जागतिक जल दिनानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये विद्यार्थ्यांनी घेतली पाणी बचतीची शपथ
पुणे : पृथ्वीवरील पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवायला हवा. भावी पिढीला पाणीटंचाईपासून रोखायचे असेल, तर पाणी बचत करायलाच हवी. ‘पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा’ हा नारा प्रत्येकाने अमलांत आणावा. त्यासाठी जनजागृतीची गरज असून, प्रत्येकाने पाणीबचत करायला हवी. तसेच वाया जाणारे पाणी वाचवायला शिकावे, असे मत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले.
जागतिक जल दिनानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पाणी बचतीची शपथ घेतली. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यदत्त नॅशनल स्कुल, सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज, सूर्यदत्त लॉ कॉलेज, सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन अँड रिसर्च, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनॉलॉजी, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेकनॉलॉजी आदी संस्थाच्या वतीने जागतिक जल दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
संचालक शीला ओक, प्राचार्य मिथिलेश विश्वकर्मा, प्राचार्य अजित शिंदे, प्राचार्य किरण राव, प्राचार्य वंदना पांड्ये, प्रा. अतुल देशपांडे, उपप्राचार्य दीपक सिंग, उपप्राचार्य रेणुका घोसपुरकर, मुख्याध्यापिका मारिया वर्मा, प्रा. मोनिका सेहरावात, प्रा. शीतल भुसारे, प्रा. राज कांकरिया, डॉ. विद्या गवेकर, प्रा. मेघा माने आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली असून, शहराना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बोअरवेल खोदण्याचे प्रमाण वाढले आहे. पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. नागरिकांच्या दिनचर्येत पाण्याची गरज सर्वांना असते. बेंगळुरूसारख्या शहरात पाणी कमतरता असल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना अजूनही पाणी पुरवठा नाही अथवा दूरवरून पाणी आणावे लागते. असे असूनही हेच पाणी वाचविण्यासाठी, त्याचे प्रदूषण रोखण्यासाठी, ते जतन करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.”
“सरकार कायदे आणि नियम बनवते. पण, त्यांचे पालन प्रत्येक जण करत नाही. भारतातही पर्जन्यमान चांगले असूनही अनेक राज्यात उन्हाळ्यात पाणी विकत घ्यावे लागते. शेतकरी आणि शेती हा भारताचा आधारभूत पाया मानला जातो. परंतु शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळते. अशा परिस्थितीत पाणी बचतीसाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. यंदाच्या जागतिक जल दिनाची ‘शांततेसाठी पाण्याचा वापर’ अशी संकल्पना आहे,” असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला जागतिक जल दिन अर्थात ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी २२ मार्च रोजी संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक जल दिन साजरा करत आहे. जागतिक जल संकटाचा सामना करण्यासाठी जागतिक जल दिनामुळे प्रेरणा मिळते. त्याचा मुख्य उद्देश २०३० पर्यंत शाश्वत विकास लक्ष्य गाठण्याचे आहे. याचाच अर्थ २०२३ पर्यंत सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता साध्य करणे असा आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
वनविभागाचे आणि महापालिकेचे आवाहन विद्यार्थ्यांना संस्थेकडून करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून पाणी बचतीसाठी शपथ ही घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून पाणी योग्य वापर आणि बचतीसंदर्भात संदेश प्रदर्शित केले.
पाणीबचतीचे हे करावे
– पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करावा
– पाण्याचा स्रोत प्रदूषित करू नये
– पिण्याचे पाणी वाहने धुणे, अंगण, जिने, फरशी धुण्यासाठी वापरू नका
– गळणारे नळ तत्काळ दुरुस्त करा
– घरासमोरील रस्त्यावर पाणी मारू नका किंवा रस्ते धुऊ नका
– कुंड्यांतील झाडे, बागकामासाठी पिण्याचे पाण्याचा वापर करू नका