एकवीरा मातेच्या चरणी प्रार्थना; राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा
वेहेरगाव, ता. मावळ, दि. १६ ऑक्टोबर २०२६ : एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना ऊन व पावसापासून संरक्षण मिळावे, यासाठी मंदिराच्या पायथ्याशी निवारा शेड उभारण्याच्या कामाकरिता आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत १२ लाख रुपयांच्या निधीची तरतुद केल्याचे शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या व माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केले .
डॉ. गोऱ्हे यांनी आज एकवीरा देवीचे दर्शन घेतले. राज्यातील दुष्काळाचे संकट दूर व्हावे, शेतकरी व कष्टकरी कुटुंबांना दिलासा मिळावा आणि सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना त्यांनी देवीच्या चरणी केली.
शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख श्री. राजेश शशिकांत खांडभोर यांनी दिनांक २४ जून २०२६ रोजी दिलेल्या निवेदनातून या निवारा शेडची मागणी केली होती. त्यानुसार सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून या कामासाठी निधीची शिफारस करण्यात आली आहे. निधी हस्तांतरणाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाला गती देऊन आगामी चैत्र यात्रेपूर्वी निवारा शेड उभारावे, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी सरपंच व संबंधितांना केले. काम पूर्ण झाल्यानंतर त्याची छायाचित्रे कार्यालयाला पाठवावीत, असेही त्यांनी सांगितले.
“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने भाविकांच्या सुविधेसाठी हा आमदार निधी एकवीरा मातेच्या चरणी अर्पण करत आहे,” अशी भावना डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
या निर्णयाचे स्थानिक ग्रामस्थ आणि वेहेरगाव व्यापारी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. भाविकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधेच्या उभारणीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल उपस्थितांनी डॉ. गोऱ्हे यांचे आभार मानले.

