सुतारदरा प्रकरणाला नवे वळण; शेकडो कोटींच्या जमीन व्यवहारावर अक्षय जैन यांचे गंभीर आक्षेप!

Date:

३७ एकर ३८ गुंठे जमीन उच्च न्यायालयाच्या कोर्ट रिसिव्हरच्या प्रतीकात्मक ताब्यात असल्याचा फलक; प्रशासकीय अनियमितता आणि संशयास्पद व्यवहारांवर युवक काँग्रेसची पत्रकार परिषद

पुणे : कोथरूडमधील सुतारदरा येथील टेकडीचे मोठ्या प्रमाणावर झालेले खोदकाम आणि सपाटीकरणाचा ‘माय मराठी’ने उजेडात आणलेला विषय आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी या जमीन प्रकरणाच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेत प्रशासकीय अनियमितता, संशयास्पद व्यवहार आणि गंभीर आक्षेपांकडे करण्यात आलेल्या कथित दुर्लक्षाचा मुद्दा उपस्थित केला आहे. दरम्यान, संबंधित ३७ एकर ३८ गुंठे जमीन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोर्ट रिसिव्हरच्या प्रतीकात्मक ताब्यात असल्याचा फलकही जागेवर लावण्यात आला आहे.

शुक्रवारी पुण्यातील पत्रकार भवन येथे अक्षय जैन यांनी पत्रकार परिषद घेतली. शेकडो कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या जमीन प्रकरणातील प्रशासकीय अनियमितता आणि संशयास्पद व्यवहारांबाबत पुरावे व कागदपत्रे सादर करण्याचे त्यांनी पत्रकार परिषदेच्या निमंत्रणातून जाहीर केले होते.

‘माय मराठी’ने यापूर्वीच उजेडात आणली होती टेकडीची दुरवस्था

कोथरूडमधील सुतारदरा परिसरातील सर्व्हे क्रमांक ११३ येथील टेकडीवर मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले खोदकाम आणि सपाटीकरण ‘माय मराठी’ने यापूर्वीच उजेडात आणले होते. टेकडीच्या विद्रुपीकरणाची छायाचित्रे प्रसिद्ध करून महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते.एवढेच नव्हे तर या टेकडी फोदिबब्त पोलिसात गुन्हा का नाही दाखल करत असा सवाल महापालिकेला करत कायम धारेवर धरले . स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनीही लवकरच गुन्हा दाखल होईल असे वारंवार सांगितले आहे . आता या जमिनीशी संबंधित न्यायालयीन घडामोडी आणि युवक काँग्रेसने उपस्थित केलेल्या आक्षेपांमुळे प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.

३७ एकर ३८ गुंठे जमिनीवर कोर्ट रिसिव्हरचा फलक

सुतारदरा, मौजे कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक ११३/१ आणि ११३/२ मधील सुमारे ३७ एकर ३८ गुंठे जमीन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोर्ट रिसिव्हरच्या प्रतीकात्मक ताब्यात असल्याचा फलक गुरुवारी (२६ नोव्हेंबर) जागेवर लावण्यात येत असल्याचे छायाचित्रातून स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, याच ठिकाणी ‘हिलएज रिअॅल्टी अँड डेव्हलपर्स एलएलपी’ या कंपनीच्या नावाने खासगी मालमत्ता आणि प्रवेशास मनाई असल्याचाही फलक लावण्यात आला आहे.

कपिल सिब्बल यांच्यासह दिग्गज विधिज्ञ न्यायालयात

मध्यमवर्गीय सर्वोदय सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यांनी महाराष्ट्र शासन व इतरांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका क्रमांक ६०९०/२०२६ दाखल केली आहे.

५ नोव्हेंबर २०२६ रोजी न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती.

याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजीव चव्हाण, प्रतिवादी क्रमांक आठ यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आबाद पोंडा, तर प्रतिवादी क्रमांक दहा यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. या सुनावणीवेळी कोथरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम हेही उपस्थित होते.

कपिल सिब्बल यांनी अधिक सूचना घेण्यासाठी आणि सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी मुदत मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने सुनावणी २० नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलत याचिकेतील प्रार्थना कलम ‘डी’नुसार पुढील तारखेपर्यंत अंतरिम दिलासा दिला होता.

महापालिका प्रशासनासमोर अनुत्तरित प्रश्न

या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर टेकडीवरील खोदकामासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? संबंधित जमिनीच्या विकासासंदर्भात महापालिकेने कोणती भूमिका घेतली होती? खोदकामाच्या अनुषंगाने आजवर कोणती कारवाई करण्यात आली? संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

जमिनीच्या मालकीचा न्यायालयीन वाद आणि टेकडीवरील खोदकामाची कायदेशीर वैधता हे स्वतंत्र मुद्दे असले, तरी पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाने आपल्या कार्यवाहीचा संपूर्ण तपशील सार्वजनिक करणे आवश्यक आहे.

‘माय मराठी’ने यापूर्वीच सुतारदरा टेकडीच्या विद्रुपीकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आता युवक काँग्रेसची पत्रकार परिषद आणि जागेवर लागलेला कोर्ट रिसिव्हरचा फलक या नव्या घडामोडींनंतर महापालिका प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री आणि विरोधी पक्षांनी भूमिका स्पष्ट करणे गरजेचे!

सुतारदरा येथील टेकडीवर मोठ्या प्रमाणावर झालेले खोदकाम, सपाटीकरण आणि आता शेकडो कोटींच्या जमीन व्यवहारासंदर्भात उपस्थित झालेले गंभीर आक्षेप पाहता स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री तसेच विरोधी पक्षांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.पुण्याच्या टेकड्या आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी केवळ महापालिका प्रशासनाची नाही, तर लोकप्रतिनिधींचीही आहे. या प्रकरणात स्थानिक लोकप्रतिनिधींनी आजवर कोणता पाठपुरावा केला? प्रशासनाकडे कोणती माहिती मागितली? पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कोणती ठोस पावले उचलली? याची माहिती पुणेकरांना मिळणे आवश्यक आहे.शहराच्या पर्यावरणाशी आणि शेकडो कोटींच्या जमीन व्यवहाराशी संबंधित या गंभीर प्रकरणात सत्ताधारी असोत वा विरोधक, सर्वांनीच आपली भूमिका सार्वजनिक करावी. राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून वस्तुस्थिती पुणेकरांसमोर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. लोकप्रतिनिधींची भूमिका आणि प्रशासनाची कार्यवाही या दोन्हींबाबत पारदर्शकता असणे गरजेचे आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हुतात्मा चौकात लावणीचा मराठमोळा साज; ‘फुलवरा’च्या नायिकांची हुतात्म्यांना मानवंदना!

वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या लावणीसाजाने वेधले लक्ष;...

संभाजीनगरचा रस्ता खरेच मोकळा होणार की कारवाई ठरणार तात्पुरती? महापालिकेच्या भूमिकेकडे पुणेकरांचे लक्ष!

कात्रज, धनकवडी, सहकारनगर आणि बिबवेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये अतिक्रमण कारवाईबाबत...

‘देश संविधानाने चालेल, मनमानीने नाही!’ नागपुरात CJP ची संविधान बचाव रॅली; अभिजीत दिपके यांचा केंद्र सरकारवर घणाघात

संविधान दिनी चार हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग असल्याचा आयोजकांचा...