गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुरू असलेला शिरुर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. 26 मार्चला आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. शिरुरमध्ये बदला घेण्यासाठीच लढणार असून महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल, असा विश्वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शिरुर लोकसभेच्या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये जोर- बैठका सुरू होत्या. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुरमधून लढण्यास इच्छुक होते. मात्र शिरुरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे असल्याने आढळराव पाटील यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.
अखेर आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून 26 मार्च रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंना पाडणारचं, असे थेट आव्हान दिल्याने ही निवडणुक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? असे बाळबोध प्रश्न आता विचारु नका. राष्ट्रवादीचा उमेदवार शिरुरमधून मोठ्या फरकाने विजय मिळवेल. शिरुर-आंबेगाव येथे पक्ष प्रवेशाची मोठी सभा होईल असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. पक्ष प्रवेशाआधी माझ एकनाथ शिंदे यांच्याशी बोलण झाले आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आहे असे आढळराव पाटील यांनी सांगितले. माझ्या कॅलक्युलेशननुसार पहिली निवडणूक 30 हजारने जिंकली. दुसरी एक लाखाने, तिसरी तीन लाखाने आता चौथी निवडणूक रेकॉर्ड मताने जिंकेन, हा मला नाही जनतेला सुद्धा विश्वास आहे असे शिवाजीराव म्हणाले.
दरम्यान शिरुरमधून लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचं आव्हान आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आज संध्याकाळी जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल असे सुनील तटकरे म्हणाले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाच पंतप्रधान बनवायच.45 पेक्षा जास्त खासदार निवडणूक आणण्याच आमच उद्दिष्टय आहे असे सुनील तटकरे म्हणाले.