पुणे-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने व्यापक तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व परिमंडळ व क्षेत्रीय कार्यालयांचा आढावा घेण्यात आला.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची तसेच गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने शहरातील प्रमुख रस्ते सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्याच्या दृष्टीने पथ विभागामार्फत विविध कामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामध्ये रस्त्यांवरील खड्डे भरणे, चेंबर दुरुस्ती, फुटपाथ दुरुस्ती, रिइन्स्टेटमेंटची कामे तसेच आवश्यक डागडुजी यांचा समावेश आहे.
शहरातील १२ मीटर व १८ मीटर रुंदीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून आढळून येणारे खड्डे व रस्त्यांशी संबंधित त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले. गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांना सुरक्षित व सुकर वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच, सर्व परिमंडळ उपायुक्त व क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची पाहणी करून खड्डेमुक्त गणेशोत्सव सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.
यावेळी आढावा बैठकीस मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, उपायुक्त विजयकुमार थोरात, उपायुक्त अरविंद माळी, उपायुक्त आशा राऊत तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


