पुणे- पक्ष फोडले,नेते फोडले ,खोट्या फसव्या आश्वासनांंचे ढग फोडले… आता मते फोडाफोडीचे राजकारण चालणार नाही , मतदार या सर्व राजकारणाला ओळखून बसलेत , त्यांना आता सारे काही समजलेय , आता ते कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव कधीही होऊ देणार नाहीत , त्यांनाच विजयी करतील आणि भाजपाला धडा शिकवतील असे येथे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी म्हटले आहे.
बागवे यांनी स्वतः घरोघरी जात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा प्रचार सुरु ठेवला आहे. पक्षाच्या पातळीवर पक्ष काम करेलच आणि पक्ष देईल त्यानुसार आम्हीही काम करू पण वैयक्तिक पातळीवर आमची नाळ या पक्षाशी जोडलेली आहे , त्यामुळे कशाचीही वाट न पाहता आम्ही कधीच प्रचाराला प्रारंभ केला आहे असे ते म्हणाले. घरोघरी काही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बागवे आणि संगीता तिवारी हे प्रचार पत्रके वाटत , तर कुठे नागरिकांचे प्रबोधन करत फिरत आहेत . वंचित आघाडी आणि एम आय एम ने उमेदवार रिंगणात उतरविले आहेत, त्यामुळे कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन होणार नाही काय ? या प्रश्नाला उत्तर देताना बागवे बोलत होते , आता मतदाराला सारे काही समजून चुकले आहे , ते आता या फोडाफोडीच्या राजकारणाला देखील याच निवडणुकीतून धडा शिकवतील असेही ते म्हणाले.