राजे शिवराय प्रतिष्ठान, कर्वेनगर तर्फे हुतात्मा जवान केशव गोसावी, तृतीयपंथी समाजसेविका आम्रपाली मोहिते यांना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे व ज्ञानेश सेवा समर्पण पुरस्कार
पुणे : इराण, इराक, इजिप्त, इंडोनेशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बर्मा, श्रीलंका हे आपले होते, ते का गेले? याचा विचार करायला हवा. आता काश्मिर ते कन्याकुमारी हा भारत तरी आपण वाचवायला हवा. मुस्लिमांना ५७ तर ख्रिचनांना ११३ देश आहेत. मात्र, हिंदूंना भारत हे एकच घर आहे. त्यामुळे हिंदू संघटन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कर्नाटकमधील श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केले.
कर्वेनगरमधील राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे हुतात्मा जवान केशव गोसावी यांना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे पुरस्कार आणि सावली सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा करणा-या आम्रपाली मोहिते यांना स्व. ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्ञानेश सेवा समर्पण पुरस्कार कर्वेनगर येथील जय शिवराय चौकात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, स्व-रुपवर्धिनीचे विनोद बिबवे, ह.भ.प. एकनाथ महाराज हगवणे, प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे, अध्यक्ष शिवाजी खरात, उत्सव प्रमुख विशाल लोयरे, सजावट प्रमुख महेश रांजणे आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रमोद मुतालिक म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील भाषावाद प्रांतवादामुळे शहाजीराजे यांची कर्नाटक मधील समाधी दुर्लक्षित आहे. त्याठिकाणी शहाजी महाराजांची प्रतिमा उभारून ते वीरक्षेत्र म्हणून प्रचलित होण्यास प्रयत्न करायला हवेत. भारताने मोठ्या प्रमाणात आपली भूमी गमावलेली आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. केरळमध्ये केवळ ४० टक्के हिंदू शिल्लक आहेत. या परिस्थितीचा विचार करून आपण संघटित होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विक्रमसिंह मोहिते म्हणाले, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, अशा अनेक अंगांनी आपली अधोगती होत होती, तेव्हा शिवरायांनी कशा प्रकारे स्वराज्य निर्माण केले, याचा विचार आपण करायला हवा. शिवरायांनी केलेल्या अनेक गोष्टींचे कार्य आपल्यापर्यंत अजूनही पोहोचायचे आहे, त्याकरिता आपण सखोल अभ्यास केला पाहिजे.
शिवजयंती महोत्सवानिमित्त राजसदरेची कलाकृती प्रसिध्द कलाकार महेश रांजणे यांनी साकारली. तर श्री शिवराज्याभिषेक ३५० वर्षपूर्ती प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीरपत्नी यशोदा गोसावी यांनी पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक महेश पवळे, अध्यक्ष शिवाजी खरात, उत्सवप्रमुख विशाल लोयरे, सजावट प्रमुख महेश रांजणे, अमित जाधव, बंटी शिरोळे, केयुर बहिरट, स्वप्नील महाडीक, सागर ढमे, सुरेश ठाकुर, रोहित थरकुडे व अमित कदम यांसह कार्यकर्त्यांनी केले.