Home Blog Page 1131

ते बदला घेण्यासाठी तर मी शेतकरी हितासाठी लढणार ..खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले हाच फरक आहे आमच्यात

पुणे- शिवाजीराव आढळराव पाटील बदला घेण्यासाठी निवडणूक लढणार आहे तर मी मात्र शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवून त्याचे हित साधण्यासाठी निवडणूक लढणार आहे हाच त्यांच्यात आणि माझ्यात महत्वाचा फरक असणार आहे असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

कोल्हे ,म्हणाले,’2019 चा बदला घेण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढणार असतील तर, माझा प्रश्न आहे एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का? का फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्यांच माणसाला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे, हा प्रश्न माझ्या मनात येतो.दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीला सामोर जाण्याचा कोणाचा काय हेतू आहे, हे ही स्पष्ट होत

त्यांच विधान पाहिले तर त्यांना 2019 चा बदला घ्यायचा आहे, मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य नागरिकांचा, महाराष्ट्रातील जनतेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मायबाप जनतेकडे मी आशिर्वाद मागतोय. त्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. त्यांना जर बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुज्ञ आहे.

राज ठाकरे यांच्यावर बोलताना ते म्हणाले,’कोणी महायुतीत जाणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.पण यापद्धतीने जे प्रकार सुरु आहेत त्यामध्ये भाजपचा कॉन्फिडन्स खचलेला दिसतोय.अब की बार 400 पार म्हणणं असताना जेमतेम ते 200 चा आकडा ते गाठू शकतील अशी वस्तुस्थिती आहे.महाराष्ट्राची भूमिका ही फार महत्वाची राहणार आहे. एकीकडे शिवसेना फोडून झाली, राष्ट्रवादी फोडून झाली तरी सुद्धा मनसेला बरोबर घेताय, तरी सुद्धा परिस्थिती भाजपला फेव्हरेबल अशी नाहीयेमहाराष्ट्र हा कायम विचारांच्या मागे उभा राहिला आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा येत्या निवडणुकीत नक्की दिसेल.

आढळराव जाणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुरू असलेला शिरुर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. 26 मार्चला आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. शिरुरमध्ये बदला घेण्यासाठीच लढणार असून महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल, असा विश्वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शिरुर लोकसभेच्या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये जोर- बैठका सुरू होत्या. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुरमधून लढण्यास इच्छुक होते. मात्र शिरुरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे असल्याने आढळराव पाटील यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.

अखेर आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून 26 मार्च रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंना पाडणारचं, असे थेट आव्हान दिल्याने ही निवडणुक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? असे बाळबोध प्रश्न आता विचारु नका. राष्ट्रवादीचा उमेदवार शिरुरमधून मोठ्या फरकाने विजय मिळवेल. शिरुर-आंबेगाव येथे पक्ष प्रवेशाची मोठी सभा होईल असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. पक्ष प्रवेशाआधी माझ एकनाथ शिंदे यांच्याशी बोलण झाले आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आहे असे आढळराव पाटील यांनी सांगितले. माझ्या कॅलक्युलेशननुसार पहिली निवडणूक 30 हजारने जिंकली. दुसरी एक लाखाने, तिसरी तीन लाखाने आता चौथी निवडणूक रेकॉर्ड मताने जिंकेन, हा मला नाही जनतेला सुद्धा विश्वास आहे असे शिवाजीराव म्हणाले.

दरम्यान शिरुरमधून लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचं आव्हान आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आज संध्याकाळी जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल असे सुनील तटकरे म्हणाले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाच पंतप्रधान बनवायच.45 पेक्षा जास्त खासदार निवडणूक आणण्याच आमच उद्दिष्टय आहे असे सुनील तटकरे म्हणाले.

सुरेल रागदारीतून वसंत ऋतूचे स्वागत 

पुणे :
 वसंत ऋतूचे  आगमन,होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर ‘स्वर धरोहर’ संस्थेतर्फे आयोजित ‘स्वर बसंत’  या गानमैफलीला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
शनिवार,दि.२३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात   ही मैफल आयोजित करण्यात आली होती.
डॉ.रेवा नातू आणि गौरी पाठारे यांनी या मैफिलीत सुरेल शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन सादर केले.त्यांना तबल्यावर रोहित देव आणि हार्मोनियमवर लीलाधर चक्रदेव यांनी साथसंगत केली.अनुश्री बोधले- नातू यांनी सूत्रसंचालन केले.

 डॉ. रेवा नातू यांनी प्रारंभी राग यमन मधील ‘देहो दान मोहे ‘ही विलंबित एक तालातील बंदिश सादर केली.’ सुखदाता सदन के शंकर ‘ ही दृत बंदिश, नंतर एक तराणा सादर केला. वसंत ठकार यांनी रचलेली राग देस मधील ‘रंग उडत है चहू ओर ‘ ही  झपतालातील बंदिश, ‘चल कोकीला मधुमास आया’ ही बंदिश सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.
गौरी पाठारे यांनी सुरेल गायकी द्वारे त्यांच्या खास शैलीत राग रागेश्री – झुमरा,आणि राग बसंत सादर केला. ‘आयो अत अत वारो’ ही पारंपारिक बंदिश तसेच ‘देखो शाम गेहेलिनी बैया मोरी’ , ‘पिया संग खेलो होरी ‘या बंदिशी सादर केल्या. होरीचा दादरा आणि झुला प्रभावीपणे सादर केला.
 दोन्हीं प्रतिभावान गायिकांच्या विलोभनीय सादरीकरणाला पुणेकर रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
स्वर धरोहर व डॉ. रेवा नातु प्रस्तुत “साधना” ह्या त्रैमासिक मालिकेतील हे पहिले पुष्प होते.भारतीय संस्कृती मध्ये ऋतुचक्राचे प्राधान्य आहे. आपले सण सुद्धा ऋतुचक्राला अनुसरून असतात. ह्या सणांची आणि ऋतूंची शोभा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधून देखील वाढते. निसर्ग आणि सण ह्यांचे अतिशय रम्य वर्णन करणाऱ्या बंदिशी आणि उपशास्त्रीय गीत प्रकार हे आपल्या शास्त्रीय संगीताचे वैशिष्ट्यच आहे. हे वैशिष्ट्य या मैफिलीतून ठळकपणे पुढे आले

अमित ठाकरे म्हणाले ,  राज ठाकरे यांनी अजूनही माझ्यासाठी ‘ते’ केल नाही……

 झी युवा वाहिनीतर्फे देण्यात येणाऱ्या झी युवा सन्मान पुरस्कार २०२४ या सोहळ्यात यावर्षी विविध क्षेत्रांतील प्रयोगशील तरूणांना झी युवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले  आहे. अशा कर्तबगार तरूणांच्या यादीत अमित राज ठाकरे यांनी यंदाच्या झी युवा नेतृत्व सन्मान पुरस्कारावर नाव कोरले आहे, रविवार दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर झी युवा सन्मान पुरस्कार २०२४ हा सोहळा प्रसारीत होणार आहे. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांचे या सोहळ्याला सहकार्य मिळाले आहे.

 झी युवा सन्मान पुरस्कार सोहळ्यात अमित ठाकरे यांनी एक वक्तव्य केले…. आणि या वक्तव्यात त्यांनी राज ठाकरे यांनी अजूनही त्यांच्यासाठी काय केले नाही याची खंत व्यक्त केली. अर्थात अमित ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे अनेक तर्क-वितर्क निर्माण झाले आहेत.

अमित ठाकरे यांचे वक्तव्य:
“माझ्या वडिलांनी मला नेहमी प्रेरणा दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. पण अजूनही त्यांनी माझ्यासाठी एक काम केलेलं नाही आणि ते म्हणजे मला एखादा कौतुकाचा मेसेज करणं.”
“मी माझ्या वडिलांचा आदर करतो आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयाचं पालन करतो. पण मला त्यांच्याकडून प्रोत्साहनाचा मेसेज मिळण्याची इच्छा आहे.कदाचित मी अजुन म्हणावे तसे  काही केले नसेल मात्र मी त्या दिवसाची वाट पाहीन .

अमित ठाकरे यांची कार्य :
मनसेच्या विद्यार्थीसेनेच्या अध्यक्षपदापासून अमित ठाकरे यांच्या कामाचा प्रवास सुरू झाला. आजपर्यंत, अमित यांनी समाजातील अनेकांच्या समस्या सोडवण्यासाठी जीवाचे रान केले. राज ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेल्या अमित ठाकरे यांनी समाजातील तळागाळातील लोकांया व्यथा समजून घेत कामाचा निपटारा करण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या नावाला असलेलं वलय अमित ठाकरे यांना वारसाने  मिळाले असले तरी, आपल्या नेतृत्वगुण आणि वक्तृत्वशैलीने अमित ठाकरे यांनी युवानेते म्हणून ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे नेते अशी त्यांच्या कामाची छाप आहे. विद्यार्थीसेनेच्या माध्यमातून युवकांच्या अनेक समस्यांची उकल करण्यात अमित ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. मुंबई मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा, रेल्वेप्रवाशांच्या सुविधांसाठी अधिकाऱ्यांशी पाठपुरावा या कामात अमित ठाकरे यांनी त्यांचे नेतृत्वकौशल्य दाखवले आहे. नेता हा लोकांना आपला वाटला पाहिजे हा मंत्र जपून अमित ठाकरे यांनी राजकारण आणि समाजकारण यांच्यात समन्वय साधला. अमित ठाकरे यांनी याच नेतृत्वगुणाची दखल घेत झी युवा वाहिनीतर्फे त्यांना झी युवा नेतृत्व सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटा चा ट्रेलर आणि रिलीजची डेट ठरली !

बॉलिवूडचा तरुण अँक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ आणि खिलाडी अक्षय कुमार यांनी त्यांच्या आगामी ॲक्शनर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची रिलीज डेट शेअर केली आहे. बहुप्रतिक्षित ट्रेलर २६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे आणि ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यां नंतर 10 एप्रिल रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 
 टायगरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर प्रेक्षकांना ट्रेलरच्या रिलीजच्या तारखेसह तसेच चित्रपटाची माहिती दिली.

 “रियल एक्शन का एक बडा डोस लेने आ रहे हैं #बडेमियांछोटेमियां! #बडेमियांछोटेमियांचा ट्रेलर २६ मार्चला!  10 एप्रिल रोजी सिनेमा प्रदर्शित होईल!” 
https://www.instagram.com/p/C41-lLyr-vD/?igsh=dGh1bm9nM3Bsazh6

 प्रेक्षकांमध्ये #TheTigerEffect पाहण्याची अपेक्षा गगनाला भिडली आहे कारण हा चित्रपट अभिनेत्याच्या उत्कृष्ट चित्रपटसृष्टीत आणखी एक भर पाडणार आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ व्यतिरिक्त टायगर श्रॉफ त्याच्या आगामी ‘रॅम्बो’, ‘सिंघम अगेन’ आणि नुकत्याच जाहीर झालेल्या ‘बागी 4’ या चित्रपटांमध्ये #TheTigerEffect दाखवण्यासाठी सज्ज आहे.

हुकूमशहा डरपोकच असतो..विरोधकांना तुरुंगात टाकून निवडणुकांना सामोरे जात आहेत

हुकूमशहा डरपोकच असतो. ‘एक अकेला सब पर भारी’ असे मोदींविषयी म्हणतात ते खरे नाही. मोदी हे घाबरले आहेत. त्यामुळेच विरोधकांना तुरुंगात टाकून निवडणुकांना सामोरे जात आहेत. यालाच डरपोक म्हणतात, असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे.

नेमके काय म्हटलेय अग्रलेखात वाचा अग्रलेख सामनाचा जसाच्या तसा …..

लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करून त्यांना अतिरेक्यासारखे वागवायचे व त्यांची बदनामी करून निवडणुकीतून माघार घ्यायला लावायची. हे करणारे राज्यकर्ते लोकशाहीची जपमाळ ओढतात तेव्हा औरंगजेबाची आठवण येते.

औरंगजेबसुद्धा जपमाळ ओढत त्याच्या विरोधकांचे काटे काढीत होता. तरीही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी निर्माण झालेच. ज्याची ज्याची भीती वाटत होती त्या सगळय़ांना कंसाने तुरुंगात डांबले, तरी कृष्णजन्म झाला व कंसाचा वध अखेर झालाच. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची अटक धक्कादायक, आश्चर्यकारक नाही. हुकूमशहा डरपोकच असतो. ‘एक अकेला सब पर भारी’ असे मोदींविषयी म्हणतात ते खरे नाही. मोदी हे घाबरले आहेत. त्यामुळेच विरोधकांना तुरुंगात टाकून निवडणुकांना सामोरे जात आहेत. यालाच डरपोक म्हणतात.

भारतीय लोकशाहीचे आणखी काय धिंडवडे निघायचे बाकी आहेत? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने त्यांच्या सरकारी घरात घुसून अटक केली. केजरीवाल यांच्याकडे दिल्ली विधानसभेत पूर्ण बहुमत आहे. त्यांच्या ‘आप’ पक्षाचे पंजाबात सरकार आहे, पण लोकसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी ‘इंडिया आघाडी’बरोबर गठबंधन केले. त्यामुळे दिल्ली, हरयाणा राज्यांत भाजपला मोठा फटका बसेल. केजरीवाल यांनी काँग्रेसबरोबर जाऊ नये यासाठी ‘ईडी’च्या माध्यमातून दहशत निर्माण केली गेली. केजरीवाल यांनी भाजपसमोर झुकण्यास नकार दिला तेव्हा त्यांच्या सरकारी निवासस्थानात घुसून ईडीने त्यांना अटक केली. मद्य घोटाळा वगैरे सर्व बहाणा आहे. केजरीवाल यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’शी हातमिळवणी केली असती तर ते अजित पवारांप्रमाणे भाजपचे नवे शंकराचार्य म्हणून नियुक्त झाले असते. या आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही ‘ईडी’ने याच पद्धतीने अटक केली. लोकांनी पूर्ण बहुमताने निवडून दिलेली सरकारे पाडता येत नाहीत तेव्हा ‘ईडी’ वगैरे यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनाच अटक करायची हे धोरण मोदी-शहांच्या सरकारने स्वीकारले आहे. यालाच हुकूमशाही म्हणतात. रशिया किंवा चीनसारख्या राष्ट्रांत विरोधकांना सरळ गायब केले जाते किंवा ठार केले जाते. आपल्याकडे लोकशाहीचे अजीर्ण झाल्याने विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून महिनोन् महिने तुरुंगात डांबले जाते. देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका

भयमुक्त वातावरणात

पारदर्शक पद्धतीने होतील, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे; पण आचारसंहिता लागू झाली असताना निवडणुकीत उतरलेल्या सरकारविरोधकांची अशी मुस्कटदाबी करणे हे कसले लक्षण समजायचे? विरोधकांनी निवडणुकीत उतरूच नये यासाठी सुरू असलेला हा दहशतवाद आहे. औरंगजेब त्याच्या विरोधकांना एक तर मांडलिक करीत होता, नाहीतर यमसदनास पाठवीत होता. हीच औरंगजेबी वृत्ती सध्याच्या केंद्रीय राज्यकारभारात दिसत आहे. केजरीवाल हे राजकीय पक्ष चालवतात व त्यांनी मद्याचे ठेके देण्याच्या बदल्यात देणग्या स्वीकारल्या असा ईडीचा आरोप आहे, पण अशा प्रकारे हजारो कोटींच्या देणग्या भाजपच्या खात्यातदेखील जमा झाल्या आहेत. निवडणूक रोखे घोटाळ्यांनी भाजपचा चेहराच ओरबाडून निघाला. ज्या कंपन्यांवर ईडी, सीबीआयच्या धाडी पडल्या त्या कंपन्यांकडून भाजपने जबरी वसुली करून पक्षाला निधी घेतला. गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा वळवून घेणे यालाच ‘पीएमएलए’ कायद्यात मनी लाँडरिंग म्हटले जाते. असे मनी लाँडरिंग भाजपने केले, पण भाजप व त्यांचे वसुली एजंट मोकळे असून केजरीवाल, सिसोदिया, संजय सिंह यांना अटका झाल्या आहेत. 2014 पासून आतापर्यंत ‘ईडी’ने केलेल्या कारवायांकडे नजर टाकली तर 95 टक्के कारवाया विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच झाल्या आहेत. मोदी-शहांनी सत्ता व तपास यंत्रणांचा केलेला हा गैरवापर आहे. ईडी, सीबीआयचा वापर विरोधकांना संपविण्यासाठी व आपली तिजोरी भरण्यासाठी केला. ही कृती संविधान विरोधी आहे. ‘दिल्ली सरकारने मद्य धोरणासंदर्भात जे निर्णय घेतले त्यामुळे त्या सरकारचा 2,873 कोटींचा तोटा झाला.

दक्षिण भारतातील मद्य उद्योजकांना

फायदा पोहोचविण्यासाठी 136 कोटी रुपयांची लायसन्स फी माफ केली व त्या बदल्यात 100 कोटी रुपयांचा निधी स्वीकारला,’ असा दावा ईडीने केला आहे. ‘ईडी’ हा सध्या एक बेभरवशाचा टोणगा झाला आहे व मोदी-शहांनी फटका मारताच ते सांगतील त्याला शिंगावर घेत असतो. भारतातील लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान त्यामुळे नष्ट झाले आहे. विरोधी आवाज राहूच नये हे विद्यमान राज्यकर्त्यांचे धोरण घातक आहे. लोकशाही पूर्णपणे संपविण्याचा हा कट आहे. मोदी सरकारने सर्वाधिक फायदा त्यांच्या दोन-चार उद्योगपती मित्रांना पोहोचवला आहे. मोदी काळात संपूर्ण देश, सार्वजनिक उपक्रम, मुंबईसारखी शहरे ही अदानीच्या घशात घातली गेली, ती काय मोदी-शहा कर्णाचे अवतार आहेत म्हणून? लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करून त्यांना अतिरेक्यासारखे वागवायचे व त्यांची बदनामी करून निवडणुकीतून माघार घ्यायला लावायची. हे करणारे राज्यकर्ते लोकशाहीची जपमाळ ओढतात तेव्हा औरंगजेबाची आठवण येते. औरंगजेबसुद्धा जपमाळ ओढत त्याच्या विरोधकांचे काटे काढीत होता. तरीही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी निर्माण झालेच. ज्याची ज्याची भीती वाटत होती त्या सगळय़ांना कंसाने तुरुंगात डांबले, तरी कृष्णजन्म झाला व कंसाचा वध अखेर झालाच. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची अटक धक्कादायक, आश्चर्यकारक नाही. हुकूमशहा डरपोकच असतो. ‘एक अकेला सब पर भारी’ असे मोदींविषयी म्हणतात ते खरे नाही. मोदी हे घाबरले आहेत. त्यामुळेच विरोधकांना तुरुंगात टाकून निवडणुकांना सामोरे जात आहेत. यालाच डरपोक म्हणतात.

केजरीवालांच्या अटकेचे परिणाम भाजपाला निवडणुकीत भोगावे लागतील -शरद पवार

पुणे– प्रत्येक राज्याच्या मंत्रिमंडळाला मद्य धोरण निश्चित करण्याचा अधिकार असतो. त्यानुसारच अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारचे प्रमुख म्हणून धोरण निश्चित केले, असे शरद पवार म्हणाले. सरकारी यंत्रणांचा वापर करून लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम यापूर्वी कधी घडले नव्हते, असा दावाही त्यांनी केला.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मद्य धोरणाबाबत केजरीवालांवर टीका केली आहे. पण पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, मंत्रिमंडळ म्हणजे त्या राज्याची वेगवेगळी धोरणे ठरवणारी अधिकृत यंत्रणा असते. त्या धोरणात काही चुकले असेल तर लोकांसमोर जायला पाहिजे. निवडणुकीमध्ये मुद्दे उपस्थित करायला पाहिजेत.

कायदेशीरदृष्ट्या काही गैर असेल तर कोर्टामध्ये गेले पाहिजे. मात्र तसे न करता त्यांना अटक केली. केजरीवाल सामान्य कुटुंबातील आहेत. ते पण तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना ९० टक्के मते मिळाली आहेत.त्यामुळे चांगल्या माणसाला लोकशाहीने दिलेला अधिकार गाजवू देत नाही. हे लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे त्यांच्या अटकेच्या कारवाईचा शंभर टक्के परिणाम राज्यातील जनतेवर होणार आहे. मागील विधानसभेला भाजपच्या दोन तरी जागा आल्या होत्या. पुढच्या वेळी त्याही येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे, असेही पवार म्हणाले.

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई

विकासकामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार : मुरलीधर मोहोळ

पुणे : गेल्या दहा वर्षांमधील कामगिरी पाहता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत, अशी संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य लोकांची भावना आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एक मत देण्याचा निश्चय प्रत्येक पुणेकराने केला आहे. ही देशाची निवडणूक आहे, मोदींची निवडणूक आहे, या दृष्टीने आम्ही पाहत असून विकासकामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार आहोत, असे पुणे लोकसभा मतदारसंघातील ‘महायुती’चे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज येथे केले.

पुण्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. ते म्हणाले ”पुणेकर सूज्ञ आहेत. पुण्याच्या निवडणुकीचा निकाल देशाचा पंतप्रधान कोण असणार, हे ठरवणार आहे. विधानसभा पोटनिवडणूक आणि देशाच्या लोकसभेची निवडणूक याचे संदर्भ पूर्णपणे वेगळे असतात. आज त्यांच्या पक्षाला जो योग्य उमेदवार वाटला, तो त्यांनी दिला. माझ्या पक्षाला माझे नाव योग्य वाटले म्हणून मला उमेदवारी दिली आहे. महायुतीची आणि महाविकास आघाडीची निवडणूक आहे असे न पाहता मोदींची निवडणूक आहे, या दृष्टीने आम्ही पाहत आहोत.

किती मताधिक्याने निवडून याल? ही निवडणूक एकतर्फी आहे का? असे विचारले असता मोहोळ म्हणाले, ‘एकतर्फी लढाई होणार, हे पुणेकरांनी ठरवले आहे. आपण पत्रकार सर्वत्र फिरत असतात आपणही याचा कानोसा घ्यावा. आकड्यात मी जाणार नाही, भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी पुणेकर उभा राहतील हा विश्वास आहे’.

त्यांचा राहुल गांधींवर विश्वास नसावा’

मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे फोटो वापरून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु असून यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता मोहोळ म्हणाले ” मीही ते पाहिले. मला त्याचे हसू आले. कदाचित, त्यांचा त्यांचे नेते राहुल गांधींवर विश्वास नसावा, म्हणून त्यांनी बापट यांचा फोटो वापरला.

मताधिक्य राखणे ही खा. गिरीश बापटांना श्रद्धांजली

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी विक्रमी मताधिक्य घेत विजय संपादन केला होता. ते मताधिक्य कायम राखणे, हीच खरी खा. बापट यांना श्रद्धांजली असेल’, असेही मोहोळ म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्याकडून निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

पुणे, दि. २२: जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मतदानाच्यावेळी उन्हापासून संरक्षणासाठी करावयाच्या व्यवस्थेबाबत माहिती घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, सारथी पुणे विभागीय कार्यालयाचे उप व्यवस्थापकीय संचालक अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, समन्वयक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ.दिवसे म्हणाले, स्थिर आणि भरारी पथकांनी पूर्ण क्षमतेने काम करावे. आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास त्वरीत गुन्हे दाखल करून अहवाल सादर करावा. मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळाच्या प्रशिक्षणाला विशेष महत्व द्यावे. कर्मचाऱ्यांना ईव्हीएमचे सविस्तर प्रशिक्षण मिळेल यादृष्टीने नियोजन करा आणि त्यांच्या शंकांचे पूर्ण निरसन होईपर्यंत प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण द्यावे.

नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या दिनांकापर्यंत मिळालेला अवधी कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी उपयोगात आणावा. कर्मचाऱ्यांना कामाचे स्वरुप सूक्ष्मरितीने समजावून द्यावे, त्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी समन्वयक अधिकाऱ्यांशी संवाद साधावा, अशा सूचना दिल्या.

यावेळी मनुष्यबळ व्यवस्थापन, ईव्हीएम यादृच्छीकरण, मतदान कर्मचाऱ्यांचे मतदान, मतदान साहित्य वाटप, वाहतूक आराखडा आदींबाबत आढावा घेण्यात आला.

निवडणूक कालावधीत दुष्काळसदृश परिस्थितीकडे दुर्लक्ष न करता आवश्यक उपययोजना तात्काळ कराव्यात असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

रायगडावर माथा टेकवून लोकशाहीसाठी लढ्याला प्रारंभ -धंगेकर

पुणे-छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर जावून काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आज महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाले. ही प्रेरणा देणारी, ऊर्जा देणारी आणि विजयाचे प्रतिक असलेली भूमी आहे, असे ते म्हणाले.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास जागवणारे हे ऊर्जा स्थळ आहे. येथे येवून नेहमीच प्रेरणा मिळते. हीच प्रेरणा घेवून आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरत आहोत. निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा इथे येवून आम्ही माथा टेकवून महाराजांचा आशीर्वाद घेवू, असा निश्चय रवींद्र धंगेकर यांनी केला.

छत्रपतींच्या घराण्यातील आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हेही या निवडणुकीत आमच्यासोबत आहेत. त्यांचाही आम्हाला आशीर्वाद लाभला आहे. जनताही भरभरून आशीर्वाद देईल, असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.रवींद्र धंगेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्यायाच्या विरोधात लढा देऊन स्वराज्य स्थापन केले. रयतेचे हित साधले. सर्वसामान्यांचे कल्याण केले. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेसाठी लढा देत समाजाची सेवा केली. समाजसुधारकांचे, संतांचे कार्य जनसेवा करताना कायम स्फूर्ती देणारे आहे.

देशात हुकूमशाही, अराजकता सुरू आहे. आपल्याला लोकशाही वाचविण्यासाठी लढायचे आहे. भाजपच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. हे चित्र बदलण्यासाठी जनतेने इंडिया आघाडीला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती: नाना पटोले

2024 ची लढाई संविधान आणि लोकशाही वाचवण्याची

मुंबई दि. 22 मार्च 2024

लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिम्मत भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांच्यात नाही म्हणून ते रडीचा डाव खेळत आहेत. पराभवाच्या भितीने घाबरलेले नरेंद्र मोदींनी केंद्रीय संस्थांना हाताशी धरून विरोधी पक्षांना संपवण्याचे कारस्थान सुरु केले आहे. याचाच भाग म्हणून झारखंडचे आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. कालच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. काँग्रेस पक्षाला निवडणूक लढवता येऊ नये म्हणून काँग्रेस पक्षाची खाती गोठवली आहेत. मोदी सरकारने फक्त काँग्रेसची खाती नाही तर या देशातील लोकशाही गोठवली असून वन नेशन, वन इलेक्शन, नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार चीन व रशियाच्या मॉडेलनुसार काम करत असून त्यांना देशात फक्त एकच पक्ष हवा आहे त्यांच्या या मॉडेलमध्ये विरोधी पक्षाला स्थानच नाही म्हणून ते विरोधी पक्षांना संपवण्यासाठी ते आपली पूर्ण ताकद लावून संविधानिक संस्था आणि तपासयंत्रणांचा गैरवापर करत आहेत. भाजपाचा कार्यकर्ता आयकर विभागाने काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवून काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्याचा कपटी डाव खेळला आहे. भारतीय जनता पक्षासह कोणताही राजकीय पक्ष इन्कम टॅक्स भरत नाही. असे असताना फक्त काँग्रेस पक्षावरच आयकर विभागाने कारवाई करून 11 बँक खाती का गोठवली? काँग्रेसवर जशी कारवाई केली तशी भारतीय जनता पक्षावर कारवाई करण्याची हिम्मत या इन्कम टॅक्स विभागाने का दाखवली नाही ? 2017-18 साली काँग्रेस पक्षाला मिळालेल्या 210 कोटी देणग्यांचा मुद्दा आहे. काँग्रेस खासदारांनी पक्षाला 14 लाख 49 हजार रुपये रोख दिले आहेत, हे कारण दाखवून इन्कम टॅक्स विभागाने 106% दंड लावून काँग्रेस पक्षाच्या खात्यातून 115 कोटी रुपये जबरदस्तीने काढून घेतले आहेत.

यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे.. टायमिंग.. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाला पुढे करून काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवून आर्थिक कोंडी केली आहे. पक्षाकडे निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पैसे नाहीत. 1993-94 साली सिताराम केसरी काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते त्यावेळच्या देणग्यासाठी आता 31 वर्षानंतर इन्कम टॅक्स विभागाने नोटीस पाठवली आहे. राजकीय पक्ष इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत नाहीत हे मोदींना माहित आहे. भाजपने कधी इन्कम टॅक्स भरला आहे का? असा सवाल करून मोदी सरकार किती खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहे हे दिसते, काँग्रेस पक्ष याप्रश्नी कोर्टात जाईल पण तोपर्यंत लोकसभा निवडणुका संपतील, असे पटोले म्हणाले.एकीकडे विरोधी पक्षाची आर्थिक कोंडी करायची आणि दुसरीकडे इलोक्टोरल बाँड मधून भाजपा मात्र कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुल करत आहे. नरेंद्र मोदी या बाँडच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठे खंडणीचे रॅकेट चालवत आहेत. इलोक्टोरल बाँडच्या माध्यमातून देणग्या दिलेल्या बहुतेक कंपन्या बोगस आहेत. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाचे छापे टाकून कंपन्यांकडून जबरदस्तीने खंडणी गोळा केली आहे. लोकशाही व्यवस्थेत स्वतंत्र व निष्पक्ष वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजेत पण मोदी सरकार विरोधकांना संपवत आहेत. भारतीय जनता पक्षाचा दारूण पराभव होत असल्याचे चित्र देशात स्पष्ट दिसत आहे म्हणूनच मोदी-शाह टोळीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मोदी सरकारच्या पापाचा घडा आता भरला आहे. हुकूमशहाचा अंत जवळ आला आहे तशी शेवटची धडपड सुरु झाली आहे पण जनता या हुकूमशाहीचा अंत करुन लोकशाही व्यवस्थेचे सरकार देशात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी खासदार प्रज्ञा ठाकूर कोर्टात हजर, जामीनपात्र वॉरंट रद्द

मुंबई: भोपाळच्या भाजप खासदारासमोर हजर राहिल्यानंतर येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरुद्ध जारी केलेले जामीनपात्र वॉरंट रद्द केले.

सप्टेंबर 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी ठाकूर याच्या विरोधात कोर्टाने 11 मार्च रोजी 10,000 रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले होते, वारंवार चेतावणी देऊनही न्यायालयात हजर न झाल्याबद्दल जारी केलेले जामीनपात्र वॉरंट रद्द केले

विशेष न्यायाधीश ए के लाहोटी यांनी त्या वेळी ठाकूर यांना २० मार्च रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते, परंतु ती येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल असल्याचा दावा करत ती तसे करू शकली नाही.

गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीच्या बदलाबाबत तात्पुरते आदेश जारी

पुणे, दि. २२: गणेशखिंड रस्त्यावर पुणे विद्यापीठ चौकामध्ये उड्डाणपूल व मेट्रो बांधकाम काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचा रस्ता अरुंद झालेला असल्यामुळे गणेशखिंड रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी यापूर्वी असलेले वाहतूकीचे सर्व आदेश रद्द करून गणेशखिंड रोड रस्त्यावरील वाहतुकीच्या बदलाबाबत पुणे शहर पोलीस उपआयुक्त (वाहतूक) यांनी प्रायोगित तत्वावर तात्पुरते आदेश जारी केले आहेत.

पुणे विद्यापीठ चौकामधुन गणेशखिंड रस्त्याने सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सेनापती बापट रोड जंक्शन येथून उजवीकडे प्रवेश बंद राहणार असून वाहनचालकांनी कॉसमॉस बँकेसमोरून यु-टर्न घेवून सेनापती बापट रोड जंक्शन वरून डावीकडे वळण घेवून पर्यायी मार्गाने जावे.

शिवाजीनगरकडून गणेशखिंड रस्त्यावर येणाऱ्या रेंज हिल्सकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रेंज हिल्स् कॉर्नर येथे उजवीकडे प्रवेश बंद राहील. वाहनचालकांनी कॉसमॉस बँकेसमोरून यु-टर्न घेवून रेंज हिल्स् कॉर्नर येथून डावीकडे वळण घेवून रेंज हिल्सकडे पर्यायी मार्गाने जावे.

पुणे विद्यापीठ चौकातून औंध, सांगवी, डांगे चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना औंध रोडवरून प्रवेश बंद राहील. वाहनचालकांनी पुणे विद्यापीठ चौकामधून बाणेर रस्त्याने जावे व राजभवनच्या पाठीमागील बाजुस यु-टर्न घेवून पुणे विद्यापीठ चौकामध्ये यावे व डावीकडे वळण घेवून औंध रोडने जावे.

पुणे विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बाणेर रोडवरून प्रवेश बंद राहणार असून वाहनचांलकांनी पुणे विद्यापीठ चौकातून डावीकडे वळणे घेवून पाषाण रोडने अभिमानश्री जंक्शन येथून उजवीकडे वळण घेवून बाणेर रस्त्याला येवून बाणेरकडे जावे. बाणेर व औंध रस्त्यावरून पुणे विद्यापीठ चौकामध्ये येणाऱ्या वाहतुकीमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

जड, अवजड वाहने, ट्रक, ट्रेलर्स, कंटेनर्स यांच्यासाठी २४ तास प्रवेश बंद
गणेशखिंड रस्त्यावरील चाफेकर चौक ते पुणे विद्यापीठ चौक, औंध रस्त्यावरील ब्रेमेन चौक ते पुणे विद्यापीठ चौक, बाणेर रस्त्यावरील अभिमानश्री चौक ते पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रस्त्यावरील अभिमानश्री चौक ते पुणे विद्यापीठ चौक व सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू. मेरीएट हॉटेल चौक ते पुणे विद्यापीठ चौजक या मार्गावर सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहने, ट्रक, ट्रेलर्स व कंटेनर्स यांना २४ तास प्रवेश बंदी राहील.

भाजीपाला वाहतूक करणारे तीनचाकी पिकअप, तीनचाकी, चारचाकी मालवाहतूक करणारी सर्व प्रकारची वाहने तसेच डंपर, मिक्सर, जे.सी.बी., रोड रोलर कमी वेगाने चालणारी वाहने व इतर वाहनांना सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री १० वाजेदरम्यान वा. दरम्यान प्रवेश बंद राहील, असेही पोलीस उपआयुक्त (वाहतूक) रोहिदास पवार यांनी कळविले आहे.

इतर शहरातून पुण्यामार्गे दुसऱ्या शहराकडे जाणाऱ्या जड, अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल

पुणे, दि. २२: पुणे शहरातून सोलापूर रस्ता, अहमदनगर रस्ता, सातारा रस्ता, मुंबई रस्ता, नाशिक रस्ता, सासवड रस्ता, पौड रस्ता, आळंदी रस्ता व इतर रस्त्यांवरून शहरात मार्गक्रमण करून दुसऱ्या शहराकडे जाणारी व येणारी सर्व प्रकारची जड, अवजड माल वाहतूक करणारे ट्रक व इतर वाहनांनी येताना व जाताना शहरामधील अन्य मार्ग वापरण्यास २३ मार्च पासून पूर्ण वेळ बंदी करण्यात आली आहे. यासंबंधीचे पूर्वीचे आदेश रद्द करून प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक मार्ग बदलाबाबतचे आदेश पुणे शहर पोलीस उपआयुक्त (वाहतूक) रोहिदास पवार यांनी जारी केले आहेत.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या संख्येमध्ये झालेली वाढ, वाहतूक कोंडी, जड वाहनांमुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे तसेच मेट्रो, उड्डाणपूल आदी विविध मोठे प्रकल्प व विकास कामे सुरु असल्यामुळे रस्त्यावरील जागा मोठ्या प्रमाणात व्यापली जाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे नागरिकांना मोठा धोका व गैरसोय असल्याने ती टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केले आहेत.

सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद असलेले व रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत प्रवेश असणारे मार्ग
अहमदनगर रस्त्यावरून पिंपरी चिंचवड, मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, होळकर पुल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पूल मार्ग बंद राहील. वाहनचालक शिक्रापूर, चाकण, तळेगाव या पर्यायी मार्गानी इच्छितस्थळी जातील. अहमदनगर रस्त्यावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता खराडी वायपास चौक, मगरपट्टा रोड, सासवड रोडने मंतरवाडी फाटा चौक, खडी मशीन चौक, कात्रज चौक मार्ग बंद राहील. वाहनचालक लोणीकंद, केसनंद, थेऊर, थेऊर फाटा तसेच शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला, लोणंद किंवा सुपा, जेजूरी या पर्यायी मार्गानी इच्छितस्थळी जातील.

अहमदनगर रस्त्यावरून सोलापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरिता खराडी बायपास चौक, मगरपट्टा रोड, हडपसर मार्ग बंद राहील. वाहनचालक शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला मार्गे इच्छितस्थळी जातील. सोलापूर रस्त्यावरून साताराकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता हडपसर, मंतरवाडी फाटाचौक, खडी मशीनचौक, कात्रजचौक मार्ग बंद राहील. वाहनचालकांनी केडगाव चौफुला, लोणंद या पर्यायी मार्गाने इच्छितस्थळी जावे.

सोलापूर रस्त्यावरून अहमदनगर व नाशिककडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता हडपसर, मगरपट्टा रोड, खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेव आंबेडकर चौक, होळकर पूल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पुल मार्ग बंद राहणार असून वाहनचालकांनी थेऊर फाटा, थेऊर, केसनंद, लोणीकंद, शिक्रापुर मार्गे तसेच केडगाव चौफुला, नाव्हरा, शिरूर मार्गे इच्छितस्थळी जावे.

शहरातील अंतर्गत रस्त्यावर जड, अवजड वाहनांसाठी २४ तास प्रवेश बंद
पुणे शहरातील मंगलदास रस्त्यावरील ब्ल्यु डायमंड चौक ते सर्किट हाऊस चौक, रेंजहिल्स् रोडवरील पोल्ट्री फार्म चौक ते रेंजहिल्स कॉर्नर चौक, सर मानेकजी मेहता रोडवरील काहुन रोड जंक्शन ते कौन्सिल हॉल चौक, पुणे स्टेशन रोडवरील जहांगीर हॉस्पिटल चौक ते अलंकार सिनेमा चौक या अंतर्गत रस्त्यावर जड अवजड माल वाहतूक करणारे ट्रक, डंपर, मिक्सर, बल्कर, जे.सी.बी., रोड रोलर वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर २४ तास प्रवेश बंद राहील. सार्वजनिक वाहतूकीच्या बसेस व अत्यावश्यक सेवेतील वाहने यातून वगळण्यात आली आहेत.

सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत व दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद असलेले चौक
संचेती चौकावरील जंगली महाराज रोड, गणेशखिंड रोड, पौड फाटा चौकवर कर्वे रोड, डेक्कनकडे, लॉ कॉलेज रोड, राजाराम पुलावरून डी. पी. रोडकडे जाणारी, दांडेकर पुल-शास्त्री रोडकडे, सावरकर पुतळा चौक बाजीराव रोडकडे, पॉवर हाऊस चौक-मालधक्का चौकाकडे, पोल्ट्री फार्मचौक-आर.टी.ओ. चौकाकडे, पंडोल अपार्टमेंट चौक महात्मा गांधी रोडकडे, खाणे मारूती चौक-इस्ट स्ट्रीटकडे, लक्ष्मी नारायण सिनेमा चौक जेधे चौकाकडे, ब्रेमेन चौक- पुणे विद्यापीठ चौकाकडे, अभिमान श्री बाणेर चौक पुणे विद्यापीठ चौकाकडे, अभिमान श्री पाषाण चौक- पुणे विद्यापीठ चौकाकडे, सिंफनी सर्कल गणेशखिंड रोडकडे, सेव्हन लव चौक जेधे चौकाकडे, आर.टी.ओ. चौक शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी जड अवजड माल वाहतूक करणारे ट्रक, डंपर, मिक्सर, वल्फर, जे.सी.बी., रोड रोलर वाहनांसाठी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत व दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद राहील.

सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत कोरेगाव पार्क रोड-नॉर्थ मेन रोड ताडीगुत्ता चौक ते कोरेगाव पार्क जंक्शन या ठिकाणी वाहनांना प्रवेश बंद असेल.

अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत, असेही पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.

साप्ताहिक अयोध्या सुपरफास्ट ट्रेन रोज चालवण्याची मागणी

मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मध्य रेल्वेकडे केली मागणी

मुंबई दिनांक २२ मार्च २०२४
अयोध्या धाममध्ये प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारल्यानंतर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मुंबईहून अयोध्या धामकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने दर्शनासाठी प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रेल्वे क्रमांक 22103 अयोध्या कॅन्टोन्मेंट सुपरफास्ट साप्ताहिक गाडी नियमितपणे रोज चालवावी अशी मागणी मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे व्यवस्थापक राम करण यादव यांना पत्राद्वारे केली आहे. रेल्वेच्या व्यवस्थापकांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे.

मुंबईतून अयोध्येसाठी रोज गाडी सुरू झाल्यास लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील एसी/स्लिपर कोचमध्ये वेटिंग तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय देखील दूर होईल. यावेळी डॉ. रमाशंकर भारतीय, आर.डी. यादव, सुरेश पाल, दीपनारायण मिश्रा, अभय झा, दयाशंकर यादव, कृपाशंकर दुबे, ब्रिजेश पाल आदी उपस्थित होते.