सुनेत्रा अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पुणे-पुढील 5 वर्षांत आपल्याला बदललेला भारत दिसून येईल. ही निवडणूक गल्ली-बोळातील नाही तर देशाची सुरक्षा कोण पाहणार याबाबतची आहे. त्यामुळे बारामतीने 400 पारमध्ये आपला उमेदवार पाठवला तर विकासाला साथ मिळेल. येथील जे विकास मॉडेल जगाला दाखवले जाते तर त्यात अजित पवार यांचा वाटा मोठा आहे. ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही तर देशाचा नेता कोण होईल याचा निर्णय करणारी आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आर पी आय अध्यक्ष रामदास आठवले, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, खासदार मेधा कुलकर्णी, माजी खासदार प्रदीप रावत, मुरलीधर मोहोळ, दीपक मानकर आमदार राहुल कुल, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील टिंगरे , दत्ता भरणे, पार्थ पवार, जय पवार उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुनेत्रा पवार ह्या बारामतीकरांच्या मनामनातील सूनबाई आहेत. बारामतीचा फैसला आजच्या सभेने केला आहे, जिकडे तिकडे केवळ लोक दिसत आहे. मंचावर जी शक्ती बसली आहे त्यांची गोळाबेरीज 12 ते 15 लाख मते आहे. बारामती मधील मागील वेळचे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार आपले सोबत आहेत. त्यामुळे बारामतीच्या सूनबाई निश्चितच दिल्लीमध्ये जातील.या लोकसभा निवडणुकीत बारामतीचा खासदार मोदींच्या बाजूने उभा राहणार की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहणार हे पाहायचे आहे. आम्ही मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत, तर राहुल गांधी यांच्यासाठी महाविकास आघाडी काम करत आहे. त्यामुळे विकासाला मत द्यायचे की विनाशाला मत द्यावचे हे ठरवले पाहिजे. वेगवेगळे नारेटीव्ह तयार केले जात असून आपण कोणत्या भूलथापांना बळी पडायचे नाही. वेगवेगळ्या विकास योजना मोदी सरकारने देशात राबवले आहे. त्याने अनेकजणांची प्रगती झाली आहे, असेही फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.