विकासकामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार : मुरलीधर मोहोळ
पुणे : गेल्या दहा वर्षांमधील कामगिरी पाहता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत, अशी संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य लोकांची भावना आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एक मत देण्याचा निश्चय प्रत्येक पुणेकराने केला आहे. ही देशाची निवडणूक आहे, मोदींची निवडणूक आहे, या दृष्टीने आम्ही पाहत असून विकासकामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार आहोत, असे पुणे लोकसभा मतदारसंघातील ‘महायुती’चे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज येथे केले.
पुण्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. ते म्हणाले ”पुणेकर सूज्ञ आहेत. पुण्याच्या निवडणुकीचा निकाल देशाचा पंतप्रधान कोण असणार, हे ठरवणार आहे. विधानसभा पोटनिवडणूक आणि देशाच्या लोकसभेची निवडणूक याचे संदर्भ पूर्णपणे वेगळे असतात. आज त्यांच्या पक्षाला जो योग्य उमेदवार वाटला, तो त्यांनी दिला. माझ्या पक्षाला माझे नाव योग्य वाटले म्हणून मला उमेदवारी दिली आहे. महायुतीची आणि महाविकास आघाडीची निवडणूक आहे असे न पाहता मोदींची निवडणूक आहे, या दृष्टीने आम्ही पाहत आहोत.
किती मताधिक्याने निवडून याल? ही निवडणूक एकतर्फी आहे का? असे विचारले असता मोहोळ म्हणाले, ‘एकतर्फी लढाई होणार, हे पुणेकरांनी ठरवले आहे. आपण पत्रकार सर्वत्र फिरत असतात आपणही याचा कानोसा घ्यावा. आकड्यात मी जाणार नाही, भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी पुणेकर उभा राहतील हा विश्वास आहे’.
‘त्यांचा राहुल गांधींवर विश्वास नसावा’
मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे फोटो वापरून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु असून यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता मोहोळ म्हणाले ” मीही ते पाहिले. मला त्याचे हसू आले. कदाचित, त्यांचा त्यांचे नेते राहुल गांधींवर विश्वास नसावा, म्हणून त्यांनी बापट यांचा फोटो वापरला.
‘मताधिक्य राखणे ही खा. गिरीश बापटांना श्रद्धांजली’
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी विक्रमी मताधिक्य घेत विजय संपादन केला होता. ते मताधिक्य कायम राखणे, हीच खरी खा. बापट यांना श्रद्धांजली असेल’, असेही मोहोळ म्हणाले.