पुणे -महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे शहर व जिल्यातील लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (पुणे), सुप्रियाताई सुळे (बारामती) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) हे गुरुवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्यांच्या प्रेरणादायी पुतळ्यापाशी वंदन करून एकत्र येऊन आपला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. श्री. रवींद्र धंगेकर (पुणे) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) हे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि सौ. सुप्रियाताई सुळे (बारामती) या विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात निवडणूक अर्ज दाखल करतील. यानंतर जवळच असलेल्या हॉटेल शांताई जवळ भव्य प्रचार सभा होणार असून तेथे तीनही उमेदवारांचा प्रचाराचा नारळ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते वाढवण्यात येणार आहे.
या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जेष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आ. विश्वजित कदम,राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत व सचिन आहिर, आणि आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अभिजित फाटके उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी आमदार व पुणे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी यांनी दिली.