणापासून भगिनी निवेदिता बँक अलिप्त राहून सहकार क्षेत्रात विकास केला आहे.  महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही बँक चालवली आहे, हे कौतुकास्पद आहे.प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, भगिनी निवेदिता बँकेची ग्राहकांशी महत्वाची भावना आहे. सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवून महिलांना सहकार क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिली आहे. भगिनी निवेदिता यांचे सामाजिक कार्य व त्यांचे विचारांशी आपण एकरूप आहे. ही एकरूपता आपण टिकवून ठेवली आहे. भगिनी निवेदितानाने सहकार क्षेत्रात महिलांना संधी दिली आहे. आज काळ झपाट्याने बदलत आहे काळानुसार बँकेने बदल करून ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यांनी केले. तर उपाध्यक्षा सीएमए डॉ. नेत्रा आपटे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेती व प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांचा ‘हिंदी-मराठी’ गीतांचा कार्यक्रम झाला. कार्यकामला उत्स्फुर्त दाद  यावेळी दिली.फोटो ओळ : भगिनी निवेदिता सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सव सांगता समारंभात सहकार व बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ अभ्यासक विद्याधर अनास्कार व मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचा हस्ते सहकारी बँकेच्या सुवर्ण भरारी स्मरणिकेच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन व बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. बँकेच्या अध्यक्षा सीए डॉ. रेवती पैठणकर, उपाध्यक्षा सीएमए डॉ. नेत्रा आपटे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यावेळी उपस्थित होत्या.

ब्राह्मण एकांडे शिलेदार ही खंत-विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर

याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे महिला उद्योजिका पुरस्कार २०२४  
पुणे : चित्रपटात जे पाहायला मिळते ती भारताची संस्कृती नाही. आपली संस्कृती बुरख्यातील नाही तसेच ती अर्धनग्न देखील नाही. भारतीय संस्कृतीत शालीनता आहे आणि याचे विशेष उत्तरदायित्व ब्राह्मणांवर आहे. चांगली वाट आणि नैतिकता ब्राह्मण सोडत नाहीत. आपण वारसा जपला पाहिजे तर पुढची तो वारसा पुढे घेऊन जाईल. ब्राह्मण स्वाभिमानी असला पाहिजे. तो चारित्र्याने ओळखला गेला पाहिजे. परंतु ब्राह्मण हे एकांडे शिलेदार आहेत, एकट्याने काम करतात. यांची खंत वाटते, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी केले.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे महिला उद्योजिका पुरस्कार सोहळ्याचे आयोजन टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात  करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या स्त्री रोग तज्ञ डॉ.सुप्रिया पुराणिक, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष विलास देशपांडे, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी, प्रतिभा संगमनेरकर, कार्यवाह श्रीकांत जोशी, मंजुषा वैद्य, स्वाती कुलकर्णी, उपेंद्र केळकर, आशिष कुलकर्णी, किरण कुलकर्णी, तन्वी लोंढे आदी उपस्थित होते.

या सोहळ्यांतर्गत स्वयंसिद्धा पुरस्कार नाशिकच्या अमोल इंडस्ट्रिज च्या संचालिका नलिनी कुलकर्णी यांना आणि युवा उद्योजिका पुरस्कार क्वालिटी पेंटस् अँण्ड कोटींग्ज प्रा.लि. च्या संचालिका दिप्ती चंद्रचूड यांना प्रदान करण्यात आला. यावेळी नुकत्याच निवड झालेल्या व महिलांचे नेतृत्व करणाऱ्या संस्थेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा व राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचा विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या शुभहस्ते सत्कार झाला.

युवा उपक्रमांतर्गत कै. सावित्री नारायण जोशी स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार आणि कै. मनोरमा शामराव कुंभोजकर स्मरणार्थ युवा उद्योजिका पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरण सोहळ्यांतर्गत उद्योजिका पुरस्काराने अपूर्वा कुलकर्णी, ईशा देशपांडे, ज्योत्स्ना आपटे, स्मृती कुकडे यांना सन्मानित करण्यात आले.

शंकर अभ्यंकर म्हणाले, नरेंद्र मोदी रत्नपारखी आहेत, त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने पुण्यातील रत्न निवडले. आज महाराष्ट्राचा राजकारणाचा आलेख घसरला आहे. नेते काय बोलतात हे पाहिल्यावर खंत वाटते. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या तोंडातून बाहेर येणारी हिडीस भाषा पाहून खंत वाटते. घटस्फोटाचे सर्वात जास्त प्रमाण महाराष्ट्रात आहे. ही आपली संस्कृती नाही आणि इतिहासही नाही. मी माझ्या बुद्धीला पटेल असे वागणार, असा विचार राष्ट्रासाठी घातक आहे. असेही त्यांनी सांगितले.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, मला जे मिळाले ते मी नागरिकांना अर्पण करते. एका विशिष्ट समाजाचे आपण असलो तरी सगळ्यांसाठी काम करतो. सगळ्या समाजाला पुढे नेत देश विकसित करायचा आहे. पक्ष आणि विचारांशी निष्ठा आहे, त्याच पद्धतीने पुढील काम  करायचे आहे. अन्याय सहन करू नका, एकी ठेवा. मी खासदार झाले, हा ब्रम्हांडाने दिलेला आशीर्वाद आहे, असे म्हणत त्यांनी नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

नलिनी कुलकर्णी म्हणाल्या, महिलांनी चार भिंतीच्या बाहेर पडून काम करायला पाहिजे. काहीतरी करण्याची जिद्द असेल तर सगळं शक्य होते. फक्त जे करतोय त्यात सातत्य पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. दीप्ती चंद्रचूड म्हणाल्या, आई वडिलांचा माझ्यावर असणारा विश्वास हा आज पर्यंतच्या प्रवासात महत्वाचा ठरला आहे.  सतत नावीन्यपूर्ण आणि प्रयोगशील असणे याचा यशामध्ये खूप मोठा वाटा आहे, असेही त्यांनी सांगितले. स्मिता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. मंजुषा वैद्य यांनी आभार मानले.

हिंदूंकरिता भारत हे एकच घर -कर्नाटकमधील श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांचे विचार

राजे शिवराय प्रतिष्ठान, कर्वेनगर तर्फे हुतात्मा जवान केशव गोसावी, तृतीयपंथी समाजसेविका आम्रपाली मोहिते यांना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे व ज्ञानेश सेवा समर्पण पुरस्कार
पुणे : इराण, इराक, इजिप्त, इंडोनेशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बर्मा, श्रीलंका हे आपले होते, ते का गेले? याचा विचार करायला हवा. आता काश्मिर ते कन्याकुमारी हा भारत तरी आपण वाचवायला हवा. मुस्लिमांना ५७ तर ख्रिचनांना ११३ देश आहेत. मात्र, हिंदूंना भारत हे एकच घर आहे. त्यामुळे हिंदू संघटन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कर्नाटकमधील श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केले.

कर्वेनगरमधील राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे हुतात्मा जवान केशव गोसावी यांना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे पुरस्कार आणि सावली सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा करणा-या आम्रपाली मोहिते यांना स्व. ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्ञानेश सेवा समर्पण पुरस्कार कर्वेनगर येथील जय शिवराय चौकात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, स्व-रुपवर्धिनीचे विनोद बिबवे, ह.भ.प. एकनाथ महाराज हगवणे, प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे, अध्यक्ष शिवाजी खरात, उत्सव प्रमुख विशाल लोयरे, सजावट प्रमुख महेश रांजणे आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रमोद मुतालिक म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील भाषावाद प्रांतवादामुळे शहाजीराजे यांची कर्नाटक मधील समाधी दुर्लक्षित आहे. त्याठिकाणी शहाजी महाराजांची प्रतिमा उभारून ते वीरक्षेत्र म्हणून प्रचलित होण्यास प्रयत्न करायला हवेत. भारताने मोठ्या प्रमाणात आपली भूमी गमावलेली आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. केरळमध्ये केवळ ४० टक्के हिंदू शिल्लक आहेत. या परिस्थितीचा विचार करून आपण संघटित होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विक्रमसिंह मोहिते म्हणाले, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, अशा अनेक अंगांनी आपली अधोगती होत होती, तेव्हा शिवरायांनी कशा प्रकारे स्वराज्य निर्माण केले, याचा विचार आपण करायला हवा. शिवरायांनी केलेल्या अनेक गोष्टींचे कार्य आपल्यापर्यंत अजूनही पोहोचायचे आहे, त्याकरिता आपण सखोल अभ्यास केला पाहिजे.

शिवजयंती महोत्सवानिमित्त राजसदरेची कलाकृती प्रसिध्द कलाकार महेश रांजणे यांनी साकारली. तर श्री शिवराज्याभिषेक ३५० वर्षपूर्ती प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीरपत्नी यशोदा गोसावी यांनी पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक महेश पवळे, अध्यक्ष शिवाजी खरात, उत्सवप्रमुख विशाल लोयरे, सजावट प्रमुख महेश रांजणे, अमित जाधव, बंटी शिरोळे, केयुर बहिरट, स्वप्नील महाडीक, सागर ढमे, सुरेश ठाकुर, रोहित थरकुडे व अमित कदम यांसह कार्यकर्त्यांनी केले.

पाणी बचतीसाठी जनजागृतीची गरज : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

जागतिक जल दिनानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये विद्यार्थ्यांनी घेतली पाणी बचतीची शपथ

पुणे : पृथ्वीवरील पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवायला हवा. भावी पिढीला पाणीटंचाईपासून रोखायचे असेल, तर पाणी बचत करायलाच हवी. ‘पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा’ हा नारा प्रत्येकाने अमलांत आणावा. त्यासाठी जनजागृतीची गरज असून, प्रत्येकाने पाणीबचत करायला हवी. तसेच वाया जाणारे पाणी वाचवायला शिकावे, असे मत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले.

जागतिक जल दिनानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पाणी बचतीची शपथ घेतली. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यदत्त नॅशनल स्कुल, सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज, सूर्यदत्त लॉ कॉलेज, सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन अँड रिसर्च, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनॉलॉजी, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेकनॉलॉजी आदी संस्थाच्या वतीने जागतिक जल दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

संचालक शीला ओक, प्राचार्य मिथिलेश विश्वकर्मा, प्राचार्य अजित शिंदे, प्राचार्य किरण राव, प्राचार्य वंदना पांड्ये, प्रा. अतुल देशपांडे, उपप्राचार्य दीपक सिंग, उपप्राचार्य रेणुका घोसपुरकर, मुख्याध्यापिका मारिया वर्मा, प्रा. मोनिका सेहरावात, प्रा. शीतल भुसारे, प्रा. राज कांकरिया, डॉ. विद्या गवेकर, प्रा. मेघा माने आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली असून, शहराना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बोअरवेल खोदण्याचे प्रमाण वाढले आहे. पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. नागरिकांच्या दिनचर्येत पाण्याची गरज सर्वांना असते. बेंगळुरूसारख्या शहरात पाणी कमतरता असल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना अजूनही पाणी पुरवठा नाही अथवा दूरवरून पाणी आणावे लागते. असे असूनही हेच पाणी वाचविण्यासाठी, त्याचे प्रदूषण रोखण्यासाठी, ते जतन करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.”

“सरकार कायदे आणि नियम बनवते. पण, त्यांचे पालन प्रत्येक जण करत नाही. भारतातही पर्जन्यमान चांगले असूनही अनेक राज्यात उन्हाळ्यात पाणी विकत घ्यावे लागते. शेतकरी आणि शेती हा भारताचा आधारभूत पाया मानला जातो. परंतु शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळते. अशा परिस्थितीत पाणी बचतीसाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. यंदाच्या जागतिक जल दिनाची ‘शांततेसाठी पाण्याचा वापर’ अशी संकल्पना आहे,” असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला जागतिक जल दिन अर्थात ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी २२ मार्च रोजी संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक जल दिन साजरा करत आहे. जागतिक जल संकटाचा सामना करण्यासाठी जागतिक जल दिनामुळे प्रेरणा मिळते. त्याचा मुख्य उद्देश २०३० पर्यंत शाश्वत विकास लक्ष्य गाठण्याचे आहे. याचाच अर्थ २०२३ पर्यंत सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता साध्य करणे असा आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

वनविभागाचे आणि महापालिकेचे आवाहन विद्यार्थ्यांना संस्थेकडून करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून पाणी बचतीसाठी शपथ ही घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून पाणी योग्य वापर आणि बचतीसंदर्भात संदेश प्रदर्शित केले.

पाणीबचतीचे हे करावे

– पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करावा

– पाण्याचा स्रोत प्रदूषित करू नये

– पिण्याचे पाणी वाहने धुणे, अंगण, जिने, फरशी धुण्यासाठी वापरू नका

– गळणारे नळ तत्काळ दुरुस्त करा

– घरासमोरील रस्त्यावर पाणी मारू नका किंवा रस्ते धुऊ नका

– कुंड्यांतील झाडे, बागकामासाठी पिण्याचे पाण्याचा वापर करू नका

सनातनी आणि वारकरी  यातील एकच विचार स्वीकारावा लागेल: ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बंडगर

पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दल आणि भारत जोडो अभियानाच्या वतीने आयोजित  वारकरी संप्रदाय परिचय अभ्यासवर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला.सोमवार,दि.२५ मार्च रोजी  दुपारी ४ वाजता एस.एम.जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे हा अभ्यासवर्ग झाला.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी मार्गदर्शन केले.संयोजन समितीच्या वतीने विवेक काशीकर,संदीप बर्वे आणि नीलम पंडित यांनी स्वागत केले.शालिनी पंडित,मनीष देशपांडे, सुदर्शन चखाले, नितीन चव्हाण , श्रीरंग गायकवाड,तेजस भालेराव उपस्थित होते.नीलम पंडित यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.
ह. भ. प. बंडगर म्हणाले, ‘ भारतात चार्वाक, बुद्ध यांच्या परिवर्तनवादी परंपरांनंतर नाथ पंथ, लिंगायत आणि वारकरी संप्रदायाचा विचार पुढे आला. त्यातून स्त्री आणि शुद्र मानल्या गेलेल्यांचा कैवार, वेदप्रामाण्यवादाचा विरोध,लोकभाषांतून प्रबोधन, योग विद्येचा पुरस्कार केला गेला.वेद कितीही ज्ञान संपन्न असला तरी तो कंजुष आहे, असे ज्ञानेश्र्वर महाराजांनी म्हटले आहे. कारण वेदात शूद्र, अती शूद्र आणि महीलाना अधिकार नाहित.वारकरी संतांनी जाती भेदाविरुद्ध काम केले.वारकरी संप्रदायातील काल्याचा विधी हा जातीभेद मिटविणारा आहे.सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचे मूळ कबीर यांच्या विचारात आहे.वारकरी संप्रदाय हा सर्वांना सामावून घेणारा सर्व समावेशक संप्रदाय आहे.

आता वर्णवर्चस्ववादी मंडळी सनातनी विचार मांडत आहेत.बुद्धी भेद करीत आहेत.हा तथाकथित सनातन विचार आणि वारकरी विचार यातील एकच विचार स्वीकारावा लागेल, असेही बंडगर महाराज यांनी सांगितले.