आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीच्या वतीने आयोजन; सद्भावना, नैतिकता, नशामुक्तीसाठी करणार मार्गदर्शन
पुणे : जैन तेरापंथचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांचा पुणे दौरा दि. २८ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत होणार आहे. या पुणे दौर्यानिमित्त त्यांचे अभिवादन करण्यासाठी शुक्रवार, दि.२९ मार्च रोजी भव्य अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगाधाम चौकापासून वर्धमान सांस्कृतिक केंद्रापर्यंत भव्य यात्रा काढण्यात येणार आहे. नशामुक्त भारत आणि नशामुक्त पुणे या अभियानांतर्गत या दौर्यामध्ये आचार्य श्री महाश्रमणजी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीचे संजय मरलेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला पं. वसंतराव गाडगीळ, संजय मरलेचा, धनपतराज कटारिया, सुरेंद्र कोठारी, दिनेश खिंवसरा, सुमन मरलेचा, पपीता मरलेचा उपस्थित होते. अभिवादन रॅलीमध्ये मोठ्या संख्येने जैनबांधव सहभागी होणार आहेत.
अभिवादन यात्रेनंतर दि. ४ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ९.३० वाजल्यापासून आचार्य श्री महाश्रमणजी यांचे प्रवचन होईल. मंगळवार, दि. २ एप्रिल रोजी कोंढव्यातील तेरापंथ भवन या वास्तूमध्ये येथे आचार्य
श्री महाश्रमणजी यांचा प्रवेश होणार आहे.
आचार्य श्री महाश्रमण जी यांनी जनकल्याण आणि राष्ट्राच्या चारित्र्य निर्माणासाठी पदयात्रा करत सद्भावना, नैतिकता, व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे. आतापर्यंत नेपाळ, भूतान, भारतातील२३ राज्यात ६० हजार कि.मी. पेक्षाही अधिक पदयात्रा त्यांनी केली आहे. त्यांच्या प्रेरणेने लाखो लोक व्यसनमुक्त झाले आहेत.
दि. २८ मार्च रोजी खड़की आलेगांवकर शाला, दि. २९ मार्च ते २ एप्रिल वर्धमान सांस्कृतिक भवन आणि २ एप्रिल तेरापंथ भवन, दि. ३ एप्रिल रोजी मगनकुंज, कल्याणी नगर आणि दि. ४ एप्रिल रोजी वाघोली येथे कार्यक्रम होणार आहेत. आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समिति एवं समस्त तेरापंथ समाज पुणे, श्री भिक्षु मेमोरियल फाउंडेशन, तेरापंथ युवक परिषद, तेरापंथ महिला मंडळ, तेरापंथ प्रोफेशनल फोरम, अनुव्रत समिती आणि सर्व तेरापंथ समाज यामध्ये सहभागी झाला आहे.