पुणे: बालमनाच्या कोऱ्या पाटीवर कल्पनांचे इंद्रधनुष्य उमटवत आणि नव्या पिढीच्या करकमलांत वाचनसंस्कृतीचा तेजोमय दीप सुपूर्द करत जिल्हा परिषद, पुणे आणि अमरेन्द्र भास्कर बालकुमार मराठी साहित्य संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे बालकुमार साहित्य संमेलन 2026′ या सारस्वत महाकुंभाचा पहिला दिवस आज, शुक्रवार, दि.27 नोव्हेंबर 2026 रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अभूतपूर्व उत्साहात, मंगलमय वातावरणात आणि रसिकजनसागराच्या साक्षीने संपन्न झाला.
💥ग्रंथदिंडीचा जयघोष व दिमाखदारशारदास्तवन:
प्रभातीच्या मंगलमय उषाकाली, सकाळी 7:30 वाजता ‘प्रादेशिक मराठी बोली आणि अभिजात भारतीय भाषांचा’ गजर करत निघालेल्या भव्य ग्रंथदिंडीने अवघी कोथरूडनगरी अक्षरमय आणि भक्तीमय झाली. या सारस्वत यात्रेत बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेतील 13 तालुक्यांतील चिमुकल्यांनी अभिजात भाषा व पारंपरिक भाषा वेशभूषेसह सादरीकरण करुन भारतमातेच्या ‘विविधतेतील एकतेचे’ विलोभनीय इंद्रधनुष्य साकारले. विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषा आणि लोकसंस्कृतीचे जिवंत, सप्तरंगी दर्शन घडवणाऱ्या या शब्दांच्या पालखीने रसिकजनांची मने जिंकून घेतली.
त्यानंतर ‘माझी गोष्ट माझे पुस्तक’ या सत्रात ज्येष्ठ बालसाहित्यिक पद्मश्री माधुरी पुरंदरे आणि शिक्षणतज्ज्ञ श्रीमती मंजरी निंबकर यांनी सर्जनशीलतेचे कवडसे उलगडत बालमनांना मंत्रमुग्ध केले.
💥 मान्यवरांच्या उपस्थितीत
उद्घाटन:-
सकाळी 10:30 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. वीरधवल जगदाळे, यशदाचे अतिरिक्त महासंचालक मा. श्री. शेखर गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. सुरेश गोसावी आणि यांच्या *शुभहस्ते सरस्वती पूजन, अजितदादा पवार प्रतिमापूजन आणि ज्ञानदीप प्रज्वलन होऊन या अक्षरोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन पार पडले. यानंतर लोणीकंदच्या बालचमूंच्या सुमधुर ईशस्तवन व स्वागतगीताने रसिकांना मंत्रमुग्ध करत या सोहळ्यात रंगत आणली.
या सारस्वत सोहळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षण व क्रीडा समिती सभापती विवेक वळसे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, प्रकल्प संचालक संतोष हराळे, बालकलाकार कबीर खंदारे यांच्यासह सर्व विषय समिती सभापती, सदस्य व शिक्षणाधिकारी ललिता दहितुले आणि भाऊसाहेब कारेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
मनोगतातून प्रेरणादायी संदेश:
*
कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान व्यक्त करत, “आम्ही बी घडलो… तुम्हीही घडा ना!” असा प्रेरणादायी संदेश दिला.
•शेखर गायकवाड यांनी केवळ टक्केवारीच्या आकडेमोडीत न अडकता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे आवाहन केले.
गजानन पाटील यांनी आगामी नवनिर्मित लोणी काळभोर शाळेत दोन्ही साहित्य संमेलनांतील बालसाहित्य कायमस्वरूपी जतन करून ठेवण्याची आश्वासक ग्वाही दिली.
💥विचारमंथन (परिसंवाद): ज्येष्ठ बालसाहित्यिक सुरेश सावंत, आबा महाजन व चित्रकार प्रियाल मोटे यांनी शब्द आणि रेषांच्या जादुई दुनियेवर बहारदार संवाद साधला. यावेळी सुरेश सावंत यांनी ‘एक बालक, एक शिक्षक आणि एक लेखणी यांच्या सामर्थ्याने जगात नक्कीच अमुलाग्र बदल घडू शकतो,’ असा ठाम विश्वास व्यक्त केला.
आबा महाजन यांनी ‘आपलं बुवा झकास असतं… डोक्याला अभ्यासाचं टेन्शनच नसतं…’ या खुमासदार कवितेने सभागृहात हास्याचे फवारे उडवत उपस्थितांचा ‘वन्समोअर’ मिळवला. सलग पाच वेळा MPSC परीक्षेत अपयश येऊनही जिद्दीने यश मिळवल्याची आणि पुढे त्याच परीक्षेत स्वतःवरच प्रश्न विचारला गेल्याची प्रेरणादायी गाथा सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना ‘पुस्तकांशी मैत्री करण्याचा’ मोलाचा संदेश दिला.
चित्रकार प्रियाल मोटे यांच्या संवादासोबत बालचित्रकारांनीही चित्ररेखाटनाचा मनसोक्त आनंद लुटला. सत्राच्या शेवटी एका बाललेखिकेने ‘लेखकांना गोष्टी कशा सुचतात?’ असा मार्मिक प्रश्न विचारला असता, हा प्रत्येक लेखकाच्या मनातलाच प्रश्न असल्याचे सांगत आबा महाजन यांनी तिचे कौतुक केले व तिला *सस्नेह पुस्तक भेट( दिले.
💥नाट्याविष्कार (‘अलबत्या गलबत्या’): !
रत्नाकर मतकरी लिखित अद्भुत, जादुई आणि अजरामर ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाट्याच्या प्रयोगाने नाट्यगृहात हास्याचे फवारे आणि टाळ्यांचा कडकडाट घडवून आणला.
💥 हृदयसंवाद(साहित्यीकांशी गप्पागोष्टी):-
99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.विश्वास पाटील यांच्याशी रंगलेल्या मैफिलीने अवघे सभागृह विचारांच्या श्रीमंतीने भारावून गेले.
💥 आधुनिक संवादाविष्कार(टेड टॉक/पॉडकास्ट):-
सायंकाळी क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम चित्रपटातील कलाकारांचे पथक,दिग्दर्शक हेमंत ढोमे व सुप्रसिद्ध युट्यूब ब्लॉगर सिद्धेश लोकरे यांच्या चैतन्यदायी संवादाने तरुणाई व बालकुमारांमधे नवा उत्साह संचारला. आणि पहिल्या दिवसाची सांगता अत्यंत जल्लोषात झाली.
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी,संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे व कार्यवाह दिलीप गरुड यांच्या सुबक नियोजनाखाली पहिल्या दिवसाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

