चंद्रपूर-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या लढत होणार आहे. सुधीर मुनगंटीवार हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आज पर्यंत कधीही एवढ्या प्रचंड मतांनी उमेदवार निवडून आला नसेल, तेवढ्या मतांनी मुनगंटीवार निवडून येणार असल्याचा विश्वास या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वेळी व्यक्त केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी इतिहास रचला जाणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. वास्तविक सुधीर मुनगंटीवार हे या मतदारसंघासाठी इच्छुक नव्हते. मला केंद्रात नव्हे तर राज्यातच लोकांची कामे करायची आहे, असे त्यांनी आधीच सांगितले होते. मात्र, तरी देखील भाजपच्या पहिल्याच यादीत सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे विरोधकांनी देखील भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. मात्र, आता पक्षाने उमेदवारी दिली असून पक्षाने दिलेले आदेश हे सर्वतोपरी मान्य करत सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रचाराला जोरदार सुरुवात केली. त्यानुसार त्यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2019 मधील मागील निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला होता. सुरेश धानोरकर यांच्या रूपाने महाराष्ट्रात काँग्रेसचे एकमेव खासदार विजयी झाले होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याने यावेळी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या वेळी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा राज्यात सर्वत्र दिसून येत आहे.
देशाचे नेतृत्त्व ठरवणारी निवडणूक – फडणवीस
ही राज्याची निवडणूक नसून देशाचे नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचे? याची निवडणूक आहे. ही निवडणूक सुधीर मुनगंटीवार किंवा काँग्रेसच्या उमेदवार यांच्यात नसून ही निवडणूक देशात मोदींचे राज्य आणायचे की राहुल गांधींना पंतप्रधान करायचे, याची निवडणूक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सुधीर मुनगंटीवार यांना दिलेले मत हे नरेंद्र मोदी यांना दिलेले मत आहे. तर काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेले मत हे राहुल गांधी यांना दिलेले मत आहे. देशात राहुल गांधींची स्थिती काय आहे, हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेले त्या-त्या ठिकाणी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. तेथील काँग्रेसमध्ये फूट पडली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. देशाच्या सर्वच कानाकोपऱ्यात एकच नाव ऐकू येईल आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी यांचा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून देशांमध्ये पहिल्यांदा गरीबांचा विचार करणारे नेतृत्व लाभले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
तुम्ही एकाच जातीच्या नावावर निवडणूक लढवणार असाल तर इतर जातीच्या लोकांनी कोणाकडे जायचे? असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. मतदारांनी डोळ्यातील अश्रू पाहून मतदान करायचे का? विकासाची दिशा पाहून मतदान करायचे? हे ठरवण्याची ही वेळ असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तुलना करायचीच असेल तर केलेल्या कामाची तुलना करा, विचारांची तुलना करा, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिभा धानोरकर यांच्यावर टीका केली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी, विचार करून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे. सर्व मतदार संघाची सेवा मी पूर्ण शक्तीने आणि तळमळिने करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझी लढाई काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही. मी आजपर्यंत जेवढे भाषणे दिली, त्यातील 99 टक्के भाषणे ही विकासावर दिली असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्याच आधारावर मी मतदारांकडे मते मागण्यासाठी जाणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत चंद्रपूर मतदार संघातून काँग्रेसचे सुरेश धानोरकर विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र महाडोळे रिंगणात होते.
- सुरेश धानोरकर (काँग्रेस) – 5,59,507 (विजयी)
- हंसजार अहीर (भाजप) – 5,14,744
- राजेंद्र महाडोळे (वंचित बहुजन आघाडी) – 1,12,079