Home Blog Page 1088

मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल-प्रचारासाठीच्या पत्रकावर प्रभू श्री रामाच्या फोटोचा वापर

पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध काँग्रेसतर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून “राम मंदिर झाले आता राष्ट्रमंदिरासाठी संकल्प करूयात” या मथळ्याखाली जाहिरात करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राममूर्तीच्या पाया पडत आहेत असे छायाचित्र असलेली पत्रके वाटली.

याप्रकरणी माजी आमदार मोहन जोशी व काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले की, ” राम मंदिराला निवडणुक प्रचाराचा मुद्दा बनवून याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.”

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पुरंदरे यांनी मोहोळ यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पुरंदरे यांची भेट घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

एमआयएम सुंडकेंची उमेदवारी:पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र !

पुणे -पुणे लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जनतेतून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे, एमआयएम चे अनिस सुंडकेयांची उमेदवारी जाहीर करण्याचे पडद्यामागील षडयंत्र भारतीय जनता पक्षाने रचले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड अभय छाजेड यांनी केला.

ॲड अभय छाजेड म्हणाले अनिस सुंडके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित पवार गट ) यामध्ये होते पुण्यात भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा पराभव होण्याच्या शक्यतेच्या भीतीपोटी भाजपाने अनिस सुंडके यांचा एमआयएम मध्ये प्रवेश घडवून आणला आणि त्यांना एमआयएम तर्फे पुण्यात उमेदवारी मिळेल अशी व्यवस्था केली हे स्पष्ट दिसत आहे. अनिस सुंडके यांनी अनेक वेळा सोयीस्कर भूमिका घेऊन पक्ष बदलले आहेत त्यामुळेच त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले असून अशा एमआयएम उमेदवाराला मुस्लीम समाज मतदान करणार नाही. काँग्रेस पक्षाने बहुसंख्यांकां प्रमाणेच अल्पसंख्यांक समाजासाठी देखील मोठे योगदान दिले असून, त्यामुळे अल्पसंख्यांकांची मते देखील काँग्रेस पक्षाला पडतील आणि भाजपाचे एमआयएम चा उमेदवार पुण्यात उभा करण्याचे षडयंत्र अयशस्वी होईल व महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील अशा विश्वास ॲड अभय छाजेड यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पास्खला रोखण्यासाठी भाजपाने एमआयएमचे अनेक उमेदवार तिथल्या काँग्रेस विरोधी उभे करण्याचे षडयंत्र रचले होते एमआयएम हा पक्ष भाजपचा “B टीम” म्हणून ओळखला जातो. देशामध्ये भाजपाने याच B टीमचा वापर केला आहे, मात्र देशात आणि तेलंगणा मध्ये देखील त्याचा फायदा भाजपाला झाला नाही. तेलंगणा मध्ये एमआयएमचे अनेक उमेदवार उभे करायला लाऊनाही काँग्रेस पक्ष सगळीकडे विजयी झाला व भाजपाचे मनसुबे धुळीस मिळाले, पुण्यातही असेच घडेल अशा विश्वास ॲड अभय छाजेड यांनी व्यक्त केला.

पिंपरी कॅम्पला लवकरच गावठाणाचा दर्जा – खासदार बारणे

पिंपरी, 18 एप्रिल – पिंपरी कॅम्पमधील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या पिंपरी मर्चंट फेडरेशनने मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना काल (बुधवारी) रात्री एका बैठकीत जाहीर पाठिंबा दिला. व्यापारी वर्गाच्या अडीअडचणींना धावून येणाऱ्या बारणे यांना विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पिंपरी कॅम्प येथील उबाडो पंचायत ट्रस्टच्या बी. टी. अडवाणी सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार बारणे, पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी, उबाडो पंचायत ट्रस्टचे अध्यक्ष ‌ओमप्रकाश तथा बाबू आडवाणी तसेच हरेश बोधानी, अनिल आसवानी, श्याम मेघरानी, इंदरशेठ बजाज, सुशील बजाज यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीचंद आसवानी म्हणाले की, खासदार बारणे हे पिंपरी कॅम्प मधील व्यापाऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे असतात. सुख-दुःखात ते साथ देतात. कोविड काळात त्यांनी व्यापाऱ्यांना खूप मदत केली. पिंपरी कॅम्पातील माथाडी कामगारांचा प्रश्न त्यांनी सोडवला.‌ व्यापाऱ्यांच्या अडीअडचणींत ते सदैव पाठीशी असतात.‌ त्यामुळे या निवडणुकीतही बारणे यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय व्यापारी बांधवांनी घेतला आहे.

पिंपरी कॅम्पला गावठाणाचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून निवडणूक झाल्यानंतर त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे खासदार बारणे यांनी सांगितले. सिंधी बांधवांना निर्वासित सनद देण्याचा विषय लवकरच मार्गी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी कॅम्पातील व्यापारी प्रामाणिकपणे व कष्टाने काम करतात. त्यांच्यावर अन्याय होत असेल तर एका फोनवर मी काम करतो. माझा कोणालाही त्रास नसतो, असे बारणे म्हणाले. चुकीचे काम आपण कधी केले नाही आणि चुकीच्या कामाला कधी पाठीशी घातले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व आणि आपण केलेले काम, सातत्याने ठेवलेला संपर्क या आधारे आपण मते मागत आहोत, असे बारणे म्हणाले.

पिंपरी कॅम्प मधील विविध व्यापारी संघटनांच्या वतीने बारणे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. सुशील बजाज यांनी सूत्रसंचालन केले.

पुण्यातील बंगल्यासह शिल्पा शेट्टीची 97 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा यांची 98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीचा जुहू फ्लॅट आणि बंगला आणि राज कुंद्राच्या नावावर नोंदणीकृत इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. हे प्रकरण 2002 च्या बिटकॉइन पॉन्झी स्कीम घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. ईडीने X वर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि आरोपी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि इतरांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलिसांकडे दाखल केलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता.

राजला जुलै 2021 मध्ये मोबाइल ॲप्सवर अश्लील चित्रपट बनवून अपलोड केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. सुमारे 2 महिन्यांनंतर त्याला जामीन मिळाला, त्यानंतर 2022 मध्ये त्याने आपल्या निर्दोषतेबद्दल सीबीआयकडे अपील केले. राज कुंद्राने आरोपांच्या काळापासून ते तुरुंगात घालवलेल्या दोन महिन्यांपर्यंतची संपूर्ण कहाणी गेल्या वर्षी ‘UT 69’ चित्रपटाद्वारे लोकांना सांगितली.

तपास एजन्सीचा आरोप आहे की आरोपींनी बिटकॉइनच्या रूपात (2017 मध्ये 6600 कोटी रुपये) लोकांकडून दरमहा 10% परतावा देण्याचे खोटे आश्वासन देऊन मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले होते. ही बिटकॉइन्स बिटकॉइन मायनिंगमध्ये वापरली जाणार होती, परंतु प्रवर्तकांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली आणि ऑनलाइन वॉलेटमध्ये अवैधरित्या मिळवलेली बिटकॉइन लपवून ठेवली.करार अयशस्वी झाला आणि गुंतवणूकदारांना त्यांचे फायदे दिले गेले नाहीत. युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फार्म उभारण्यासाठी कुंद्राला गेन बिटकॉइन पॉन्झीचा मास्टरमाइंड आणि प्रवर्तक अमित भारद्वाज यांच्याकडून 285 बिटकॉइन्स मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. जे त्याच्याकडे अजूनही आहेत, ज्याची सध्याची किंमत 150 कोटींपेक्षा जास्त आहे.या प्रकरणातील पहिली तक्रार 11 जून 2019 रोजी आणि पुरवणी तक्रार 14 फेब्रुवारी 2024 रोजी दाखल करण्यात आली होती. त्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टाने यावर कारवाई केली. यापूर्वी ईडीने 69 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.

मनसे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घेणार मेळावे – राजेंद्र वागस्कर.

भाजपा मनसे पदाधिकाऱ्यांची प्रचार नियोजन बैठक संपन्न

पुणे-राजब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करतील व त्यांचे मताधिक्य वाढवे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील अशी ग्वाही मनसे चे नेते आणि पुणे लोकसभा प्रभारी राजेंद्र वागस्कर व मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली.
प्रचाराचे नियोजन करण्यासाठी भाजपा आणि मनसे च्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा चे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा संयोजक राजेश पांडे,लोकसभा प्रभारी श्रीनाथ भीमाले,महायुतीचे समन्वयक व प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर,पुणे शहर सरचिटणीस राजेंद्र शिळमकर, रवींद्र साळेगावकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे उपस्थित होते तर मनसे च्या वतीने नेते राजेंद्र वागस्कर, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे,प्रदेश सरचिटणीस गणेश सातपुते, प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे , योगेश खैरे प्रवक्ते मनसे इ पदाधिकारी उपस्थित होते.
मनसे ने महायुतीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याने निश्चितच आमची ताकद वाढली असून मुरलीधर मोहोळ हे मताधिक्याचा विक्रम करतील असा विश्वास वाटतो असे भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले. मनसे चे कार्यकर्ते दैनंदिन प्रचारात तर सहभागी होतीलच पण स्वतंत्रपणे शहर पातळीवर आणि विधानसभा निहाय मेळावे आयोजित करण्यात येतील असेही या बैठकीत ठरविण्यात आले.
मनसे च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी योग्य समन्वय राखला जाईल व प्रचाराच्या नियोजनात मनसे चा सहभाग असेल असे महायुती चे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

बारामती लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

पुणे, दि. १८: जिल्ह्यातील ३५- बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक म्हणून श्रीमती आनंधी पालानीस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-१०१ असा असून त्यांचा संपर्क क्रमांक ८९९९१५७६०९ असा आहे. तसेच निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी दिगंबर हौसारे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९३७०९०८२६२ असा आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून विजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-२०५ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९५२९१४८६१९ असा आहे. तसेच निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी गणेश सस्ते असून त्यांचा संपर्क क्रमांक ९८९०९४९५८७ असा आहे.

निवडणूक निरीक्षक बारामती लोकसभा मतदारसंघ यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे भेटण्याची वेळ दुपारी ३.३० वाजेपासून ते सायं. ५.३० वाजेपर्यंत आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
0000

विकसित भारताआधी भ्रष्टाचारमुक्त भारताची आवश्यकता

डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन; ‘२०४७ च्या भारतासाठी धोरणात्मक, वैज्ञानिक कृती’वर व्याख्यानजयंत सहस्रबुद्धे यांच्या जयंतीनिमित्त ‘जयंतस्मृति’मध्ये व्याख्यान व सुरेश नाईक लिखित पुस्तकाचे प्रकाशन 
पुणे : “भ्रष्टाचारमुक्त भारत हाच खऱ्या अर्थाने २०४७ मधील विकसित भारत असेल. तेव्हा ‘भारत’ आणि ‘इंडिया’, असा फरक नसेल. भारताने आधी भ्रष्टाचारमुक्त व्हावे, तरच विकसित भारत अर्थपूर्ण ठरेल”, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. सुशासन, लोकशाही मूल्यांची जपणूक, सुरक्षेची ग्वाही असेल, तेव्हाच भारत ‘लॅंड ऑफ आयडियाज’ पुरता मर्यादित न राहता ‘लॅंड ऑफ  अपॉर्च्युनिटीज’ बनेल, असेही डॉ. माशेलकर यांनी नमूद केले.
विज्ञान भारतीचे माजी राष्ट्रीय संघटन सचिव स्वर्गीय जयंत सहस्रबुद्धे यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जयंतस्मृति’ व्याख्यान व पुस्तक प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, विवेक प्रकाशन आणि विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने मयूर कॉलनीतील एमईएस सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे ‘२०४७ च्या भारतासाठी धोरणात्मक आणि वैज्ञानिक कृती’ यावर विशेष व्याख्यान झाले. तसेच यावेळी पश्चिम महाराष्ट्र विज्ञान भारतीचे माजी अध्यक्ष आणि इस्रोचे माजी समूह संचालक डॉ. सुरेश नाईक लिखित विवेक प्रकाशन प्रकाशित ‘इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा’ या वैज्ञानिक पुस्तकाचे प्रकाशनही झाले.
ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला होती. तसेच एमईएस नियामक मंडळ उपाध्यक्ष आनंदी पाटील, विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. योगेश शौचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, विवेक प्रकाशनाचे सहकार्यकारी संपादक दीपक जेवणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. यावेळी इंटर्नशिप पोस्टरचे विमोचनही झाले. पोस्टरविषयी डॉ. नंदिनी कोठारकर यांनी माहिती दिली. तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यातील विजेत्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा झाला.

डॉ. माशेलकर यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेकानेक उदाहरणे देत विकसित भारताची प्रतिमा श्रोत्यांसमोर उभी केली. ते म्हणाले, ‘तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून आपण उत्पन्नाच्या पातळीवरील असमानता दूर करू शकतो. आपल्या युवा पिढीने समाजातील तळागाळाच्या हिताचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपण धर्म, जात, भाषा, वंशाच्या नावावर विभाजित होत असल्याचे चित्र आहे. पण आपण प्रत्येकाने जातीमुक्त भारताचे स्वप्न पाहिले पाहिजे. स्वातंत्र्याच्या शताब्दीवर्षांतला भारत हा सुसंस्कृत, सुशिक्षित, सुरक्षित, समृद्ध आणि स्वानंदी असावा, असे मला वाटते’.

डॉ. भटकर यांनी जयंतराव सहस्रबुद्धे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘जयंतराव सर्वसामान्यांच्या सेवेसाठी समर्पित होते. त्यांची विज्ञानाकडे पाहण्याची दृष्टी निराळी होती. त्यांचे समाजासाठीचे योगदान अविस्मरणीय होते, त्यांनी दिलेली दृष्टी आणि दिशा पकडून आपण काम केले पाहिजे’, असे भटकर म्हणाले.
भूषण गोखले यांनी अध्यक्षीय समारोपात जयंतरावांचे स्मरण केले. डॉ. मानसी माळगावकर यांनी ऋणनिर्देश केला. डॉ. सुनील कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कीर्ती बडवे यांनी परिचय करून दिला. डॉ. योगेश शौचे यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. डॉ. कौस्तुभ साखऱे यांनी जयंतराव सहस्रबुद्धे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.

संशोधनासाठी मोठी गुंतवणूक गरजेची
विकासाच्या प्रक्रियेत देशातील विविध क्षेत्रातील संशोधनाचा महत्त्वाचा वाटा असतो. मात्र, आपल्याकडे अत्यल्प निधी संशोधनासाठी दिला जातो. आपल्या जीडीपीच्या दोन टक्के निधी आपण संशोधनासाठी दिला पाहिजे. त्यामुळे संशोधनातील गुंतवणूक वाढली पाहिजे आणि त्यासाठी सरकारप्रमाणेच उद्योगपतींनी योगदान दिले पाहिजे. विकसित होण्यासाठी संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे, असे डॉ. माशेलकर म्हणाले.

महिंद्रा ट्रॅक्टर्सने ४० लाख ट्रॅक्टर युनिट्सच्या विक्रीतून पार केला मैलाचा दगड

मुंबई१८ एप्रिल २०२४: महिंद्रा समूहाचा भाग आणि संख्येनुसार जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्रा ट्रॅक्टर्सने मार्च २०२४ मध्ये निर्यातीसह आपल्या ब्रँडच्या ४० लाखाव्या ट्रॅक्टरची  विक्री करून एक महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. महिंद्र ट्रॅक्टर्ससाठीचे महिंद्राचे सर्वात नवीन ट्रॅक्टर सुविधा केंद्र आणि जागतिक उत्पादन केंद्र असलेल्या महिंद्राच्या झहीराबाद केंद्रातून महिंद्राच्या अत्याधुनिक युवो ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मवर आधारित महिंद्रा युवो टेक प्लसने हा मैलाचा दगड पार केला.

महिंद्रा ट्रॅक्टर्सने १९६३ मध्ये यू.एस.च्या इंटरनॅशनल हार्वेस्टर इंक. सह भागीदारीद्वारे पहिला ट्रॅक्टर आणल्यानंतर, २००४ मध्ये १० लाख युनिट उत्पादनाचा टप्पा ओलांडला आणि त्यानंतर २००९ मध्ये संख्येनुसार जगातील सर्वाधिक विक्री करणारे फार्म ट्रॅक्टर उत्पादक म्हणून नाव कमावले. ९ वर्षांनंतर २०१३ मध्ये, महिंद्राने २० लाख युनिट उत्पादनाचा टप्पा गाठला आणि त्यानंतर २०१९ मध्ये ३० लाख युनिट उत्पादनाचा टप्पा गाठला. फक्त ५ वर्षांनी आर्थिक वर्ष २४ मध्ये, महिंद्रा ट्रॅक्टर्सने दैदीप्यमान कामगिरी करत ४० लाखाव्या ट्रॅक्टरची विक्री केली. संपूर्ण आर्थिक वर्षात, महिंद्रा ट्रॅक्टर ब्रँडने २ लाखांहून अधिक युनिट्सची जोरदार विक्री देखील केली.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले, “परिवर्तनात्मक शेती आणि जीवन समृद्ध करण्याच्या आमच्या उद्देशाने प्रेरित होऊन आम्हाला ४० लाखावा महिंद्रा ट्रॅक्टर विकताना खूप अभिमान वाटत आहे. याचे कारण गेली अनेक दशके आम्ही या क्षेत्रात अग्रणी असून महिंद्राची ट्रॅक्टरची यशस्वी ६० वर्षेही यंदा साजरी करत आहोत. या सर्व महत्वपूर्ण कामगिरीच्या पार्श्वभूमीवर मी आम्हाला दररोज प्रेरणा देणाऱ्या आमच्या ग्राहकांचे, शेतकरी, तसेच आमच्या भागीदारांचे आणि आमच्या टीमचे मनापासून आभार मानू इच्छितो. आम्ही सर्वांनीच परिवर्तनाचा प्रवास एकत्रपणे सुरू केला आहे.”


महिंद्रा ट्रॅक्टर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम वाघ म्हणाले, “महिंद्रा फार्म डिव्हिजनमध्ये आमच्यासाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. ४० लाख ट्रॅक्टर डिलिव्हरीमधून आमच्या ब्रँड उद्देशावर असलेला ग्राहकांचा विश्वास तसेच भारतीय शेतीबद्दलची आमची सखोल समज दिसून येते. गेली  वर्ष विलक्षण होती. या काळात आम्ही सर्वात जलद दहा लाखांचा टप्पा पूर्ण केला. शेतकऱ्यांना प्रगतीसाठी आम्ही सक्षम करत असताना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि अतुलनीय विश्वासार्हता पुरवताना विस्तृत ट्रॅक्टर पोर्टफोलिओच्या सहाय्याने आम्ही आमच्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करत राहू.”

गेल्या ६० वर्षांच्या कालावधीत महिंद्राने ३९० पेक्षा जास्त ट्रॅक्टर मॉडेल्सच्या विविध श्रेणींचा समावेश करण्यासाठी आपल्या योजनांचा विस्तार केला आहे. या कालावधीत महिंद्रा ट्रॅक्टर्सनेही संपूर्ण भारतभर १२०० पेक्षा जास्त डीलर भागीदारांचे मजबूत नेटवर्क उभारले आहे. ग्राहक प्रथम दृष्टीकोनामुळे ब्रँडला विक्री, सेवा आणि सुट्या भागांचे अनेकविध स्तर पुरविण्यास सक्षम केले असून महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या ४० लाख ग्राहकांचा पाया विस्तारत आहे. 

महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या ४० लाख ग्राहकांचे कौतुक करण्यासाठी, कंपनीने ‘४० लाख आनंदी ग्राहक आणि ६० वर्षांचा ब्रँड विश्वास’ हे शीर्षक असलेले नवीन डिजिटल व्हिडिओ कमर्शियल (DVC) सादर केले असून देशभरात आपली उत्पादने आणि सेवांवर नवनवीन ऑफर्स आणत आहे. ही जाहिरात मोहीम समृद्धीचे प्रतीक असलेल्या आणि महिंद्रा ट्रॅक्टर्सशी जुळणाऱ्या ‘लाल’ रंगाभोवती फिरते.


नवीन महिंद्रा ट्रॅक्टर डिव्हीसी पाहण्यासाठी येथे क्लिक करा:     (https://www.youtube.com/watch?v=y_76wOT94n0)

सहा खंडांमधील ५० पेक्षा जास्त देशांमध्ये आपला ठसा उमटवून यूएस ही महिंद्रा ट्रॅक्टर्सची भारताबाहेरील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. नुकतेच ग्लोबल लाइट वेट ट्रॅक्टर प्लॅटफॉर्म OJA चे अनावरण झाले. जपानच्या मित्सुबिशी महिंद्रा ॲग्रीकल्चर मशिनरीच्या सहकार्याने महिंद्राने अलीकडेच यू.एस. मध्ये OJA ची विक्री सुरू केली. OJA सह महिंद्रा ट्रॅक्टर्स २०२४ मध्ये थायलंडमध्ये सुरू होणाऱ्या आसियानमध्ये आणि त्यानंतर जागतिक ट्रॅक्टर बाजारात अग्रगण्य ट्रॅक्टर ब्रँड म्हणून महिंद्रा ट्रॅक्टर्सला आपले स्थान मजबूत करण्यास सक्षम करत २०२५ मध्ये युरोप मध्ये पदार्पण करेल.

उष्णतेच्या लाटेत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण, महापारेषणची उच्चस्तरीय बैठक

वीजपुरवठ्यातील व्यत्यय टाळण्यासाठी तांत्रिक कामे सुरू

पुणे, दि१८ एप्रिल २०२४: यंदाच्या उन्हाळ्यातील उष्णतेची प्रचंड लाट सध्या सुरू असल्याने विजेच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोबतच वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसत आहे. या परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गुरूवारी (दि. १८) महावितरण व महापारेषणच्या पुणे परिमंडलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय बैठक झाली. तीत प्रामुख्याने लोणीकंद ४०० केव्ही, एनसीएल २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रावरील वीजभार विभाजित करून तो अन्यत्र वळवणे तसेच पारेषणच्या काही उपकेंद्रातून २२ केव्हीच्या नवीन वितरण वीजवाहिन्यांसाठी उपाययोजना आदी तांत्रिक कामांचे निर्णय घेण्यात आले व त्यासंदर्भात युद्धपातळीवर कामेही सुरू करण्यात आली.

रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात झालेल्या या बैठकीमध्ये मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (महावितरण) व श्री. अनिल कोलप (महापारेषण) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुणे परिमंडलातील सर्वच १२ विभागनिहाय पारेषण व वितरण यंत्रणेचा आढावा घेण्यात आला व त्यानुसार तांत्रिक उपाययोजनांचे निर्णय घेत भारव्यवस्थापनेतून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विभागपातळीवर २४x७ समन्वय ठेवण्याचे निर्देश कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.

पुणे परिमंडलामध्ये सुमारे ३१०० मेगावॅट विजेची मागणी आहे. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. पर्यायाने विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महापारेषणच्या काही अतिउच्चदाबाचे उपकेंद्र व वीजवाहिन्यांवर ताण येत आहे. पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘एलटीएस’ (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित होत असल्यामुळे नाईलाजाने काही ठिकाणी वीजपुरवठा बंद ठेवावा लागत आहे. यासोबतच अवकाळी वादळी पाऊस व गारपिट यामुळेही पारेषण व वितरण यंत्रणेवर परिणाम होत आहे.

या पार्श्वभूमिवर पुणे परिमंडलातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापारेषणच्या लोणीकंद ४०० केव्ही उपकेंद्रातील काठापूर व आळेफाटा २२ केव्ही वीजवाहिन्यांचा भार हा बाभळेश्वर ४०० केव्ही उपकेंद्रावर देण्याचा निर्णय झाला. शुक्रवारी (दि. १९) रात्री उशिरा हे काम पूर्ण होईल. या उपायामुळे लोणीकंदवरील वीजभार कमी झाल्यामुळे मंचर विभागातील प्रामुख्याने शेतीपंपांसह इतर सर्व ग्राहकांना सुरळीत वीज उपलब्ध होईल. तसेच चाकण व तळेगाव अतिउच्चदाब वीजवाहिन्यांना फायदा होणार आहे. तसेच गणेशखिंड येथील एनसीएल १३२ केव्ही उपकेंद्रातील काही वीजभार फ्लॅगशिप २२० केव्ही उपकेंद्राकडे वळविण्यात येत आहे. यासोबतच राजगुरुनगर विभागातील तळेगाव, कामशेत, पवना येथील वीजवाहिन्यांना खोपोलीवरून वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

या बैठकीमध्ये महापारेषणच्या विविध उपकेंद्रांमध्ये महावितरणच्या नवीन २२ केव्ही वीजवाहिन्या कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक उपाययोजना करणे आणि पर्यायाने अस्तित्वात असलेल्या वीजवाहिन्यांवरील भार कमी करणे याबाबतचे नियोजन प्रस्तावित करण्यात आले. त्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू करण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व श्री. अनिल कोलप यांनी दिले. यावेळी महापारेषण व महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, युवराज जरग, विठ्ठल भूजबळ, जयंत कुलकर्णी, अमित कुलकर्णी तसेच कार्यकारी अभियंत्यांची उपस्थिती होती.

सोलापुरमध्ये प्रणिती शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल.

मुंबई, दि. १८ एप्रिल
नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सर्व पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपात घेणारे मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी सर्व समाज घटकांच्या समस्या, वेदना, दुःख जाणून घेतले व त्यांना प्रचंड जनसमर्थनही लाभले आहे. नरेंद्र मोदी हे फेल झालेले इंजिन असून राहुल गांधींचे इंजिनच देशाला प्रगतीपथावर घेऊन जाईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.


सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेवारी अर्ज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भरला, त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने राज्यातील घरे फोडून संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी-शहा यांना खूश करण्यासाठी एकनाथ शिंदे व अजित पवार हे राहुल गांधी यांच्यावर टीका करतात पण त्याचा काही फरक पडणार नाही. सोलापुरच्या विकासात भाजपा हा मोठा अडसर ठरला आहे, हा अडसर लोकसभा निवडणुकीत दूर करा, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले.
या सभेला संबोधित करताना माकप नेते नरसय्या आडम यांनी भाजपवर जोरदार निशाना साधला, रे नगर वसाहतीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. मात्र या योजनेची सुरवातच २०१३ मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून झाल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. भाजप सरकारने निधी दिला म्हणजे काय त्यांनी त्यांच्या खिशातून दिला का? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला.
आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहीर सभा पार पडली व त्यानंतर भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजपने १० वर्षात विश्वासाने सोलापुरकरांचा वापर करून मतदान घेतले आणि सत्तेची मजा घेतली आणि लोकांना गरज असताना त्यांच्याकडे पाठ फिरवली. ही लढाई आपल्या सगळ्यांची असून निवडणुकीत भाजपाला जागा दाखवून द्या. सोलापूरला विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर आणण्यासाठी या लढाईत विजयी होण्यासाठी आर्शीवाद द्यावा, असे आवाहन प्रणिती शिंदेंनी केले.

उमेदवारी अर्ज भरताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उज्वलाताई शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, धर्मराज काडादी, भगिरथ भालके, माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे, सुधीर खरटमल, महेश गादेकर, विश्वनाथ चाकोते, शिवसेना ठाकरे गटाचे नेते पुरुषोत्तम बरडे, उत्तम प्रकाश खंदारे, उपनेते शरद कोळी, अस्मिता गायकवाड, अजय दासरी, गणेश वानकर, यु. एन. बेरिया, अमर पाटील, भारत जाधव, प्रमोद गायकवाड, तौफिक शेख, एम एच शेख, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम. पाटील, शहर अध्यक्ष निखिल किरनाळे, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे आदी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्तेचा उन्माद काय असतो हे भाजपने दाखवून दिलं-शरद पवार

पुणे-सत्तेचा उन्माद काय असतो हे राज्यकर्त्यांनी दाखवून दिलं असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर टीका केली आहे . त्यासोबतच मोदी सरकार गेली १० वर्षे जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शरद पवार म्हणाले की, आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, महिलांची सुरक्षितता याबाबत केलेली वक्तव्य आणि वस्तुस्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे, असं म्हणत शरद पवारांनी थेट विरोधकांवर निशाणा साधला.

महाविकास आघाडीच्या बारामती, शिरुर आणि पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुप्रिया सुळे (SunetraPawar), रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि अमोल कोल्हे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी मोठ शक्तीप्रदर्शन आणि सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शरद पवारांनी विरोधकांवर सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलाच हल्लाबोल केला. या सभेला पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. पुण्यातील महाविकास आघाडीचे सगळे स्थानिक नेते उपस्थित होते. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मोदी 2014 सत्तेत आले. त्यावेळी पेट्रोल चे भाव 71 रुपये दिले. मोदी म्हणाले पन्नास दिवसांत पेट्रोलचे भाव कमी करतो . आज 3 हजार 650 दिवस झाले, आज दर 106 रुपये झाले. घरगुती गॅस बाबत मोदी म्हणाले, 410 रुपयांवरून कमी करणार. आता 1 हजार 160 रुपये झाला. मोदी तरुण मुलांना रोजगार देणार होते. प्रत्येक वर्षी दोन लाख रोजगार देणार होते, उलट रोजगार टक्का घसरला. आज 86 टक्के तरुण बेरोजगार आहेत. याचा अर्थ शब्द द्यायचा आणि तो फिरवायचा. त्यामुळं जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही, हा ठाम निर्णय घेतला पाहिजेतिन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पृथ्वीराज चव्हाण,जयंत पाटील, मोहन जोशी,रमेश बागवेसुषमा अंधारे, प्रशांत जगताप, होळकरांचे वंशज, सचिन आहिर आणि मविआचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तिन्ही उमेदवारांनी सरकारवर हल्लाबोल केला आणि मतदानाचं आवाहन केलं.बारामतीतील विकास मीच केलाय, म्हणणाऱ्या अजित पवारांना कार्य अहवाल पाठवणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे . ….तर, मी शारदाबाई पवारांची नात असल्याचे सांगत दादा-वहिनींना टोलाही सुळे यांनी लगावला.मी दहा वर्षे निधी आणला नाही,असे ते म्हणु लागलेत, त्यांना माझा कार्य अहवाल मी चांगलं पॅकिंग करून पाठवणार आहे. तो अहवाल मराठीतही आहे, असा टोलाही अजित पवारांना लगावला. तसेच, त्यांनी माझा कार्य अहवाल वाचला तर ते मलाचं मतदान करतील. तसेच, मला म्हणतात हे रडत बसतील. पण, लक्षात ठेवा, शारदाबाई पवारांची नात आहे मी,रडणारी नाही. मला लढायला शिकवलं आहे, लढणारी आहेअशा शब्दात सुप्रिया सुळेंनी दादा वहिनींना टोला लगावला.मी नशिबवान आहे, मला तुतारी हे चिन्ह मिळालं. तुतारी सर्व शुभकार्यासाठी असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हाही तुतारीच वाजली होती. आपल्याला ही तुतारी रविंद्र धंगेकर यांच्याहाती द्यायची आहे. शाहू-फुले-आंबेडकर, जितेगा धंगेकर.. अशी घोषणाही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिली. आमच्या एका हातात तुतारी आणि दुसऱ्या हाती मशाल आहे. रामकृष्ण हरी अन् वाजवा तुतारी.. अशी घोषणाही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिली.मोदी भारताची अर्थ व्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे, असं म्हणतात. मात्र, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना विकासाची गती जशी होती, तशीच कायम राहिली असती तर आज आपण तिसऱ्या क्रमांकावर असतो. हे मी नव्हे तर देशातील नामांकित संस्थांचा अहवाल सांगतो, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. तसेच, विकसित भारत हे स्वप्न 2047 पर्यंत शक्य नाही. याला मोदींची धोरणं कारणीभूत ठरली आहेत. मोदी फक्त गोलगोल फिरवतात. मात्र, विकासाची व्याख्या सांगत नाहीत. मोदी फक्त फोटो झळकवतात. 48 ठिकाणी त्यांचे फोटो झळकवले आहेत. त्यांना भीती आहे, आपला फोटो जनतेसमोर नसेल तर जनता आपल्याला विसरून जातील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

गीत रामायणातील सलग ५६ गीत सादरीकरणाचा पुण्यात ‘हटके’ कार्यक्रम शनिवारी

तब्बल २५ हून अधिक कलाकारांचे सलग ९ तास सादरीकरण
पुणे : गीतरामायणाचा सांगितिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न आजही अनेकजण करत आहेत. त्यामुळे हटके म्युझिक ग्रुपच्या वतीने देखील पुण्यात एक अनोखा प्रयोग होत आहे. एकाच व्यासपीठावर एकाच दिवशी गीत रामायणातील ५६ गीतांचे तब्बल २५ हून अधिक कलाकार सलग ९ तास सादरीकरण करणार आहेत. सदाशिव पेठेतील रेणुका स्वरूप शाळेमागील म. ए. सो भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात शनिवार, दिनांक २० एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत ‘ संपूर्ण दिवस गीतरामायणाचा’ हा कार्यक्रम होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती हटके म्युझिक ग्रुपचे संस्थापक शिरीष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला माधव धायगुडे, सुमेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

शिरीष कुलकर्णी म्हणाले, आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर आणि गानश्रेष्ठ बाबूजी उर्फ सुधीर फडके यांची अजरामर कलाकृती म्हणजे गीतरामायण. त्यामुळे गीत रामायणाचा वसा जपण्यासाठी हा अनोखा कार्यक्रम करण्यात येत आहे. सुरुवातीपासूनच हटके ग्रुपला प्रत्येक वेळी काहीतरी वेगळे व नावीन्यपूर्ण करण्याची इच्छा होती. त्यानुसार या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

माधव धायगुडे म्हणाले, कार्यक्रम चार सत्रांमध्ये होणार असून सकाळी ९ वाजता उद्घाटन होणार आहे. यावेळी गदिमा यांच्या सुकन्या कल्पलता अंतरकर आणि सुपुत्र आनंद माडगुळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शाळेच्या आवारात विविध प्रकारची पुस्तके व इतर वस्तूंचे स्टॉल देखील रसिकांसाठी उपलब्ध असणार आहेत.

गीत रामायणातील निवडक गाण्यांचे कार्यक्रम अनेक ठिकाणी होतात. मात्र एक सलग ५६ गीते सादर करण्याचे शिवधनुष्य हटके ग्रुपने पेलले आहे. याकरिता मागील सहा महिन्यांपासून तयारी सुरू आहे. सादरीकरण करणारे कलाकार हे हौशी कलाकार असून विविध क्षेत्रात नोकरी व्यवसायात कार्यरत आहेत. गदिमा आणि बाबूजींनी दिलेला सांगीतिक वारसा जपण्याकरिता तसेच हा अनमोल ठेवा रसिकांसमोर आणण्याकरिता कलाकारांचा हा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम विनामूल्य खुला असून पुणेकरांनी या कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हटके म्युझिक ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.

आचारसंहितेचा भंग करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा: अतुल लोंढे

शिवसेनेच्या जाहीरातींना बेकायदेशीर परवानगी देणाऱ्या एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा.

मुंबई, दि. १८ एप्रिल
लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे व त्याबाबतची रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहीरातबाजी करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

राज्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात अतुल लोंढे म्हणतात की, निवडणूक आयोगाच्या पत्र क्र. 437/6/INST/2015-CCS दि 29.12.2015 नुसार, निवडणूक प्रचारासाठी सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमांच्या मालमत्तांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे, अशा आशयाचे पत्र सर्व राज्यांचे कॅबिनेट सचिव, मुख्य सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उद्देशून पाठवलेले आहे. बंदी असतानाही एसटीच्या अधिकाऱ्यांनी 1000 हून अधिक बसेस शिवसेना उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी अवैधपणे वापरास परवानगी दिली आहे. एसटी महामंडळाच्या या बसेसवर शिवसेना बॅनर लावून निवडणूक प्रचार करत आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो आणि शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह स्पष्टपणे दाखवण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे हे कृत्य केवळ आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन करत नाही तर निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षता आणि अखंडतेला बाधा आणणारे आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

पराभव समोर दिसू लागल्याने महायुतीकडून वैयक्तिक टीका – डॉ. अमोल कोल्हे

पुणे : धोरणात्मक मुद्दे नसल्याने महायुतीच्या नेत्यांकडून वैयक्तीक टीका केली जात असल्याच वक्तव्य महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं.

महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट आघडी लोकसभा निवडणूक 2014 च्या अधिकृत उमेदवारांची प्रचार शुभारंभ सभा आज पुण्यात पार पडली. या सभेपुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शांताई हॉटेल समोर महाविकास आघाडीतील तिन्ही उमेदवारांसाठी प्रचारची शुभारंभ सभा घेण्यात आली.

जेष्ठ नेते शरदरचंद्रजी पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात,मोहन जोशी, या सभेला बारामती आणि पुणे लोकसभेचे उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, विश्वजित कदम, संग्राम थोपटे, संजय जगताप, शिवसेनेचेसुषमा अंधारे, सचिन आहेर,  आपचे नेते अजित पाटील,भूषणसिंहराजे गजेंद्रसिंहराजे होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अमोल कोल्हे पुढे म्हणाले, प्रचाराची दुसरी आणि तिसरी फेरी सुरू असताना देशातील आणि राज्यातील जनतेचे ठरले की, स्वाभिमानाने तुतारी फुक्याची आणि मशाल पेटवायची. पण मला धोरणात्मक मुद्दे नसल्याने महायुतीच्या नेत्यांकडून वैयक्तीक टीका केली जात आहे.

मला नटसम्राट म्हणले जाते, कार्य सम्राट परवडतो पण खोके सम्राट ,पलटी सम्राट चालत नाही. कचाकचा बटन दाबा तुम्हाला हवा तेवढा निधी देतोझ या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचाही डॉ. कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतला. लोकशाहीची थट्टा करता का सवाल करत , तुम्ही जो निधी देणार म्हणून सांगता तो तुमचा नाही तर जनतेचा पैसा आहे. स्वतःची मालकी असल्या सारखे वागत असाल तर हा कर त्याच दोन टक्के लोकांकडून घेत जावा. सत्तेची मस्ती, गुर्मी कोठून येते असा थेट सवाल ही डॉ. कोल्हे यांनी केलाय.

भगवा ध्वज नाचवत खासदार बारणे यांचा श्रीराम नवमी शोभायात्रांमध्ये सहभाग

चिंचवड, दि 18 एप्रिल – श्रीराम नवमी जन्मोत्सवानिमित्त शहरात काढण्यात आलेल्या विविध शोभायात्रांमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे काल (बुधवारी) रात्री सहभागी झाले. कासारवाडी येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने आयोजित शोभायात्रेत भगवा झेंडा नाचवत जल्लोषही केला.

संभाजीनगर येथील ओम साई राम मंदिरात खासदार बारणे यांच्या हस्ते महाआरती झाली. श्रीमंत जगद्गुरु साईबाबा प्रतिष्ठान व कुशाग्र कदम युथ फाऊंडेशन यांच्यावतीने यावेळी खासदार बारणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल, कविता बहल, नारायण बहिरवाडे, अमित गोरखे, अनुराधा गोरखे, वैशाली काळभोर, प्रसाद शेट्टी, कुशाग्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार बारणे यांच्या हस्ते यावेळी महाप्रसादाचेही प्रातिनिधिक वाटप करण्यात आले.

शाहूनगर येथे श्री साई मित्र मंडळ व श्री साई मंदिर देवस्थान ट्रस्टच्या श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळ्यातही खासदार बारणे सहभागी झाले. त्यावेळी अमित गोरखे, नारायण बहिरवाडे, महेश चांदगुडे, सुप्रिया चांदगुडे, अनुराधा गोरखे, निलेश वांजरे, अध्यक्ष बापू शिंदे, चंद्रकांत नेवसे, अनिल मुळे, रामदास गाढवे आदी उपस्थित होते.

राजेश आरसूळ यांच्या पुढाकाराने आयोजित अखिल वेताळनगर रामनवमी उत्सव समिती, चिंचवडगावातील श्री मयुरेश्वर मित्र मंडळ, अखिल चिंचवडेनगर रामनवमी उत्सव तसेच कासारवाडी येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल आयोजित शोभायात्रांमध्ये खासदार बारणे सहभागी झाले.

‘जो राम को लाये है, हम उनको लायेंगे’ ‘अयोध्या तो झांकी है, काशी- मथुरा बाकी है’ च्या घोषणांनी परिसर दणदणून गेला होता. स्वतः खासदार बारणे हातात भगवा झेंडा घेऊन शोभायात्रेतील जल्लोषात सहभागी झाले.

काळेवाडी रहाटणीत भेटीगाठी

काळेवाडी येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संगीता कोकणे यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी भेट दिली. कोकणेनगर येथील श्री भाग्यवंती देवी मंदिरात जाऊन बारणे यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी पुजारी दादा पाटील व सिद्धाराम माले पाटील यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.

माजी नगरसेविका ज्योती भारती, विनोद नढे, सागर नढे, पीसीएमटीचे माजी सभापती प्रकाश मलशेट्टी, अरुण तांबे, बापूसाहेब जाधव, युवा महाराष्ट्र केसरी पैलवान किशोर नखाते यांच्या निवासस्थानी बारणे यांनी भेट दिली. सर्वांनी बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

खासदार बारणे यांच्या समवेत प्रदीप दळवी, शरद राणे, दिलीप कुसाळकर, अंकुश कोळेकर आदी पदाधिकारी होते.