याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे महिला उद्योजिका पुरस्कार २०२४
पुणे : चित्रपटात जे पाहायला मिळते ती भारताची संस्कृती नाही. आपली संस्कृती बुरख्यातील नाही तसेच ती अर्धनग्न देखील नाही. भारतीय संस्कृतीत शालीनता आहे आणि याचे विशेष उत्तरदायित्व ब्राह्मणांवर आहे. चांगली वाट आणि नैतिकता ब्राह्मण सोडत नाहीत. आपण वारसा जपला पाहिजे तर पुढची तो वारसा पुढे घेऊन जाईल. ब्राह्मण स्वाभिमानी असला पाहिजे. तो चारित्र्याने ओळखला गेला पाहिजे. परंतु ब्राह्मण हे एकांडे शिलेदार आहेत, एकट्याने काम करतात. यांची खंत वाटते, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे महिला उद्योजिका पुरस्कार सोहळ्याचे आयोजन टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या स्त्री रोग तज्ञ डॉ.सुप्रिया पुराणिक, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष विलास देशपांडे, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी, प्रतिभा संगमनेरकर, कार्यवाह श्रीकांत जोशी, मंजुषा वैद्य, स्वाती कुलकर्णी, उपेंद्र केळकर, आशिष कुलकर्णी, किरण कुलकर्णी, तन्वी लोंढे आदी उपस्थित होते.
या सोहळ्यांतर्गत स्वयंसिद्धा पुरस्कार नाशिकच्या अमोल इंडस्ट्रिज च्या संचालिका नलिनी कुलकर्णी यांना आणि युवा उद्योजिका पुरस्कार क्वालिटी पेंटस् अँण्ड कोटींग्ज प्रा.लि. च्या संचालिका दिप्ती चंद्रचूड यांना प्रदान करण्यात आला. यावेळी नुकत्याच निवड झालेल्या व महिलांचे नेतृत्व करणाऱ्या संस्थेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा व राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचा विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या शुभहस्ते सत्कार झाला.
युवा उपक्रमांतर्गत कै. सावित्री नारायण जोशी स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार आणि कै. मनोरमा शामराव कुंभोजकर स्मरणार्थ युवा उद्योजिका पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरण सोहळ्यांतर्गत उद्योजिका पुरस्काराने अपूर्वा कुलकर्णी, ईशा देशपांडे, ज्योत्स्ना आपटे, स्मृती कुकडे यांना सन्मानित करण्यात आले.
शंकर अभ्यंकर म्हणाले, नरेंद्र मोदी रत्नपारखी आहेत, त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने पुण्यातील रत्न निवडले. आज महाराष्ट्राचा राजकारणाचा आलेख घसरला आहे. नेते काय बोलतात हे पाहिल्यावर खंत वाटते. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या तोंडातून बाहेर येणारी हिडीस भाषा पाहून खंत वाटते. घटस्फोटाचे सर्वात जास्त प्रमाण महाराष्ट्रात आहे. ही आपली संस्कृती नाही आणि इतिहासही नाही. मी माझ्या बुद्धीला पटेल असे वागणार, असा विचार राष्ट्रासाठी घातक आहे. असेही त्यांनी सांगितले.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, मला जे मिळाले ते मी नागरिकांना अर्पण करते. एका विशिष्ट समाजाचे आपण असलो तरी सगळ्यांसाठी काम करतो. सगळ्या समाजाला पुढे नेत देश विकसित करायचा आहे. पक्ष आणि विचारांशी निष्ठा आहे, त्याच पद्धतीने पुढील काम करायचे आहे. अन्याय सहन करू नका, एकी ठेवा. मी खासदार झाले, हा ब्रम्हांडाने दिलेला आशीर्वाद आहे, असे म्हणत त्यांनी नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
नलिनी कुलकर्णी म्हणाल्या, महिलांनी चार भिंतीच्या बाहेर पडून काम करायला पाहिजे. काहीतरी करण्याची जिद्द असेल तर सगळं शक्य होते. फक्त जे करतोय त्यात सातत्य पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. दीप्ती चंद्रचूड म्हणाल्या, आई वडिलांचा माझ्यावर असणारा विश्वास हा आज पर्यंतच्या प्रवासात महत्वाचा ठरला आहे. सतत नावीन्यपूर्ण आणि प्रयोगशील असणे याचा यशामध्ये खूप मोठा वाटा आहे, असेही त्यांनी सांगितले. स्मिता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. मंजुषा वैद्य यांनी आभार मानले.