पुणे- पुण्यात लोकसभेची निवडणूक आता चांगलीच रस्सीखेच करणारी होईल हे कुणा ज्योतिष्याने सांगण्याची गरज उरली नाही. कॉंग्रेसच्या स्थानिक चढा ओढीच्या राजकारणात अगोदरच अडकलेल्या धंगेकर यांना आता भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्याशी सरळ सरळ टक्कर द्यायची नाही तर त्या सोबत वंचित चे मोरे आणि एम आय एम ने जाहीर केलेले उमेदवार अनिस सुंडके यांच्यासह मुळ लढत मोहोळ यांच्याशी द्यायची आहे.धंगेकर यांना हि कसरत करताना स्थानिक कॉंग्रेस मधील नव्या जुन्या नेत्यांची साथ देखील घ्यायची आहे. एकूणच पुणेरी संस्कृतीच्या नावाखाली वारंवार दाखविले जाणारेआपण सारे भाऊ ..मिळून सारे मिसळ खाऊ .. हे भ्रामक चित्र प्रत्यक्षात मतदान निवडणुकीत दिसणार मात्र नाही. हे स्पष्ट आहे.
महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडीसमवेत एमआयएमदेखील पुण्याच्या आखाड्यात उतरली आहे.मुळचे कॉंग्रेसचे असलेले अनिस सुंडके ( anis sundke) यांना ‘एमआयएम’ पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. यामुळे एक प्रकारे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांचीकाही मते जातील असे बोललं जात आहे. सुंडके यांच्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन होऊन भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.’एमआयएम’चे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी ( Asaduddin Owaisi ) हे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांच्या प्रचारासाठी संभाजीनगर येथे आले होते. याच दरम्यान झालेल्या जाहीर सभेत पुणे लोकसभा मतदारसंघातून ( Pune Lok Sabha Constituency ) अनिस सुंडके ( anis sundke ) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.अनिस सुंडके माजी नगरसेवक, माजी स्थायी समिती अध्यक्ष आहेत.त्यांचे लहान बंधू रईस सुंडके माजी नगरसेवक, तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके पुणे मनपा 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या होत्या.जय भीम-जय मीमचा नारा देत सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्धार अनिस सुंडके यांनी केला आहे. अनिस सुंडकेंनी म्हटलं, “गेल्या पंचवीस वर्षांपासून मी पुण्यातील राजकारणात सक्रिय आहे. सर्व जाती-धर्माचे माझे चांगले संबंध असून, पुण्यातील अनेक प्रश्नांना मी मार्गी लावण्यास काम केले आहे. गेल्या अनेक निवडणुकीत मी काँग्रेस पक्षाचा व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काम केलेले आहे. पुणे महानगरपालिकेत मी अनेक पदं भूषविलेली असून, पश्चिम महाराष्ट्र येथे सर्व धर्म लोकांशी माझे चांगला संपर्क आहे. पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना पुण्यासाठी अनेक विधायक कामं केली आहेत.””विविध प्रश्नांची मला जाणीव आहे. समाजाच्या प्रश्नांचा अनुभव असल्याने अनेक आजी-माजी नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. पुण्यातील अनेक दिग्गज आजी-माजी नगरसेवकांचा ‘एमआयएम’ पक्षात जाहीर प्रवेश होईल,” असं अनिस सुंडकेंनी सांगितलं.
वंचित आघाडीचे उमेदवार मोरे एकीकडून आणि दुसरीकडून सुंडके हे कॉंग्रेसच्या धंगेकर यांचे मताधिक्य कमी करतील असा काही राजकीय समीक्षकांचा दावा आहे. धंगेकर यांना कॉंग्रेसची परंपरागत मते मिळतील आणि स्वतःच्या नावाच्या ,आणि स्वकर्तुत्वाच्या वलयाची मते पडतील . यातील कॉंग्रेसच्या परंपरागत मतांमधील मुस्लीम आणि बहुजनांची मतविभागणी होऊन धंगेकर यांना फटका बसू शकतो असे सांगितले जाते आहे .तर धंगेकर यांचे कार्यकर्ते आणि कॉंग्रेसचे काही कट्टर कार्यकर्ते मात्र आम्ही भाजपा उमेदवाराच्या महापालिकेतील कारकिर्दीची कुंडली जनतेसमोर मांडून भाजपची कट्टर मते देखील त्यांना मिळण्यापासून रोखू असा दावा करत आहेत . एकूणच आता पुण्यातील लोकसभेच्या लढतीला रंग भरायला खऱ्या अर्थाने उद्यापासून सुरुवात होत आहे . कोण बाजी मारेल, मतदारांची मते कोण कशा पद्धतीने, मार्गाने मिळवेल हे पाहणे राजकीय दृष्ट्या रंजक ठरणार आहे .