नवी दिल्ली, 17 एप्रिल 2024
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या आधिपत्याखालील स्वायत्त संस्था असलेल्या भारतीय खगोलभौतिक संस्थेने (आयआयए) अयोध्येतील सूर्य तिलक प्रकल्पामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सूर्य तिलक प्रकल्पाअंतर्गत, चैत्र महिन्यात, रामनवमीला बरोब्बर दुपारी 12 वाजता श्री राम लल्लाच्या मूर्तीच्या कपाळावर सूर्यकिरण आणण्यात आले. आयआयएच्या पथकाने सूर्याची स्थिती, रचना आणि दृष्टी प्रणालीचे इष्टतमीकरण यांचा हिशोब मांडला आणि अयोध्येच्या मंदिराच्या ठिकाणी एकत्रीकरण तसेच संरेखनाची प्रक्रिया राबवली.
श्री रामनवमी उत्सवाच्या इंग्रजी दिनदर्शिकेतील तारखा दर वर्षी चंद्र दिनदर्शिकेनुसार बदलत असतात. म्हणून, दर वर्षी रामनवमीला आकाशातील सूर्याची स्थितीदेखील बदलते. तपशीलवार हिशोबातून असे दिसते की श्री राम नवमीच्या इंग्रजी दिनदर्शिकेतील तारखेची दर 19 वर्षांनी पुनरावृत्ती होते. या दिवसांमध्ये आकाशातील सूर्याच्या स्थितीचे मोजमाप करण्यासाठी खगोलशास्त्रातील तज्ञता आवश्यक असते.
अयोध्येतील मंदिराचे बांधकाम अजूनही पूर्ण झाले नसल्याने, आयआयएच्या तज्ञांनी विद्यमान रचनेशी अनुकूल होईल अशा प्रकारे संरचनेत बदल केला आणि प्रतिमा इष्टतम केली. त्यातून 4 आरसे आणि 2 भिंगांच्या सहाय्याने 17 एप्रिल 2024 रोजी सूर्य तिलक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या प्रक्रियेसाठी वापरलेले साधन बंगळूरु येथील ऑप्टिका संस्थेने तयार केले असून प्रत्यक्ष मंदिराच्या ठिकाणी दृक-यांत्रिक प्रणालीची अंमलबजावणी सीएसआयआर-सीबीआरआयतर्फे करण्यात आली.