पुणे, दि. २२: जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मतदानाच्यावेळी उन्हापासून संरक्षणासाठी करावयाच्या व्यवस्थेबाबत माहिती घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, सारथी पुणे विभागीय कार्यालयाचे उप व्यवस्थापकीय संचालक अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, समन्वयक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ.दिवसे म्हणाले, स्थिर आणि भरारी पथकांनी पूर्ण क्षमतेने काम करावे. आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास त्वरीत गुन्हे दाखल करून अहवाल सादर करावा. मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळाच्या प्रशिक्षणाला विशेष महत्व द्यावे. कर्मचाऱ्यांना ईव्हीएमचे सविस्तर प्रशिक्षण मिळेल यादृष्टीने नियोजन करा आणि त्यांच्या शंकांचे पूर्ण निरसन होईपर्यंत प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण द्यावे.
नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या दिनांकापर्यंत मिळालेला अवधी कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी उपयोगात आणावा. कर्मचाऱ्यांना कामाचे स्वरुप सूक्ष्मरितीने समजावून द्यावे, त्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी समन्वयक अधिकाऱ्यांशी संवाद साधावा, अशा सूचना दिल्या.
यावेळी मनुष्यबळ व्यवस्थापन, ईव्हीएम यादृच्छीकरण, मतदान कर्मचाऱ्यांचे मतदान, मतदान साहित्य वाटप, वाहतूक आराखडा आदींबाबत आढावा घेण्यात आला.
निवडणूक कालावधीत दुष्काळसदृश परिस्थितीकडे दुर्लक्ष न करता आवश्यक उपययोजना तात्काळ कराव्यात असेही जिल्हाधिकारी म्हणाले.