Home Blog Page 1089

लेकीत आणि सुनेत भेद करणारांच्या पदरात धोंडे पडतील- एकनाथ शिंदे

पुणे-बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. भाकरी फिरवायची वेळ आता आलीय. त्यामुळे यंदा भाकरी फिरवा. बारामतीची लढाई ही वैयक्तिक नाही.

नरेंद्र मोदींच्या विकासाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजित पवारांनी महायुतीला साथ दिली. ही लोकसभा निवडणूक देशाचे भवितव्य घडवणारी आहे. विकसित भारत बनवणारी ही निवडणूक असून प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचा विजय हा तितकाच महत्त्वाचा आहे असं आवाहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनेत्रा पवारांना निवडून द्या असं लोकांना म्हटलं.

पुण्यात महायुतीच्या सभेत एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही. बारामतीच्या विकासात अजित पवारांनी अनेक वर्ष जे काही काम केले, त्यांची दूरदृष्टी आहे. बारामतीच्या विकासाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम कुणी केले असेल तर ते अजितदादांनी केले. मात्र जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा अजित पवारांवर अन्याय झाला. सहनशीलतेचा अंत असतो. शेवटी अजित पवारांनी महायुतीत येत सरकारला भक्कम साथ दिली. शरद पवारांचं बोट सोडल्यावर नरेंद्र मोदींनी देशाचा कायापालट केला, विकासाकडे नेले. त्यामुळे आता अजित पवारांनीही हे बोट सोडलं असून त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या रुपाने बारामतीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. सुनेत्रा पवारांची खंबीर साथ अजितदादांच्या पाठिशी आहेत. १५ हजारांपेक्षा जास्त महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे. सुनेत्रा पवार या उत्तम खासदार होतील त्यात कुणालाही शंका असण्याचं कारण नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच मागील १० वर्षात एकही सुट्टी न घेता देशाला सर्मपणाने काम करणारे पंतप्रधान लाभले आहेत. राजनीतीसाठी नव्हे तर राष्ट्रनीतीसाठी नरेंद्र मोदींचा जन्म झाला आहे. मोदींनी दिलेला प्रत्येक शब्द त्यांनी पाळला आहे. या देशाला महासत्ता बनवण्याचं वचन मोदींनी दिली आहे. ही देशाची निवडणूक भवितव्य ठरवणारी आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत की राहुल गांधी असा प्रश्न कुणालाही विचारला तर एकच उत्तर येईल मोदी, मोदी…राहुल गांधीना पंतप्रधान करण्याचा विचार देशातील जनता स्वप्नातही करू शकत नाही. राहुल गांधींना काँग्रेस लॉन्च करू शकली नाही. मोदींकडे आत्मविश्वास आहे तर इंडिया आघाडीकडे नैराश्य, अहंकार आहे. अहंकार माणसाला पराभवाकडे, विनाशाकडे नेतो. परंतु आत्मविश्वास विजयाकडे नेतो असा चिमटा शिंदेंनी विरोधकांना काढला.

दरम्यान, सुनेत्रा पवार प्रचंड मतांनी विजयी झाल्या पाहिजे. घड्याळाला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत. याठिकाणी आयेगा तो मोदीही. आपल्याला एक एक मत महत्त्वाचे आहे. काही लोक ही निवडणूक भावनिक म्हणून करतायेत. ही निवडणूक विकासाची आहे, भावनेची नाही. कुणी कितीही आटापिटा केला तरी आयेगा मोदी, अजितदादांच्या कामाची पोचपावती येत्या निवडणुकीत मिळेल असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

बारामतीच्या विकासात अजित पवारांचा मोठा वाटा:सुनेत्रा पवार जनतेच्या मनातील सुनबाई, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

सुनेत्रा अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे-पुढील 5 वर्षांत आपल्याला बदललेला भारत दिसून येईल. ही निवडणूक गल्ली-बोळातील नाही तर देशाची सुरक्षा कोण पाहणार याबाबतची आहे. त्यामुळे बारामतीने 400 पारमध्ये आपला उमेदवार पाठवला तर विकासाला साथ मिळेल. येथील जे विकास मॉडेल जगाला दाखवले जाते तर त्यात अजित पवार यांचा वाटा मोठा आहे. ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही तर देशाचा नेता कोण होईल याचा निर्णय करणारी आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आर पी आय अध्यक्ष रामदास आठवले, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, खासदार मेधा कुलकर्णी, माजी खासदार प्रदीप रावत, मुरलीधर मोहोळ, दीपक मानकर आमदार राहुल कुल, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील टिंगरे , दत्ता भरणे, पार्थ पवार, जय पवार उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुनेत्रा पवार ह्या बारामतीकरांच्या मनामनातील सूनबाई आहेत. बारामतीचा फैसला आजच्या सभेने केला आहे, जिकडे तिकडे केवळ लोक दिसत आहे. मंचावर जी शक्ती बसली आहे त्यांची गोळाबेरीज 12 ते 15 लाख मते आहे. बारामती मधील मागील वेळचे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार आपले सोबत आहेत. त्यामुळे बारामतीच्या सूनबाई निश्चितच दिल्लीमध्ये जातील.या लोकसभा निवडणुकीत बारामतीचा खासदार मोदींच्या बाजूने उभा राहणार की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहणार हे पाहायचे आहे. आम्ही मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत, तर राहुल गांधी यांच्यासाठी महाविकास आघाडी काम करत आहे. त्यामुळे विकासाला मत द्यायचे की विनाशाला मत द्यावचे हे ठरवले पाहिजे. वेगवेगळे नारेटीव्ह तयार केले जात असून आपण कोणत्या भूलथापांना बळी पडायचे नाही. वेगवेगळ्या विकास योजना मोदी सरकारने देशात राबवले आहे. त्याने अनेकजणांची प्रगती झाली आहे, असेही फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

निवडणूक नरेंद्र मोदी VS विरोधात राहुल गांधी अशीच

:बारामती मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे-केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात विकास कामात समन्वय असावा लागतो. आज दुष्काळ असून सरकार काम करत आहे. महायुती घटक सोबत घेऊन एकत्रित काम करावयाचे आहे. ही निवडणूक मोदी विरोधात राहुल गांधी अशी आहे. काहीजण मुद्दाम कौटुंबिक गोष्टी पुढे आणत आहे. हलक्या कानाचे कोणी राहु नये तर बनाबनवी यास बळी न पडता विकास कामांना साथ द्या. बारामती मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार असून सर्व तालुक्यांना हक्काचे पाणी देणार आहे. त्यासाठी पैसा मोठा लागणार असून आपल्या विचाराचे सरकार असेल पाहिजे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , आर पी आय अध्यक्ष रामदास आठवले, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, खासदार मेधा कुलकर्णी, माजी खासदार प्रदीप रावत ,मुरलीधर मोहोळ, दीपक मानकर, राहुल कुल, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील टिंगरे , दत्ता भरणे, पार्थ पवार, जय पवार उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, उद्याची निवडणूक ही गावकीची नाही तर देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. जागतिक पातळीवर देश भक्कम करण्याचे काम नरेंद्र मोदी आक्रमकपणे करत आहे. अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आणत आहे. सुनेत्रा पवार यांची निवडणुकीत कमी वेळेत अधिक कामे करावे लागणार आहे. आम्ही आधी महायुती विरोधात लढत होतो पण एकत्र बसून चर्चा करून विरोध कमी केला आहे. नेत्यांचे आग्रहास पोषक वातावरण निर्माण झाले आहे आता मताधिक्य कसे वाढेल याचा प्रयत्न करावा. रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होतील पण मतदारांना आपल्याकडे वळवणे काम करावे लागणार आहे.प्रफुल्ल पटेल म्हणाले, लोकांनी मला वेगळ्या भूमिकेत आधी पहिले होते. अजित पवार आणि मी एकत्रित संसद काम 1991 मध्ये सुरू केले. एका वटवृक्ष छायेखाली आम्ही काम केले. मागील 30 ते 40 वर्षापासून बारामती मधील जनमानसाची कामे अजित पवार करत आहे. त्यांचा विकासकामात मोठा वाटा आहे. एका रात्रीत आम्ही निर्णय घेतला नाही. अनेकवेळा आमची भूमिका पुढे मागे होत होती त्यामुळे राज्यात संभ्रम निर्माण झाले. बदलत्या भूमिकेने पक्षाचे नुकसान झाले आहे.मोदी यांचे नेतृत्व देशाने आणि जगाने स्वीकारले आहे. विकासाचे वाटचाल प्रवाह सोबत जाणे महत्त्वाचे आहे.रामदास आठवलेंची शायरी-अजित पवारांनी गाठला आहे विकासाचा पल्ला..:..त्यामुळे शरद पवारांना देतो मोदींच्या सोबत येण्याचा सल्ला- रामदास आठवलेअजित पवार हे महायुती सोबत आले ज्या कारणामुळे ते कारण आहे सुप्रिया सुळे. अजित दादा आता नाही राहिले खुळे त्यामुळे हरणार आहे सुप्रिया सुळे. कोणी किती केला कल्ला, तरी सुनेत्रा पवार जिंकणार आहे बारामतीचा किल्ला. अजित पवारांनी गाठला आहे विकासाचा पल्ला त्यामुळे मी शरद पवारांना देतो मोदी यांच्या सोबत येणाचा सल्लारामदास आठवले म्हणाले की, शरद पवार हे मोदी यांच्या सोबत आले असते तर अजित पवार इकडे असे आले नसते. शरद पवार यांनी समान मुद्देवर एकत्र येणे गरजेचे होतें . पवार साहेब घड्याळ सोडून गावोगावी वाजवतात तुतारी. ज्या घड्याळ साठी आतापर्यंत काम केले त्याचे महत्व जाणून घेतले पाहिजे. राज्यात महायुतीला 45 पेक्षा जास्त जागा मिळणार आहे.महायुतीच्या पाठीशी सगळेजण उभे राहिले आहेत.बारामती मध्ये सुनेत्रा पवार उभ्या आहेत,अजित पवार याची ताकद मतदारसंघात मोठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकास करत आहे. मोदी ना पाडण्यासाठी काँग्रेससह इतर जण एकत्रित आले आहेत.मोदी ना हरवणे वेडे गबळ्याचे काम नाही.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, संकटात मदतीसाठी धावून जाणारे हे सरकार आहे. अनेक ऐतिहासिक कामे सरकारने केली आहे. मराठा आरक्षण बाबत सरकारने अभ्यास करून काम केले आहे. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाल्यावर अनेक टीका टिप्पणी होते. यशस्वी पुरुष मागे महिला असते पण अजित दादा यांनी सुनेत्रा ताई यांना काम करण्याची संधी दिली आहे. सुनबाईना पाठवा दिल्लीत आणि लेकीला पाठवा गल्लीत अशी घोषणा त्यांनी यावेळी दिली.

सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हे यांचे उमेदवारी अर्ज दाखल …

पुणे-:लोकसभा मतदारसंघांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरला.महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज शिरूर लोकसभा मतदार संघातून दाखल केला.बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, युगेंद्र पवार उपस्थित होते.

महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार व बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात,रमेश बागवे, मोहन जोशी आमदार विश्वजित कदम, अशोक पवार, संजय जगताप, सचिन अहिर, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते. धंगेकर यांनी आपला अर्ज पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी सुळे म्हणाल्या, काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत जे-जे लोक उमेदवारी अर्ज भरतील त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. सर्वांना मी विजयासाठी शुभेच्छा देते, सुनेत्रा पवारांचे नाव न घेता सुळेंनी शुभेच्छा दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरण्यास गुरुवारी (दि. १८) सुरुवात होणार झाली. त्यात जिल्ह्यातील पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शहरात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांपैकी बारामती लोकसभा मतदारसंघ राज्यातील दुसऱ्या टप्प्यात असल्याने तेथे १२ एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (दि. १९) आहे. उर्वरित पुणे, मावळ व शिरूर या तीन मतदारसंघांसाठीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होत आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल असून, अर्जांची छाननी दुसऱ्या दिवशी अर्थात २६ एप्रिलला होणार आहे. अर्ज माघारीची तारीख २९ एप्रिल आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीतर्फे वसंत मोरे आणि ‘एमआयएम’कडून अनिस सुंडके यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे, महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शिवाजीराव आढळराव यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतर्फे शिवसेनेचे श्रीरंग बारणे व महाविकास आघाडीतर्फे उध्दवसेनेतर्फे संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे.

अखेर नारायण राणेंना रत्नागिरी – सिंधुदुर्गची उमेदवारी जाहीर

रत्नागिरी-भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे किरण सामंत यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, भाजप आणि शिवसेना यांच्यातील तिढा आता सुटला असून किरण सामंत यांनी माघार घेतला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्यानंतर लगेचच भारतीय जनता पक्षाच्या वतीने नारायण राणे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे महायुतीमधील हा कोकणातील तिढा सामांजस्याने सुटला असे म्हणावे लागेल.कोकणातील महत्त्वाचा मानला जाणारा रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विनायक राऊत यांनीही आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र महायुतीचा उमेदवार अद्याप घोषित झाला नव्हता. अखेर भारतीय जनता पक्षाने विनायक राऊत यांच्या विरोधात नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये दिसून येणार आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची तयारी सुरू केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघावर आपला दावा सांगितला होता. महायुतीच्या जागा वाटपामध्ये यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत तिढा निर्माण झाला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किरण सामंत यांनी सामंजस्याची भूमिका घेत माघार घेतली असल्याची माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

महायुतीमध्ये आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही. आम्ही ज्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी देईल, त्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. मग तो उमेदवार नारायण राणे असेल तरीदेखील आम्ही त्यांचा प्रचार करू, असे देखील उदय सामंत यांनी म्हटले होते. त्यानंतर लगेचच भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

आईचा आशिर्वाद घेऊन अमोल कोल्हे उमेदवारी अर्ज दाखल करणार.

पुणे -माझी आई माझे सर्वस्व आहे, तिचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत ते घेऊनच आपण आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मायबाप जनतेने हि निवडणूक हातात घेतल्याचा विश्वास शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

एक जबाबदारी ची भावना आहे, देशातील जनतेने निर्णय घेतल्याचे जाणवते. महागाई, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमीभाव यासारख्या अनेक विषयांवर या सरकारने जनतेची निराशा केली आहे. हे सरकार बदलायचे हा सर्वसामान्य जनतेने निर्णय घेतला आहे. या बदलाचा शिलेदार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. कोणताही डमी उमेदवारी अर्ज भरणार नाही. आईच्या चरणावर डोकं ठेवून निघालो आहे. ज्या व्यक्तीकडे प्रामाणिकता, निष्ठा हेतू निष्टता असते त्याच्या मागे सगळं जग त्याला यश देण्यासाठी उभे राहते अशा भावना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्याअगोदर मध्यमांशी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या आहे.

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विध्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात ही लढत होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डॉ. अमोल कोल्हे यांनी तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा ५८ हजारांनी पराभव केला होता यावेळी देखील या दोघांमध्ये लढत होणार आहे.

या भाजपा उमेदवाराची संपत्ती 1400 कोटी रुपयांची, दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट

दक्षिण गोवा मतदारसंघातून भाजपने व्यापारी श्रीनिवास धेंपो यांच्या पत्नी पल्लवी धेम्पो यांना उमेदवारी दिली आहे. पल्लवी यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते. रिटर्निंग ऑफिसरसमोर दाखल केलेल्या 119 पानांच्या प्रतिज्ञापत्रात पती श्रीनिवास धेम्पो यांच्यासह एकूण संपत्ती सुमारे 1,400 कोटी रुपये आहे. धेम्पो ग्रुपचा व्यवसाय फ्रँचायझी फुटबॉल लीगपासून रिअल इस्टेट, जहाजबांधणी, शिक्षण आणि खाण व्यवसायापर्यंत विस्तारला आहे.

पल्लवी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 255.4 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे दिसून येते, तर श्रीनिवास यांच्या मालकीच्या मालमत्तेचे मूल्य 994.8 कोटी रुपये आहे. पल्लवी यांच्या स्थावर मालमत्तेचे एकूण बाजारमूल्य 28.2 कोटी रुपये आहे, तर श्रीनिवास यांच्या स्थावर मालमत्तेचे एकूण बाजारमूल्य 83.2 कोटी रुपये आहे. श्रीनिवास धेम्पोंच्या गोवा आणि देशाच्या इतर भागांमध्ये असलेल्या मालमत्तांव्यतिरिक्त, या जोडप्याकडे दुबईमध्ये एक अपार्टमेंट देखील आहे, ज्याचे सध्याचे बाजार मूल्य 2.5 कोटी रुपये आहे. याशिवाय लंडनमध्येही 10 कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे.

पल्लवी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे वेगवेगळ्या सीरिजच्या तीन मर्सिडीज बेंझ कार आहेत, ज्यांची किंमत अनुक्रमे 1.69 कोटी, 16.42 लाख, 21.73 लाख रुपये आहे. कॅडिलॅक कार आहे, ज्याची किंमत 30 लाख आहे. महिंद्रा थार एसयूव्ही आहे ज्याची किंमत 16.26 लाख रुपये आहे. पल्लवी यांनी प्रतिज्ञापत्रात 5.7 कोटी रुपयांचे सोने असल्याची माहिती दिली आहे. पल्लवी यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 10 कोटी रुपयांचे आयकर रिटर्न भरले, तर श्रीनिवास यांनी त्याच वर्षासाठी 11 कोटी रुपयांचे रिटर्न भरले.

पल्लवीकडे 217.11 कोटी रुपयांचे रोखे, 12.92 कोटी रुपयांची बचत आणि सुमारे 9.75 कोटी रुपयांच्या इतर गोष्टी आहेत. 49 वर्षीय भाजप उमेदवाराने एमआयटी, पुणे विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा लोकसभा जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. पल्लवी यांच्यासोबत भाजपचे उत्तर गोव्यातील उमेदवार श्रीपाद नाईक यांनीही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

उत्तर गोव्यातील भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक हे पाचवेळा खासदार राहिले आहेत आणि सातवी निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाईक म्हणाले, ‘भाजप सरकारने गोव्यातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 1999 आणि 2014 प्रमाणे भाजप गोव्याच्या दोन्ही लोकसभा जागा जिंकेल. श्रीपाद नाईक यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 2.05 कोटी रुपये किंमतीची जंगम मालमत्ता, 8.81 कोटी किंमतीची स्थावर मालमत्ता आणि 17 लाख वार्षिक उत्पन्न जाहीर केले आहे.

कचाकचा बटनं दाबा , निधी देतो : मी गमतीने ते वक्तव्य केलं- अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे : आम्ही तुम्हाला निधी देतोय, त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं पटापट दाबा. तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर अजित पवारांना ट्रोल करण्यात आलं. त्यांच्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला. ‘एका शब्दाचा उगाच बाऊ करु नये, मी ग्रामीण भाषेत कचाकचा हा शब्द वापरला, असं म्हणत अजित पवारांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.काल इंदापूरात डॉक्टरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मी गमतीने ते वक्तव्य केलं. त्यानंतर ग्रामीण भाषेत कचाकचा हा शब्द वापरला जातो. त्यामुळे मी ते बोललो. यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता. या कार्यक्रमात सगळे प्रतिष्ठित डॉक्टर्स होते, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे.अजित पवार आज सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या फक्त सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. बाकी उमेदवारांचे अर्ज नंतर दाखल करण्यात येणार आहे,असंही अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवारांवर दमदाटी करण्यात येत असल्याचे आरोप करण्यात येत आहे. रोहित पवारांकडून असे अनेकदा आरोप करण्यात आले आहे. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या कोणाला असे धमकीचे फोन येत आहेत. त्यांनी ते फोन रेकॉर्ड करावे आणि सगळ्यांना ऐकवावे, असं खुलं आव्हान अजित पवारांनी दिलं आहे.

आज मी नव्या पर्वाला सामोरी जात आहे- सुनेत्रा अजीत पवार

पुणे- आज येथे सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे की,’ आज एक नवे आव्हान पेलण्यासाठी सज्ज होत आहे,आज मी नव्या पर्वाला सामोरी जात आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणधीशाचे दर्शन घेऊन आरती केल्यावर माध्यामांशी सुनेत्रा यांनी संवाद साधला .

त्या म्हणाल्या,’ आज एक नवे आव्हान पेलण्यासाठी सज्ज होत आहे. ते आपल्या सर्वांच्या सदिच्छा, प्रेम आणि आशीर्वादाच्या बळावर. ते बळ गाठीशी बांधूनच आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन गणरायाचे आणि लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात दत्त महाराजांचे जोडीने दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. गणरायाची आरती केली.आजपर्यंत गाव, तालुका, जिल्हा पातळीवर सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरीकांना आधार, पर्यावरण, जलसंधारण, स्वच्छता, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात दखलपात्र काम करत आले. माझ्या या ग्रामविकासाच्या कामाचा गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते झाला. शैक्षणिक क्षेत्रातील कामाच्या बळावर सिनेटवर काम करण्याची संधी मिळाली आणि जलसंधारण, पर्यावरणासह इतर सामाजिक क्षेत्रातील कामाच्या बळावर सार्क परिषदेत सहभागी होण्याची, बोलण्याची संधी मिळाली. गावात, तालुक्यात, जिल्ह्यात काम करून, एकेक टप्पा पार करत पुढे जात आता बारामती लोकसभा मतदार संघाची उमेदवार म्हणून मला महायुतीच्या वतीने संधी मिळाली आहे.या नव्या पर्वाचा प्रारंभ करत आज मी महायुतीच्या वतीने माझा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. मला माझ्या जबाबदारीची जाणिव आहे. गेली दीड महिना सहा विधानसभा मतदारसंघातील नऊ तालुक्यात संपर्क साधताना आपण दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद, आपलेपणाने केलेले स्वागत, भरभरून दिलेले आशीर्वाद याच पाठबळावर मी या नव्या पर्वाला सामोरी जात आहे. भल्या मोठ्या मतदार संघाच्या सेवेचे आव्हान स्वीकारत आहे. मी लोकांत रमते, कामावर विश्वास ठेवते आणि रिझल्टला महत्व देते. त्याचसोबत जनसंपर्क आणि प्रचंड मेहनत या बळावर तुम्ही देत असलेल्या प्रेमाला, दाखवत असलेल्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही, हा माझा शब्द. आपण आपल्या सेवेची संधी देणार आहात याचा विश्वास मला तुम्हीच दिला आहात. त्यासाठी सिद्ध होताना दि. ७ मे रोजी आपण “घड्याळ” या चिन्हा समोरील बटन दाबून मला विजयी करावे ही नम्र विनंती.

अजित पवार, सुनेत्रा पवार दगडूशेठ गणपती मंदिरात तर मुरलीधर मोहोळ शंकर महाराज मंदिरात

पुणे – बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली.प्रदीप देशमुख व मान्यवर यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. एकीकडे या दाम्पत्यांनी गणपतीची आराधना केली तर दुसरीकडे पुणे लोकसभा मतदार संघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सातारा रस्त्यावरील शंकर महाराज मठात जाऊन तिथे बाबांची पूजा अर्चा केली , माजी नगरसेवक महेश वाबळे यावेळी त्यांच्या समवेत होते . मोहोळ आज अर्ज भरणार नाहीत मात्र त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी रवींद्र धंगेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राम लल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणे आणण्यात भारतीय खगोलभौतिक संस्थेची भूमिका अत्यंत महत्त्वाची

नवी दिल्‍ली, 17 एप्रिल 2024

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या आधिपत्याखालील स्वायत्त संस्था असलेल्या भारतीय खगोलभौतिक संस्थेने (आयआयए) अयोध्येतील सूर्य तिलक प्रकल्पामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सूर्य तिलक प्रकल्पाअंतर्गत, चैत्र महिन्यात, रामनवमीला बरोब्बर दुपारी 12 वाजता श्री राम लल्लाच्या मूर्तीच्या कपाळावर सूर्यकिरण आणण्यात आले. आयआयएच्या पथकाने सूर्याची स्थिती, रचना आणि दृष्टी प्रणालीचे इष्टतमीकरण यांचा हिशोब मांडला आणि अयोध्येच्या मंदिराच्या ठिकाणी एकत्रीकरण तसेच संरेखनाची प्रक्रिया राबवली.

श्री रामनवमी उत्सवाच्या इंग्रजी दिनदर्शिकेतील तारखा दर वर्षी चंद्र दिनदर्शिकेनुसार बदलत असतात. म्हणून, दर वर्षी रामनवमीला आकाशातील सूर्याची स्थितीदेखील बदलते. तपशीलवार हिशोबातून असे दिसते की श्री राम नवमीच्या इंग्रजी दिनदर्शिकेतील तारखेची दर 19 वर्षांनी पुनरावृत्ती होते. या दिवसांमध्ये आकाशातील सूर्याच्या स्थितीचे मोजमाप करण्यासाठी खगोलशास्त्रातील तज्ञता आवश्यक असते.

अयोध्येतील मंदिराचे बांधकाम अजूनही पूर्ण झाले नसल्याने, आयआयएच्या तज्ञांनी विद्यमान रचनेशी अनुकूल होईल अशा प्रकारे संरचनेत बदल केला आणि प्रतिमा  इष्टतम  केली. त्यातून 4 आरसे आणि 2 भिंगांच्या सहाय्याने 17 एप्रिल 2024 रोजी सूर्य तिलक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

या प्रक्रियेसाठी वापरलेले साधन बंगळूरु येथील ऑप्टिका संस्थेने तयार केले असून प्रत्यक्ष मंदिराच्या ठिकाणी दृक-यांत्रिक प्रणालीची अंमलबजावणी सीएसआयआर-सीबीआरआयतर्फे करण्यात आली.

आता मते फोडाफोडीचे राजकारण चालणार नाहीच – रमेश बागवे

पुणे- पक्ष फोडले,नेते फोडले ,खोट्या फसव्या आश्वासनांंचे ढग फोडले… आता मते फोडाफोडीचे राजकारण चालणार नाही , मतदार या सर्व राजकारणाला ओळखून बसलेत , त्यांना आता सारे काही समजलेय , आता ते कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव कधीही होऊ देणार नाहीत , त्यांनाच विजयी करतील आणि भाजपाला धडा शिकवतील असे येथे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी म्हटले आहे.

बागवे यांनी स्वतः घरोघरी जात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा प्रचार सुरु ठेवला आहे. पक्षाच्या पातळीवर पक्ष काम करेलच आणि पक्ष देईल त्यानुसार आम्हीही काम करू पण वैयक्तिक पातळीवर आमची नाळ या पक्षाशी जोडलेली आहे , त्यामुळे कशाचीही वाट न पाहता आम्ही कधीच प्रचाराला प्रारंभ केला आहे असे ते म्हणाले. घरोघरी काही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बागवे आणि संगीता तिवारी हे प्रचार पत्रके वाटत , तर कुठे नागरिकांचे प्रबोधन करत फिरत आहेत . वंचित आघाडी आणि एम आय एम ने उमेदवार रिंगणात उतरविले आहेत, त्यामुळे कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन होणार नाही काय ? या प्रश्नाला उत्तर देताना बागवे बोलत होते , आता मतदाराला सारे काही समजून चुकले आहे , ते आता या फोडाफोडीच्या राजकारणाला देखील याच निवडणुकीतून धडा शिकवतील असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांचा ८१वा वाढदिवस उत्साहात साजरा

पुणे-

ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त हॉटेल तरवडे क्लर्क्स इन येथे झालेल्या कौटुंबिक समारंभात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे, प्रा. फ.मु. शिंदे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, निर्माते दिग्दर्शक उदयदादा लाड, प्राध्यापक मिलिंद जोशी, अशोक विखे, गौरव फुटाणे, सुनील महाजन, मोहन जोशी, उमेदवार रवींद्र धंगेकर, रवी चौधरी, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘सामना सन्मान’  हा पुरस्कार दिवंगत अभिनेते निळू फुले, श्रीराम लागू, पं. भास्कर चंदावरकर आणि विजय तेंडुलकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळणाऱ्या  निर्मात्याला हा पुरस्कार दिला जाणार असून साहित्य-कला गौरव या संस्थेची स्थापना करण्याची घोषणा रामदास फुटाणे यांनी केली.  यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे  आणि निर्माते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आठवणींना उजाळा दिला. श्रीपाद ब्रह्मे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर स्नेहभोजन होऊन हा कौटुंबिक कार्यक्रम संपला. ‘आज वाढदिवसाच्या निमित्याने आयोजित या कार्यक्रमात शेकडो मित्र व परिचित आले. त्यामुळे आनंद होऊन माझे आयुष्य निश्चितच वाढले असेल’ असे म्हणत रामदास फुटाणे यांनी सर्वांचे आभार मानले. 

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व प्राणी-पक्ष्यांसाठी दाणा-पाणी

पुणे : उन्हाचा वाढता चटका लक्षात घेता पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स आणि वंचित विकास यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व प्राणी-पक्ष्यांसाठी दाणा-पाणी उपक्रम राबविण्यात आला. ‘वाढता उन्हाळा, पक्षांना सांभाळा’ या अभिनव उपक्रमातून ‘प्राणी वाचवा, पक्षी जगवा’ हा विचार पोहोचवण्यात आला.आरोग्य शिबिरात ५०० मुलामुलींची तपासणी करण्यात आली. 
शिबिरात वजन, उंची, रक्तदाब, कान, नाक, घसा, दात, डोळे, मुलींच्या पाळी समस्या, वाढत्या वयातील त्वचेचे प्रश्न, पोटाच्या तक्रारी आदींची तपासणी व डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन मुलांना मिळाले. भारती हॉस्पिटलच्या आयुर्वेद विभागाचे डॉ. शीतल पाटील व डॉ. गजानन पाटील यांच्यांसह डॉ. शुभम विसपुते, डॉ. रोहित यादव, डॉ. प्रतिक उगले, डॉ. नितीश गुप्ता, स्वयंसेवक प्रसाद गोंदकर यांनी आरोग्यसेवा दिली. तसेच यावेळी डॉ. पाटील यांनी वयाच्या चाळीशीनंतर जाणवणारी मेनोपॉजची लक्षणे, शारीरिक व मानसिक बदल, उपाय, आहार, व्यायाम यावर मार्गदर्शन केले. 
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार गायकवाड, वंचित विकासच्या मीना कुर्लेकर व सुनिता जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे नियोजन ‘पीव्हीजी’च्या प्रा. उर्मिला पाटील, विवेक झेंडे व वंचित विकासच्या तेजस्विनी थिटे यांनी केले.

डॉ. संजयकुमार गायकवाड म्हणाले, “आगामी काळात वंचित विकासच्या सहकार्याने महाविद्यालयात पर्यावरण, शिक्षण, महिला सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता, मुलांचे समुपदेशन, कार्यशाळा व सत्र आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. युवा पिढीला समाजाप्रती भान असावे व समाजासाठी त्यांनी योगदान द्यावे, त्याचा अभ्यास व अनुभव त्यांना मिळावा यासाठी हे उपक्रम उपयुक्त ठरतील.”
तेजस्विनी थिटे म्हणाल्या, “या उपक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरण व त्यातील प्रत्येक जीवाचे महत्व समजावून सांगण्यात आले. वाढता उन्हाळा लक्षात घेवून आपल्या परिसरातील तहानलेल्या या चिमुकल्या जीवांसाठी दाणा-पाणी ठेवण्यासाठी १०० मातीची भांडी वाटप करण्यात आले. महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.”

पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १७ :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा 18-19 या वयोगटातील 1 लाख 41 हजार 457 नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांनी मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून दुर्गम भागातील मतदान केंद्रापर्यंत आवश्यक मतदान साहित्य पोहोच करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरसह आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात नवमतदारांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करुन घेतली आहे.

18-19 वयोगटातील सर्वाधिक नवमतदार रामटेक मतदारसंघात आहेत. त्यापाठोपाठ भंडारा-गोंदिया या मतदारसंघात आहेत. रामटेक मतदारसंघात 31,725, भंडारा-गोंदिया 31,353, नागपूर 29,910, चंद्रपूर 24,443 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 24,026 इतके नवमतदार आहेत. यासह 20-29 वयोगटांतील सर्वाधिक मतदारही रामटेक मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 3,83,276,  भंडारा-गोंदिया 3,66,570, चंद्रपूर 3,42,787, नागपूर 3,37,961 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 3,28,735 इतके मतदार आहेत.

30-39 वयोगटातील सर्वाधिक मतदार हे नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 5,06,372, रामटेक 4,90,339, चंद्रपूर 4,25,829, भंडारा-गोंदिया 3,99,115 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 3,56,921 इतके मतदार आहेत.

पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक मतदार सर्वाधिक नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 70,698 इतके मतदार आहेत. त्यापाठोपाठ रामटेक 46,413, भंडारा-गोंदिया 38,269, चंद्रपुर 37,480 आणि गडचिरोली-चिमुर 33,559 असे एकूण 2,26,419 ज्येष्ठ  मतदार आहेत. येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून सर्व मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी केले आहे.