पुणे-भारतात आजच्या घडीला १७६.४ मिलियन टन दुधाचे उत्पादन केले जाते. देशातील पशुपालन आणि दुग्ध व्यवसायात कार्यरत महिलांचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गुरांना चारा घालणे, दूध काढणे, दुधाची विक्री या कामांमध्ये महिलांचे योगदान लक्षणीय आहे. महिला सक्षमीकरणाचे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेऊन टाटा पॉवरने पुण्यातील मावळ येथे मावळ डेअरी फार्मर सर्व्हिसेस प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या स्थापनेत सहयोग दिला आहे. हा महाराष्ट्रातील पहिला संपूर्णपणे महिलांनी चालविलेला दुग्ध व्यवसाय आहे. हा महाराष्ट्रातील पहिला संपूर्णपणे महिलांनी चालविलेला दुग्ध व्यवसाय आहे.
यावेळी मावळचे माननीय खासदार श्री. श्रीरंग बारणे, माननीय आमदार श्री. सुनील शेळके आणि टाटा पॉवरचे सीईओ व एमडी श्री प्रवीर सिन्हा उपस्थित होते. या दुग्ध व्यवसायातून बनविलेल्या उत्पादनांच्या विक्रीला चालना देण्यासाठी ‘क्रेयो’ (Creyo) या ब्रँड नावाने थेट मुंबई व पुण्यातील ग्राहकांना देखील ही उत्पादने केवळ एक बटन क्लिक करून उपलब्ध करवून दिली जात आहेत.
२०१५ साली फक्त ३३४ सदस्यांपासून या डेअरीची सुरुवात झाली आणि आज यामध्ये सदस्यसंख्या १२०० वर जाऊन पोहोचली आहे. या दुग्ध व्यवसायामुळे सर्वसामान्य शेतकरी ते अभिमान व आत्मविश्वासाने कार्यरत असलेल्या कृषी उद्योजिका असा मोठा टप्पा या महिलांनी पार केला आहे. हा प्रकल्प संपूर्णपणे महिलाच चालवत असल्यामुळे याठिकाणी त्यांना महत्त्वाच्या पदांवर नेतृत्व भूमिका बजावण्याची संधी मिळत आहे.
स्थानिक महिला व टाटा पॉवर यांच्या दरम्यान सहयोगाच्या माध्यमातून हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आला. दुग्ध प्रकल्पाच्या विकासाच्या व्यवहार्यतेबाबत करण्यात आलेल्या सखोल संशोधनातून मावळ डेअरी फार्मर सर्व्हिसेस प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची स्थापना करण्यात आली. महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
या प्रकल्पाने १५ आधुनिक सुसज्जित दूध संकलन केंद्रे विकसित केली असून त्यामध्ये २६ गावांना समाविष्ट करून घेण्यात आले आहे. प्रकल्पाच्या संचालनात व व्यवहारांमध्ये संपूर्ण पारदर्शकता ठेवली जाते, संबंधित स्थानिक व दुग्ध शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची वास्तविक किंमत पुरेपूर मिळते. सध्या या प्रकल्पात विविध गावांमधून जवळपास ६००० लिटर दूध दर दिवशी जमा केले जाते.
टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, “स्थानिकांना स्वयंपूर्ण होण्यात मदत करण्यासाठी टाटा पॉवरतर्फे केल्या जात असलेल्या प्रयत्नांमधून मावळ डेअरी प्रकल्प उभा राहिला आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय स्थानिक महिलांना जाते, त्यांनी आपले भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी सहकाराचा मार्ग निवडला आणि आज त्या स्वतः स्वयंपूर्णतेचे आदर्श उदाहरण बनल्या आहेत. मावळचे शेतकरी आणि टाटा पॉवरची शाश्वत उद्धिष्टांप्रतीची वचनबद्धता यांच्या मधला दुवा बनल्याबद्दल मी आमचे सहयोगी एएलसी इंडिया यांचे आभार मानतो.”
टाटा पॉवरचे हायड्रोज विभागाचे हेड श्री. अश्विन जी पाटील यांनी सांगितले, “आजवर भारतात दुग्ध सहकार उद्योगात पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे. पण आता यामध्ये प्रगतिशील परिवर्तन घडून येत आहे. या व्यवसायात महिलांची भूमिका गुरांची काळजी घेणे, त्यांना चारा पाणी देणे, दूध काढणे इतपत मर्यादित होती. पण आता त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारत असल्यामुळे दुग्ध सहकाराची चळवळ अधिक मजबूत झाली आहे.”
ते पुढे म्हणाले, “ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना प्रकल्पाच्या संपूर्ण संचालन व व्यवस्थापनाचा मंच उपलब्ध करवून देण्यासाठी आम्ही हा प्रकल्प सुरु केला आहे. महिला दुग्ध शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी टाटा पॉवरने ‘लघु स्वरूपाच्या दुग्ध व्यवसायाचे‘ प्रशिक्षण देणारे सर्टिफिकेशन प्रोग्रॅम्स तसेच ‘शुद्ध दूध उत्पादन आणि पशु व्यवस्थापन‘ याची ओळख करून देणारे प्रशिक्षण आयोजित केले.”
दूध संकलनात उत्तरोत्तर वाढ व्हावी आणि डेअरीमध्ये नवनवीन सदस्य सामील व्हावेत यासाठी टाटा पॉवरतर्फे आजूबाजूच्या भागांमध्ये सर्वेक्षण करून मावळ भागातील लोकांच्या नेमक्या गरजा समजून घेतल्या जात आहेत. प्रकल्प सुरळीतपणे चालावा यासाठी १५ नवीन गावांना यामध्ये समाविष्ट करवून घेण्यात आले आहे. गेल्या चार वर्षात ३००० शेतकरी कुटुंबांचा समावेश असलेल्या पशुपालन व्यवसायातील स्थानिकांना इतर पूरक सेवा देखील पुरविण्यात आल्या आहेत. यामध्ये मिनी डेअरी फार्म्स, पशुवैद्यकांच्या सेवा, डेअरी फार्मच्या व्यवस्थापनाचे तसेच उत्पादनाच्या मार्केटिंगचे प्रशिक्षण इत्यादींचा समावेश आहे.
प्रकल्पाला चालना देण्याच्या दृष्टीने या डेअरीमधून मुंबई आणि पुण्यासारख्या मोठमोठ्या शहरांना दूधपुरवठा केला जाण्याबरोबरीनेच पनीर, क्रीम, लोणी अशी उच्च दर्जाची उत्पादने देखील तयार केली जातील.