पुणे-बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. भाकरी फिरवायची वेळ आता आलीय. त्यामुळे यंदा भाकरी फिरवा. बारामतीची लढाई ही वैयक्तिक नाही.
नरेंद्र मोदींच्या विकासाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजित पवारांनी महायुतीला साथ दिली. ही लोकसभा निवडणूक देशाचे भवितव्य घडवणारी आहे. विकसित भारत बनवणारी ही निवडणूक असून प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचा विजय हा तितकाच महत्त्वाचा आहे असं आवाहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनेत्रा पवारांना निवडून द्या असं लोकांना म्हटलं.
पुण्यात महायुतीच्या सभेत एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही. बारामतीच्या विकासात अजित पवारांनी अनेक वर्ष जे काही काम केले, त्यांची दूरदृष्टी आहे. बारामतीच्या विकासाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम कुणी केले असेल तर ते अजितदादांनी केले. मात्र जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा अजित पवारांवर अन्याय झाला. सहनशीलतेचा अंत असतो. शेवटी अजित पवारांनी महायुतीत येत सरकारला भक्कम साथ दिली. शरद पवारांचं बोट सोडल्यावर नरेंद्र मोदींनी देशाचा कायापालट केला, विकासाकडे नेले. त्यामुळे आता अजित पवारांनीही हे बोट सोडलं असून त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या रुपाने बारामतीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. सुनेत्रा पवारांची खंबीर साथ अजितदादांच्या पाठिशी आहेत. १५ हजारांपेक्षा जास्त महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे. सुनेत्रा पवार या उत्तम खासदार होतील त्यात कुणालाही शंका असण्याचं कारण नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मागील १० वर्षात एकही सुट्टी न घेता देशाला सर्मपणाने काम करणारे पंतप्रधान लाभले आहेत. राजनीतीसाठी नव्हे तर राष्ट्रनीतीसाठी नरेंद्र मोदींचा जन्म झाला आहे. मोदींनी दिलेला प्रत्येक शब्द त्यांनी पाळला आहे. या देशाला महासत्ता बनवण्याचं वचन मोदींनी दिली आहे. ही देशाची निवडणूक भवितव्य ठरवणारी आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत की राहुल गांधी असा प्रश्न कुणालाही विचारला तर एकच उत्तर येईल मोदी, मोदी…राहुल गांधीना पंतप्रधान करण्याचा विचार देशातील जनता स्वप्नातही करू शकत नाही. राहुल गांधींना काँग्रेस लॉन्च करू शकली नाही. मोदींकडे आत्मविश्वास आहे तर इंडिया आघाडीकडे नैराश्य, अहंकार आहे. अहंकार माणसाला पराभवाकडे, विनाशाकडे नेतो. परंतु आत्मविश्वास विजयाकडे नेतो असा चिमटा शिंदेंनी विरोधकांना काढला.
दरम्यान, सुनेत्रा पवार प्रचंड मतांनी विजयी झाल्या पाहिजे. घड्याळाला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत. याठिकाणी आयेगा तो मोदीही. आपल्याला एक एक मत महत्त्वाचे आहे. काही लोक ही निवडणूक भावनिक म्हणून करतायेत. ही निवडणूक विकासाची आहे, भावनेची नाही. कुणी कितीही आटापिटा केला तरी आयेगा मोदी, अजितदादांच्या कामाची पोचपावती येत्या निवडणुकीत मिळेल असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.