स्व. बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह रखडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभाग आक्रमक; खर्चवाढ, विलंब आणि उद्घाटनाच्या तारखेबाबत प्रशासनाला थेट सवाल
पुणे : पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असलेले स्व. बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह तब्बल ११ वर्षांपासून रखडल्याने कलाकार, रंगकर्मी आणि नाट्यरसिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रकल्पाच्या उद्घाटनाची निश्चित तारीख जाहीर करण्याऐवजी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाने केला आहे.
या प्रश्नावर आता अधिक व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी कोथरूड येथील यशवंत चव्हाण नाट्यगृह परिसरात नियोजित बेमुदत उपोषणाबाबत स्थानिक राजकीय दबावातून पोलिसांच्या माध्यमातून समज देऊन आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आंदोलन रोखून मूळ प्रश्न संपणार नसल्याचे विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाला थेट सवाल
बालनाट्यगृहाचा प्रश्न गेल्या ११ वर्षांपासून प्रलंबित असताना प्रशासनाने अद्याप उद्घाटनाची निश्चित तारीख का जाहीर केलेली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या वाढलेल्या खर्चाचा हिशोब कोण देणार? विलंबाला नेमके कोण जबाबदार? आणि हे प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का, असे थेट प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केले आहेत.
विभागाच्या म्हणण्यानुसार, सन २०१४ पासून रखडलेल्या या प्रकल्पाचा खर्च सुमारे २ कोटी रुपयांवरून २९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतरही सुमारे ६८.९५ लाख रुपयांच्या नव्या कामासाठी निविदा काढण्याची गरज का निर्माण झाली, याचा स्पष्ट खुलासा प्रशासनाने जनतेसमोर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रकल्पाला वारंवार मुदतवाढ का देण्यात आली? कंत्राटदारांना किती वेळा आणि कोणत्या कारणांसाठी मुदतवाढ देण्यात आली? विलंबासाठी जबाबदार व्यक्ती किंवा यंत्रणांवर काही कारवाई झाली का? विलंबामुळे वाढलेल्या आर्थिक भाराची जबाबदारी कोणाची? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नसल्याचा आरोप विभागाने केला आहे.
हा केवळ राजकीय विषय नाही : कलाकारांचा प्रश्न
स्व. बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा विषय नसून पुण्यातील कलाकार, बालरंगभूमी, रंगकर्मी आणि संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्राच्या भवितव्याशी निगडित प्रश्न असल्याचे बाबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.
“आंदोलन तात्पुरते थांबवता येईल; मात्र कलाकारांचा आवाज आणि जनतेचा जाब विचारण्याचा अधिकार दाबता येणार नाही,” असा इशारा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
मा. बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू असून, विविध क्षेत्रातील कलाकार, रंगकर्मी आणि कलाप्रेमी आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. दररोज नव्या कलाकारांचा सहभाग असलेले साखळी उपोषण करून हा प्रश्न व्यापक सांस्कृतिक चळवळीच्या स्वरूपात पुढे नेण्याची भूमिका विभागाने घेतली आहे.
प्रमुख मागण्या
राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाने प्रशासनासमोर पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत :
- स्व. बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृहाच्या उद्घाटनाची निश्चित तारीख तातडीने कागदोपत्री जाहीर करावी.
- सन २०१४ पासून आजपर्यंतच्या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च, निर्णय, कामे आणि विलंब यासंदर्भातील श्वेतपत्रिका जाहीर करावी.
- कंत्राटदारांना देण्यात आलेल्या सर्व मुदतवाढीचा तपशील जाहीर करून विलंबाबाबत कारवाई झाली आहे की नाही, हे स्पष्ट करावे.
- विलंबामुळे झालेल्या अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर उत्तरदायित्व ठरवावे.
- सुमारे २ कोटी रुपयांपासून २९ कोटी रुपयांपर्यंत खर्च वाढल्यानंतरही ६८.९५ लाख रुपयांच्या नव्या कामाची गरज का निर्माण झाली, याचा सार्वजनिक खुलासा करावा.
“११ वर्षांचा वनवास आता संपलाच पाहिजे!”
“आमचा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कलाकारांच्या हक्कांसाठी आहे. प्रशासनाने तातडीने संपूर्ण माहिती जनतेसमोर मांडून उद्घाटनाची निश्चित तारीख जाहीर करावी. अन्यथा लोकशाही आणि संविधानिक मार्गाने हा लढा अधिक तीव्र व व्यापक करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
“११ वर्षांचा वनवास आता संपलाच पाहिजे!
बालनाट्यगृह सुरू झालेच पाहिजे!
कलाकारांचा आवाज दाबला जाणार नाही!”
अशी ठाम भूमिका विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मांडली आहे.


