पुणे- जेष्ठ कवी व सेवानिवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी यांच्या साहित्यविश्व प्रकाशन, पुणेने प्रकाशित केलेल्या ‘ उद्याच्या श्वासासाठी’ या कवितासंग्रहास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूरकडून देण्यात येणारा राज्यस्तरीय बाबुराव बागुल पुरस्कार जाहीर झाला आहे. तसे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे व सरचिटणीस डॉ. रविंद्र तिरपुडे यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे. नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृह येथे ३१ मार्चला होणाऱ्या महामंडळाच्या दहाव्या वर्धापनदिन कार्यक्रमात, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘उद्याच्या श्वासासाठी’ या कवितासंग्रहामध्ये पर्यावरणविषयक सुंदर कवितांचा समावेश आहे. श्री. पुजारी यांच्या ‘आई माझं जग ‘ या कवितासंग्रहाच्या दोन आवृत्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांनी आपल्या दिवंगत शिक्षकाविषयीचे ‘देवमाणूस’ हे संकलित पुस्तक तसेच स्व. वडिलांविषयीची ‘ ही घडीपत्रिकाही प्रकाशित केली आहे. विविध वृत्तपत्रे, मासिके व दिवाळी अंकांतून श्री पुजारी यांचे लेख,कविता,प्रवासवर्णने, पुस्तक परीक्षणे प्रकाशित झाली आहेत. त्यांची वृक्षलागवड,पर्यावरणविषयक जनजागृतीपर घोषवाक्ये पुण्यात विविध ठिकाणी प्रसारित करण्यात आलेली आहेत. त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार २०२१, राष्ट्रीय प्रबोधनयात्री पुरस्कार २०२३ व इतर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. वनविभागाचे प्रसिद्धी अधिकारी म्हणूनही त्यांनी बराच काळ काम पाहिले आहे.