Home Blog Page 1090

दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार

मुंबई दि. 17 : जे दिव्यांग नागरिक मतदान केंद्रावर येऊन मताधिकार बजावू इच्छितात, त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधा मिळण्यासाठी दिव्यांग मतदारांनी आपले नाव Saksham-ECI या अॅपवर चिन्हांकित करणे आवश्यक आहे. या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे दिव्यांग मतदारांना ये-जा करणे सोयीचे होऊ शकेल.

दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ९८,११४ मतदान केंद्रे आहेत. त्यांपैकी ९८,०३९ मतदान केंद्रांवर रॅम्पची आवश्यकता आहे. त्यांतील ९७,६६२ मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ३७७ मतदान केंद्रावर प्रमाणित मानकानुसार तात्पुरत्या रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना सुलभपणे वापरता येतील अशी शौचालयेही उभारली आहेत.

विशेष म्हणजे, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३१३ मतदान केंद्रांवर सर्व दिव्यांग मतदान अधिकारी कार्यरत असणार आहेत. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ आणि समाजमाध्यमे ह्या वरील मजकूर दिव्यांग नागरिकांना, विशेषतः अंध आणि कर्णबधिर मतदारांना वाचण्या-ऐकण्यायोग्य तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये आधीच मतदार असलेल्या दिव्यांग मतदारांनी Saksham-ECI या अॅपवर आपले नाव कसे चिन्हांकित करावे, नव्याने मतदार नोंदणी कशी करावी, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मिळणाऱ्या सुविधा इ. माहिती व्हिडिओ व लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे. मतदार चिठ्ठी, मतपत्रिका, मतदार मार्गदर्शक पुस्तिका हे अंध मतदारांना ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे. ही सुविधा घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरावा लागेल. हा अर्ज भरून घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या घरी भेट देतील. प्रत्येक टप्प्याची निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून पाच दिवसांपर्यंत पात्र ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरून देता येईल. या मतदारांची गुप्त पध्दतीने मतदान प्रक्रिया त्यांच्या मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या मतदान-तारखेच्या एक दिवस आधी पूर्ण केली जाईल.

पालघरमध्ये भाजपाच्या उमेदवारीचे बनावट पत्र प्रसिद्धप्रदेश भाजपातर्फे पोलिसांत तक्रार दाखल

भाजपा कायदा विभागाचे प्रमुख ॲड. चौबे यांची माहिती

मुंबई-पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याबाबतचे भाजपा केंद्रीय कार्यालयाचे खोटे पत्र प्रसारित केल्याबद्दल प्रदेश भाजपातर्फे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या आचार संहिता व काय़दा विभागाचे प्रदेश अध्यक्ष ॲड.अखिलेश चौबे यांनी ही माहिती बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजपाच्या खोट्या लेटरहेडवर व्हायरल करण्यात आलेले हे पत्र म्हणजे दोन पक्षांत तेढ निर्माण करण्यासाठी रचलेला कट असल्याचेही ॲड.चौबे यांनी सांगितले. प्रदेश भाजपा कायदा प्रकोष्ठचे संयोजक ॲड. शहाजी शिंदे, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते.
श्री. चौबे यांनी सांगितले की, पालघर मतदारसंघासाठी प्रकाश निकम यांना भाजपातर्फे उमेदवारी दिल्याचे पक्षाचे केंद्रीय कार्यालयाचे बनावट पत्र समाजमाध्यमांतून प्रसारित झाल्याचे कळताच आपण त्या विरोधात मंगळवारी रात्री उशिरा मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. भाजपाच्या बनावट लेटरहेडवर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असलेल्या प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याचे पत्र प्रसिद्ध करून भाजपा – शिवसेना या दोन्ही पक्षांत तेढ निर्माण करण्यासाठी रचलेला हा कट असून त्याची कसून चौकशी करण्याची मागणी आपण केली आहे.
पालघर लोकसभा जागेसाठी अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नसताना जाणूनबुजून खोटे पत्र व्हायरल करून महायुतीच्या भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये नाहक तेढ निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न हाणून पाडू असेही चौबे यांनी सांगितले. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468 आणि 417 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आल्याचे ॲड. चौबे यांनी सांगितले.

मुंबई भाजपातर्फे रामनवमी उत्साहात साजरी

मुंबई दिनांक १७ एप्रिल २०२४
मुंबई भाजपातर्फे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा खासदार, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्रात राम जन्मोत्सव सोहळ्यासह विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार वांद्रे पश्चिम मतदारसंघातील आयोजित रामनवमी उत्सवात सहभागी झाले. कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी खेतवाडी येथील सार्वजनिक श्री उत्सव मंडळाद्वारे आयोजित श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. दहिसर मतदार संघातील दौलत नगर येथे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खा. पीयूष गोयल, आ. मनीषा चौधरी यांनी रथयात्रेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले. तसेच उपस्थित राम भक्तांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश दरेकर, माजी नगरसेवक विद्यार्थी सिंह उपस्थित होते. आ. मिहिर कोटेचा यांनी मुलुंड पश्चिमेकडील ‘बाबाजी की झोपडी’ या सुप्रसिद्ध मंदिरात राम जन्मोत्सवाला हजेरी लावत प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेत शुभाशिर्वाद घेतले. आ. सुनील राणे यांनी बोरिवलीतील जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले. आ. प्रवीण दरेकर यांनी मागाठाणे काजुपाडा येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनकडून सिम्बायोसिस रुग्णालयातील प्रसूती विभाग अद्ययावत

पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने लवळे येथील सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्रातील प्रसूती विभाग व शल्यक्रियागार (ऑपरेशन थिएटर) अद्ययावत करण्यात आले. स्वर्गीय मोहिनी प्रल्हाद छाब्रिया यांच्या स्मरणात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची देणगी सुपूर्त करण्यात आली.
फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे संस्थापक स्वर्गीय प्रल्हाद छाब्रिया यांच्या जयंतीदिनी सिम्बायोसिस रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत करण्यात आला होता. त्याचाच पुढील भाग म्हणून प्रसूती विभाग (लेबर वॉर्ड) व ऑपरेशन थिएटरमध्ये आरोग्य सुविधा सक्षम करण्यात आल्या आहेत. या आरोग्यसुविधेमुळे अकाली, तसेच गुंतागुंतीच्या वैद्यकीय परिस्थितीत जन्मलेल्या बालकांवर उपचार होणे अधिक सुलभ होणार आहे. त्यातून त्यांचे संगोपन योग्यरीत्या होईल. मुळशीच्या ग्रामीण भागातील रुग्णांना आता या स्वरूपाच्या उपचारांसाठी शहरात यावे लागणार नाही.

या सुविधेचे उद्घाटन सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर व होप फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्षा अरुणा कटारा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रकाश प्रल्हाद छाब्रिया, मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे माजी व्यवस्थापकीय संचालक अनिल वाभी, मुकुल माधव फाउंडेशनचे समन्वयक सचिन कुलकर्णी आणि जितेंद्र जाधव यांच्यासह सिम्बायोसिस रुग्णालय, मुकुल माधव फाउंडेशनमधील कर्मचारी उपस्थित होते.
प्रकाश छाब्रिया यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशनने घेतलेला पुढाकार समाजोपयोगी असल्याचे नमूद केले. डॉ. राजीव येरवडेकर यांनी छाब्रिया आणि मजूमदार कुटुंबाच्या स्नेहाबद्दल भावना व्यक्त करत गोरगरीब रुग्णांवर उपचाराकरिता हा पुढाकार मोलाचा ठरणार असल्याचे सांगितले. अरुणा कटारा यांनी सामान्यांना आधार देण्याचा छाब्रिया दाम्पत्याचा वारसा योग्य पद्धतीने पुढे घेऊन जात असल्याबद्दल अभिनंदन केले.

नेहरु, गांधी परिवारावर टीका करुन पापे लपवण्याचा भाजपाचा प्रयत्न; महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांचा विदर्भात प्रचाराचा धडाका; गोंदियात नाना पटोलेंची पदयात्रा.

गोंदिया/मुंबई, दि. १७ एप्रिल
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली असून काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जनतेचा आशिर्वाद मिळाला आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला लोकांनी अनेक गावातून हाकलून लावले. १० वर्षातील अत्याचारी कारभाराला जनता कंटाळली आहे. मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप असून विदर्भातील पाचही जागांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

भंडाऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील तानाशाही सरकारने १० वर्षात देशाची संपत्ती विकून देश चालवला, देश कर्जबाजारी करून ठेवला, तरुणांचे जीवन बरबाद केले, शेतकऱ्यांना उद्धवस्त केले, महागाई, बेरोजगारी या ज्वलंत विषयावर भाजपाचे नेते बोलतच नाहीत, हा राग जनतेच्या मनात आहे. मोदी सरकारचा कारभार पाहून जनतेने त्यांचा निर्णय पक्का केला असून परिवर्तन होणार असे चित्र विदर्भातील पाचही मतदारसंघात दिसले. काँग्रेस पक्षाने जाहीर सभा, चौक सभा घेण्याबरोबरच घरोघरी जाऊन ५ न्याय व २५ गॅरंटीची माहिती लोकांपर्यंत पोहचवली. काँग्रेस पक्षाने दिलेली गॅरंटी जनतेचे कल्याण करणारी आहे तर मोदी गॅरंटी ही भ्रष्टाचारी लोकांना वाचवणारी आहे. भ्रष्ट लोकांना ईडी, सीबीआयकडून दबाव आणून भाजपात प्रवेश द्यायचा व वॉशिंगमधून त्यांना स्वच्छ करण्याचे काम भाजपाने केले आहे.
भाजपाच्या उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग केला, खर्चाची मर्यादाही ओलांडली असून त्यासंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने मतविभाजनाचा प्रयत्न केला असला तरी त्यात त्यांना यश येणार नाही. काँग्रेस व गांधी, नेहरु परिवारावर आरोप करून भाजपा सत्तेत आले परंतु १० वर्षात भाजपाने काय केले यावर ते बोलत नाहीत. नेहरु, गांधी परिवारावर टीका करुन भाजपा पापे लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

भंडारा-गोंदियाचे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ गोंदिया शहरात पदयात्रा काढण्यात आली. मामा चौकातून सुरु झालेली ही पदयात्रा नेहरू चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, चांदणी चौक, शंकर चौक, यादव चौक, रामनगर, पाल चौक ते गुरुद्वारा मरार टोली बस स्टॉप येथे समाप्त झाली. या पदयात्रेदरम्यान काँग्रेसचे ‘न्यायपत्र’ नागरिकांना देण्यात आले. यावेळी गोंदिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा. आ. दिलीप बनसोडे, गोंदिया काँग्रेस शहराध्यक्ष योगेश अग्रवाल, तालुकाध्यक्ष रमेश अंबुले, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याआधी सकाळी नाना पटोले यांनी डब्बा ता. अर्जुनी येथे कॉर्नर सभेला संबोधित केले.

धंगेकरांची चहुबाजूने मतकोंडी-वंचित नंतर एमआयएम देखील रिंगणात

पुणे- पुण्यात लोकसभेची निवडणूक आता चांगलीच रस्सीखेच करणारी होईल हे कुणा ज्योतिष्याने सांगण्याची गरज उरली नाही. कॉंग्रेसच्या स्थानिक चढा ओढीच्या राजकारणात अगोदरच अडकलेल्या धंगेकर यांना आता भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्याशी सरळ सरळ टक्कर द्यायची नाही तर त्या सोबत वंचित चे मोरे आणि एम आय एम ने जाहीर केलेले उमेदवार अनिस सुंडके यांच्यासह मुळ लढत मोहोळ यांच्याशी द्यायची आहे.धंगेकर यांना हि कसरत करताना स्थानिक कॉंग्रेस मधील नव्या जुन्या नेत्यांची साथ देखील घ्यायची आहे. एकूणच पुणेरी संस्कृतीच्या नावाखाली वारंवार दाखविले जाणारेआपण सारे भाऊ ..मिळून सारे मिसळ खाऊ .. हे भ्रामक चित्र प्रत्यक्षात मतदान निवडणुकीत दिसणार मात्र नाही. हे स्पष्ट आहे.

महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडीसमवेत एमआयएमदेखील पुण्याच्या आखाड्यात उतरली आहे.मुळचे कॉंग्रेसचे असलेले अनिस सुंडके ( anis sundke) यांना ‘एमआयएम’ पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. यामुळे एक प्रकारे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांचीकाही मते जातील असे बोललं जात आहे. सुंडके यांच्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन होऊन भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.’एमआयएम’चे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी ( Asaduddin Owaisi ) हे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांच्या प्रचारासाठी संभाजीनगर येथे आले होते. याच दरम्यान झालेल्या जाहीर सभेत पुणे लोकसभा मतदारसंघातून ( Pune Lok Sabha Constituency ) अनिस सुंडके ( anis sundke ) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.अनिस सुंडके माजी नगरसेवक, माजी स्थायी समिती अध्यक्ष आहेत.त्यांचे लहान बंधू रईस सुंडके माजी नगरसेवक, तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके पुणे मनपा 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या होत्या.जय भीम-जय मीमचा नारा देत सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्धार अनिस सुंडके यांनी केला आहे. अनिस सुंडकेंनी म्हटलं, “गेल्या पंचवीस वर्षांपासून मी पुण्यातील राजकारणात सक्रिय आहे. सर्व जाती-धर्माचे माझे चांगले संबंध असून, पुण्यातील अनेक प्रश्नांना मी मार्गी लावण्यास काम केले आहे. गेल्या अनेक निवडणुकीत मी काँग्रेस पक्षाचा व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काम केलेले आहे. पुणे महानगरपालिकेत मी अनेक पदं भूषविलेली असून, पश्चिम महाराष्ट्र येथे सर्व धर्म लोकांशी माझे चांगला संपर्क आहे. पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना पुण्यासाठी अनेक विधायक कामं केली आहेत.””विविध प्रश्नांची मला जाणीव आहे. समाजाच्या प्रश्नांचा अनुभव असल्याने अनेक आजी-माजी नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. पुण्यातील अनेक दिग्गज आजी-माजी नगरसेवकांचा ‘एमआयएम’ पक्षात जाहीर प्रवेश होईल,” असं अनिस सुंडकेंनी सांगितलं.

वंचित आघाडीचे उमेदवार मोरे एकीकडून आणि दुसरीकडून सुंडके हे कॉंग्रेसच्या धंगेकर यांचे मताधिक्य कमी करतील असा काही राजकीय समीक्षकांचा दावा आहे. धंगेकर यांना कॉंग्रेसची परंपरागत मते मिळतील आणि स्वतःच्या नावाच्या ,आणि स्वकर्तुत्वाच्या वलयाची मते पडतील . यातील कॉंग्रेसच्या परंपरागत मतांमधील मुस्लीम आणि बहुजनांची मतविभागणी होऊन धंगेकर यांना फटका बसू शकतो असे सांगितले जाते आहे .तर धंगेकर यांचे कार्यकर्ते आणि कॉंग्रेसचे काही कट्टर कार्यकर्ते मात्र आम्ही भाजपा उमेदवाराच्या महापालिकेतील कारकिर्दीची कुंडली जनतेसमोर मांडून भाजपची कट्टर मते देखील त्यांना मिळण्यापासून रोखू असा दावा करत आहेत . एकूणच आता पुण्यातील लोकसभेच्या लढतीला रंग भरायला खऱ्या अर्थाने उद्यापासून सुरुवात होत आहे . कोण बाजी मारेल, मतदारांची मते कोण कशा पद्धतीने, मार्गाने मिळवेल हे पाहणे राजकीय दृष्ट्या रंजक ठरणार आहे .

तुळशीबागेत राममंदिरात २६३ वा श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्या वतीने आयोजन ; फुलांनी सजविलेल्या सभामंडपात श्रीरामजन्माचा पाळणा

पुणे : कुलभूषणा दशरथ नंदना, बाळा जो जो रे… असे पाळण्याचे मंगल स्वर ऐतिहासिक तुळशीबाग राम मंदिरात निनादले. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये फुलांनी सजलेल्या सभामंडपात २६३ वा श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा झाला.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात सकाळी श्रीरामाची मुख्य पूजा पार पडली. मंदिर परिसरात सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली. ह.भ.प. दर्शन बुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा दुपारी १२.४० वाजता साजरा झाला.

श्रीराम जन्मानंतर मिळणारा श्रीरामाच्या वस्त्राचा ‘पागोट्याचा प्रसाद’ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. तर, सायंकाळी श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकात पुणेकरांनी पुष्पवृष्टीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र उर्फ सुहास तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवाराने उत्सवाचे आयोजन केले आहे.

शुक्रवार, दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. मंगळवार, दिनांक २३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६ वाजता ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.दर्शनबुवा वझे यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. शनिवार, दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीसत्यनारायण महापूजेने श्रीराम जन्मोत्सव उत्सवाची सांगता होणार आहे. तरी

अतिदुर्गम ग्रामीण आदिवासी भागातील मुलांना सायकल वाटप 

महा एनजीओ फेडरेशन व माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचा पुढाकार

पुणे :  महा एनजीओ फेडरेशन व माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ यांच्या पुढाकाराने अतिदुर्गम आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. दररोज ४ ते ५ किलोमीटर पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांनी सायकलवर स्वार होऊन उज्वल भविष्याची वाट  शोधावी या उद्देशाने त्यांना सायकल देण्यात आल्या.
माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ व महा एनजीओ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व आदिवासी कल्याण व संवर्धन संस्था यांच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली. माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ शिवाजीनगर येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या सचिव सुशिला राठी, राजू आसावा, विनोद कारवा, मुकुंद शिंदे, नितीन साबळे, सुनील कोळपे, मनोज सूर्यवंशी तसेच विद्यार्थ्यांचे पालक ही उपस्थित होते.
कार्यक्रमात १५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे व योगेश बजाज यांनी केले
शेखर मुंदडा म्हणाले, आदिवासी दुर्गम भागामध्ये विद्यार्थी प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी घरापासून लांब असलेल्या शाळांमध्ये जातात. घर ते शाळा हे अंतर ते पायी चालत चालत जातात. शिक्षण घेणे त्यांना सोयीचे व्हावे आणि रोजचा वेळ वाचावा यासाठी सायकलींचे वाटप करण्यात आले. 

मनसे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सक्रिय होणार

पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रचाराच्या हालचालींनाही वेग आला आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे सक्रीय होणार आहे. यासंदर्भात मोहोळ यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली असून ‘पुण्यातही मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने आणि जोमाने मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उभे राहतील, प्रचारात सक्रिय होतील,’ असा विश्वास मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मोहोळ यांना दिला.

मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर कार्यालयात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. याप्रसंगी मोहोळ यांना शुभेच्छा देत अमित ठाकरे यांनीही मनसेची संपूर्ण पुणे शहर संघटना आपल्या प्रचारात सक्रिय असेल, असा विश्वास दिला. यावेळी मनसेच्या वतीने ठाकरे यांनी मोहोळ यांचा सत्कार केला. या भेटीनंतर मोहोळ आणि मनसेचे सरचिटणीस बाबू वागसकर यांनी संयुक्तरित्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

या वेळी मनसेचे नेते बाबू वागसकर, सरचिटणीस रणजीत शिरोळे, सरचिटणीस बाळा शेडगे, सरचिटणीस अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या भेटीबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘मनसेचे नेते अमितजी ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असताना मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचे मताधिक्य वाढवण्यास मोठा हातभार लावतील, असा शब्द दिला. त्यांच्याशी प्रचाराच्या रणनीतीबाबतही चर्चा झाली. त्यामुळे आमचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. विजय आणखी सोपा झाला आहे. राजसाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आणि मनसेची स्वतंत्र ताकद संपूर्ण पुणे शहरात आहे. त्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे. साहजिकच आम्ही सर्वच पक्ष एकदिलाने काम करून मोठा विजय साकारू’.

मनसे सरचिटणीस वागसकर म्हणाले, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नुकताच महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आमचे नेते अमितजी ठाकरे सर्वच शहरांत जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. त्यांनी आज पुण्यातही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी, सर्व संघटकांशी चर्चा केली. त्यांनी आम्हा सर्वांना सोबत घेऊन, सन्मानाने वागणूक देऊन महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करण्यास सांगितले आहे. त्यानुसार आम्ही एकदिलाने त्यांच्या प्रचारात सहभागी होणार आहोत’.

राज ठाकरे , नरेंद्र मोदींंची एकत्र सभा होईल – अमित ठाकरे

पुणे-अमित ठाकरे यांनी आज येथे सांगितले कि, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची मुंबईत एकत्र सभा होईल . त्यामुळे राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने प्रत्यक्ष प्रचारात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.याचवेळी पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक आणि वंचित चे लोकसभा उमेदवार वसंत मोरे हे सोशल मिडिया च्या भूलभुलैय्याच्या आहारी गेलेले आहेत , निवडणुकीत हे स्पष्ट होईल असे ते म्हणाले.

राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर दिसतील. लवकरच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरती होईल अशी माहिती अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना दिली आहे.दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुण्यात अमित ठाकरे आज प्रभाग निहाय बैठका घेत आहेत. महायुतीला दिलेल्या पाठिंबाबाबत ते पदाधिकाऱ्यांसोबत बोलत आहेत. तर दुसरीकडे मनसेतील काही पदाधिकाऱ्यांनी महायुतीला पाठिंबाबात नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता मनसेने पक्षाचे काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अमित ठाकरे म्हणाले की, वसंत मोरे हे सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचा चिमटा त्यांनी काढला. मनसेने लोकसभा निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतल्यानंतर मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी चाचपणी केली होती. त्यानंतर त्यांनी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची पण भेट घेतली होती.पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे बहुजन वंचित आघाडीकडून लढत आहेत. त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी महापौर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सामना करावा लागणार आहे. पुणे लोकसभेची लढत तिरंगी होणार आहे. तर चार दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले होते .

मनसे नेते बाबू वागास्कर म्हणाले, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती यांना जाहीर बिनशर्ता पाठिंबा दिलेला आहे.त्यानुसार पुणे शहरातील पक्षाचे संघटक व शाखाध्यक्ष यांच्याशी प्रचाराबाबत बोलणे झाले आहे .अमित ठाकरे यांनी महायुतीच्या प्रचारात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याचे संकेत दिले आहे. त्यानुसार पुण्यातील महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना आम्ही पाठिंबा दिला आहे .मोहोळ यांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघात यापुढे सक्रिय होतील.

महाविकास आघाडीचे सुळे, कोल्हे अन् धंगेकर एकाचवेळी उमेदवारी अर्ज दाखल करणार


पुणे -महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे शहर व जिल्यातील लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (पुणे), सुप्रियाताई सुळे (बारामती) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) हे गुरुवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्यांच्या प्रेरणादायी पुतळ्यापाशी वंदन करून एकत्र येऊन आपला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. श्री. रवींद्र धंगेकर (पुणे) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) हे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि सौ. सुप्रियाताई सुळे (बारामती) या विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात निवडणूक अर्ज दाखल करतील. यानंतर जवळच असलेल्या हॉटेल शांताई जवळ भव्य प्रचार सभा होणार असून तेथे तीनही उमेदवारांचा प्रचाराचा नारळ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते वाढवण्यात येणार आहे.

    या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जेष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आ. विश्वजित कदम,राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत व सचिन आहिर,  आणि आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अभिजित फाटके उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी आमदार व पुणे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी यांनी दिली.

अयोध्येतील राम मंदिर उभारणीमुळे देशात नवचैतन्य – खासदार बारणे

शहरातील राम मंदिरांना भेट देत बारणे यांनी साधला रामभक्तांशी संवाद

खासदार बारणे यांनी स्वतःच्या हाताने वाढला महाप्रसाद

चिंचवड, दि. 17 एप्रिल – श्रीराम नवमीनिमित्त शहरातील विविध राम मंदिरांमध्ये जाऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले तसेच काम भक्तांशी संवाद साधला. सुमारे पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर उभारणीमुळे देशात नवचैतन्य निर्माण झाल्याच्या भावना बारणे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

नवलाख उंब्रे येथील प्राचीन राम मंदिरात दर्शन

खासदार बारणे यांनी रामनवमी निमित्त मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथील प्राचीन स्वयंभू राम मंदिर, थेरगाव येथील श्रीराम-जानकी मंदिर, रहाटणी, चिंचवड व प्राधिकरण पेठ क्रमांक 27 येथील राम मंदिरांत जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या समवेत तानाजी बारणे, मयूर बारणे, दीपक गुजर, गौरव जाधव, भरत जाधव, प्रदीप दळवी, अंकुश कोळेकर आदी कार्यकर्ते होते.

नवलाख उंब्रे येथील प्राचीन स्वयंभू राम मंदिरात श्रीराम नवमी जन्मोत्सवानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहास बारणे यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांच्या समवेत निवृत्ती शेटे, बाळासाहेब नेवाळे, शरद हुलावळे, बाळासाहेब गायकवाड आदी पदाधिकारी होते. हभप गौरव महाराज उडापे यांचा बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अंतूभाऊ नरवडे, विक्रम कदम, संतोष नरवडे, नागेश शिर्के, संतोष पापळ आदींनी खासदार बारणे यांचे स्वागत केले.

थेरगाव येथील श्रीराम-जानकी मंदिरात अध्यक्ष गुलाब तिवारी व पुजारी सभाशंकर तिवारी यांनी खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार केला. रहाटणी येथे अंकुशराव राजवडे, अजय कदम, आदेश राजवडे यांनी बारणे यांना श्रीरामाचा प्रसाद देऊन निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

चिंचवड गावातील राम मंदिरात मुख्य विश्वस्त श्रीकांत देव तसेच पुजारी नितीन राजर्षी व कौस्तुभ रबडे यांनी बारणे यांचे स्वागत व सत्कार केला.‌ त्यावेळी माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडेही उपस्थित होत्या. निगडी प्राधिकरण पेठ क्र. 27 येथे श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने सागर दिवाकर व लक्ष्मीशेठ अग्रवाल यांनी बारणे यांचे स्वागत केले.

रामभक्तांशी संवाद

ठिकठिकाणी बारणे यांनी रामभक्तांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयध्येत राम मंदिर उभारणीचा दिलेला शब्द पाळला आहे. हे केवळ राम मंदिरच नाही तर राष्ट्र मंदिर आहे. प्रभू श्रीराम हे भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहिल्यामुळे संपूर्ण देशात नवचैतन्य निर्माण झाले असून नव्या आत्मविश्वासाने देश पुढील प्रगती करणार आहे, असे बारणे म्हणाले.

रामनगरमध्ये महाप्रसाद वाटप

चिंचवड रामनगर येथील श्रीराम सेवा ट्रस्ट आयोजित रामजन्मोत्सवात सहभागी होऊन खासदार बारणे यांनी स्वतःच्या हातांनी रामभक्तांच्या पंगतीला महाप्रसादाचे वाटप केले. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अमर दौंडकर व राहुल दौंडकर व अन्य पदाधिकाऱ्यांना खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार केला.

देहूरोड येथील वैश्य समाज मंदिरातील श्रीराम जन्मोत्सवास खासदार बारणे उपस्थित होते. विशाल खंडेलवाल, सुरेश बन्सल, सुमित जिंदल, सुनील गोयल, अमित बन्सल, अमित शर्मा, आशिष बन्सल, राहुल गोयल आदींनी त्यांचे स्वागत केले. बारणे यांना श्रीरामरायाचा प्रसाद देऊन निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

महायुतीच्या नेत्यांचा शब्द ‘प्रमाण’;मावळात चालवणार फक्त ‘धनुष्यबाण’!

मावळच्या विकासासाठी एकत्र राहण्याचा महायुतीच्या मेळाव्यात संकल्प

माझ्यापेक्षाही बारणे यांना जास्त मताधिक्य मिळेल – सुनील शेळके

महायुतीच्या विरोधात काम केल्यास कारवाई – बाळा भेगडे

कामशेत, 17 एप्रिल – महायुतीच्या नेत्यांनी मावळ तालुक्याच्या विकासासाठी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांचा शब्द आमच्यासाठी प्रमाण आहे. त्यांच्या आदेशानुसार एकजुटीने व एकदिलाने फक्त ‘धनुष्यबाण’ चिन्ह चालविण्यात येईल, असा निर्वाळा मावळ तालुक्यातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी काल (मंगळवारी) दिला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कामशेत जवळ हिरकणी लॉन्स येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा झाला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या मेळाव्यात एकमेकांवर मिश्किल शेरेबाजी करत महायुतीच्या तालुक्यातील सर्व नेत्यांनी खासदार बारणे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला.

मेळाव्यास खासदार बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, भाजप विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, आरपीआयचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भालेकर, भाजपा महिला आघाडीच्या तालुक्याध्यक्ष सायली बोत्रे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष दीपाली गराडे, शिवसेना महिला संघटक शैला पाचपुते, तसेच सचिन घोटकुले, गुलाबराव म्हाळसकर, एकनाथ टिळे, निवृत्ती शेटे, बाळासाहेब घोटकुले, ज्ञानेश्वर दळवी, बाबुराव वायकर, शरद हुलावळे, राजेंद्र तरस, सुनील मोरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हायुतीत एकमत – बाळा भेगडे

बाळा भेगडे म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी आग्रही मागणी करणे, यात काहीही गैर नव्हते.‌ पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी सांगितल्यानंतर तो विषय आता संपलेला आहे. देशाचा इतिहास घडवणारी ही निवडणूक आहे. त्यासाठी एकमेकांच्या विरोधात लढणारे देखील आम्ही आता एका व्यासपीठावर आलो आहोत.

महायुतीच्या नेत्यांप्रमाणेच आता कार्यकर्त्यांमध्येही एकमत होऊन खासदार बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल. महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणेच नेत्यांवर ही कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आमदार सुनील शेळके यांची टोलेबाजी

आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या खास शैलीत टोलेबाजी करत सभा गाजवली. गेल्या पाच वर्षात जेवढी राजकीय स्थित्यंतरे अनुभवली तेवढी इतरांनी 50 वर्षांत अनुभवली नसतील, असे सांगत ते म्हणाले की, अनेक नाट्यपूर्ण राजकीय उलथापालथी झाल्याने कधी विरोधात, कधी सत्तेत, कधी बरोबर, कधी बाजूला अशा वेळोवेळी भूमिका बदलाव्या लागल्या. हे सर्व करीत असताना मावळचा विकास या एकाच मुद्द्यासाठी आम्ही तडजोडी केल्या. मानापमान सहन केला. तालुक्याला न्याय देईल, विकास करेल त्यालाच पाठिंबा, एवढीच आपली भूमिका असते.

तालुक्याला दोन-अडीच हजार कोटी रुपयांचा निधी देणाऱ्या नेत्याशी इमान राखणे आवश्यक आहे. अजितदादांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. त्यामुळे मावळात बारणे यांना आपल्यापेक्षाही अधिक मताधिक्य मिळेल, अशी ग्वाही आमदार शेळके यांनी दिली. बारणे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा द्यावा एवढीच माझी मागणी होती, त्याप्रमाणे त्यांनी तो दिला आहे. त्यामुळे आता कोणतीही तक्रार उरलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महामार्गांवरील उड्डाणपूल लवकरच – बारणे

मावळ तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांबाबत खासदार बारणे यांनी त्यांच्या भाषणात उहापोह केला. जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर मावळ तालुक्यात आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्तावही लवकरच मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले. तालुक्यातील काही प्रलंबित कामे अंतिम टप्प्यात असून निवडणुकीनंतर त्यांना गती मिळेल, असेही बारणे यांनी स्पष्ट केले.

आपले मत वाया घालवू नका – बापूसाहेब भेगडे

महायुतीच्या नेत्यांनी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वांनी नेत्यांच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. यावेळी आयुष्यात प्रथमच मी धनुष्यबाणाला मतदान करणार आहे, असे बापूसाहेब भेगडे यांनी सांगितले. आपले मत वाया घालू नका, विरोधात काम करून पायावर धोंडा पाडून घेऊ नका, असेही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना बजावले.

खासदार बारणे यांच्या रूपात आम्हाला साक्षात नरेंद्र मोदीच दिसत आहेत, असे उद्गार भास्करराव म्हाळसकर यांनी काढले. गतिमान विकासासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे ही भारताची गरज आहे, असे रवींद्र भेगडे म्हणाले. खासदार बारणे यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल, असे गणेश खांडगे यांनी सांगितले. विरोधकांची खुर्ची धोक्यात असल्यामुळेच, संविधान धोक्यात असल्याचा खोटा प्रचार ते करीत आहेत, असा आरोप सूर्यकांत वाघमारे यांनी केला.

सचिन घोटकुले यांनी स्वागत केले तर राजू खांडभोर यांनी आभार मानले. भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले.

गद्दारी कशाला म्हणतात ? काय सांगितले अमोल कोल्हेंनी

मंचर/पुणे: खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर डॉ. कोल्हे यांनी मोहितेंचा जोरदार समाचार घेतला. दिलीप मोहिते पाटील यांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटते अस म्हणत कोल्हे यांनी गद्दार कोणाला म्हणतात हे उदाहरणांसह सांगितले.

अवसरी मध्ये आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात डॉ. कोल्हे बोलते होते. यावेळी देवदत्त निकम, सुरेश भोर, राजू इनामदार, आलू इनामदार, दिलीप पवळे, दत्ता गांजाळे, शेखर पाचुंदकर, राजाराम बाणखेले, नितीन भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.

खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी केलेल्या वक्तव्याचे सखेद आश्चर्य वाटते अस म्हणत डॉ. कोल्हे म्हणाले, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करून त्याच्या ताटात माती कलविण्याचे जे पाप भाजपने केलं त्याला गद्दारी म्हणतात. भाजपच्या बेरोजगारी वाढविण्याला गद्दारी म्हणतात. पेट्रोल शंभर च्या पार व गॅस हजाराच्या पार जातो त्याला गद्दारी म्हणतात.

ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही केवळ स्वार्थासाठी आणि आपल्यावर होण्याऱ्या कारवाय पासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी वाहायची याला महा गद्दारी म्हणतात, असं सांगत मोहिते पाटलांना चांगलीच चपराक लगावली.

इतिहासातील हंबीरराव मोहिते खंबीर होते पण हे?

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे उदाहरण देत डॉ. कोल्हे म्हणाले की, आणि म्हणूनच खेद वाटतो की सगळे उघड्या डोळ्याने दिसत असतानाही असा आरोप करावा लागतो त्यामुळे असं वाटतं की नक्कीच काहीतरी कमप्लशन असेलआणि कमप्लशन नसेल तर कुठल्या तरी करवाई पासून वाचण्यासाठी असा महा गद्दारीचा आरोप करण्याची लाचारी वाघासारख्या नेतृत्वाने करू नये, असा ही टोला डॉ. कोल्हे यांनी लगावला.

अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली बूथ काबीज होण्याची भीती

कार्यकर्त्यांना केलं सतर्क राहण्याचे आवाहन

यंदाची निवडणूक ही फक्त आपल्या शिरुर मतदारसंघापुरती मर्यादित नाही तर ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निर्णयाक ठरणारी निवडणूक आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती याच बरोबर लोकशाही वाचवण्यासाठी महत्वाची निवडणूक आहे. आणि म्हणूनच प्रत्येक बूथ आपल्यासाठी महत्वाचा आहे. विरोधकांकडून बूथ काबीज करण्याचे प्रकार घडू शकतात, त्यामुळे आपण सतर्क राहायला हवं, असं आवाहन महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना केलं.डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, आपल्याला प्रत्येक बूथ महत्वाचा आहे. प्रत्येक बूथ वर मताधिक्य मिळणे गरजेचे आहे. आपल्याकडे मोठे नेते नाहीत. पैश्यांची ताकद नाही. पण जनतेची ताकद आहे. ऐनवेळी बूथ काबीज केला जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. बूथ वर गैर प्रकार होण्याच्या शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे डोळ्यात तेल घालून जागरूक रहा, अस सांगत अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना सतर्क केलं.

जशी पाच वर्ष वयाच्या व वीस वर्ष वयाच्या पहिलवानांमध्ये कुस्ती लावली जात नाही
तशीच पाच वर्षाचा जनसंपर्क व वीस वर्षांचा जनसंपर्क यातही फरक असणारच ना असा सवाल करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वीस वर्षांचा कामाचा बुरखा फाडला.५ वर्षाच्या माझ्या कार्यकाला पेक्षा त्यांचा जनसंपर्क लई भारी एवढेच ते सांगत सुटतात पण खासदार ज्यासाठी संसदेत निवडून पाठवतात त्याची तुलना केली तर माझी अवघ्या ५ वर्षाची कामगिरी तुमच्या १५ वर्षापेक्षा लई भारी हे नाही सांगत … असा टोला कोल्हे यांनी लगावला .

सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. आंबेडकरांचे विचार अत्यंत महत्वपूर्ण

मेघराज राजेभोसले यांचे मत; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये अभिवादन सोहळा

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूर्यगौरव सन्मान २०२४’ प्रदान करण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते राजेभोसले यांना सन्मानित करण्यात आले.

‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील योगाचार्य बीकेएस अय्यंगार सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी सिनेपत्रकार अश्विनी कोळेकर-धायगुडे, ‘सूर्यदत्त’चे संचालक प्रशांत पितालिया, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, राजेश खन्ना, शीतल फडके, प्रा. वंदना पांड्ये यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेच्या प्रांगणातील डॉ. आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सूर्यदत्त संस्थेमध्ये अनेकविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भावी पिढीला डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची आणि त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या महामानवाच्या कार्यातून देशाला जे संविधान प्राप्त झाले; त्याचे महत्व कळावे, या उद्देशाने हा सोहळा आयोजिला आहे.”

चित्रपट क्षेत्रात राजेभोसले यांचे कार्य उल्लेखनीय आहे. कोरोना काळात चित्रपट व नाट्य सृष्टीतील पडद्यामागील सर्व कलाकारांना केलेली मदत लक्षणीय आहे. कलाकारांसाठी सोयीसुविधा उभारण्यात त्यांचे योगदान आहे. कोल्हापूरातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत, तसेच बाधित घरांसाठी केलेले सहकार्य मोलाचे होते. निर्मात्यांचे नैराश्य घालवण्यासाठी विचारमंथन शिबिराचे आयोजन केले. विविध संस्थांवर महत्वपूर्ण पदे भूषवित असताना सामान्यांकरिता त्यांनी उभारलेले कार्य आदर्शवत असून, ते डॉ. आंबेडकर यांच्या विचारांशी सुसंगत आहे,” असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
मेघराज राजेभोसले म्हणाले, “सूर्यदत्त संस्थेतर्फे डॉ. आंबेडकरांच्या नावाने होणारा हा सन्मान प्रोत्साहन देणारा आहे. ‘सूर्यदत्त’चे शैक्षणिक व सामाजिक कार्य मोठे आहे. गेल्या २५ वर्षांत हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचा त्यांचा हा प्रवास दैदिप्यमान असाच आहे. संघर्षाशिवाय कोणतेही कार्य उभे राहत नाही. कोणत्याही क्षेत्रातील सर्वसामान्य व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्यावर भर द्यायला हवा. डॉ. आंबेडकरांच्या जीवनप्रवासातून शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्ष काम करताना अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. या महामानवाच्या अनुकरणीय गोष्टी समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचायला हव्यात.”

अश्विनी कोळेकर-धायगुडे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विचार व्यक्त केले. प्रशांत पितालिया यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. नीलिमा मगरे सूत्रसंचालन यांनी केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.