पुणे-:लोकसभा मतदारसंघांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरला.महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज शिरूर लोकसभा मतदार संघातून दाखल केला.बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, युगेंद्र पवार उपस्थित होते.
महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार व बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात,रमेश बागवे, मोहन जोशी आमदार विश्वजित कदम, अशोक पवार, संजय जगताप, सचिन अहिर, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते. धंगेकर यांनी आपला अर्ज पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी सुळे म्हणाल्या, काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत जे-जे लोक उमेदवारी अर्ज भरतील त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. सर्वांना मी विजयासाठी शुभेच्छा देते, सुनेत्रा पवारांचे नाव न घेता सुळेंनी शुभेच्छा दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरण्यास गुरुवारी (दि. १८) सुरुवात होणार झाली. त्यात जिल्ह्यातील पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शहरात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांपैकी बारामती लोकसभा मतदारसंघ राज्यातील दुसऱ्या टप्प्यात असल्याने तेथे १२ एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (दि. १९) आहे. उर्वरित पुणे, मावळ व शिरूर या तीन मतदारसंघांसाठीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होत आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल असून, अर्जांची छाननी दुसऱ्या दिवशी अर्थात २६ एप्रिलला होणार आहे. अर्ज माघारीची तारीख २९ एप्रिल आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीतर्फे वसंत मोरे आणि ‘एमआयएम’कडून अनिस सुंडके यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे, महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शिवाजीराव आढळराव यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतर्फे शिवसेनेचे श्रीरंग बारणे व महाविकास आघाडीतर्फे उध्दवसेनेतर्फे संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे.